Thursday, July 7, 2011

आहार

"फॅमिली डॉक्‍टर क्‍लब'च्या सदस्यांशी "व्हिडिओ कॉन्फरन्स'द्वारा "आहार कसा असावा, कसा नसावा' यासंबंधी झालेला आरोग्य संवाद...
शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण खूप कमी होत आहे. ते वाढविण्यासाठी आहार कसा असावा?
उत्तर : स्त्रीच्या शरीरात पुरुषांच्या तुलनेत हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असतेच. स्त्रीच्या प्रकृतीला ते धरून आहे. मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव होतो. ते रक्त भरून काढण्यासाठी योग्य आहार घ्यायला हवा अन्यथा हिमोग्लोबिन कमी होते. हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्यामुळे स्त्रीरोग वाढतात. मासिक पाळी वेळेवर न येणे किंवा आधी येणे, गर्भाशयात गाठी होणे, अंगावर जाणे यांसारखे आजार होऊ शकतात आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण आणखी कमी होते. आहारात खजूर किंवा अंजीर असेल तर हिमोग्लोबिनला फायदा होतो.

हिमोग्लोबिन वाढणारे बहुतेक पदार्थ उष्ण आहेत. त्यामुळे खजूर खायचा असेल तर तो तुपासह खायला हवा. बीट, पालक, मेथी याने लोह वाढते. पण शरीराने ते स्वीकारायला हवे. लोह व हिमोग्लोबिन यांचे सात्म्य करणे तेवढेसे सोपे नाही. सततच्या धावपळीमुळे शरीर जर गरम असेल तर अन्नातील हिमोग्लोबिन कमी ओढून घेते. म्हणून शरीरातील, विशेषतः मेंदूतील उष्णता अजिबात वाढता कामा नये. आपण अलीकडे तेलकट, मसाल्याचे तिखट पदार्थही भरपूर खातो, त्यानेही पोटातील उष्णता वाढते. प्रत्येक वस्तूला आपण फोडणी देतो, पोह्यांवर लिंबू पिळतो हे त्यातील धातूंचे शरीरात शोषण व्हावे म्हणून; पण आपण लिंबू पिळण्याऐवजी पोह्यावर दही घालून खातो. त्यामुळे त्याचा शरीराला काही फायदाच मिळत नाही; नुकसान मात्र होऊ शकते. म्हणून शरीरातील उष्णता न वाढवता हिमोग्लोबिन वाढवणारे शांतीरोझसारखे औषध आहारात रोज ठेवावे. पाळी नियमित राहावी यासाठी वैद्यांचे मार्गदर्शन घ्यावे. शतावरी कल्प, च्यवनप्राशही आहारात असू द्यावे. केवळ आहाराने हिमोग्लोबिन वाढत नाही.

नाश्‍ता कधी घ्यावा? दुपारचे व रात्रीचे जेवण कोणत्या वेळी घ्यावे? प्रमाण कसे असावे? रात्री सूर्यप्रकाश नसतो त्याचा अन्नपदार्थांवर परिणाम होतो का?
उत्तर ः नाश्‍ता गरम असावा. दहीवडे, फळे हा नाश्‍ता होऊ शकत नाही. सूर्योदयापूर्वी उठणारा मनुष्य असेल तर सकाळी साडेआठच्या सुमारास नाश्‍ता घ्यावा. जेवढ्या लवकर भरपूर खाऊ तेवढी भूक टिकून राहते. सकाळी कामावर जाण्यापूर्वी दहा वाजता जेवण घेणाऱ्याला वेगळा नाश्‍ता करण्याची गरज नाही. सर्वसाधारण पाच-साडेपाचला वेळ बदलल्याने पित्त वाढते. म्हणून त्या वेळी काहीतरी तोंडात टाकणे आवश्‍यक आहे. म्हणजे पित्त वाढत नाही. नाश्‍ता गरम व भरपूर करावा. त्यापेक्षा जास्त दुपारचे जेवण असावे. रोज एखादे पक्वान्न असावे. दुपारच्या जेवणाच्या अर्ध्याहून कमी रात्रीचे जेवण असावे. मांसाहार रात्री करू नये. सूर्यास्तापूर्वी जेवण घेणे अधिक चांगले. अन्नपचन सोपे होते. अंधार पडल्यानंतर वातावरणातील बॅक्‍टेरियाही वाढतात, अन्नात विकृती येतात. त्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतोच. म्हणून वातावरणातील अग्नी, उष्णता असेपर्यंत जेवण घ्यावे. सूर्यास्तापूर्वी जेवण घेणे सध्या शक्‍य होत नाही. पण सूर्य मावळल्यानंतरही पुढे काही वेळ उष्णता टिकून असते, तोवर जेवण घेता येईल. म्हणजे कार्ला येथे रात्री नऊपर्यंत किंवा पुण्या-मुंबईत रात्री अकरापर्यंत वातावरणातील उष्णता टिकून असते, तोवर तेथे जेवण घ्यायला हरकत नाही.

रोजच्या आहारात सॅलड किती असावे? तसेच फळे खाणे योग्य की फळांचा रस पिणे योग्य असते?
उत्तर ः आहार आठ भागांत विभागता येईल. म्हणजे दोन भाग भात, अर्धा भाग उसळ, अर्धा भाग अन्य भाजी, दीड भाग पोळी, अर्धा भाग आमटी, पक्वान्न दोन भाग असा सात भागांत आहार असेल. त्यानंतर अर्धा भाग सॅलड असावे. म्हणजे चार ते पाच टक्के एवढेच सॅलड खावे. कच्चे अन्न त्याहून अधिक नसावे. ते भरपूर खाल्ले तर त्यानेच पोट भरून जाईल, पण त्यामुळे शरीराची गरज भागणार नाही. पानांची सॅलड असतात त्यावर कोणतीही कीटकनाशक फवारणी केलेली नाही ना, त्याला उग्र वास येत नाही याची खातरजमा करून घ्यावी. काही गोष्टी उकडून, कोशिंबिरी करूनही खाता येतील. बटाटा उकडून त्यावर लोणी, मिरपूड टाकून त्याचे रायते करता येईल. अशा प्रकारे सॅलडमध्ये विविधताही ठेवता येईल.
फळे कापून खाण्याचा फायदा असतो. संत्री, मोसंबी, अननस, फणस अशी फळे वगळता बहुतेक फळे सालीसह खाता येतात. सफरचंदाचा सालासह रस काढला तर हरकत नाही. संत्री, मोसंबी यांचाही रस काढून प्यायला हरकत नाही. मात्र, फळे सकाळी दहानंतर सायंकाळी पाचपर्यंत खावीत. दुधाशी मिसळून कोणतेही फळ खाऊ नका. त्यामुळे मिल्कशेक वगैरे घेऊ नयेत. रात्रीच्या वेळी ज्यूस पिऊ नये. शिकरण खायला हरकत नाही. मात्र त्यात मध किंवा केशर घालून खावे. नुसते केळे दुधात कुस्करून केलेल्या शिकरणाने कफवृद्धी होते. शिकरणही दुपारच्या जेवणात घ्यावे; रात्री घेऊ नये.

रासायनिक खतावरच्या पालेभाज्यांचा शरीरावर दुष्परिणाम होतो का?
उत्तर : अगदीच रेल्वेलाईनच्या शेजारच्या, गटारीच्या पाण्यावर घेतलेल्या पालेभाज्या अजिबात खाऊ नयेत. आळू सांडपाण्यावर घेतला जातो; पण त्याचे पान दीड-दोन फूट उंच असते, तसेच त्यातील दोष काढून टाकण्यासाठी दही-ताक लावले जाते. पण पालक, मेथी या भाज्या जमिनीलगत असतात. त्यांच्याबाबत विशेष काळजी घ्यावी. शुद्ध व ताजी पालेभाजी असावी. जैनधर्मीयांत चातुर्मासात पालेभाज्या खात नाहीत. कारण त्या काळात जंतूसंसर्ग खूप होतो. पालेभाजी आधी मिठाच्या पाण्यात नीट धुवून घ्या. मग चांगल्या पाण्याने पुन्हा धुवून घ्या. त्यामुळे त्यावरील जंतू निघून जातील. भाजी थोडी हातावर कुस्करून वास घ्या. कीटकनाशके फवारलेली असतील व त्याचा अंश त्या पानांमध्ये असेल तर लगेच त्याचा वास येईल. ही भाजी खाण्यास अयोग्य असेल. कोबी, फ्लॉवरमध्ये खत व कीटकनाशके यांचा अंश टिकून राहतो. त्यावर अळ्याही लवकर पडतात. म्हणून या भाज्या शक्‍य तेवढ्या टाळाव्यात.

