Saturday, March 6, 2010

निसर्गोपचार-साद निसर्गाची

डॉ. उल्हास कोल्हटकर ‘उदंड जाहले पाणी। स्नान-संध्या करावया।।’ समर्थ रामदासांनी या ओळींतून जणू स्नानाचे व त्याकरिता आवश्यक असणाऱ्या पाण्याचे महत्त्वच एक प्रकारे अधोरेखित केले आहे. संपूर्ण शरीराच्या बाह्य स्वच्छतेकरिता अंघोळीसारखे दुसरे साधन नाही; पण ती कशी करावी याचेही एक शास्त्र आहे. केवळ ४ ते ५ मि.ची कावळ्याची अंघोळ (Executive Bath) ही किमान १५-२० मि.च्या शास्त्रशुद्ध पूर्ण अंघोळीला पर्याय ठरूच शकत नाही व निसर्गोपचारांमधील अंघोळ असेल तर तिची ‘स्टाइल’ आणखीनच वेगळी!
सूर्यस्नान, वायुस्नान, बाष्पस्नान, कटिस्नान, पादस्नान अशा स्नानाच्या वेगवेगळ्या पद्धती निसर्गोपचारात वापरल्या जातात. त्यांचा आपण एक धावता आढावा आता घेणार आहोत.

सूर्यस्नान : ‘अतिपरिचयात अवज्ञा’ या न्यायाने भरपूर सूर्यप्रकाशाच्या आपल्या देशात आपल्याला सूर्यप्रकाशाचे महत्त्व अजिबात लक्षात येत नाही; पण युरोप-अमेरिकेमधील अनेक भागांत दिवस लहान होऊ लागताच कमी सूर्यप्रकाशाचे परिणाम दृगोच्चर होऊ लागतात. माणसे निराश, दु:खी, चिडचिडी व मुडी होऊ लागतात, त्यांची भूक कमी होते व निद्रानाश जडतो. वसंत ऋतू येताच परत सर्व काही ठिकठाक होते. हे असे का होते याबद्दल अनेक सिद्धान्त मांडले गेले आहेत. त्यातील एका प्रमाणे, सूर्यप्रकाशामुळे शरीरांतर्गत स्रवणाऱ्या ‘मेलॅटोनीन’ नावाच्या द्रव्याचे प्रमाण कमी होते तर सूर्यप्रकाशाच्या अभावी ‘मेलॅटोनीन’ अतिप्रमाणात तयार होते व त्यामुळे नैराश्य येते. हा सर्व प्रकार १९७० च्या आसपास पाश्चिमात्य शास्त्रज्ञांच्या लक्षात आला, त्याला त्यांनी SAD (Seasonal affcctive disarder) असे नाव दिले. आश्चर्य म्हणजे इ. स. पूर्व सहाव्या शतकात होऊन गेलेला चरक सूर्यप्रकाशाचा उपचारांमध्ये वापर करताना दिसतो! विविध कारणांमुळे सूर्यप्रकाश उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. मात्र हे उगवतीच्या सूर्यप्रकाशाबाबतच खरे आहे. दुपारची वा माध्यान्हीची उन्हे त्वचेला व शरीराला घातक असतात. हे पक्के ध्यानात ठेवावे. सूर्यप्रकाशातील अतीनील किरणांमुळे शरीरात ‘डी’ जीवनसत्व निर्माण होते तर अधोरक्त  किरणांमुळे उष्णता निर्माण होऊन स्नायू शिथिल होतात. निसर्गोपचारपद्धती असे मानते, की या कारणामुळे सूज व वेदना कमी होतात. नियमित सूर्यस्नानामुळे सर्वसामान्य आरोग्य तर सुधारतेच; पण शरीराची प्रतिरक्षाप्रणालीही अधिक कार्यक्षम होते. निसर्गोपचार शास्त्रानुसार सूर्यप्रकाशामुळे केसांची वाढ अधिक होते, रक्तदाब कमी होतो, शरीरातील आम्लता कमी होते व स्नायूंची ताकद वाढते. मात्र सूर्यस्नान घेताना काही पथ्ये पाळणे आवश्यक. ते सकाळी व संध्याकाळी कोवळ्या उन्हातच करावे. शरीर निर्वस्त्र अथवा कमीतकमी कपडय़ात असावे, डोळे झाकलेले व डोळे बंद असावेत आणि सूर्यस्नानानंतर थंड पाण्याने अंघोळ करावी.

वायुस्नान : शुद्ध व शीतल हवेत खोल, दीर्घ श्वास काही काळापर्यंत घेणे म्हणजे वायुस्नान! या शास्त्राप्रमाणे रक्ताचे ऑक्सिजनेशन सुधारणे व शरीर-मन शिथिल होणे असे अनेक फायदे फायदे वायुस्नानामुळे होतात. (यातील ऑक्सिजनेशनचा मुद्दा आधुनिक विज्ञानानुसार विवादास्पद असला तरी दीर्घश्वसनामुळे मानसिक शिथिलीकरणास मदत होते एवढे नक्की!)

बाष्पस्नान : घामावाटे शरीरातील विजातीय द्रव्ये बाहेर टाकली जातात. उपचारांनी अधिक घाम निर्माण केल्यास शरीरातील साठलेली विषद्रव्ये अधिक प्रमाणात बाहेर टाकली जातील, असा गृहीत सिद्धांत या उपचारांमागे आहे. या उपचारांकरिता एक विशिष्ट प्रकारच्या बाष्पपेटीची आवश्यकता असते. रिकाम्यापोटी एखादा ग्लास पाणी पिऊन कमीत कमी कपडय़ांवर या पेटीत बसतात. याचा कालावधी साधारण १२ ते १५ मि. असतो. बाष्पस्नानानंतर शरीर थंड व ओल्या कपडय़ाने पुसावे व नंतर गार पाण्याने अंघोळ करावी. बाष्पस्नान आठवडय़ातून साधारण एकदा घेतले जाते. फिनलंडमध्ये (व आता सर्व जगात!) प्रचलित असलेला ‘सोना बाथ’ हा बाष्पस्नानाचाच एक बदललेला प्रकार म्हणता येईल. गर्भवती स्त्रिया, हृदरोगी व रक्तदाबाचे रोगी यांनी बाष्पस्नान वा सोना बाथ टाळणे इष्ट. स्थूलत्त्वनिवारणाकरिताही अशा प्रकारचे स्नान हा एक उत्तम पूरक उपाय आहे. असे मानले जाते.

कटिस्नान : पोट व आतडे, यकृत, प्लीहा, स्वादुपिंड, मूत्रपिंड यांचे कार्य सुधारण्याकरिता या पद्धतीचा वापर निसर्गोपचारात केला जातो. कटिस्नानाकरिता साधारण २।। ते ३ फूट लांब व सुमारे दोन फूट रुंद, असा टब लागतो. टबात ८ ते १० इंच उंचीपर्यंत येईल, अशा पद्धतीने गार वा समशीलतोष्ण पाणी भरून त्यात शरीराचा मध्यभाग पाण्यात बुडेल, अशा रीतीने बसतात. पाण्यात बसण्यापूर्वी एक ग्लास गरम पाणी पिणे हितावह असते. हिवाळ्यात साधारणत: १० ते १५ मि. व उन्हाळ्यात २० ते ३० मि. इतका वेळ कटिस्नान घेतले जाते. कटिस्नानानंतर पोट कोरडे करून पोटाचे व्यायाम घेणे इष्ट असते. कटिस्नान रिकाम्या पोटाने घ्यावे व नंतरही अर्धा तास रिकामे ठेवावे.

मृत्तिकास्नान : निसर्गोपचारातील ही मृत्तिकोपचारांची पद्धत म. गांधींमुळे लोकप्रिय झाली असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. संपूर्ण शरीरावर अथवा शरीराच्या एखाद्या भागावर ओल्या मातीचा लेप, पट्टी, पोटीस अथवा डोके बाहेर ठेवून शरीर मातीत पुरून ठेवणे इ. प्रकारांनी मृत्तिकोपचार केले जातात. या शास्त्रानुसार ओल्या मातीमुळे शरीरातील ‘अधिक’ उष्णता शोषली जाणे, शरीरात साठवलेली विषारी द्रव्ये खेचली जाणे, स्नायू व चेतातंतूंवरील ताण शोषला जाणे इ. प्रकारांनी सूज, वेदना इ. नाहीशा होतात. यावर अधिक शास्त्रशुद्ध प्रयोग होऊन त्यापाठीमागचे शास्त्र शोधणे आवश्यक आहे असे वाटते. मृत्तिकोपचारांकरिता स्वच्छ, रासायनिक वा अन्य प्रदूषणांपासून मुक्त अशी मऊ माती लागते. सर्वसाधारणपणे मातीचा एक इंच जाडीचा लेप देण्यात येतो. ताप, मलावरोध काही विशिष्ट कारण नसलेली पोटदुखी वा सांधेदुखी यासारख्या विकारांवर मृत्तिकोपचार उपयुक्त असल्याचे दिसून येते. आयुर्वेदाने आरोग्यपूर्ण जगण्याचे शास्त्र सांगताना (स्वास्थ्यवृत्त) निसर्गाच्या तालांशी जुळवून घेण्यास, तसेच उपचारांमध्ये नैसर्गिक साधनांचा व प्रक्रियांचा समावेश केला आहे. निसर्गाशी समतोल राखू पाहणाऱ्या ‘योगा’चा आयुर्वेदाचा व निसर्गोपचारांचा म्हणूनच अनेक ठिकाणी संबंध येताना दिसतो. जलनेती व वमन हे उपचार असेच Common Ground वर आहेत.
जलनेती व वमन : नाकावाटे पाणी आत घेऊन ते तोंडावाटे बाहेर काढणे व एका नाकपुडीतून घेऊन ते दुसऱ्या नाकपुडीने बाहेर काढणे म्हणजे जलनेती. सकाळच्या वेळी रिकाम्यापोटी अधिक प्रमाणात पाणी पिऊन ते ओकून बाहेर काढणे वमन. या दोन्ही ‘यौगिक’ शुद्धिक्रियांचा वापर हा श्वसनमार्ग, सायनसेस आणि पोट साफ ठेवण्याकरिता अनुक्रमे केला जातो. डोकेदुखी, नाक चोंदणे, सर्दी, सायनुसायटिस अशा विकारांवर जलनेतीचा चांगला उपयोग होताना दिसतो. तर पचनाच्या विकारांमध्ये वमनाचा चांगला उपयोग होताना दिसतो. अर्थातच पाण्याचा वापर करून केलेल्या या दोन्ही शुद्धिक्रिया तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच कराव्या. निसर्गोपचारातील दोन महत्त्वाच्या पद्धती म्हणजे आहार आणि चुंबक चिकित्सा. अर्थात ते स्वतंत्र लेखविषय आहेत. त्याविषयी पुढे केव्हातरी. विविध उपचारपद्धतींमध्ये निसर्गोपचारांचे आपले स्वत:चे असे एक स्थान आहे. कमी खर्चिक व निसर्गाच्या अधिक जवळ नेणाऱ्या या पद्धतीतचे म्हणूनच अधिक महत्त्व आहे. आधुनिक संशोधनाने त्यातील महत्त्वाच्या व मूलभूत सिद्धांतांना पुष्टी मिळाल्यास अधिक बरे होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वरवर सोपे वाटणारे हे उपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावेत न पेक्षा रोगांपेक्षा उपचार अधिक धोकादायक, अशी परिस्थिती निश्चितच उद्भवेल!
Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad