Friday, January 8, 2010

ऊब अभ्यंगाची

संपूर्ण अंगाला एकरूपतेने जोडणे व त्यात पडलेल्या भेगा व तडा घालवणे हा तेल लावण्यामागचा उद्देश असल्यामुळे अभि-अंग (अभ्यंग) हा शब्द अत्यंत समर्पक असून तो कृती व फायद्याचा बोध करून देतो.

बा हेरचे वातावरण थंड असले म्हणजे थंडीच्या दिवसात वा थंड प्रदेशात कपड्यांची खरी किंमत कळते. काश्‍मीर, कुलू मनाली वा दिल्लीला गेल्यावर प्रत्येक जण गरम कपडे, स्वेटर, मोजे खरेदी करण्याची धडपड करतोच. अहमदाबादसारख्या गरम प्रदेशात गरम कपडे मिळणार नाहीत असे नव्हे, पण जेथे वातावरण खूप थंड असते, स्वेटर घातल्याशिवाय बाहेर जाता येत नाही अशा ठिकाणी विविध व नावीन्यपूर्ण स्वेटर, टोप्या, मोजे वगैरे गोष्टी मिळू शकतात.

थंडी संपल्यानंतर कपाटात ठेवून दिलेल्या स्वेटरची आठवण अचानक पुढच्या हिवाळ्यात होते. हिमालयात बर्फाचे वादळ झालेले आहे वा सिमला, काश्‍मीर येथे भरपूर बर्फ पडत आहे, असे टीव्हीवर पाहिले, की मंडळी लगेच गरम कपड्यांची शोधाशोध सुरू करताना दिसतात. कारण पुढच्या एक - दोन दिवसांत ही थंडीची लाट राजस्थान, गुजरात या ठिकाणी लोकांना गारठवून महाराष्ट्रापर्यंत पोचते. तसे पाहताना समुद्रकिनारी असलेली गावे थंडीला फार घाबरत नाहीत. कारण तेथील समुद्राचा थंडीला एक प्रकारचा वचक असतो. एरवी तर तेथे हाफपॅंट व शर्ट घालून फिरायला लावणारी गरमी व चिकचिकाट असतो.

थंडीच्या दिवसात, पावसाळ्यात तेलाचा मसाज म्हणजे अभ्यंग करणे खूप आवश्‍यक असते. पण नेमके त्याच वेळी कपडे काढून बसावेसे वाटत नाही. कपडे काढल्यावर थंडी एवढी बोचरी असते की मसाजमुळे होणारा फायदा झाला नाही तरी चालेल, अशी मनोधारणा तयार होते.
सहल म्हणून केव्हा तरी थंड प्रदेशात जाणे वेगळे आणि आपल्या राहत्या घरी थंडी वाजणे वेगळे. आपल्याकडचे हवामान उष्णतेकडे झुकणारे असल्यामुळे साधारणतः आपल्या घरात पंखे, एसी वगैरे लावलेले असतात. हीटर्स वगैरे खोली गरम करणाऱ्या उपकरणांची व्यवस्था केलेली नसते. अचानक थंडी पडली तर थंडीपासून संरक्षण करण्यासाठी घराच्या खिडक्‍या, दारे बंद करून घेणे एवढेच आपल्या हातात असते. पण या दारा-खिडक्‍यांची रचना व पातळ काचा थंडी पूर्णपणे बाहेर थांबवू शकत नाहीत.

हिवाळा हा ऋतू अप्रतिम असतो. या ऋतूत भूक भरपूर लागते. उन्हाळ्यासारखे थकायला होत नाही. म्हणून थंडीच्या दिवसात छान खावे, प्यावे, मसाज करून घ्यावा. याच ऋतूत वर्षभरासाठी आरोग्याची बेगमी करून ठेवता येऊ शकते. मसाजसाठी वापरलेला अभ्यंग हा शब्द अत्यंत समर्पक आहे. मसाजमध्ये आत एक प्रकारचा संदेश (मेसेज) द्यायचा असतो वगैरे शब्दांची व अर्थाची ओढाताण करून समजूत काढली तरी काय, कुणाला, कोठे मेसेज द्यायचा व हा मेसेज मिळाल्यावर मेंदू कसे काम करतो हे सर्व अनुत्तरितच राहते. एक गोष्ट नक्की आहे, की थंडीमुळे वा पावसाळ्यातील वातवृद्धीमुळे सांध्यात व त्वचेत आलेल्या कोरडेपणामुळे त्वचा ताणली जाते, त्यामुळे कंड सुटणे, तडतडणे, सांध्यात दुखणे वा त्वचा रुक्ष होणे वगैरे त्रास होऊ लागतात.

अशा वेळी त्वचेत तेल जिरवले तर त्वचेला पुन्हा जीवनदान मिळते व थंडी-पावसाळ्याचे त्रास होत नाहीत. संपूर्ण अंगाला एकरूपतेने जोडणे व त्यात पडलेल्या भेगा व तडा घालवणे हा तेल लावण्यामागचा उद्देश असल्यामुळे अभि-अंग (अभ्यंग) हा शब्द अत्यंत समर्पक असून तो कृती व फायद्याचा बोध करून देतो.

आयुर्वेदात अभ्यंग मुख्यत्वे तेलाचाच सांगितला आहे. त्याचा उद्देश स्नायूत व त्वचेखाली असलेला आमदोष हटवून घालवणे व त्वचेला तेल पाजून त्वचा लवचिक करणे, जोडणे असा आहे. झाड वाळल्यावर त्याची पाने गळून पडत असल्यास, झाडाच्या फांद्या कटकन्‌ मोडू शकत असल्यास झाडाला पाणी दिल्यावर झाडाला पुनर्जीवन प्राप्त होते, त्याला नवीन पालवी फुटते, तसे आपल्याला अभ्यंगामुळे नवचैतन्य, नवतारुण्य प्राप्त होते. रुक्ष झालेली त्वचा तेल लवकर ओढून घेते. त्वचेच्या अत्यंत सूक्ष्म चिरांमधूनही तेल आत जिरते.

साधे तेल शरीरात मुरवणे हे काम वाटते तेवढे सोपे नाही. कारण तेलात एक प्रकारचा चिकटपणा असतो, जो लगेचच त्वचेवर एक प्रकारचे आवरण तयार करतो. म्हणून अभ्यंगासाठी वापरायचे तेल सिद्ध करणे आवश्‍यक आहे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे, ज्यामुळे तेल ताबडतोब आतपर्यंत जिरायला व शरीरात सात्म्य होण्यास समर्थ होते. तेलाच्या चौपट, आठपट वा सोळापट पाणी टाकून तयार केलेला वनस्पतींचा काढा व अनेक वनस्पती पाण्यात भिजवून त्यांचा केलेला लगदा तेलात टाकून उकळायला ठेवला जातो. पाणी उडून जाईपर्यंत हा अग्निसंस्कार केला जातो. असा अग्निसंस्कार केलेले तेल गुणाने सूक्ष्म तर होतेच, शिवाय ते शरीरात सात्म्य व्हायलाही मदत होते. काही आयुर्वेदिक तेले तयार करताना काही विशिष्ट फायदे मिळण्यासाठी तेलात दूध, दही, दह्यावरची निवळी टाकूनही उकळले जाते.

तेल कोमट वा गरम करून त्यात काही अर्काचे थेंब टाकून, काही चूर्ण टाकून, काही सुगंध मिसळून पटकन तयार केले तर त्याची किंमतही फार नसेल. असे तेल सुगंधी असेल, रंगाला आकर्षक असेल पण ते त्वचेत जिरून कार्य करायला समर्थ नसेल, असे तेल लावण्याने थंडीची मजा घेण्याजोगे शरीर तयार होण्याची अपेक्षा पूर्ण होणार नाही.

एकंदरीत, आयुर्वेदिक तेल हे आपल्या ऋषिमुनींचे अमूल्य संशोधन आहे. स्वस्तात झटपट उत्पादन करण्याच्या नादी लागल्यास आयुर्वेदिक तेले तयार होऊ शकणार नाहीत. तेल तयार करताना पाठात सांगितल्यानुसार सर्व वनस्पती योग्य प्रमाणात वापरल्या आहेत, की केवळ थोड्याशा वनस्पती कमी प्रमाणात वापरल्या आहेत ही गोष्ट तेल तयार झाल्यावर प्रयोगशाळेत शोधून काढणे दुरापास्त असते. तेल तयार करताना वनस्पतींचा काढा टाकून अनेक तासांपर्यंत अग्निसंस्कार गेला आहे, की तेल नुसते गरम करून वनस्पतींचा अर्क व रंग टाकला आहे हेही शोधणे अवघड ठरते. अर्थातच आयुर्वेदिक पद्धतीनुसार बनविलेले तेल न वापरता अभ्यंग केल्यास खरा अभ्यंग होत नाही, अशा अभ्यंगापासून अभ्यंगाचे फायदेही मिळत नाहीत.

खूप प्रमाणात तेल लावून शरीर चपचपीत करणे, मसाजसाठी साधे असंस्कारित तेल घेतल्याने ते आत न जिरणे, शरीराला नुसते घर्षण करणे यामुळे एक प्रकारचा सुरुवातीला वाटणारा थकवा व नंतर वाटणारा आराम यामुळे शरीर-मनाला बरे वाटले तरी त्यामुळे रोगपरिहार वा शरीराला नवतारुण्य देण्याच्या दृष्टीने असा मसाजचा कितपत उपयोग होतो याचा विचार करणे भाग आहे.

तेव्हा थंडी आली रे आली की गुळाची पोळी खाणे, रेवडी खाणे, तिळगुळाचे लाडू खाणे एवढ्यावर न राहता तिळाच्या तेलावर आयुर्वेदिक पद्धतीने संस्कार करून बनविलेले अभ्यंग तेलाचा मसाज घेणे श्रेयस्कर ठरते. थंडीच्या ऋतूत रात्री झोपण्यापूर्वी नाकात औषधी तुपाचे थेंब, कानात औषधी तेलाचे थेंब, टाळूवर औषधी तेलाचे थेंब जिरविण्याची काळजी घेतली तर त्यापासून मिळणारे फायदे नंतर वर्षभर उपभोगता येतात.

- डॉ. श्री बालाजी तांबे 

Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad