Sunday, July 19, 2009

उपचार दम्यावर!

दमा अथवा अस्थमा ही रुग्णाला कासावीस करणारी श्‍वसनमार्गाची व्याधी आहे. पूर्वी प्रौढ वयात जास्त आढळून येणारा हा रोग सध्या मात्र सर्व वयोगटांतील माणसांमध्ये दिसून येत आहे व दम्याच्या रुग्णांची संख्या जलद गतीने वाढत आहे ही चिंतेची बाब आहे.
निरोगी श्‍वसनसंस्था माणसाच्या शरीराला योग्य प्रमाणात ऑक्‍सिजन (प्राणवायू) पुरवते व त्यावर शरीरसंस्थेच्या अनेक क्रिया अवलंबून असतात, तसेच श्‍वसनामुळे शरीरात ऑक्‍सिजन व कार्बन डाय ऑक्‍साईडची योग्य पातळी राखली जाते. यासाठी नाक, श्‍वसननलिका, फुफ्फुसे व आलव्हिओली आणि त्या भोवतीचे रक्तवाहिन्यांचे जाळे इ. श्‍वसनसंस्थेच्या सर्व रचनांमध्ये आकुंचन व प्रसरण क्रिया योग्य प्रमाणात होणे महत्त्वाचे आहे, तसेच भोवतालच्या बरगड्या, छाती व पोटामधील पडदा आणि श्‍वासाबरोबर आत येणाऱ्या कणांना अडवण्यासाठी सिलियाचीही योग्य रीतीने हालचाल होणे आवश्‍यक ठरते.
दम्याच्या रुग्णांमध्ये या श्‍वसनमार्गाला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे (External or Internal factors) सूज असते व त्यामध्ये स्राव (Mucus) जमा होतो. यामुळे श्‍वसनमार्गाची नैसर्गिक रुंदी कमी होते, तसेच या मार्गातील स्नायू आकुंचन पावल्यामुळे (bronchospasm) श्‍वसनमार्ग अधिकच अरुंद होतो. यामुळे श्‍वासोश्‍वास करण्यास अडथळा निर्माण होतो.

दम्याची कारणे ः
१) अनुवंशिकता, २) हवेचे प्रदूषण (धूळ, तंबाखू/ सिगारेटचा धूर, जळत्या लाकडांचा धूर, पेट्रोल/ डिझेलचा धूर, कारखान्यांचा धूर.) ३) कीटकनाशके, सेंट अथवा सुगंधी द्रव्यांचा वास, ४) केसाळ अथवा पिसे असणाऱ्या पाळीव प्राणी, पक्ष्यांचा सहवास, ५) सतत थंड व कोरड्या हवेत राहणे, ६) घरात अथवा आजूबाजूला दमटपणा व ओलसरपणा सतत असणे, ७) एखाद्या अन्नपदार्थाची (गहू, अंडे इ.) किंवा डबाबंद पदार्थात घातलेल्या एखाद्या घटकाची ऍलर्जी. ८) एखाद्या औषधाची ऍलर्जी, ९) सतत सर्दी, पडसे, सायनसचा त्रास असणे, १०) कारखान्यातील रासायनिक पदार्थांचा वास, कापसाचे कण, ११) फुलांचा वास अथवा परागकणांची ऍलर्जी, १२) सतत अपचनचा त्रास असणे, १३) अतिशय शारीरिक श्रम, १४) अत्याधिक मानसिक ताणतणाव, अस्वस्थता, दडपशाहीमुळे भावनांचा कोंडमारा होणे, १५) शरीराची प्रतिकारशक्ती एकंदरीत कमी असणे.
अर्थात वरीलपैकी कोणतेही कारण नसल्यामुळेसुद्धा दमा होऊ शकतो, तर वर सांगितलेल्या कोणत्याही कारणांमुळे शरीराची प्रतिक्रिया होते (श्‍वसनमार्ग आकुंचन पावणे) म्हणून दम्याला ठशरलींर्ळींश अळीुरू ऊळीशरीश असेही म्हटले जाते. म्हणून रुग्णाने थोडी जागरूकता ठेवून दम्याच्या लक्षणांपूर्वीचे कारण ओळखून त्या गोष्टीचा संपर्क टाळावा.

दम्याची लक्षणे
१) श्‍वास घ्यायला अतिशय त्रास, धाप लागणे,
२) सर्दी, खोकला,
३) छातीत जडपणा जाणवणे,
४) छातीतून आवाज येणे (थहशशूळपस),
५) बोलण्यास त्रास होणे,
६) रुग्णास अशक्तपणा, बेचैनी जाणवून तो घाबराघुबरा होतो.
७) झोपल्यावर त्रास वाढतो, तर बसल्यावर कमी होतो.
८) कधी कधी सारख्या दम्यामुळे रुग्ण चिडचिडा होतो.
९) चेहरा लाल होणे, मानेचे स्नायू ताठरणे, जीभ व नखे निळसर दिसणे ही घातक लक्षणे होत.
दम्याचा ऍटॅक काही मिनिटांपासून काही तास ते काही दिवसांपर्यंत राहू शकतो. आहार, विहार, आजूबाजूच्या वातावरणाची काळजी व प्रतिबंधात्मक उपाय केले, तर दमा त्रासदायक ठरत नाही. मात्र ऍटॅक आल्यावर तातडीचे उपचार घेणेच योग्य ठरते. निसर्गोपचार व ऍक्‍युपंक्‍चरमुळे दम्याचा त्रास (ऍटॅक कमी होणे, सर्दी कमी प्रमाणात बाहेर पडणे, हुशारी वाटणे) निश्‍चितपणे कमी होऊ शकतो.

कोणती काळजी घ्यावी?
१) सर्वप्रथम अतिशय सकस व पूरक आहार घ्यावा. जेणेकरून जीवनसत्त्वे व पूर्ण प्रथिनांची कमतरता भरून निघेल व शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.
२) पोषक आहार एकाच वेळी पोट जड होईपर्यंत न घेता थोड्या थोड्या प्रमाणात दिवसातून ४-५ वेळा घेणे. ८-१२-४-८ वाजता अशा दिवसाच्या आहाराचा आदर्श वेळ ठरतील. (आपल्या दिनक्रमानुसार यात थोडा बदल चालेल, मात्र रात्रीचे जेवण ८-८।। पर्यंत घ्यावेच.)
३) तळलेले पदार्थ व थंड पदार्थ, पाणी टाळावे. उलट कोमट पाणी दिवसभर घेतल्यास रुग्णास फायदाच होईल.
४) कोमट दुधामध्ये मध (१ चमचा चहाचा) घालून घ्यावे.
५) ७-८ तुळशीची पाने १/२ ग्लास पाण्यात घालून उकळावे. कोमट झाल्यावर प्यावे.
६) अनुलोम - विलोम, भस्त्रिका प्राणायाम योग्य पद्धतीने हळूहळू करत ५ मिनिटांपर्यंत नियमित रोज केले तरी खूप फायदा होतो. उजव्या नाकपुडीतून हवा घेऊन डाव्या नाकपुडीने हवा सोडणे असे १-१० अंक मोजेपर्यंत करावे.
७) सिद्धासन, भुजंगासन, सुप्त वज्रासन, मत्स्यासन, शवासन इ. आसने आधी नीट शिकून घेऊन करावीत. शिवमुद्राही १० मिनिटांपर्यंत करावी.
८) काही ऍक्‍युप्रेशर बिंदूंनाही दाब देऊन फायदा होतो.
९) ज्यांना शक्‍य असेल त्यांनी सकाळचे ऊन छातीवर व पाठीवर घ्यावे. (कडक ऊन नको) किंवा सोसवेल एवढ्या गरम कपड्याने छाती व पाठीकडची बाजू शेकावी.
१०) गरम पाण्याचा वाफारा नियमित घेणे व गरम पाण्याच्या गुळण्या करणे यामुळे सुद्धा रुग्णांना खूप आराम मिळतो.
११) आंघोळीच्या वेळी गरम पाण्याची (सोसवेल एवढेच) धार छातीवर व पाठीवर धरावी.
१२) सोन्याचा व चांदीचा छोटासा पत्रा अथवा तुकडा घालून उकळलेले पाणी रुग्णास प्यायला द्यावे.
१३) रुग्णाने मोकळ्या हवेत फिरून येणारी तरतरी अनुभवावी.
१४) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक विचार करून ताणतणावांपासून दूर राहावे. मनातील भावनांचा व मतांचा निचरा वेळोवेळी योग्य पद्धतीने करावा.
१५) दिवसातील ५ मिनिटे तरी भगवंताचे नामस्मरण जरूर करावे.
१६) ज्या रुग्णांना तपकीर ओढण्याची, तंबाखू, पानमसाला खाण्याची व विडी/ सिगरेट ओढण्याची सवय असेल त्यांनी या गोष्टींपासून दूर राहावे.
१७) आहारात लसूण, पडवळ, दुधी भोपळा, चवळई इ. भाज्यांचा समावेश करावा.
स्वतःचा विकास साधताना औद्योगिक क्रांती व त्यामधून गतिमान झालेल्या जीवनशैलीच्या दुष्परिणामांना सामोरे जाताना मानवाची दमछाक होऊ लागली आहे. तेव्हा निसर्ग नियमांनुसार आहार, विहार व स्वनियंत्रित जीवनशैलीकडे वळता आले तर आपण दम्याला नक्कीच दम देऊ शकू!
डॉ. आरती साठे, मुंबई

No comments:

Post a Comment

ad