मेनोपॉजनंतर स्त्रीचा आहार कसा असावा?
उत्तर : रजोदर्शन हा स्त्रीच्या आरोग्याचा दाखला आहे. रजोनिवृत्तीनंतर तिच्यात मानसिक व शारीरिक बदल होतात. तिच्या पेशींना ताजंतवानं करणे, त्या पेशीतील दोष दूर करणे, मानसिक ताण बाहेर टाकणे ही कामे स्त्रीची हार्मोनल सिस्टिम करते. रजोनिवृत्तीनंतर तेच द्रव्य शरीरात साठायला लागतात. मग वजन वाढते, शरीर बेढब दिसू लागते, डोळे खोल जातात, चेहरा काळा दिसू लागतो. शरीरातील विषद्रव्ये, नको असलेली मानसिकता वाहून जाणे बंद झाल्याने हे सारे घडते. त्यामुळे रजोनिवृत्तीनंतर व्यायामाकडे लक्ष द्यावे. आहारात जड द्रव्ये घेऊ नयेत. तेलकट, तळकट पदार्थ, वाटाणा, राजमा, चवळी, वांगे असे वातुळ पदार्थ, मांसाहारात जुने व मोठ्या प्राण्यांचे मांस टाळायला हवे. तसेच शांत करणारे द्रव्य खावे. सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा गुलकंद, शांतीरोज, कुमारी कंपाउंड, अशोकारिष्ट अशी द्रव्ये घ्यावीत. शरीरातील कॅल्शिअम व हिमोग्लोबिन नीट राहील याकडे लक्ष ठेवावे.

नुकतीच बायपास झाली आहे. त्यानंतर शुगर आढळली. शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार कसा असावा? तूप खाऊ नये असे ऍलोपॅथी सांगते, तर आयुर्वेदात तूप खावे असे सांगितले जाते.
उत्तर : या विषयात आयुर्वेदाचे भरपूर संशोधन आहे. हजारो वर्षांचा अनुभव आहे. मी स्वतः पस्तीस वर्षे बृहत्‌वात चिंतामणी, श्‍वासचिंतामणी अशी औषधे देतो. रुग्णांना बरे करतो आहे. कच्च्या दुधावरचे क्रीम काढून तयार केलेले तूप किंवा रसायनांपासून केलेले तूप विकायला येते, ते खाऊ नये. आयुर्वेदिक पद्धतीने, पारंपरिक भारतीय पद्धतीने कढवलेले गाईच्या दुधापासूनचे साजूक तूप दिवसाला सात-आठ चमचे खावे. बायपासनंतर एकदम एवढे तूप खायला सुरवात करू नये. पहिल्यांदा दोन-तीन चमचे तूप खावे. महिन्याभराने त्यात वाढ करीत न्यावी. बायपासचा शॉक म्हणून रक्तात साखर उरते आहे. पण तरीही रोज चमचाभर उसाची पांढरी साखर खायला हवी. बत्ताशाची साखर पचायला अधिक सोपी असते. त्यामुळे दोन चमचे तुपात एक चमचा बत्ताशाची साखर घालून ती खाल्ली तर मधुमेह बरा व्हायला व हृदयाच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरेल. आंबा, अतिप्रमाणात केळी, चिकू, सीताफळ, अल्कोहोल पूर्णतः वर्ज्य करावे. फ्लॉवर, कोबी, चवळी व वाटाणा हेही त्रासदायक ठरणार असल्याने खाऊ नयेत. संध्याकाळचे जेवण एकदम कमी करा. हलका फुलका, सूप खायला हरकत नाही. बायपासला सहा महिने झाल्यानंतर एकदा पंचकर्म करून घ्यावे म्हणजे पुन्हा रक्तवाहिनीत ब्लॉक होणार नाही. मधुमेहासाठी ते योग्य ठरेल.

- डॉ. श्री बालाजी तांबे
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad