Thursday, January 28, 2010

रहस्य केसांचे!

मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे.. सळसळीत, रेशमी, काळेभोर, लांबसडक केस म्हणजे जणू सौंदर्याचा मापदंडच! एक लांबसडक केस चेहऱ्यातील अनेक उणिवा भरून काढेल तर खुरटे, आखूड केस सुंदर चेहऱ्यालादेखील बाधा आणतील. म्हणूनच बहुधा आपल्याच देशात नव्हे तर जगभरात हजारो वर्षांपासून लांबसडक केसांचं अतिशय आकर्षण आहे. आपले केस लांबसडक, सळसळते नसल्याचं दु:ख सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखाने एकदा मुलाखतीत बोलून दाखवलं होतं! मध्यंतरीच्या काळात काही वर्षे आपल्याकडे आखूड केसांची फॅशन आली होती खरी, पण ती अगदीच तात्पुरती. एरवी कामिनी कौशल, मधुबाला, साधना, जयाप्रदा, परवीन बाबी, करिश्मा कपूरपासून आजच्या करीना, कतरीना, बिपाशा बासू, विद्या बालनपर्यंत प्रत्येक काळात लांबसडक केसांचीच फॅशन होती आणि आजही आहे. हेअर स्टाईलचे प्रकार बदलले असतील, पण केसांच्या लांबीचं आकर्षण तेच आहे.
लांब केस हे सौंदर्याचंच नाही तर सामाजिक प्रतिष्ठेचंदेखील लक्षण मानलं जात असे. पूर्वापार इजिप्त, ग्रीक, रोमन वगैरे देशांतील उमराव घराण्यातील स्त्रिया लांबसडक केस राखत असत. केस मेंदीने रंगवून त्यावर सोनेरी चमकी पसरवून फुलांची सजावट करण्याचा हक्क फक्त उमराव घराण्यातील स्त्रियांनाच होता. गरीब वा गुलाम स्त्री- पुरुषांना डोक्यावर केस राखता येत नसत. जपानमध्ये मात्र कुलीन स्त्रीपेक्षा ‘गेईशा’ (पुरुषांचं नृत्य गायनाने मनोरंजन करणाऱ्या स्त्रिया)चेच केस अधिक लांब असत. उंच मनोऱ्यासारखी केशरचना आणि त्यावर हिरेमोत्यानं मढवलेल्या छोटय़ा कंगव्यांची सजावट करण्याची पद्धत होती. आजही जपानमध्ये लग्न समारंभात वधूची अशीच मनोऱ्यासारखी उंच केशरचना केली जाते!
लांब केस आणि तारुण्य हे समीकरण तर सांगायलाच नको. वाढत्या वयात शारीरिक तसेच मानसिक बदलांमुळे केस गळू लागतात त्यामुळे ते आपोआपच कापून टाकण्याकडचा कल अधिक वाढतो. केस जर अधिक काळ लांबसडक राहावे असं वाटत असेल तर त्यासाठी लहानपणापासून आहारविहाराच्या सवयी योग्य असणं गरजेचं आहे. केसांना सगळ्यात जास्त गरज असते ती पोटातून जाणाऱ्या खनिज द्रव्यांची आणि केस स्वच्छ राखण्याची. त्यासाठी भरपूर पाणी प्यावे, मोड आलेली कडधान्ये, गाजरसारख्या पदार्थाचा आहारात समावेश असावा आणि निदान एक दिवसाआड तरी तेल- शांपू लावून केस धुवावेत.’

गरजेनुसार मोकळे सोडता येतात किंवा बांधून ठेवता येतात म्हणून लांब केसांचं आकर्षण सर्वानाच असतं. लांब केस सुंदर दिसत असले तरी त्यांची काळजीही खूप घ्यावी लागते. ज्यांना लांब केस आवडतात, ते मेंटेन करण्याची जबाबदारीही त्या स्वखुशीने पेलतात. आईकडून हा वारसा मुली खरेतर जपत आल्या आहेत. सध्याच्या काळात लांबसडक केस असलेल्या मुली अपवादच.

2 comments:

  1. लांब केस असलेली एक मराठी अभिनेत्री मला लक्षात आहे, ती म्हणजे अर्चना जोगळेकर. त्यानंतर मला मराठी चित्रपटात खरेखुरे लांबसडक केस असणारी अभिनेत्री दिसली नाही.

    ReplyDelete

ad