Monday, May 23, 2011

खाईन तर 'तुपाशी'

मालविका करकरे ( साभार- साप्ताहिक सकाळ)
 
गरम गरम वरण-भात, लिंबू व त्यावर एक चमचा ताजे साजूक तूप! घी, घृत, मधुर, शीत, कुंभीसर्प, महाघृत अशा अनेक नावांनी तूप प्रसिद्ध आहे. भारत, बांगलादेश, पाकिस्तान यामध्ये तुपाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. तूप हा शब्द मूळ संस्कृत "घृत' या शब्दापासून आला आहे. आपण पूर्वीपासून निरंजन, यज्ञ, होमहवनात तुपाचा वापर करतो. असे मानले जाते, की साजूक तुपाच्या दिव्यामुळे तेथील सूक्ष्म जंतूंचा नाश होतो. याच कारणामुळे यज्ञामध्ये कदाचित तुपाची आहुती देत असत.

भारतात तर अनेक राज्यांमध्ये भरपूर तूप खाल्ले जाते. बंगाल, ओरिसामध्ये भात हा तुपाबरोबरच वाढतात. आपल्याकडेही मोदक, गूळपोळी, पुरणपोळी भरपूर तुपाबरोबरच खाल्ली जाते.

तापविलेले दूध थंड झाल्यावर त्यावरील सायीला विरजण लावले जाते. तयार दही रवीने घुसळून लोणी बाजूला काढतात. हे लोणी जाड बुडाच्या पातेल्यात मंद आचेवर कढविले जाते. 12-15 मिनिटे कढविण्याची प्रक्रिया चालते. तूप तयार झाले, की सोनेरी पिवळा रंग येऊ लागतो. तयार तूप झाकण न ठेवता गार होऊ देतात. तुपावर दुधातले सॉलिड्‌स फोम स्वरूपात तरंगतात. मध्ये स्वच्छ तूप असते व तळाशी बेरीच्या स्वरूपातील दुधातील प्रथिने जमा होतात. ही बेरी साखर घालून मुलांना जरूर खायला द्यावी. थंड तूप अलगद काढून स्टीलच्या अथवा चांदीच्या भांड्यात ठेवावे. तूप बनविताना दुधाच्या सायीपासून ते लोणी कढविण्यापर्यंत अनेक संस्कार केले जातात. म्हणून विरजण, मंथन व अग्निसंस्कारामधून तूप तयार होत असल्याने ते गुणसंपन्न मानले जाते. तुपाचा रंग, स्वरूप, चव ही दुधावर अवलंबून असते. गाईचे व म्हशीचे तूप यातही फरक आढळतो. तुपाचा टिकण्याचा काळ भरपूर असतो. नेहमीच्या तापमानाला तूप हवाबंद डब्यात ठेवले जावे. घरी केलेले तूप स्वस्त तर पडतेच, पण त्याचा दर्जाही चांगला असतो. काही वेळा बाहेरचे तूप कच्च्या दुधापासून घुसळून क्रीम काढून बनवितात.

सर्वश्रेष्ठ तूप
सर्व स्निग्ध पदार्थांत तूप उत्तम मानले जाते. जुने तूप अधिक गुणकारी असते. पण त्याला जर उग्र वास आला तर ते आहारात न वापरता औषध म्हणून वापरतात. तुपामध्ये मुख्यतः संपृक्त स्निग्धे (डर्रीीींरींशव ऋरीीं) आढळून येतात. तुपामध्ये बीटा कॅरोटीन आढळते. तुपातून जीवनसत्त्व अ, ड, ई, क मिळतात- जी "अँटीऑक्‍सिडंट्‌स' मानली जातात. त्यामुळे कुठल्याही आजारात लढण्याची शक्ती प्राप्त होते. तसेच तुपात 4 ते 5 टक्के "लिनोलेरक ऍसिड' आढळते. त्यामुळे मेंदूचे पोषण होते, पचनशक्ती वाढते व डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. तुपामध्ये थोड्या प्रमाणात ओमेगा 3 व ओमेगा 6 स्निग्धाम्ले असतात. त्यामुळे हृदयाचे आजार झाल्यास प्रमाणात तूप खावे. तुपाच्या सेवनाने स्मृती, ग्रहणशक्ती व ताणशक्ती वाढण्यास मदत होते. तुपामधील स्निग्धाम्ले प्रमाणशील असल्याने त्वचेच्या, पेशींच्या व उतींच्या आरोग्यास गुणकारी ठरते. म्हशीच्या, गाईच्या, शेळीच्या, मेंढीच्या दुधापासून तूप बनविले जाते.

तूप सर्वांसाठी सर्वांच्या आहारात रोज घरी बनविलेल्या तुपाचा एक चमचा वापर तरी असावाच. तूप हे वजन वाढविण्यासाठी, बळ येण्यासाठी, प्रतिभा व हिंमत वाढविण्यासाठी आवश्‍यक आहे. मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी तूप गुणकारी आहे. गर्भवती स्त्रीने आहारात रोज दोन चमचे तूप घ्यावे, ज्यामुळे गर्भाचे चांगले पोषण होते व प्रसूतीस त्रास होत नाही.

गरम दूध व तूप घेतल्यास बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. कावीळ असल्यास, क्षय रोगात, रक्तक्षय असल्यास, कर्करोगात आहारात तूप जरूर वापरावे. खूप कष्टकरी लोकांनी, वयोवृद्ध लोकांनी आहारात तूप घ्यावे. त्यामुळे पचन चांगले होण्यास व शक्ती येण्यास मदत होते. हृदयविकार, मधुमेही, अतिरिक्त वाढलेले वजन अशा व्यक्तींनी आहारात तुपाचे सेवन करताना आहारतज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. आहारात तूप योग्य प्रमाणात घेतल्यास तुपाचे स्थान महत्त्वाचे ठरते. आयुर्वेदापासून ते आधुनिक आहारशास्त्रापर्यंत तूप हे स्वयंपाकातील सर्वश्रेष्ठ स्निग्ध आहे.

तूप का खावे?* तूप सर्व स्निग्धात उत्तम आहे.
* स्मृती, ग्रहणशक्ती, ताणशक्ती व बळ वाढविणारे आहे.
* पचनास सहज व सोपे आहे.
* टिकवणकाळ भरपूर असल्याने साठविता येते.
* त्वचेचे, केसांचे आरोग्य चांगले राहते.
* सर्व अवयवांना संरक्षण व भरपूर ऊर्जा मिळते.
* मेंदूला पोषक व शरीराचे तापमान योग्य राखण्यास मदत होते.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad