Tuesday, March 2, 2010

ध्यानोपचार-1

आपल्याला केवळ दमछाक करणारी आणि सरतेशेवटी आजारी पाडणारी गती नको; तर आरोग्य, निरामयता, शांतता, सुख व समृद्धी देईल अशी गती हवी आहे. यासाठी ध्यानमार्गाचे आचरण करावे, असे आपल्याला भगवंतांनी, वेदवाङ्‌मयाने व परंपरेने सांगितले आहे. आपल्यावरचे ताण दूर करून शांती मिळवायची असेल, तर "सोम साधना' करणे आवश्‍यक ठरते.

आरोग्यासाठी, रोगनिवारणासाठी साधारणपणे आपण आहार, व्यायाम, औषधे वगैरे निरनिराळे प्रयत्न करत असतो. रोगनिवारणासाठी ध्यान हा सर्वांत स्वस्त व सोपा मार्ग आहे हे आपल्याला माहीत असते; परंतु त्याकडे न वळता आपल्याला काही त्रास होऊ लागला, तर आपण डॉक्‍टरांकडे धाव घेतो, औषधांची योजना करतो. आजारी पडू नये यासाठी आयुर्वेदाने स्वस्थवृत्तात सांगितलेल्या दिनक्रमात ध्यानाचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. आपल्याला सर्वांना सुख, समृद्धी हवी असते. जीवन सोपेपणाने जगता यावे व रात्री शांतपणे झोपता यावे, ही आपल्या सर्वांचीच इच्छा असते.

सध्या जीवन धावपळीचे झाले आहे, त्यामुळे अनेक गोष्टींसाठी "वेळ नाही' ही सबब आपण सांगत असतो. शरीरशुद्धी करून घेणे आवश्‍यक असते हे आपल्याला माहीत असले, तरी त्यासाठी आपल्याला वेळ नसतो. "ध्यान करा' असे कुणी सांगितले तरीही "वेळ नाही' हे आपले उत्तर तयार असते. योग व प्राणायाम यांचा प्रचार खूप झालेला आहे; पण त्यासाठी रोज सकाळी तास-दोन तास वेळ काढणारे किती असतात, याचे उत्तर कोणालाच माहीत नाही. शिबिरात लोक तास-दोन तास वेळ देतात; पण नंतर हलके हलके कमी कमी होत होत 5-10 मिनिटे काढली जातात. पोलिस चौकीवर हजेरी लावावी अशा प्रकारे हजेरी लोक देवासमोर वा योगासमोर लावताना दिसतात.

संध्येत दोन-तीनच प्राणायाम असतात, पण याचा अर्थ असा नाही, की केवळ तेवढेच प्राणायाम करावेत. दोन-तीन प्राणायाम करून काहीही होत नाही. आपल्याला प्राणायामाची गरज आहे व आपण त्याची सुरवात करणे आवश्‍यक आहे हे सुचविण्याच्या हेतूने संध्येत दोन-तीनच प्राणायाम सांगितलेले असतात, हे आपल्या लक्षात येत नाही व लक्षात आले तरी त्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो.

यावर तोडगा काय व यावर मार्ग कसा काढणार? चालत जाण्यापेक्षा सायकलने गेलो तर आपण लवकर पोचतो, स्कूटरने गेलो तर त्याहीपेक्षा लवकर पोचतो, असे करत करत रोजच्या प्रवासासाठीसुद्धा हवेतून जाणारी वाहने शोधून काढायची वैज्ञानिकांची कल्पना आहे. आपण राहत असलेल्या बाराव्या मजल्याच्या बाल्कनीच्या बाहेर उभ्या असलेल्या वाहनात बसून ऑफिसला जाण्याची कल्पना भविष्यात सत्यात आली तर नवल वाटणार नाही. आपण गती स्वीकारलेली आहे व आपण धावतो आहोत. स्वतःभोवती गोल गोल फिरताना सात-आठ चकरा घेऊन थांबल्यास नंतरची आठवी, नववी चक्कर आपोआपच होते. चकरा घेताना एकदम थांबता येत नाही. असेच काहीसे आपले सर्वांचे झालेले आहे. आपण एकदा जी काही धावायला सुरवात केली, ते आपण धावतोच आहे. आपण विसरून गेलो, की आपल्याला केव्हा तरी थांबायचे आहे. आपले लक्ष्य काय आहे, आपल्याला काय मिळवायचे आहे, हेही आपण ठरविलेले नाही. एखादा ठरवतो की मला महिन्याला एक लाख रुपये मिळाले की मी सुखी होईन; हे स्वप्न पुरे करायला तो धावत सुटतो. पण एक लाख मिळाल्यावर तो थांबत नाही, तो विचार करतो एक लाखाऐवजी मला दोन लाख मिळाले तर मी अजून सुखी होईन; पुन्हा धावायला सुरवात करतो. जसजशी हातातल्या पैशांची पिशवी जड होईल, तसतसे धावणे अवघड होते, आजारपण येते, शेवटी पिशवी येथे राहते व तो वर जातो.

तेव्हा आपल्याला अशी गती हवी असेल जी आपल्याला आरोग्य, निरामयता, शांतता, सुख तेव्हा बहुतेक देशांतील लोकांनी "आयुर्वेद' हा शब्दच ऐकलेला नसे, त्या देशातील लोकांना संपूर्ण आरोग्याची संकल्पना माहीत नसे, ते लोक आज आपल्याला आयुर्वेद शिकवू पाहत आहेत. असे मुळीच होऊ नये.

आपल्या सर्वांना गतीने जायचे आहे. मी धंदा सुरू केला आहे तर किती दिवसात फायदा मिळणार? मी कालपासून आसने शिकतो आहे, मला किती दिवसांत बरे वाटेल, असे आपले प्रश्‍न असतात. यावर कुणी जर 5-10 वर्षे लागतील असे उत्तर दिले तर आपण त्याला वेडात काढू. मी एक वर्ष, अगदी म्हटले तर जास्तीत जास्त तीन वर्षे थांबायला तयार आहे अशी गतीचीच भाषा आपण बोलत असतो. श्रीमद्‌भगवद्‌गीतेत म्हटले आहे, यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम्‌, नादगती, प्रकाशाची गती ज्याच्यापुढे फिकी पडेल अशी परमगती प्राप्त होऊ शकेल अशी साधना श्रीमद्‌भगवद्‌गीतेने देऊन ठेवलेली असताना आपण इकडे तिकडे धावलो तर काय प्राप्त होईल, यावर विचार होणे आवश्‍यक आहे. आपल्याला गती तर पाहिजे; पण त्या गतीला टिकणारे साधनही योग्य असणे आवश्‍यक आहे.

समजा आपण पेट्रोलवर चालणारी छान वेगात जाणारी एक गाडी विकत घेतली, स्वस्त पडेल म्हणून तिला डिझेलचे इंजिन बसविले व खूप वजन भरून गाडी चालवायला सुरवात केली, तर असे वजन व गती या दोन्हीचा विचार करून ती गाडी बनविलेली नसल्यामुळे गाडी वर्षभरात खिळखिळी होईल. तेव्हा आपल्याला ज्या गतीने जायची इच्छा आहे, त्या गतीला चालेल असे आपले शरीर आपल्याला बदलत न्यायला पाहिजे.

सत्य युगापेक्षा कलियुगात माणसांचे आयुष्य कमी झालेले दिसते. कारण आपण चौपट गतीने फिरतो आहोत. सत्य युगातील माणसे शांत होती. आमचे वडील चालायचे खूप वेगात, पण त्यांना कशाची घाई नसायची, ते 100 वर्षे जगले. आज आपल्याला कुठेतरी जायची घाई आहे; पण आपण धावू शकत नाही, आपल्याला धाप लागते. हे गणित सोडवायचे असेल तर आपल्याला आपले शरीर निरोगी ठेवणे भाग आहे. एखाद्याला वाटेल, की मी तर काही पळत नाही, मला माझ्या घरापासून ते दुकानापर्यंत एक फर्लांगभरही जावे लागत नाही. मी घरातून निघाल्यावर दोन मिनिटात दुकानात पोचतो, तेथे छान पैकी गादीवर बसून गल्ला गोळा करतो. मला कुठेच पळावे लागत नाही. तुम्ही जरी पळाला नाहीत, तरी तुमच्या आजूबाजूचे लोक, वाहने व विश्‍व प्रचंड गतीने पळत असेल तर त्याचा परिणाम सगळ्यांवर होतच असतो.

प्रदूषणाविषयी बोलत असताना हवेतील कार्बन-डाय-ऑक्‍साईड वा अन्य विषारी वायू यांचाच आपण विचार करत असतो. आपल्या भोवताली वाढलेले ध्वनिप्रदूषण कोण लक्षात घेणार? पुणे, मुंबई वगैरे मोठ्या शहरातील जनता तुलनेत सुखी आहे. कारण तेथे रात्री दहानंतर मोठ्या आवाजाला बंदी असते, कायदा पाळायला लावणारी योजना काम करत असते. मध्यंतरी मुंबईत एका मोठ्या नटाची पार्टी रात्री बारानंतर चालू असल्याचे आढळल्यावर पोलिसांनी तेथील स्पीकर जप्त करून नेले; पण छोट्या गावातील लाऊडस्पीकर रात्री दोनपर्यंत चालू असले तरी कोणी लक्ष देत नाही. उरुस, उत्सव, लग्नकार्य वगैरे प्रसंगांत भोंगा वाजत राहतो. हवेपेक्षा ध्वनीचे प्रदूषण अधिक धोकादायक असते. सांगायचा हेतू काय, तर या सगळ्यांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. अशा गतीशी जुळवून घेताना उत्पन्न झालेल्या उष्णतेचा वा गतीमुळे बदललेल्या चुंबकत्वाचा होणारा परिणाम टळत नाही.

'सोम'साधना
हे परिणाम आपल्याला सहन करता यावेत यासाठी आपल्याला भगवंतांनी "सोम'साधना - "सोम' ध्यानपद्धती सांगितली आहे. या ध्यानपद्धतीविषयी आपण थोडी माहिती करून घेऊ.
आपणा सर्वांना शांतता व आरोग्य हवे असते. आपल्याला सर्वांना माहीत आहे, की आरोग्याचा सर्वांत मोठा शत्रू आहे मानसिक ताण. मानसिक ताणाची अंतिम अवस्था आली असता आपल्याला मानसिक ताण आहे हेच आपल्याला कळत नाही. माझ्याकडे असे रोगी येतात व म्हणतात, ""मला कसलाही ताण नाही, माझा मुलगा उच्चशिक्षित असून अमेरीकेत नोकरीला आहे, माझी मुलगी छान आहे, पत्नी उत्तम आहे. चांगला मोठा बंगला आहे, आम्हाला कशाचीच काही कमतरता वा समस्या नाही. पण शरीरात रोग तर दिसतो आहे. आयुर्वेद तर सांगतो, की प्रज्ञापराधामुळेच आजार येतात. समजा नवरा-बायकोचा सकाळी काही वाद झाला तर ते दोघे दिवसभराचे व्यवहार करतात, जेवतात, एकमेकांशी आवश्‍यक ते बोलतातदेखील; पण एक छुपा ताण अस्तित्वात असतो, जो लक्षातही येत नाही. जो मानसिक ताण लक्षात येत नाही, पण जो असतो, त्यामुळेच प्रज्ञापराध घडतो. मेंदू ज्ञानाचे साधन आहे व त्या प्रज्ञेचे जे सधन असणाऱ्या मेंदूत ताणामुळे विघ्न तयार होते व यातूनच रोग उत्पन्न होतात. मनुष्य निर्णय घेऊ शकत नसल्याने ताण उत्पन्न होतो. हे करू का, ते करू अशी माणसाची दोलायमान स्थिती राहिली की ताण येतो. असे म्हणतात, बुद्धी म्हणजे विवेक व विवेक म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता. ही क्षमता आपल्यात कमी कमी होत असल्याचे दिसते. मला पूर्वी गाडी घ्यायची होती तेव्हा बाजारात अँबेसिडर व फियाट दोनच गाड्या उपलब्ध होत्या, त्याही लगेच मिळत नसत. त्यामुळे दोन्हीकडे नाव नोंदवायचे, जी आधी मिळेल ती घ्यायची, असे करावे लागत असते. आज बाजारात गेले असता 50 कंपन्यांच्या अनेक गाड्या असतात. कोणी तीन वेळा शो-रूममध्ये जातो व काही न घेताच परत येतो. आपल्याबरोबर त्याने मानसिक ताण मात्र आणलेला असतो.

हा ताण आपल्याला विसर्जन करायचा असेल तर त्यासाठी ध्यान हे एकमेव साधन आहे. ध्यानाने भगवत्प्राप्ती होत असते. भगवत्प्राप्ती म्हणजेच शांती, भगवत्प्राप्ती म्हणजेच समाधान, भगवत्प्राप्ती म्हणजेच ताणरहित अवस्था व निरामय आरोग्य. पतंजली मुनींनी त्यांच्या अष्टांगयोगात ध्यानाला समाधीच्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा दर्जा दिलेला आहे. अष्टांगयोगात यम-नियम, आसन-प्राणायाम, प्रत्याहार-धारणा, ध्यान-समाधी अशा चार जोड्या आहेत. मला याही प्रश्‍नाचे उत्तर मिळालेले नाही की लोक आसन, प्राणायाम वगैरे करायला लागतात; पण यम-नियमांकडे ते का दुर्लक्ष करतात? असे केल्यामुळे ते जे काही करतात त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही. पाठ दुखायची थांबणे वगैरे आसन-प्राणायामाचा बारीकसा कुठला तरी लाभ मिळाला तर आयुष्याची इतिकर्तव्यता झाली, असे समजायला लागतात. त्यामुळे आपल्याला यम-नियमांपासून सुरवात करायला पाहिजे.

यम-नियम, आसन-प्राणायाम ही चार अंगे एका बाजूला आहेत. यातील यम व आसन हे बहिर्मुुख असतात, त्यांचा उपयोग बाह्य शरीराला अधिक होतो, तर नियम व प्राणायाम अंतर्मुख असतात. बाह्य शरीराला अनुशासन लावण्यासाठी आसने असतात, तर अंतर्शरीराला अनुशासित करण्यासाठी प्राणायाम असतो. यानंतर येते प्रत्याहार-धारणा ही जोडी. नको असलेल्या गोष्टींचा त्याग करणे म्हणजे प्रत्याहार व ज्या गोष्टी हव्या आहेत त्यांना धरून ठेवणे, त्या सुटणार नाहीत हे पाहणे म्हणजे धारणा. यानंतर येते ध्यान व समाधी. ध्यान हीच समाधी आहे व समाधी हेच ध्यान आहे. ध्यान व समाधी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अशा रीतीने या अंगांकडे पाहिले, तर ध्यान आपल्याला संपूर्ण आरोग्य कसे देऊ शकते वा प्रत्येक रोगावर त्याचा कसा उपयोग होतो, हे आपल्या लक्षात येईल.

मुख्य म्हणजे आपल्याला प्रज्ञापराध नको आहे, आपल्या मेंदूचा आपल्या शरीरावर पूर्ण ताबा हवा आहे. या दोन्ही गोष्टी ध्यानाने कशा मिळवायच्या, हे आपल्याला समजले तर संपूर्ण शरीराचे आरोग्य आपल्याला मिळेल.

Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

1 comment:

ad