Tuesday, August 24, 2010

घरात ठेवा मंगलकलश - भाग - ५

संजय पाटील, sanjuspatil@hotmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it


सध्या आपण मंगलकलशाची माहिती घेतोय. त्यामुळे मला येणारे एसएमस, मेल खूप कमी झालेयत. सर्वाना झटपट चमत्कार करणारं काहीतरी हवंय. बस्स, मार्केटमध्ये जायचं ती वस्तू घेऊन यायची, घरात ठेवायची की फुटलीच नशिबाची लॉटरी असं काहीतरी हवं. (शक्य झाल्यास ती वस्तुही घरपोच मिळायला हवी. त्यासाठी मार्केटमध्ये तरी कशाला जायचं ?) हे मंगलकलश वगैरेचं झंझट कोण करत बसणार ? पूर्वी रांगोळीबद्दल लिहिलं होतं. त्यावेळी ‘अहो, ही रांगोळी दररोज कोण काढणार , एवढा वेळ कसा काढणार', असे तक्रारवजा सूरात गृहिणींचे फोन  यायचे. गंमत म्हणजे या गृहिणी नोकरी-व्यवसाय न करणाऱ्या होत्या. माझ्या मित्राची मामी आहे. ती न्यायाधीश आहे. अशा पोस्टवर काम करणारी मामी दररोज स्वतच्या हातानं रांगोळी काढून मग कोर्टात जाते. करायचं ठरवलं तर सगळं जमतं हो! कंटाळाच करायचा असेल तर हे कसं जमणार, ते कसं जमणार अशा नकारघंटा वाजतच राहणार.
भारतात लोक दिवसाकाठी सरासरी  तीन तास टीव्ही बघण्यात घालवतात असं एक पाहणी अहवाल सांगतो. (ज्यांना हे स्टेटमेन्ट मान्य नसेल ते लोक यापेक्षाही जास्त वेळ घालवत असतील.) टीव्हीप्रेम इतकं असेल तर बाकीच्या गोष्टींसाठी वेळ कुठला उरायला?.. मग कमर्शियल ब्रेकमध्ये  फोन करून पीडणार मला. काय तर म्हणे , दररोज रांगोळी काढायची कुणी?..  कुणी म्हणजे काय, तुम्हीच! तुमच्या घरी येऊन काय दूधवाला रांगोळी काढणार..?  
मंगलकलशाची स्थापना वर्षांतून एकदाच म्हणजे दिवाळीच्या पाडव्याला करायची आहे. (प्रत्येक साडेतीन मुहुर्तावर केल्यास आणखी चांगलं.)  मागील लेखात जे मंत्र व विधी दिले आहेत ते वाचून काढा. साहित्य तयार ठेवा. आणि स्थापना करा.  स्थापनेसाठी किती वेळ लागतो माहीत आहे. जेमतेम २५ मिनिटं.  वर्षांकाठी टीव्ही बघण्यात किती वेळ जातो माहितेय?  एक हजार ९५ तास.. अरे देवा! हे सर्व मी काय सांगत बसलोय.  त्यापेक्षा एका वाक्यात सांगतो, पटलं तर करा नाहीतर सोडून द्या.
मला वाटतं आता थोडीच लोकं माझ्याबरोबर उरलीयत. (बाकीच्यांनी टीव्ही ऑन केला का?) या थोडय़ांसाठी अधिक माहिती देतो.
सर्वसाधारण कलशाची माहिती भाग क्र. तीन मध्ये दिली होती. ती रीपीट करणं गरजेचं वाटतंय.
एक तांब्याचा  कलश घ्या. त्याच्या अधोभागावर हळद व कुंकवाच्या एकाआड एक रेषा ओढा. रेषा किती असाव्यात यासाठी  काही नियम नाही. मध्यभागी अष्टगंधाने किमान दोन स्वस्तिक काढा. उध्र्वभागी चंदन किंवा गोरोचनाच्या तीन आडव्या रेषा (त्रिपुंड) ओढा. तांब्याच्या गळ्याला पिवळा-नारंगी धागा (नाडा) बांधा. तांब्या पाण्यानं अर्धा भरा. त्यात गोमूत्राचे चार थेंब, मोठी सुपारी, थोडय़ा, अक्षता चांदीचं (देवादिकांचं चित्र असलेलं नको) किंवा साधं चलनातलं नाणं आणि शक्य झाल्यास दुर्वा, चंदन, सवरेषधी, सुगंधी द्रव्य, सप्तमृत्तिका, पंचरत्नं टाका, तांब्याच्या तोंडावर विडय़ाची किंवा अशोक वा आंब्याची पाच पानं किंवा पंचपल्लव (वड, पाकर किंवा शिरिष, औदुंबर, आंबा व पिंपळ यांची पानं) ठेवा. त्यावर नारळ ठेवा. हा कलश लाकडी पाटावर तांदळाचं/ गव्हाचं (किंवा सप्तधान्याचं) स्वस्तिक किंवा चक्र काढून त्यावर स्थानापन्न करा. लाकडी पाट जमिनीवरच ठेवलंत तर बरं. एवढं सगळं झालं की तुमचा परिपूर्ण मंगलकलश तयार झाला. पानं सुकत असल्यानं दर दिवसाआड ती बदलणं गरजेचं आहे. पाणी दररोज किंवा आठवडाभरात बदललं तरी चालेल. किमान पंधरा दिवसांतून एकदा तांब्याची घासपूस करावी. तांदळाचं- गव्हाचं स्वस्तिक विस्कटल्यानंतर नवं तयार करावं. तांदूळ खराब झाल्यास पक्ष्यांना, गायीला खाऊ घालावेत किंवा झाडाच्या बुंध्याशी सोडावेत. बाकी नारळ, सुपारी, नाणं वगैरे वारंवार बदलण्याची गरज नाही. दरवर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजनाला ते बदलावं. जुन्या वस्तू पाण्यात सोडून द्याव्यात.
अशा प्रकारे विधिवत स्थापन झालेला मंगलकलश घराच्या कोणत्याही भागातील ऊर्जा वृद्धिंगत करू शकतो. घराच्या कोणत्या दिशेला तो ठेवल्यास काय शुभ परिणाम मिळू शकतात ते आता पाहू. कलशाची सर्वसाधारण रचना आपण वर पाहिलीच आहे. काही समस्यांचं निराकरण करण्यासाठी दिशानुरूप त्याची मांडणी करतो तेव्हा काही बदल त्यात करावे लागतात. त्याबद्दल थोडक्यात विवेचन आता करतो.
उत्तर
उत्तर ही जलतत्त्वाची दिशा आहे. करियर, नोकरी, व्यवसाय, नोकरीतील नव्या संधी या दिशेवरून बघतात. ही कुबेराची दिशा आहे. करियरमध्ये व्यवसायात काही अडचणी असतील, चांगलं शिक्षण असूनही नोकरी मिळत नसेल तर या दिशेला मंगलकलश ठेवावा. चंदेरी वर्ख असलेल्या किंवा आकाशी रंगाच्या पाटावर त्याची स्थापना करावी. कलशात चांगल्या प्रतीचा मोती टाकावा. तत्पूर्वी । ओम श्रां श्रीं श्रौं स: सोमाय नम:। या बीजमंत्राने त्यावर १०८ वेळा जलाभिषेक करावा. चांदीचे किंवा जस्ताचे चंद्रकोरीच्या आकाराचे तुकडे टाकावेत. चांदीचाच कलश वापरू शकलात तर सोन्याहून पिवळं. स्वस्तिक तांदळाचंच काढावं आणि पानं विडय़ाची वापरावीत. पानांची संख्या दहा ठेवावी. शक्य असेल तर प्लक्ष (पाकर) या झाडाची पानं वापरावीत. उर्वरित रचना वर सांगितल्याप्रमाणं सर्वसाधारण पद्धतीनं करावी.
ईशान्य
ईशान्य ही जलतत्त्वाची दिशा आहे. ही ज्ञानाची दिशा आहे. या दिशेत श्रीशंकर उभे असतात. मुलं अभ्यास नीट करीत नसतील, स्मरणशक्तीच्या एकाग्रतेच्या काही समस्या त्यांना असतील तर या दिशेत मंगलकलश ठेवा. येथेही चंदेरी वर्खाच्या किंवा आकाशी रंगाच्या लाकडी पाटावर त्याची स्थापना करावी. कलशात चांगल्या प्रतीचं स्फटिक लिंग -बाण टाकावं. (स्फटिक लिंग म्हणजे पिंड नाही हे कृपया लक्षात घ्या). चांदीचं छोटं त्रिशूळ आणि चंद्रकोरीच्या आकाराचे चांदीचे आठ तुकडे पाण्यात टाकावेत. स्फटिक लिंग कलशात ठेवण्यापूर्वी त्यावर ओम नम:शिवाय। ही शिवपंचाक्षरी उच्चारत १०८ वेळा जलाभिषेक करावा. त्यानंतर
 ओम त्र्यंबक यजमाहे सुगंधि पुष्टीवर्धनम
ऊर्वारुकमिव बंधनान मृत्योमृक्षीयमामृतात
हा महामृत्युंजय मंत्र १०८ वेळा जपत जलाभिषेक करावा. शक्यतो चांदीचा कलश वापरावा. स्वस्तिक तांदळाचं काढावं आणि विडय़ाची आढग पानं वापरावीत, बाकीची रचना नेहमीप्रमाणे करावी.
पूर्व
पूर्व ही जलतत्त्वाची दिशा आहे. ती संततीची कारक आहे. आरोग्य, कुटुंब आणि वडीलधारी त्यावरून बघतात. संततीसंदर्भात काही समस्या असतील, कुटुंबात वाद असतील, आरोग्याच्या कटकटी असतील तर या दिशेत मंगलकलश ठेवा. पोपटी रंगाच्या किंवा तांब्याचा वर्ख असलेल्या लाकडी पाटावर त्याची स्थापना करावी. कलशात पिरॅमिडच्या आकाराचं स्फटिक टाकावं. (परवडत असेल तर हिरा टाकावा) हिरा किंवा स्फटिक कलशात ठेवण्यापूर्वी ओम द्रां द्री द्रौ स: शुक्राय नम:। या बीजमंत्राचा उच्चार करीत १०८ वेळा त्यावर जलाभिषेक करावा. वडाच्या झाडाची तीन किंवा चार पानं वापरावीत. बाकीची रचना सर्वसाधारणपणे करावी.
(क्रमश:)
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad