Sunday, February 7, 2016

स्रोतस सिद्धांत -4

उदक म्हणजे पाणी, शरीरातील एकंदर जलतत्त्व. शरीर पंचमहाभूतांपासून तयार झालेले असले तरी त्यातील जलतत्त्वाचे योगदान खूप महत्त्वाचे असते. आधुनिक शास्त्रानेही हे स्वीकारलेले आहे. म्हणूनच अन्नापेक्षा अधिक गरज पाण्याची असते. सतत कोरडे अन्न खाण्याने किंवा रुक्ष गुणाचे अन्न सेवन करण्याने, तसेच तहान लागूनही पाणी न पिण्याने उदकवहस्रोतसात दोष उत्पन्न होऊ शकतो. 


आपण आयुर्वेदातील स्रोतसांची माहिती घेतो आहोत. मागच्या वेळी प्राणवहस्रोतसाचे मूळ, ते बिघडले असता उद्‌भवणारी लक्षणे आणि बिघाडामागची कारणे काय असतात हे बघितले होते. आता आपण यापुढच्या स्रोतसांविषयी जाणून घेणार आहोत. 

उदकवहस्रोतस 
उदक म्हणजे पाणी, शरीरातील एकंदर जलतत्त्व. शरीर पंचमहाभूतांपासून तयार झालेले असले तरी त्यातील जलतत्त्वाचे योगदान खूप महत्त्वाचे असते. आधुनिक शास्त्रानेही हे स्वीकारलेले आहे. म्हणूनच अन्नापेक्षा अधिक गरज पाण्याची असते. 
मूल - उदकवहानां स्रोतसां तालुमूलं क्‍लोम च ।....चरक विमानस्थान 
मुखाच्या आत असणारा टाळू आणि क्‍लोम (या शरीररचनेची परिभाषा निश्‍चित नाही. काही विद्वानांनी याचा अर्थ श्वासनलिका असा घ्यावा, तर काहींच्या मते अग्न्याशय -पॅन्क्रियाज घ्यावा असे म्हटलेले आहे) हे उदकवहस्रोतसाचे मूळ होय. 

स्रोतसदुष्टीची लक्षणे - 
प्रदुष्टानां तु खल्वेषामिदं विशेषविज्ञानं भवति; तद्यथा - जिह्वाताल्वोष्ठकण्ठक्‍लोमशोषं पिपासां चातिप्रवृद्धां दृष्ट्‌वोदकवहान्यस्य स्रोतांसि प्रदुष्टानीति विद्यात्‌ । 
- जीभ, टाळू, ओठ, कंठ, क्‍लोम ही स्थाने अगदी कोरडी पडणे. 
- फार तहान लागणे. पाणी पिऊनही शमत नाही अशी तहान लागणे. 
स्रोतसात बिघाड होण्याची लक्षणे 
औष्ण्यादामाद्भयात्‌ पानादतिशुष्कान्नसेवनात्‌ । 
अम्बुवाहीनि दुष्यन्ति तृष्णायाश्‍चातिपीडनात्‌ ।।.....चरक विमानस्थान 
- उष्णतेशी सातत्याने संपर्कात राहिल्याने उदा. उष्ण गुणाचे अन्न सेवन करणे, उन्हात फार वेळ राहणे, अग्नीजवळ काम करणे वगैरे. 
- शरीरात आमदोष वाढल्याने 
- भीती वाटल्याने, सातत्याने भीतीच्या अमलाखाली राहण्याने 
- मद्यपान अतिप्रमाणात करण्याने 
- सतत कोरडे अन्न खाण्याने किंवा रुक्ष गुणाचे अन्न सेवन करण्याने 
- तहान लागूनही पाणी न पिण्याने उदकवहस्रोतसात दोष उत्पन्न होऊ शकतो. 

अन्नवहस्रोतस 
यालाच महास्रोतस असेही म्हणतात. 
मूल - अन्नवहानां स्रोतसां आमाशयो मूलं वामञ्च पार्श्वम्‌ । 
आमाशय (अन्न सेवन केल्यानंतर लगेचच जेथे साठवले जाते तो अवयव) आणि डाव्याबाजूची कूस हे अन्नवहस्रोतसाचे मूळ होय 
स्रोतसदुष्टीची लक्षणे 
प्रदुष्टानां तु खल्वेषामिदं विशेषविज्ञानं भवति; तद्यथा - अनन्नाभिलषणमरोचकाविपाकौ छर्दिं च दृष्ट्‌वाऽन्नवहान्यस्य स्रोतांसि प्रदुष्टानीति विद्यात्‌ । 
- अन्न सेवन करण्याची इच्छा न होणे 
- तोंडाला चव न राहणे, तसेच काही खाल्ले तर त्याची चव न समजणे 
- पचनक्रिया व्यवस्थित न होणे 
- उलट्या होणे 
स्रोतसात बिघाड होण्याची कारणे 
अतिमात्रस्य चाकाले चाहितस्य च भोजनात्‌ । 
अन्नवाहीनि दुष्यन्ति वैगुण्यात पावकस्य च ।।....चरक विमानस्थान 
- अति प्रमाणात (भूक लागलेली असेल त्यापेक्षा अधिक प्रमाणात) जेवण करण्याने 
- अवेळी जेवण करण्याने 
- अहितकर म्हणजे स्वतःच्या प्रकृतीला प्रतिकूल किंवा शिळे, जुने, खराब झालेले अन्न सेवन करण्याने 
- जाठराग्नीमध्ये बिघाड झाल्याने अन्नवहस्रोतसांत दोष उत्पन्न होत असतो 
यापुढे सात धातूंची सात स्रोतसे समजावली आहेत, त्यांची माहिती आपण पुढच्या वेळी घेऊ. 

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad