Monday, August 29, 2011

'निसर्गाशी हातमिळवणी' - हरितालिका

'हरि' म्हणजे निसर्ग व "तालिका' म्हणजे हातमिळवणी, म्हणून हरितालिका व्रताचे आचरण म्हणजे निसर्गनियमांचे पालन करणे होय. भारतीय संस्कारात हरितालिकेचे पूजन ही परंपरा चालू ठेवण्यामागे असलेली संकल्पना अशी आहे, की प्रत्येक स्त्रीला इच्छित व मनासारखा पती मिळविण्याचा हक्क असतो आणि त्यासाठी तिला काही तपश्‍चर्या करावी लागते. आपल्या आवडीचा किंवा आपल्याला शोभेसा मुलगा मिळेपर्यंत कामशक्‍तीवर विजय मिळविणे आणि धीर धरून तपश्‍चर्या करून "मिळाला तर तोच मुलगा, अन्यथा कुमारिका राहणे परवडले' अशा तऱ्हेचा विश्‍वास दाखविणारी ही पूजा.

स्त्री व पुरुष ही जोडी एकत्र आल्याशिवाय विश्‍वाचे चक्र फिरू शकत नाही. यासाठी निसर्गाने एक मोठा चमत्कार घडवून केवळ मनुष्यमात्राच्याच नव्हे, तर सर्व प्राणिमात्रांच्या पेशी-पेशीमध्ये कामशक्‍तीचे प्राबल्य आणि विरुद्ध लिंगाचे आकर्षण पेरून ठेवले आहे. पुरुष व स्त्री एकमेकांसमोर आले नाहीत तरी कामशक्‍तीचे प्राबल्य त्याला मिलनासाठी उद्युक्‍त करत राहते. विरुद्धलिंगी आकर्षण असल्यामुळे सहवास घडला तर एकत्र यावे व निसर्गचक्राला गतिमान करावे, ही इच्छा झाल्याशिवाय राहत नाही. स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन मुलाला जन्म दिला तरच निसर्गचक्र गतिमान राहते असे नव्हे. हा संपूर्ण विश्‍वपसारा चालण्यासाठी, या जगतातील मानवतेला उत्कर्ष, सुखसमाधान व आनंद मिळण्यासाठी मूळ घटक आहे कुटुंब. ब्रह्मचर्याश्रमानंतर गृहस्थाश्रम, त्यानंतर वानप्रस्थाश्रम व त्यानंतर संन्यासाश्रम अशी योजना ओळखून भारतीयांनी त्याची व्यवस्था केली.

ज्ञानसाधना, वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक, मानसिक व इतर शक्‍ती मिळविणे यासाठी असतो पहिला ब्रह्मचर्याश्रम. विश्‍व चालण्यासाठी ज्या चार चाकांची आवश्‍यकता आहे त्यातील एक चाक म्हणजे ब्रह्मचर्याश्रम. दुसरे चाक गृहस्थाश्रम. या काळात स्त्री व पुरुष एकत्र राहतात आणि समाजाची मुहूर्तमेढ रोवतात किंवा त्या ठिकाणी समाजधारणेची पहिली सुरवात करतात. शिवाय ब्रह्मचर्यातील मुलांसाठी व्यवस्था करणे आणि गरजवंतांना, वैज्ञानिकांना, आवश्‍यकता असेल अशा अतिथींना आश्रय देण्यासाठी, भगवंतांची उपासना करून परमेश्‍वराशी ऐक्‍यभाव साधण्यासाठी अध्यात्ममार्गावर असणाऱ्या संन्याशांना, साधूंना आश्रय देणे, त्यांची व्यवस्था करणे, हेही गृहस्थाश्रमींचेच काम होय. गृहस्थाश्रम नसला तर ब्रह्मचर्याश्रम किंवा वानप्रस्थाश्रम अस्तित्वात राहू शकणार नाहीत. गृहस्थाश्रमामुळेच निसर्गाचे संतुलन, नद्या, नाले, पर्वत, एकूणच पर्यावरणाचे रक्षण होऊ शकते. तसेच गृहस्थाश्रमामुळेच मनुष्येतर प्राण्यांचे संरक्षण होते व त्यांना त्यांच्या जीवनाचा अर्थ सापडण्यासाठी मदत केलेली दिसून येते.

स्त्री-पुरुषांनी एकत्र येणे, त्यांनी गृहस्थाश्रम सुरू करणे यासाठी वैयक्‍तिक, सामाजिक व नैतिक पातळीवर जो विधी पार पाडला जातो, त्याला "लग्न' म्हणतात. लग्नाची इच्छा असणारे, आवश्‍यकता असणारे स्त्री-पुरुष हे "उपवर' म्हणून ओळखले जातात. प्रत्येक पुरुषाला असे वाटते, की गृहलक्ष्मी भाग्यवान असावी, तिने संपत्ती बरोबर आणायची आवश्‍यकता नाही, तर तिच्या पावलाने लक्ष्मी घरात यावी; निसर्गचक्राला मदत करण्यासाठी तिला मुलाबाळांची व साहजिकच इतर नातेवाइकांची आवड असावी; त्यांची ऊठ-बस करण्यात आनंद मानणारी असावी. ती सुंदर, देखणी, गोरीपान असावी; तिला अनेक कला अवगत असाव्यात व मुख्य म्हणजे ती प्रेम करणारी असावी. भरदार बाहू असलेला, अत्यंत उमदा व देखणा, कर्तृत्ववान, धाडसी, शूर, श्रीमंत, समाजात चांगले स्थान असणारा किंवा पुढे मिळवू शकणारा, असा वर आपल्याला मिळावा, तो पत्नीवर अतोनात प्रेम करणारा असावा, अशी प्रत्येक उपवर मुलीची इच्छा असते. इतर प्राणिमात्रांच्या बाबतीत ही सर्व भानगड नसते. ताकदवान प्राणी आपल्या जातीच्या मादीवर हक्क गाजवतो. प्राण्यांमध्ये नर-मादी यांच्या जोड्या बदलत राहतात. स्थळ-काळाचे बंधन न ठेवता निसर्गचक्राला गतिमान ठेवतात. पुढे होणाऱ्या मुलाबाळांची कसलीही जबाबदारी न घेता नुसते कामशक्‍तीला वाट करून देतात, म्हणूनच त्यांना पशू म्हटले जाते. हरितालिका व्रतात पार्थिव लिंगाची पूजा करणाऱ्या सखीसह पार्वतीपूजन अभिप्रेत आहे. "हरि' म्हणजे निसर्ग व "तालिका' म्हणजे हातमिळवणी, म्हणून हरितालिका व्रताचे आचरण म्हणजे निसर्गनियमांचे पालन करणे होय. भारतीय संस्कारात हरितालिकेचे पूजन ही परंपरा चालू ठेवण्यामागे असलेली संकल्पना अशी आहे, की प्रत्येक स्त्रीला इच्छित व मनासारखा पती मिळविण्याचा हक्क असतो आणि त्यासाठी तिला काही तपश्‍चर्या करावी लागते. आपल्या आवडीचा किंवा आपल्याला शोभेसा मुलगा मिळेपर्यंत कामशक्‍तीवर विजय मिळविणे आणि धीर धरून तपश्‍चर्या करून "मिळाला तर तोच मुलगा, अन्यथा कुमारिका राहणे परवडले' अशा तऱ्हेचा विश्‍वास दाखविणारी ही पूजा. भगवान शंकरांना मिळविण्यासाठी पार्वतीने हे व्रत केले. हे व्रत जवळजवळ एकतर्फी असते. ज्या वेळी मुलगा व मुलगी, दोघांनाही हाच वा हीच माझी साथीदार आहे असे पटलेले असते तेव्हा गोष्ट सोपी असते; परंतु भगवान शंकरांना प्रसन्न करून घेऊन त्यांना विवाहासाठी उद्युक्‍त करून त्यांच्याशी लग्न करून राहायचा पर्वतकन्या पार्वतीने निश्‍चय करून केलेली तपश्‍चर्या म्हणजे हरितालिका. वर निवडण्याचा व पसंतीचा पहिला हक्क हा स्त्रीचाच असतो, म्हणून या व्रतात स्त्रीला मुख्य भूमिका मिळालेली दिसते. सध्याच्या जगात अशा तऱ्हेच्या विचारांची खरोखरच आवश्‍यकता आहे.

लग्न हे दोन सुसंस्कृत स्त्री-पुरुषांमध्ये व्हावे, त्यांच्या आवडी-निवडी, शिक्षण, सामाजिक प्रतिष्ठा वगैरे सर्व एवढे जुळणारे असावे, की एकदा जुळलेली मने पुन्हा न तुटता जन्मजन्मांतरी हीच शिव-पार्वतीची जोडी राहील. असे झाले तर त्यांना तर आनंद मिळेलच, परंतु मनुष्यमात्रासाठी काहीतरी केल्याचे श्रेय मिळेल, हे नक्‍की.

स्त्री-पुरुषांच्या बाबतीत निकट शरीरसंबंध किंवा अति खोल मानसिक संबंध संप्रेरकांच्या कार्यात बदल घडवितो. हे संबंध नियमबाह्य असतील तर प्रकृतीवर वाईट परिणाम होऊ शकतो. नुसते उपवर असतानाच नव्हे, तर संपूर्ण तारुण्यावस्थेत शरीरस्वास्थ्य व सौंदर्य टिकून राहणे आवश्‍यक असते. जीवनाचा आनंद घेण्यासाठीची प्रेरणा म्हणजेच सौंदर्य आणि साधन म्हणजे आरोग्यवान शरीर.

भारतीय परंपरेतील हरितालिका व्रत म्हणजे ज्या व्यक्‍तीवर प्रेम असेल, त्याच व्यक्‍तीशी नैतिक व नैसर्गिक मार्गाने एकरूपता साधणे, म्हणजेच लग्न करणे व लग्न होईपर्यंत व्रतस्थ राहणे आणि फक्‍त त्याच व्यक्‍तीशी अंतर्बाह्य पूर्ण समर्पित होणे. बाह्य वातावरणाचा व दिसत नसल्या तरी सूक्ष्म शक्‍तींचा प्रकृतीवर परिणाम होतो, हे विज्ञानसिद्ध आहे. तेव्हा चुकीचा आहार-विहार, व्यक्‍तीचे आकर्षण व संबंध असणे, त्यात होणारे बदल हे नक्कीच आरोग्यावर परिणाम करतील, म्हणून पुढील आयुष्यात सुखाने राहता यावे यासाठी उपवर मुलींनी करावयाचे व्रत म्हणजे "हरितालिका' व्रत.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad