Sunday, May 29, 2011

आरोग्यासाठी बुद्धी

स्वतःच्या प्रकृतीस न मानविणारे अन्न खाणे, स्वतःची ताकद नसताना भलत्याच कामात गुंतणे हे बुद्धिहीनच करू शकतो. शांतता व समाधानात मनाचा ताण जाऊन सर्व रोगांवर रामबाण इलाज होऊ शकतो हा अनुभव असूनही मनःशांतीचा प्रयत्न म्हणजे ध्यान, योग, संगीत वगैरेंना आयुष्यात स्थान न देणे हे पण बुद्धिहीनतेचेच लक्षण आहे. प्रत्येकाने बुद्धावताराचा आदर्श समजून सद्‌बुद्धी व शांती ह्यांची उपासना करणे म्हणजेच "बुद्धं शरणं गच्छामि' हे ठरवून आरोग्य मिळवावे ह्यातच कल्याण आहे.

श्री गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त बुद्धी आणि शांती यावर आरोग्य कसे अवलंबून आहे ह्यावर चिंतन होऊ शकेल.
बुद्धी म्हणजे निश्‍चय करण्याची शक्‍ती. श्रीमद्‌भगवद्‌गीतेत दहाव्या अध्यायाच्या चौथ्या पाचव्या श्‍लोकात भगवंतांनी सांगितले आहे, की बुद्धी, क्षमा, दान, शम, दम वगैरे सगळे भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात.

दोन मित्र होते, दोघांनी सारखेच शिक्षण घेतले, दोघे उत्तम मार्गाने उत्तीर्ण झाले, दोघांनाही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या मॅनेजरच्या पदावर लागल्या. एकाच्या हाताखाली अनेक माणसे काम करत होती तर दुसऱ्याची कंपनी लहान असल्याने त्याच्या हाताखाली दोन-तीनच लोक होते. अर्थातच दोघांच्या पगारात मोठी तफावत होती. मोठ्या मॅनेजरला प्रश्‍न विचारला की तुम्ही तुमच्या मित्रापेक्षा असे वेगळे काय केले की तुम्ही ह्या पदावर पोचू शकला? ह्याचे उत्तर त्याच्याकडे नव्हते. ही आहे देवाची कृपा.

प्रत्येक मनुष्याला बुद्धी लागते. म्हणूनच आपण म्हणतो, ""देवा, मला चांगली बुद्धी दे.'' सद्‌बुद्धी असली की बाकी सगळे मिळाल्यासारखेच आहे. ही बुद्धी मीच आहे, ही माझीच विभूती आहे असे भगवंतांनी म्हटले आहे.

बुद्धीमुळे निश्‍चय करण्याची क्षमता मिळते. कसलाही निश्‍चय झालेला नाही म्हणून मनुष्य दुःखी आहे? जे लोक दुःखी असतात त्यांनी ध्येयनिश्‍चिती केलेली नसते, आपल्याला कुठे जायचे आहे हे त्यांनी ठरविलेले नसते. असे लोक जन्मामागून जन्म घेतात; पण त्यांच्या आयुष्यात काही घडत नाही. यासाठी बुद्धी हवी, निर्णय घेता येणे आवश्‍यक आहे.

बुद्धी सात्त्विक असणेही आवश्‍यक आहे, तरच ती आपल्या परमध्येयाकडे जाण्याचा निर्णय घेते, अन्यथा ती बुद्धी आपल्याला खोली ओढते, पापाचरण करवून ती आपल्याला दुःखाकडे, कष्टाकडे घेऊन जाते. परमध्येयाकडे जाण्याचा निर्णय घेणारी बुद्धी ती मी आहे असे भगवंत म्हणतात.

अनेकदा लोक म्हणतात, ""मी दारू पितो, मी गुन्हा केला हे चूक असेलही पण अशी बुद्धी मला देव का देतो?"" असे देवाच्या डोक्‍यावर खापर फोडणे चुकीचे आहे. अशी बुद्धी देव देत नाही, परमध्येयाकडे जाण्याचा निर्णय घेणारी सात्त्विक बुद्धी मी आहे असे भगवंत म्हणतात.

एखाद्या गोष्टीची माहिती म्हणजे ज्ञान असे आपल्याला वाटते. ज्ञान काय आहे हे आपल्याला कळलेलेच नाही. स्मृती, पाठांतर, एखादी गोष्ट पटकन समजणे ह्याला आपण ज्ञान म्हणतो. पण हे ज्ञान नव्हे, सारासार निर्णय घेता आला पाहिजे. असा निर्णय ज्याला घेता येतो तो खरा ज्ञानी. अहं ब्रह्मा।स्मि ह्या तत्त्वाचे ज्ञान ते तत्त्वज्ञान. व असे ज्ञान असणारा तो ज्ञानी. आत्मज्ञान हेच खरे ज्ञान. बुद्धी म्हणजे बुद्धिवाद नव्हे. आम्ही बुद्धिवादी, तुम्ही श्रद्धेने जाणारी मंडळी असे म्हटले जाते. पण ह्या बुद्धीचा भगवंतांना अभिप्रेत असणाऱ्या बुद्धीशी काही संबंध नाही. जिच्या मदतीने सारासार विवेक करता येईल अशी सात्त्विक बुद्धी भगवंतांना अभिप्रेत आहे.

आहार-विहार हे आरोग्याचे मोठे आधारस्तंभ आहेत आणि माणसाने कसे जगावे हे बुद्धीच ठरविते. स्वतःच्या प्रकृतीस न मानविणारे अन्न खाणे, स्वतःची ताकद नसताना भलत्याच कामात गुंतणे हे बुद्धिहीनच करू शकतो. शांतता व समाधानात मनाचा ताण जाऊन सर्व रोगांवर रामबाण इलाज होऊ शकतो हा अनुभव असूनही मनःशांतीचा प्रयत्न म्हणजे ध्यान, योग, संगीत वगैरेंना आयुष्यात स्थान न देणे हे पण बुद्धिहीनतेचेच लक्षण आहे. प्रत्येकाने बुद्धावताराचा आदर्श समजून सद्‌बुद्धी व शांती ह्यांची उपासना करणे म्हणजेच "बुद्धं शरणं गच्छामि' हे ठरवून आरोग्य मिळवावे ह्यातच कल्याण आहे.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad