Monday, May 23, 2011

औषधी संत्रं

कुमुदिनी कुलकर्णी
संत्रं हे मूळ दक्षिण चीनमधील फळ आहे. याची चव आंबट-गोड व रसाळ असते. याचा मोसम वर्षातून दोनदा असतो. याच्या रसामुळे प्रतिकारशक्ती निर्माण होते, म्हणून तो अशक्त, आजारी व लहान मुलांना देतात. संत्र्याचे खूप औषधी उपयोगही आहेत.

आरोग्यासाठी
 • सर्व प्रकृतीच्या लोकांनी संत्र्याच्या रसात गरम पाणी टाकून प्यावं.
 • संत्र्याच्या रसामुळे पोटातील कृमी, पोटशूळ कमी होऊन हाडं मजबूत होतात.
 • श्‍वासनलिकेच्या सुजेवर संत्र्याचा रस गुणकारी आहे.
 • गर्भवती स्त्रीला उलट्यांचा त्रास होत असेल तर आराम वाटण्यासाठी संत्र्याचा रस घ्यावा.
 • गॅस निर्माण होऊन जठर आणि लहान आतड्यात बिघाड निर्माण झाल्यास संत्र्याचा रस घ्यावा. जठर व आतड्याचा मार्ग स्वच्छ होतो व पचनशक्ती सुधारते.
 • संत्र्यामुळे जठराग्नी प्रज्वलित होतो. भूक लागते.
 • 100 ग्रॅम संत्र्यापासून 60 कॅलरी ऊर्जा मिळते.
 • संत्र्यामुळे शरीराची झीज लवकर भरून येते.
सौंदर्यासाठी
 • संत्रासाल वाळवून त्याची पावडर शिकेकाईमध्ये वापरतात.
 • मेंदीत वापरतात. तिला सुगंधी वास येतो.
 • संत्र्याच्या ताज्या सालीपासून पार्लरमध्ये ऑरेंज लोशन नावाचं मसाज क्रीम बनवतात.
 • संत्र्याची साल वाळवून केलेल्या 1 वाटी संत्रा पावडरमध्ये अर्धी वाटी मसूर डाळीचं पीठ व दोन चमचे ज्येष्ठमध पावडर टाकावी. हे मिश्रण एकत्र करून ठेवावं व अंघोळ करताना उटण्यासारखं लावावं. 10 मिनिटांनी ते धुऊन काढावं. लव कमी होते.
 • संत्रा पावडर दुधाच्या सायीत खलून मसाज केल्यास चेहऱ्यावरील काळे डाग, मुरूम नाहीसे होऊन चेहरा गोरा व सतेज दिसू लागतो.
खाण्यासाठी
 • संत्र्याचं सरबत 2 वाट्या संत्र्याचा गर, 2 चमचे खडीसाखर, एक चमचा चाट मसाला हे सर्व साहित्य मिक्‍सरमधून काढून, गाळून, बर्फ टाकून सर्व्ह करावं.
 • संत्रा बर्फी :
500 ग्रॅम खवा, 400 ग्रॅम साखर, 10-12 वेलच्या, चारोळी, बदाम, पिस्ते. संत्र्यांची पाकवलेली एक साल (केकमध्ये वापरतात ती), ताज्या संत्र्याचा रस, केशरी रंग व वर्खचा कागद खवा हाताने सारखा करून घ्या. साखरेत साधारण वाटीभर पाणी घालून पक्का पाक करा. नंतर त्यात खवा घालून मंद अग्नीवर ढवळत रहा. जरा वेळाने खाली उतरून त्यात वेलची पूड, केशरी रंग, संत्र्याचा रस आणि संत्र्याची कुटलेली साल घालून खूप घोटावं. घट्ट होत आलं की तूप लावलेल्या थाळीत ओतावं. वरती बदाम, पिस्ते, चारोळी यांचे काप लावून सजवावे. गरम असताना वर्खचा कागद लावावा.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad