Friday, January 8, 2010

अन्नयोग : सुका मेवासुकामेवा पौष्टिक असतो इतपत माहिती सर्वांना असते, पण सुक्‍या मेव्याचे नेमके गुणदोष माहिती झाले तर कोणत्या प्रकृतीसाठी काय योग्य, काय अयोग्य हे ठरविता येऊ शकते.

आत्तापर्यंत आपण फळांची माहिती घेतली. प्रत्येक फळात काय गुण आहेत, काय दोष आहेत हे समजून घेतले. फळांनंतर आपण सुक्‍या मेव्याचे म्हणजे जी फळे वाळवून खाता येतात त्यांचे गुणधर्म पाहणार आहोत. सुकामेवा पौष्टिक असतो इतपत माहिती सर्वांना असते, पण सुक्‍या मेव्याचे नेमके गुणदोष माहिती झाले तर कोणत्या प्रकृतीसाठी काय योग्य, काय अयोग्य हे ठरविता येऊ शकते.
सुका मेवा नावाप्रमाणेच सुकवलेला असतो. त्यामुळे अर्थातच अधिक काळ साठवून ठेवता येतो. लहान मुलांना खाऊ म्हणून योग्य प्रमाणात सुका मेवा देणे उत्तम असते.

बदाम
संस्कृतमध्ये वाताम, गुजराती व मराठीत बदाम, हिंदीत बादाम तर इंग्रजीत आल्मंड नावाने ओळखला जातो.
शुष्कं च तत्फलं प्रोक्तं मधुरं धातुवर्धकम्‌ ।
स्निग्धं वृष्यं च बल्यं च पौष्टिकं कफकारि च ।।
वातपित्तस्य शमनं प्रोक्‍तं गुणविशारदैः ।...निघण्टु रत्नाकर
रस - मधुर
गुण - स्निग्ध
विपाक - मधुर
दोष - वातपित्तशामक व कफवर्धक
बदामामुळे धातूंचे पोषण होते, विशेषतः शुक्रधातूची शक्‍ती वाढते. बदाम पौष्टिक असतात, शरीरावश्‍यक कफ वाढवितात.
रात्रभर पाण्यात भिजविलेले तीन - चार बदाम सकाळी साल काढून खाणे एकंदर सर्व प्रकृतींसाठी अनुकूल असते. बदामामुळे सर्वच धातूंचे पोषण होत असल्याने स्मरणशक्‍ती, एकाग्रशक्‍ती वाढण्यासाठी मदत मिळते. विद्यार्थ्यांनी, बुद्धीला ताण देणाऱ्या सर्व व्यावसायिकांनी रोज तीन - चार बदाम खाणे उत्तम असते. गर्भधारणेपूर्वी स्त्री-पुरुषांनी आणि स्त्रीने संपूर्ण गर्भारपणात भिजवलेले बदाम खाण्याचा चांगला उपयोग होताना दिसतो.
भिजवलेले बदाम बारीक वाटून दूध, खडीसाखर, तूप यासह शिजवून तयार केलेली खीर वीर्यवर्धनासाठी, ताकद वाढण्यासाठी चांगली असते. ही खीर मेंदूसाठीही अतिशय पोषक असते. संपूर्ण वर्षभर बदाम खाणे उत्तम असतेच, किमान हिवाळ्यात तरी बदाम निश्‍चित खावेत.

सुके अंजीर
अंजीराला संस्कृतमध्ये रामोदुंबरिकाफल (रामाचे उंबर) तर इंग्रजीत फिग म्हणतात.
अञ्जीरः शीतलः स्वादुर्गुरु रक्‍तरुजाहरः ।
दाहं वातं च पित्तं च नाशयेत्‌ तृप्तिदो मतः ।।...निघण्टु रत्नाकर
रस - मधुर
गुण - गुरु म्हणजे पचायला जड
वीर्य - शीत
दोष - वात-पित्तशामक
अंजीर रक्‍त शुद्ध करून वेदना कमी करणारे असते, शीत वीर्याचे असल्याने दाहशामक असते, तृप्ती देते. सुकलेले अंजीर तूप व खडीसाखरेबरोबर खाणे अतिशय पौष्टिक असते, धातू वाढवते व शरीरातील उष्णताही कमी करते. अंजीरामध्ये रक्‍त शुद्ध करण्याचा तसेच रक्‍त वाढविण्याचा मोठा गुण आहे. ताजे अंजीर वर्षभर उपलब्ध नसते, पण सुके अंजीर नियमित खाता येते. संपूर्ण गर्भारपणात एक वा दोन सुके अंजीर खाणे उत्तम असते. सुके अंजीर पाण्यात सहा - सात तास भिजवून खाल्ले असता शौचाला साफ होण्यासही मदत मिळते.
पित्त वाढल्यामुळे घसा लाल होऊन दुखत असल्यास सुक्‍या अंजिराच्या काढ्याने गुळण्या करण्याचा उपयोग होतो.

मनुका
संस्कृतमध्ये द्राक्षा, मराठीत बेदाणे वा मनुका तर इंग्रजीत रेझिन्स म्हणतात.
वृष्यं संतर्पणं बल्यं पौष्टिकं परिकीर्तितम्‌ ।।...निघण्टु रत्नाकर
मनुका काळ्या सबीज द्राक्षांपासून तर बेदाणे हिरव्या निर्बीज द्राक्षांपासून तयार केलेले असतात. बेदाण्यांपेक्षा मनुका अधिक उपयुक्‍त असतात, त्यातही काळ्या मनुका अधिक औषधी असतात.
रस - मधुर
गुण - स्निग्ध, लघु म्हणजे पचण्यास सोप्या.
वीर्य - शीत
दोष - त्रिदोषशामक
मनुका पौष्टिक, ताकद वाढविणाऱ्या व शरीराला तृप्त करणाऱ्या असतात. काळ्या मनुका रक्‍तवाढीसाठी तसेच शुक्रधातूच्या पोषणासाठी, उत्तम असतात.
10-12 काळ्या मनुका रात्रभर रोज थंड पाण्यात भिजत घालून सकाळी कोळून गाळून घ्याव्यात. गाळलेल्या पाण्यात साखर, व जिऱ्याची पूड टाकून घेतल्यास शरीरातील उष्णता, कडकी कमी होते, लघवीला साफ होते. पाण्यात भिजविलेल्या 10-12 मनुका रात्री झोपण्यापूर्वी खाण्याने दुसऱ्या दिवशी शौचाला साफ व्हायला मदत होते. डोकेदुखी, उलट्या, मळमळ, हातापायांची आग, नाकातून रक्‍त येणे वगैरे पित्ताच्या त्रासांमध्ये नियमितपणे 10-12 मनुका वा बेदाणे खाणे उत्तम असते.
कोरडा खोकला, कसकस, न शमणारी तहान, हृद्रोग वगैरेंमध्येही मनुका उपयुक्‍त असतात. काळ्या मनुका धात्री रसायनामधील एक मुख्य द्रव्य असते म्हणूनच धात्री रसायनाचा रक्‍तवर्धनासाठी तसेच हॉर्मोन्सचे कार्य सुधारण्यासाठी व स्त्रीसंतुलनासाठी खूप चांगला उपयोग होतो.

- डॉ. श्री बालाजी तांबे 

Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad