Friday, January 8, 2010

दिवस अभ्यंगाचे; थंडीचा फायदा


थंडीतील रुक्षतेचा त्रास होऊ नये म्हणून थंडीत अभ्यंग करायचा असतो. थंडीत अनुभूत होणारी दुसरी गोष्ट म्हणजे थंडीत भूक जास्त लागते. भूक चांगली लागणे, हे पचनशक्‍ती चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे निदर्शक असते. पचनशक्‍ती चांगली असली की शरीरशक्‍ती वाढणे शक्‍य असते. यालाच महत्त्वाचा हातभार लावत असतो अभ्यंग.

भारतीय कालगणनेनुसार सहा ऋतूंचे एक वर्ष असते. तीन-तीन ऋतूंचे दोन गट केले असता त्याला "अयन' असे म्हणतात. अर्थातच संपूर्ण वर्षात दोन "अयने' असतात. शिशिर, वसंत व ग्रीष्म या तीन ऋतूंच्या कालावधीला "उत्तरायण' म्हणतात, तर वर्षा, शरद व हेमंत या तीन ऋतूंच्या कालावधीला "दक्षिणायन' म्हणतात. उत्तरायणात सूर्य क्रमाक्रमाने तीव्र होत जात असल्याने उत्तरायणाला आग्नेय काल म्हणतात, तर दक्षिणायनात ढग, पाऊस, वाऱ्यामुळे सूर्याची तीव्रता कमी कमी होत असल्याने हा काळ सौम्य समजला जातो.
सूर्याची तीव्रता वाढली की ओलावा कमी होणे, स्निग्धता कमी होणे ओघाने येतेच. उत्तरायणात म्हणजे शिशिर, वसंत व ग्रीष्म ऋतूत शरीरातील स्निग्धता क्रमाक्रमाने कमी होऊन कोरडेपणा वाढणार असतो, म्हणूनच उत्तरायण सुरू होण्यापूर्वीच म्हणजे हेमंत ऋतूपासून आयुर्वेदाने अभ्यंग करण्यास सुचवले आहे.

शिशिर व हेमंत हे ऋतू म्हणजे थंडीचे दिवस. हेमंतामध्ये थंडीला सुरवात होते आणि शिशिरात खरी थंडी असते. थंडीत हवेतील रुक्षता वाढते, हे आपण त्वचा कोरडी पडणे, फुटणे वगैरे लक्षणांवरून सहज समजू शकतो. थंडीतील रुक्षतेचा त्रास होऊ नये म्हणून थंडीत अभ्यंग करायचा असतो. थंडीत अनुभूत होणारी दुसरी गोष्ट म्हणजे थंडीत भूक जास्त लागते. भूक चांगली लागणे, हे पचनशक्‍ती चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे निदर्शक असते. पचनशक्‍ती चांगली असली की शरीरशक्‍ती वाढणे शक्‍य असते. यालाच महत्त्वाचा हातभार लावत असतो अभ्यंग. याही कारणामुळे थंडीत अभ्यंग करणे उत्तम समजले जाते.

अभ्यंगामुळे त्वचा निरोगी राहतेच, पण शरीरदृढतेसाठी, एकंदर शरीरशक्‍ती व्यवस्थित राहण्यासाठीही अभ्यंग खूप उपयोगी असतो. चरकसंहितेत यासंबंधी सांगितले आहे...
न चाभिघाताभिहतं गात्रमभ्यंग सेविनः ।
विकारं भजते।त्य़र्थं बलकर्मेणि वा क्वचित्‌ ।।
सुस्पर्शोपचितांगश्‍च बलवान्‌ प्रियदर्शिनः ।
भवत्यभ्यंगं नित्यत्वात्‌ नरो।ल्पजर एव च ।।
...चरक सूत्रस्थान

नियमित अभ्यंग करणाऱ्या व्यक्‍तीला श्रम झाले तरी सहज सहन होऊ शकतात, अति श्रमाने थकवा येत नाही किंवा इतर विकार होत नाहीत. त्वचा कोमल, स्पर्शाला सुखावह वाटेल अशी होते. शरीर भरते, मनुष्य बलवान व बघत राहावा असा होतो व वृद्ध झाला तरी त्याच्यात वृद्धत्वाची लक्षणे कमीत कमी प्रकट होतात.

प्रशान्तमारुताबाधं क्‍लेशव्यायामसंसहम्‌ ।
नित्य अभ्यंग करणाऱ्यास वातजन्य रोग होत नाहीत. क्‍लेश, श्रम सहन होतात. व्यायाम सहन करण्याची शक्‍ती येते.
अष्टांगहृदयात दिनचर्या सांगताना अभ्यंग रोज करावा, असे सांगितले आहे...
अभ्यंगमाचरेन्नित्यं स जराश्रमवातहा ।
दृष्टिः प्रसादः पुष्टयायुः स्वप्नसुत्वक्‍त्वदार्ढ्यकृत्‌ ।।
...अष्टांगहृदय सूत्रस्थान

अभ्यंग करण्याने म्हातारपण येत नाही. म्हणजेच वय वाढले तरी म्हातारपणामुळे येणारी अशक्‍तता, परावलंबित्व येत नाही, तारुण्य टिकून राहते. श्रम सहन करण्याची क्षमता वाढते, वातदोष संतुलित राहतो, दृष्टी उत्तम राहते, शरीर पुष्ट होते (या ठिकाणी पुष्ट याचा लठ्ठ असा अर्थ अभिप्रेत नाही, तर शरीर भरणे, बलवान होणे या अर्थाने पुष्ट शब्द वापरला आहे). अभ्यंग करण्याने दीर्घायुष्याचा लाभ होतो. झोप शांत लागते. त्वचा सुकुमार, कोमल राहते. त्वचा घट्ट राहते व एकंदरीत शरीर दृढ राहते.
अभ्यंगाचे हे सगळे फायदे जास्तीत जास्त मिळण्यासाठी थंडीचे दिवस उत्तम असतात. म्हणूनच हेमंत व शिशिर ऋतूत अभ्यंग नक्की करावा.
आयुर्वेदात ऋतुचर्या सांगताना दोन - दोन ऋतूंचे तीन गट पाडलेले दिसतात.

*ग्रीष्म व वर्षा ऋतूचा एक गट होतो. या काळात आहार, आचरण खूप काळजीपूर्वक करायचे असते. खाण्या-पिण्यावर संयम ठेवायचा असतो.
*शरद व वसंत ऋतूंचा दुसरा गट होतो. या ऋतूंमध्ये शरीरशक्‍ती साधारण असते, त्यामुळे या काळात थोडीफार काळजी घेतली तर एकंदर आरोग्य टिकू शकते.
*शिशिर व हेमंत या दोन ऋतूंमध्ये शरीरशक्‍ती उत्तम असते, त्यामुळे हा काळ शरीरशक्‍ती अधिकाधिक वाढवण्यासाठी उत्तम समजला जातो. उत्तम पोषक अन्न, च्यवनप्राश, धात्री रसायनसारखे धातुपोषक रसायन, नियमित अभ्यंग करण्याने शरीरशक्‍ती वाढवणे सहज शक्‍य असते. म्हणूनच थंडीच्या दिवसांत अभ्यंग नियमित करणे सर्वांच्याच हिताचे असते.

अभ्यंग शब्दात अंगाला तेल लावणे व जिरवणे अभिप्रेत असते. शास्त्रोक्‍त पद्धतीने तयार केलेले औषधी तेल शरीरात आतपर्यंत जिरण्याच्या क्षमतेचे असते. त्यामुळे वर पाहिलेले अभ्यंगाचे फायदे मिळण्यासाठी तेल औषधी असायला हवे, म्हणजेच ते वातशामक, शरीरपोषक द्रव्यांचा संस्कार केलेले असावे. नुसत्या तिळाच्या, खोबऱ्याच्या वा मोहरीच्या तेलाने अभ्यंग केल्याने अभ्यंगाचे खरे फायदे मिळू शकणार नाहीत.

अभ्यंग करताना सहसा पायापासून सुरवात केली जाते. केसांच्या विरुद्ध दिशेने तेल लावले की आतपर्यंत जिरणे सोपे असते, असे सांगितलेले असल्याने तेल लावताना खालून वर, या दिशेने लावायचे असते.
फार रगडून किंवा जोर लावून तेल लावणे, हाही एक प्रकारचा अभ्यंग असू शकतो, ज्याला संस्कृतमध्ये "मर्दन-अभ्यंग' म्हटले जाते; पण त्यासाठी प्रशिक्षित परिचारक (थेरपिस्ट) असणे आवश्‍यक होय. आतल्या शरीरावयवांची रचना समजून घेऊन कुठल्या ठिकाणी किती दाब द्यायचा, किती वेळ चोळायचे, हे समजू शकणाऱ्या परिचारकाकडूनच "मर्दन अभ्यंग' करून घ्यावा. एरवी आपले आपण औषधी तेल जिरविण्यानेही अभ्यंगाचे फायदे मिळू शकतात. तरफेने वजन उचलताना जसे तरफेच्या लांबीला महत्त्व असते, तसेच मसाज करत असताना दाब व वेळ, यापैकी वेळ तरफेचे काम करते. किती दाब द्यायचा याबरोबरच किती वेळ दाब द्यायचा, हेही महत्त्वाचे असते.

थंडीत अभ्यंग करण्याचा अजून एक फायदा म्हणजे कितीही थंडी असली तरी त्वचा फुटत नाही. त्वचा कोरडी पडण्याने तडतडणे, खाज येणे वगैरे त्रास अजिबात होत नाहीत आणि शरीर उबदार राहते. अभ्यंग करण्याने एकंदरच रक्‍ताभिसरण सुधारत असल्याने शरीराला आवश्‍यक देहोष्मा कायम राहतो. हात-पाय गारठणे, सुन्न होणे वगैरे त्रासांना आपोआपच प्रतिबंध होतो.

पादाभ्यंग हाही अभ्यंगाचाच एक प्रकार होय. पादाभ्यंग म्हणजे काशाच्या वाटीने पायाच्या तळव्यांना तूप चोळणे. पायाला अभ्यंग करण्याचेही खूप फायदे मिळतात. मुळाला पाणी घातल्याने जसे झाड सर्व बाजूंनी बहरते, तसेच पादाभ्यंग केल्याने संपूर्ण शरीराचे पोषण होते.

खरत्वं स्तब्धतां रौक्ष्यं श्रमः सुप्तिश्‍च पादयोः ।
सद्य एवोपशाम्यन्ति पादाभ्यंगनिषेवणात्‌ ।।
जायते सौकुमार्यं च बलं स्थैर्यं च पादयोः ।
दृष्टिःप्रसादं लभते मारुश्‍चोपशाम्यति ।।
न च स्यात्‌ गृध्रसीवातः पादयोः स्फुटनं न च ।
न सिरास्नायुसंकोचः पादाभ्यंगेन पादयोः ।।
....चरक संहिता

पायांना अभ्यंग केल्यास पायांचा खरखरीतपणा, पाय जखडणे, रुक्षता, थकावट, बधिरता, मुंग्या येणे वगैरे त्रास नाहीसे होतात, पाय कोमल होतात व त्यांच्यातील बल व स्निग्धता वाढते; डोळ्यांची आग व लाली कमी होऊन डोळे प्रसन्न होतात, वाताचे शमन होते, सायटिका होत नाही, पायांना भेगा पडत नाहीत, सिरा व स्नायूंचा संकोचही होत नाही.

संपूर्ण शरीराला अभ्यंग करता येतो, त्याचप्रमाणे विशिष्ट अवयवाला, शरीरातील विशिष्ट भागाला स्थानिक अभ्यंग करता येतो. उदा. गुडघे दुखत असल्यास फक्‍त गुडघ्यांना किंवा सांधे दुखत असल्यास फक्‍त सांध्यांना खास तेल लावण्याचा व जिरविण्याचा फायदा होतो.

बामसारखे केवळ वेदना कमी करणारे तेल एखाद्या वेळी वापरता येते. मात्र गुडघ्यांची, सांध्यांची झीज भरून आणण्यासाठी अभ्यंग करायचा असल्यास "शांती तेला'सारखी तेले आयुर्वेदात सांगितलेली असतात. ही तेले आतपर्यंत जिरून, वात कमी करून झीज भरून आणतात आणि खऱ्या अर्थाने उपयोगी पडतात.

पाठीच्या मणक्‍यावरही विशेष अभ्यंग करता येतो. मणके, तसेच मणक्‍यांना धरून ठेवणारे स्नायूंचे स्तंभ यांच्यावर अभ्यंग करता येतो. मान व पाठीच्या त्रासासाठी संशोधन करून "कुंडलिनी मसाज' नावाची विशेष अभ्यंग पद्धती मी विकसित केलेली आहे, ज्याचा फायदा स्लिप्ड डिस्क, मणक्‍यांची झीज, स्पॉंडिलायटीस असे त्रास बरे करण्यासाठी तर होतोच; पण मुळात असे त्रास होऊ नये म्हणूनही मेरुदंडाचा विशेष अभ्यंग नियमाने घेता येतो आणि त्यासाठी "कुंडलिनी' नावाचे विशेष विकसित केलेले तेल वापरता येते.

एकंदरच तारुण्य टिकविण्यासाठी, शरीरशक्‍ती वाढविण्यासाठी अभ्यंग हा सहज करता येण्याजोगा व अतिशय प्रभावी उपचार आहे. सध्याच्या धावपळीच्या व मानसिक ताणाने भरलेल्या जीवनशैलीसाठी तर अभ्यंग हे जणू वरदानच म्हणावे लागेल. थोडा वेळ काढून स्वतःला अभ्यंग करण्याने आणि महिन्या-दोन महिन्यांतून आयुर्वेदिक प्रशिक्षित परिचारकाकडून अभ्यंग मसाज घेण्याने आरोग्याचे रक्षण करणे सहज शक्‍य होते.

- डॉ. श्री बालाजी तांबे Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad