Sunday, February 7, 2016

स्रोतस सिद्धांत -3

प्रकुपित दोष शरीरात भ्रमण करत असताना जेथे ‘ख-वैगुण्य’ म्हणजे स्रोतसांमध्ये बिघाड झालेला असेल तेथे व्याधी तयार होतो. म्हणजेच दोष हे रोगाचे कारण असले तरी शरीरात नेमक्‍या कोणत्या ठिकाणी रोग होईल हे स्रोतसांच्या दुष्टीवर ठरत असते. व्यवहारात यालाच आपण ‘वीक पॉइंट’ असे म्हणतो. 

आयुर्वेदातील स्रोतस सिद्धांताची माहिती आपण घेतो आहोत. शरीर निरोगी, राहण्यासाठी स्रोतसांचे योगदान महत्त्वाचे असते. तसेच रोग होण्यासाठीसुद्धा स्रोतसांची दुष्टी कारणीभूत असते. 

कुपितानां हि दोषाणां शरीरे परिधावनम्‌ ।
यत्र संगः खवैगुण्याद्‌ व्याधिस्तत्रोपजायते ।।....सुश्रुत सूत्रस्थान

प्रकुपित दोष शरीरात भ्रमण करत असताना जेथे ‘ख-वैगुण्य’ म्हणजे स्रोतसांमध्ये बिघाड झालेला असेल तेथे व्याधी तयार होतो. म्हणजेच दोष हे रोगाचे कारण असले तरी शरीरात नेमक्‍या कोणत्या ठिकाणी रोग होईल हे स्रोतसांच्या दुष्टीवर ठरत असते. व्यवहारात यालाच आपण वीक पॉइंट असे म्हणतो म्हणजे चार व्यक्‍ती पावसात भिजल्या तर त्यातल्या एकाला सर्दी होईल, दुसऱ्याला कंबर दुखू लागेल, तिसऱ्याचा अपचनाचा त्रास होईल आणि चवथ्याला कदाचित काहीही होणार नाही. पावसात भिजण्याने, थंडी वाजण्याने शरीरात वातदोष आणि कफदोष प्रकुपित होत असतात. ज्याची श्वसनसंस्था अशक्‍त असेल त्याला सर्दी होईल, ज्याच्या शरीरात अगोदरपासून वातदोष बिघडलेला असेल त्याची कंबर दुखू लागेल, ज्याची पचनसंस्था अशक्‍त असेल त्याला अपचनाचा त्रास होईल आणि ज्याच्या शरीरात असा कोणताच अशक्‍त पॉइंट नसेल म्हणजेच ज्याच्या स्रोतसात ‘ख-वैगुण्य’ नसेल त्याला काहीच त्रास होणार नाही.
यातून अजून एक गोष्ट लक्षात येऊ शकेल, की दोषांमध्ये थोड्या-फार प्रमाणात चढाव-उतार होणे स्वाभाविक असते. वय, ऋतुकाळ, आहार-आचरण या सर्वांनुसार दोष कमी-जास्त होत असतात, त्यामुळे एका बाजूने दोष प्रकुपित व्हायला नकोत यासाठी दक्ष राहायला हवे, तसे दुसऱ्या बाजूने स्रोतसांमध्ये ख-वैगुण्य तयार होणार नाही याकडेही लक्ष ठेवता यायला हवे.

चरकसंहितेनुसार तेरा स्रोतसांचे ‘मूल’ काय असते आणि ते स्रोतस बिघडले तर शरीरावर कोणकोणती लक्षणे उत्पन्न होतात हे आपण पाहू.
१. प्राणवह स्रोतस

मूल -
तत्र प्राणवहानां स्रोतसां हृदयं मूलं महास्रोतश्‍च ।
...चरक विमानस्थान
हृदय आणि महास्रोत म्हणजे मुखापासून ते गुदापर्यंतचा भाग हे प्राणवहस्रोतसाचे मूळ होत.

स्रोतसदुष्टीची लक्षणे -
अतिसृष्टम्‌ अतिबद्धं कुपितं अल्पाल्पम्‌ अभीक्ष्णं वा सशब्दशूलम्‌ उच्छवसन्तं दृष्ट्‌वा  प्राणवहान्यस्य स्रोतांसि प्रदुष्टानि विद्यात्‌ । ...चरक विमानस्थान
-  श्वास फार जोराने चालू होणे.
-  बांधल्यासारखा किंवा कोंडल्यासारखा वाटणे. 
-  कुपित झाल्यासारखा म्हणजे जोराजोराने आणि अनियमित गतीने घेतला जाणे.
-  थोडा थोडा घेतला जाणे किंवा बाहेर पडणे, दीर्घश्वसन करता न येणे.
-  जलद गतीने सुरू होणे. 
-  श्वास घेताना आवाज होणे.
-  श्वासोच्छ्वास करताना वेदना होणे.
अशी लक्षणे ज्या व्यक्‍तीत दिसतील त्याचे प्राणवहस्रोतस बिघडले आहे असे समजावे.

प्राणवह स्रोतसामध्ये बिघाड होण्याची कारणे -
क्षयात्‌ संधारणात्‌ रौक्ष्यात्‌ व्यायामात्‌ क्षुधितस्य च ।
प्राणवाहिनी दुष्यन्ति स्रोतांस्यन्यैश्‍च दारुणैः ।। 
...चरक विमानस्थान
  शरीरातील धातूंची झीज झाल्याने
  मल, मूत्र, अधोवायू वगैरे नैसर्गिक आवेगांना जबरदस्तीने अडवून ठेवण्याने
  शरीरात रुक्षता वाढल्याने
  भूक लागलेली असताना भूक न शमवता व्यायाम करण्याने
  स्वशक्‍तीचा विचार न करता इतर कोणतेही श्रमकारक, कठोर काम करण्याने प्राणवहस्रोतसात बिघाड उत्पन्न होऊ शकतो. 

पुढच्या वेळेला आपण अन्नवह, उदकवह वगैरे इतर स्रोतसांची माहिती घेऊ या.

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad