Thursday, December 10, 2009

रसायन

रसायनसेवनाने शरीरशक्‍ती वाढली, धातूंची तसेच एकंदरच हृदय-मेंदू वगैरे महत्त्वाच्या अवयवांची कार्यक्षमता वाढली आणि त्यायोगे पुरुषार्थ साध्य होऊ शकला, की त्यातून आपोआपच फायदे होतात. आरोग्यपूर्ण, यशस्वी आणि सुखसंतोषाने परिपूर्ण आयुष्य जगायचे असले, तर त्यासाठी आयुर्वेदोक्‍त रसायनांना, त्यातही शास्त्रोक्‍त पद्धतीने व संस्कारांनी सिद्ध केलेल्या रसायनांना पर्याय नाही.- डॉ. श्री बालाजी तांबे.आ युर्वेदाच्या आठ अंगांपैकी एक महत्त्वाचे अंग म्हणजे रसायन. रसायन हे आयुर्वेदशास्त्राचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य होय.
शस्तानां रसादीनां सप्तधातूनां लाभोपायः ।...चरक चिकित्सास्थान
विशुद्ध, संपन्न रसादी धातूंचा लाभ होण्यासाठीचा उपाय म्हणजे रसायन.
आरोग्याचे रक्षण होण्यासाठी तसेच रोगातून बरे होण्यासाठी दोष संतुलित राहणे जितके महत्त्वाचे तितकीच धातूंची संपन्नताही आवश्‍यक असते. असंतुलित दोष रोगांचे कारण असतात, पण रोग उत्पन्न होतात धातूंच्या आश्रयाने. मुळात जर धातू सारवान, सशक्‍त व कणखर असतील, तर सहजासहजी रोग होत नाही. झाला तरी त्याला फार वेळ थारा मिळू शकत नाही. म्हणूनच आयुर्वेदामध्ये रसायनांबद्दल सांगितले आहे.
जराव्याधिनाशकमौषधम्‌ रसायनम्‌ । स्वस्थस्य ओजस्करं यत्तु तद्‌ वृष्यं तद्‌ रसायनम्‌ ।...चरक विमानस्थान
म्हातारपण टाळणारे आणि व्याधींचा नाश करणारे औषध म्हणजे रसायन होय. निरोगी व्यक्‍तीच्या मनाची तसेच तनाची तुष्टी, पुष्टी व उत्साह वाढविणारे ते रसायन होय.
रसायनांचे फायदे आयुर्वेदात या प्रकारे सांगितले आहेत,
दीर्घमायुः स्मृतिं मेधां आरोग्यं तरुणं वयः । प्रभावर्णस्वरौदार्य देहेन्द्रियबलं परम्‌ ।।
वाक्‌सिद्धिं प्रणतिं कान्तिं लक्षते ना रसायनात्‌ ।...चरक चिकित्सास्थान
रसायनाचे सेवन करण्याने मनुष्यास दीर्घायुष्य, स्मृती, मेधा, आरोग्य, तारुण्य, प्रभा, उत्तम वर्ण, स्वर, मानसिक औदार्य, उत्तम शरीरबल, श्रेष्ठ इंद्रियशक्‍ती या सर्व गुणांचा लाभ होतो. रसायनांच्या सेवनामुळे वाणीला सिद्धी प्राप्त होते, सतेज कांतीचाही लाभ होतो.
सध्याच्या प्रचलित भाषेत सांगायचे तर रसायनांच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्‍ती उत्तम राहते, रोगातून पूर्णपणे बरे होण्यासाठी तसेच पुन्हा पुन्हा रोग न व्हावा म्हणूनही रसायनांचा उपयोग होतो. रसायनांमुळे स्टॅमिना चांगला राहतो, काम करण्यास उत्साह येतो. नवीन कल्पना सुचण्यास मदत मिळते, शारीरिक व मानसिक ताण सहन करण्याची क्षमता उत्पन्न होते.
आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये रसायनसेवनाचे दोन प्रकार सांगितले आहेत,
र्कुटीप्रावेशिक रसायन
कुटीप्रवेशेन यत्‌ क्रियते तत्‌ कुटिप्रावेशिकम्‌ ।.
...चरक चिकित्सास्थान
जे विशेष कुटीत राहून केले जाते ते कुटीप्रावेशिक रसायन.
र्वातातपिक रसायन
वातातपिकसेवयो।पि यत्‌ क्रियते तद्‌ वातातपिकम्‌ ।
...चरक चिकित्सास्थान
वारा, ऊन यांचे सेवन करत असतानाही जे सेवन केले जाते ते वातातपिक रसायन.
कुटीप्रावेशिक रसायन सेवन करताना मनुष्य त्याचा सामान्य आहार-विहार करू शकत नाही. कारण त्या दरम्यान त्यास अनेक कडक नियमांचे पालन करावे लागते. परंतु वातातपिक रसायन सेवन करताना मनुष्य आपला रोजचा व्यवहार करू शकतो (म्हणजे वाऱ्यात वा उन्हात जाऊ शकतो).
तयोः श्रेष्ठतरः पूर्वो विधिः स तु सुदुष्करः । ..चरक चिकित्सास्थान
या दोन्ही प्रकारांतील कुटीप्रावेशिक रसायनाचा विधी श्रेष्ठ आहे, परंतु कठीण आहे. त्यामुळे सर्व जण हा विधी करू शकतीलच असे नाही. परंतु वातातपिक रसायन सर्वसामान्य मनुष्यही करू शकतो.
रसायनाचा फायदा मिळविण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्यायला हव्यात. एक म्हणजे रसायन शास्त्रोक्‍त पद्धतीने, उत्तम वीर्यवान द्रव्यांनी व्यवस्थित बनविलेले असायला हवे आणि दुसरे म्हणजे रसायन सेवनापूर्वी शरीरशुद्धी करून घ्यायला हवी. शरीरशुद्धीचे महत्त्व पटवण्यासाठी अतिशय चपखल उदाहरणही आयुर्वेदाने दिलेले आहे.
नाविशुद्धशरीरस्य युक्‍तो रासायनो विधिः। न भाति वाससि क्‍लिष्टे रंगयोग इवाहितः ।।...सुश्रुत रसायनस्थान
ज्याप्रमाणे मळलेल्या वस्त्रावर रंग राहत नाही, त्याप्रमाणे शरीरशुद्धी झाल्याशिवाय रसायनांचा फायदा होत नाही.
अर्थातच या ठिकाणी शरीरशुद्धी केवळ पोट साफ होण्यापुरती मर्यादित नाही, तर स्नेहन-स्वेदन करून शास्त्रोक्‍त पद्धतीने विरेचनादी विधी करून घेणे अपेक्षित आहे. चरकसंहितेमध्ये रसायनयोग सांगण्यास सुरुवात करण्यापूर्वीच विरेचनासाठी हरितक्‍यादी प्रयोग सांगितला आहे. योग्य प्रकारे शरीरशुद्धी झाली की पथ्यपूर्वक राहून वय, प्रकृती, सात्म्यता यांचा सर्व बाजूंनी विचार करून रसायनाचा प्रयोग सुरू करावा, असेही सांगितले आहे.
यथास्थूलमनिर्वाह्य दोषान्‌ शारीरमानसान्‌ । रसायनगुणैर्जन्तुर्युज्यते न कदाचन ।।
योगा ह्यायःप्रकर्षार्था जरारोगनिबर्हणाः । शरीरशुद्धानां सिध्यन्ति प्रयतात्मनाम्‌ ।।...चरक चिकित्सास्थान
शारीर व मानसदोषांना दूर न करता म्हणजेच पंचकर्म न करता रसायनांचे सेवन जी व्यक्‍ती करते त्यास रसायनांचा लाभ होत नाही.
म्हणूून मनावर ज्यांचा काबू आहे अशा शरीर व मनाची शुद्धी केलेल्यांनी आयुष्य वाढविण्यासाठी व म्हातारपण, तसेच रोग नष्ट करण्यासाठी रसायनाचे सेवन करावे.
मन ज्यांच्या अधीन नाही त्यांना रसायन सांगू नये. तसेच जे आळशी, श्रद्धाहीन व कष्ट न करता फळाची अपेक्षा ठेवणारे आहेत व जे रसायन औषधींसंबंधी आदर बाळगत नाहीत अशांना रसायन सांगू नये, असेही आयुर्वेदात स्पष्ट केलेले आहे.
रसायन बनविण्यासाठी वापरण्यात येणारी द्रव्ये कशी असावीत, हेही याप्रमाणे सांगितले आहे.
आपूर्णरसवीर्याणि काले काले यथाविधि । आदित्यपवनच्छायासलिलप्रीणितानि च ।। .चरक चिकित्सास्थान
रसायनासाठी वापरायची औषधे पूर्ण रस व वीर्याने युक्‍त असावीत व त्या त्या योग्य काळात तयार झालेली असावीत. सूर्य, वारा, सावली, पाणी यांनी त्यांचे पोषण झालेले असावे. औषधे पक्षी, किडे यांनी खाल्लेली, सडलेली, खराब झालेली नसावीत व त्यांना कुठल्याही प्रकारचा रोग झालेला नसावा. अशी औषधे व फळे रसायनासाठी उत्तम समजावीत.
रसायन गुणधर्मांनी युक्‍त अशा अनेक वनस्पती आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत. आवळा, हिरडा, गुडूची, डुक्करकंद, पिंपळी, शतावरी, अश्‍वगंधा, गोक्षुर, ब्राह्मी, शंखपुष्पी, पुनर्नवा वगैरे वनस्पती स्वभावतःच रसायन गुणांनी युक्‍त असतात. क्वचित काही रसायनांचे योग असे आहेत की ज्यात एकच वनस्पती वापरलेली आहे. पण बहुतेक सर्व रसायने बऱ्याच द्रव्यांपासून बनवली जातात व रसायने बनविण्याची विशिष्ट पद्धत असते. रसायनांच्या पाठात सांगितलेली सर्व घटकद्रव्ये नुसती एकत्र मिसळली की रसायन तयार झाले असे नसते तर योग्य क्रमाने, योग्य संस्कार करत क्रमाक्रमाने रसायन बनवले तरच त्या रसायनाचा खरा गुण येतो. उदाहरणादाखल चरकसंहितेत सांगितलेल्या ब्राह्मरसायनाची कृती पाहू.
पञ्चानं पञ्चमूलानां भागान्‌ दशपलोन्मितान्‌ । हरितकी सहस्रं च त्रिगुणामलकं नवम्‌ ।।
विदारीगन्धां ...... सर्वं घृतभाजने ।।...चरक चिकित्सास्थान
पाच पंचमुळे प्रत्येकी दहा पल (400 ग्रॅम) घेऊन दहा पट पाण्यात काढा करावा व एक दशमांश उरल्यावर गाळून घ्यावा.
पंच पंचमुळे अशी,
1. विदारीकंद, बृहती, पिठवण, कंटकारी, गोक्षुर
2. बिल्व, अग्निमंथ, श्‍योनाक, काश्‍मरी, पाटला
3. पुनर्नवा, मुद्गपर्णी, माषपर्णी, बला, एरंड
4. जीवक, ऋषभक, मेदा, जीवंती, शतावरी
5. शर, उसाचे मूळ, दर्भ, कास, तांदूळ मूळ
ही सर्व द्रव्ये प्रत्येकी दोन - दोन पल (80-80ग्रॅम) घेऊन वर सांगितल्यानुसार काढा करावा.
1000 हिरडे व 3000 आवळे शिजवून त्यातील बिया व रेषा काढून तयार झालेला कल्क वरील काढ्यात टाकावा व शिजविण्यास सुरुवात करावी व त्यावेळेसच खालील चूर्णे टाकावीत.
मंडूकपर्णी, पिंपळी, शंखपुष्पी, नागरमोथा, वावडिंग, चंदन, अगरू, ज्येष्ठमध, हळद, वेखंड, नागकेशर, वेलची, दालचिनी प्रत्येकी चार पल (160 ग्रॅम) टाकावे,
त्यात खडीसाखर 1100 पल (44 किलो) टाकावी.
तिळाचे तेल दोन आढक (5.12 किलो) व तूप तीन आढक (7.68 किलो) व वरील मिश्रण हे सर्व तांब्याच्या कढईत मंद अग्नीवर एकत्र शिजवावे व थंड झाल्यावर त्यात 1.5 आढक (3.84 किलो) मध टाकावे. सर्व नीट एकत्र करून तुपाने राबलेल्या पात्रात नीट साठवून ठेवावे.
तिष्ठेत्‌ संमूच्छितं तस्य मात्रा काले प्रयोजयेत्‌ । न चोपरुन्ध्याद्‌ आहारमेकं मात्रां जरां प्रति ।।
षष्टिकः पयसा चात्र जीर्णे भोजनमिष्यते ।।....चरक चिकित्सास्थान
रसायनकाळी हे औषध अशा मात्रेत घ्यावे ज्याने आहाराला अडथळा येणार नाही, म्हणजेच योग्य वेळी भूक लागेल व भूक लागल्यावर म्हणजेच रसायन पचल्यावर साठेसाळीचा भात व दूध एवढाच हार घ्यावा. या ब्राह्मरसायनाच्या सेवनाने वैखानस, वालखिल्य वगैरे तपस्वी अमित काळ जगले. शिवाय त्यांचे जीर्ण शरीर जाऊन त्यांना तरुण शरीराचा लाभ झाला. तंद्रा, क्‍लम, श्‍वासादी रोगांपासून मुक्‍त होऊन त्यांना उत्तम मेधा, स्मृती, बल यांची प्राप्ती झाली व त्यांनी अत्यंत श्रद्धेने ब्राह्मतप व ब्रह्मचर्याचे पालन केले.
च्यवनप्राशही च्यवनऋषींना पुन्हा तारुण्य मिळवून देण्यासाठी सांगितला गेला होता. रसायनांमुळे आरोग्य, तारुण्य व सतेजतेचा तर लाभ होतोच पण एकदा ऐकलेले लक्षात राहू शकणे, गरुडासारख्या तीक्ष्ण दृष्टीचा लाभ होणे, अलक्ष्मीचा नाश होणे, राजा वश होणे, भाग्यवृद्धी होणे यासारखे फायदे होतात असेही आयुर्वेदात सांगितलेले आहे. मुळात रसायनसेवनाने शरीरशक्‍ती वाढली, धातूंची तसेच एकंदरच हृदय-मेंदू वगैरे महत्त्वाच्या अवयवांची कार्यक्षमता वाढली आणि त्यायोगे पुरुषार्थ साध्य होऊ शकला की त्यातून या प्रकारचे फायदे आपोआपच होत असावेत. थोडक्‍यात आरोग्यपूर्ण, यशस्वी आणि सुखसंतोषाने परिपूर्ण आयुष्य जगायचे असले तर त्यासाठी आयुर्वेदोक्‍त रसायनांना, त्यातही शास्त्रोक्‍त पद्धतीने व संस्कारांनी सिद्ध केलेल्या रसायनांना पर्याय नाही.
- डॉ. श्री बालाजी तांबे
--

Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

3 comments:

 1. Rasayna cha lekh vachala, manala patle hi pan tumhi jya gosti vapraylya sangitya aahe tya milnar kuthe??? aani javun purches kelyach tar tich kahri muli aahe he kase aolkhave ekhadya veles dukandar fasvu shakto. tya mule tumchi swathachi kahi products astil tar plz kalvave.
  ha blog awdla barichsi AYURVEDA baddel mahiti milali.

  ReplyDelete
 2. mala hey rasayn karayche aahe maze mr. keral che aslya mule tithe hey sagl uplabdh hoyilch pan tumhi je praman sangitle aahe tyat kiti banel rasayan?? aani kiti diwas tyache sevan karave??? kontya rutut banwawe?? kontya veles ghyave??

  ReplyDelete
 3. Dr Balaji Tambe yanchya medicine store madhe nakki miltil aushadhe

  ReplyDelete

ad