Tuesday, August 24, 2010

मुगाचे वरण पचण्यास हलके, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करणारे, कफदोष तसेच पित्तदोष शामक असते. तुरीच्या वरणात तूप घालून सेवन केले असता ते त्रिदोषांचे संतुलन करते. उडदाचे वरण गुणाने स्निग्ध, शुक्रधातूसाठी हितकर आणि वातदोषाचे शमन करणारे असते.
भाताबरोबर वरण लागतेच. वरण-भात हे बाराही महिने कंटाळा न येता खाता येण्यासारखे अन्न आहे. भात बनविण्याचे जसे विविध प्रकार आहेत तसे वरणाच्याही अनेक पाककृती आयुर्वेदात दिलेल्या आहेत. वरण हा शब्द "वरान्न' यावरून आलेला आहे. वर म्हणजे श्रेष्ठ, उत्तम. नावाप्रमाणेच वरण श्रेष्ठ अन्न होय. सर्वप्रथम वरण बनविण्याची सामान्य पद्धत सांगितली आहे,
गृहीत्वा द्विदलं धान्यं पेषिण्या सुविपेषयेत्‌ ।तच्चूर्णे सतुषे क्षिप्त्‌वा निशादधिघृतानि च ।।
तथैव पिहितं स्थाप्य पश्‍चादद्दाली विनिर्हरेत्‌ ।चतुर्गुणोदके पक्‍त्वा तस्मिन्‌ रामठसैंधवे ।।
साज्यां हरिद्रां क्षिप्त्‌वा यत्क्रियते तद्वरान्नकम्‌ ।...निघण्टु रत्नाकर
ज्या द्विदल धान्याचे वरण करायचे असेल ते धान्य किंचित भरडावे व त्याला किंचित तूप, हळद व दही चोपडून काही वेळ दडपून ठेवावे. नंतर उन्हात वाळवून कांडून घ्यावे व त्याची सडीक डाळ करावी.
डाळीत चौपट पाणी घालून शिजवावी व शिजत आली की हिंगाची पूड, सैंधव, तूप व हळद हे पदार्थ घालून नीट घोटावे. शिजले की अग्नीवरून उतरावे.

मुगाचे वरण
मुद्गसूपो लघुर्ग्राही कफपित्तहरो हिमः ।स्वादुर्नेत्र्यो अनिलहरः ।।...निघण्टु रत्नाकर
मुगाचे वरण पचण्यास हलके, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करणारे, कफदोष तसेच पित्तदोष शामक असते. वीर्यानेंथंड असते. वातशामक असते, रुचकर असते आणि डोळ्यांसाठी हितकर असते.

तुरीचे वरण
सूपश्‍चाढकिजो वातकरः श्‍लेष्महरो हिमः ।रुक्षः कषायो रुचिकृत्‌ साज्यो दोषत्रयप्रणुत्‌ ।।...निघण्टु रत्नाकर
तुरीचे वरण रुचकर असते, कफशामक असते, वीर्याने थंड असते, गुणाने रुक्ष असते, म्हणून थोडे वातकर असते. मात्र तुरीच्या वरणात तूप घालून सेवन केले असता ते त्रिदोषांचे संतुलन करते.

मटकीचे वरण
मकुष्टसूपो।ल्पबलः पाचनो दीपनो लघुः ।चक्षुष्यो बृंहणो वृष्यः पित्तश्‍लेष्मास्ररोगनुत्‌ ।।...निघण्टु रत्नाकर
मटकीचे वरण पचण्यास हलके असते, अग्नीस प्रदीप्त करते, पचनास मदत करते, थोड्या प्रमाणात ताकद वाढविते, डोळ्यांसाठी हितकर असते, धातूंना वाढवते, शुक्रधातू वाढवते, पित्तदोष, कफदोष व रक्‍तरोगात हितावह असते.

मसूराचे वरण
मसूरसूपः संग्राही शीतलो मधुरो लघुः ।कफपित्तास्रजित्‌ वर्ण्यो विषमज्वरनाशनः ।।...निघण्टु रत्नाकर
मसूराचे वरण वीर्याने थंड, चवीला गोड व पचायला हलके असते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, कफदोष, पित्तदोष व रक्‍तदोषात हितकर असते, वर्ण उजळवते, विषमज्वरात हितकर असते.

उडदाचे वरण
माषसूपश्‍च कुल्माषः स्निग्धो वृष्यो।ऩिलापहः ।उष्णः संतर्पणो बल्यः सुस्वादु रुचिकारकः ।।
धातुवृद्धिकरश्‍चासौ कफपित्तकरो गुरुः ।...निघण्टु रत्नाकर
उडदाचे वरण गुणाने स्निग्ध, शुक्रधातूसाठी हितकर आणि वातदोषाचे शमन करणारे असते, धातूंची वृद्धी करते, कफ, पित्तदोष वाढवते व पचण्यास जड असते.

- डॉ. श्री बालाजी तांबे  आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405 
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad