Sunday, July 19, 2009

मेंदूस्तवन

शरीराने विशेष बलाढ्य नसतानाही माणूस नावाच्या प्राण्याने पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना काबूत आणले ते सुमारे तीन पाउंड वजनाच्या मेंदूमुळे! इतर प्राण्यांमध्येही तो असतो; पण माणसात तो कमालीचा विकसित झाला. मेंदूमुळे विचारशक्ती आली. सत्‌-असत्‌ असा विवेक आला. भावना सूक्ष्म बनल्या. विचार, भावना व्यक्त करण्यासाठी वाणीची क्षमता विकसित झाली. निरनिराळ्या भाषा विकसित झाल्या. अस्तित्वातील प्रत्येक सूक्ष्म व स्थूल गोष्टीचा वेध घेणारी संशोधक वृत्ती आली.
निसर्गाने बनविलेल्या मेंदू या अद्‌भुत अवयवाविषयी आपण विचार करतो; त्याच्या क्षमतेचे, कार्याचे विश्‍लेषण करतो आणि त्यासाठीही आपण वापरतो तो मेंदूच! असंख्य मृत आणि जिवंत मेंदूंचा मेंदूच्याच साह्याने अभ्यास करूनही आपल्याला आपल्या मेंदूच्या पाच टक्‍क्‍यांहून अधिक गोष्टींविषयी माहिती नाही. म्हणजे मेंदूच्या पंचाण्णव टक्के कार्याविषयी आपण व शास्त्रज्ञ सारखेच अडाणी आहोत. त्यामुळे मेंदूचा ठासून वापर करणाऱ्या विचारवंतांनी त्यांची फुशारकी मारण्याची जरुरी नाही, तसेच मेंदूचा वापर हा आपल्यासाठी वैकल्पिक आहे, असा गोड गैरसमज करून घेऊन कलावंतांनी त्याची अफाट ताकद नजरेआड करू नये.
मेल्यानंतर मेंदूचे काप करता येतात; पण जिवंत मेंदू हा अर्धद्रव असतो. तो खास पोषण करणाऱ्या द्रव्यामध्ये कवटीच्या बंद पेटीत तरंगत असतो. मेंदूभोवती तीन आवरणे असतात. बाहेरून आतल्या क्रमाने त्यांची नावे "ड्यूरा', "ऍरेकनॉइड', आणि "पाया' अशी असतात. इतर अवयवांप्रमाणे मेंदूमध्ये रक्तवाहिन्यांचे जाळे नसते. शिवाय मेंदूलगतचे "पाया' आवरण रक्तामध्ये फिरणाऱ्या जिवाणू- विषाणूंना, तसेच इतर अनेक रासायनिक व दूषित पदार्थांना मेंदूमध्ये शिरण्यास मज्जाव करते. या "पाया' आवरणाला "ब्लड-ब्रेन-ब्ररिअर' म्हणतात. या "कस्टम'मधून अल्कोहोल, निकोटिनसारखे मुरब्बी गुन्हेगार मात्र शिताफीने घुसतात आणि इतर अवयवांप्रमाणे मेंदूवरही घातक परिणाम करतात.
मेंदूमध्ये सुमारे दहा अब्ज पेशी असतात. मेंदूची प्रत्येक पेशी साठ हजार पेशींना जोडलेली असते. लहानपणापासून दररोज मेंदूच्या तीन हजार पेशी मरत असतात. मेंदू आणि हृदयाच्या पेशींना शरीरातल्या इतर पेशींप्रमाणे आपली आवृत्ती काढता येत नाही. त्यामुळे एकदा पेशी मेल्या, की तिथली जागा जोडणाऱ्या दुसऱ्या प्रकारच्या पेशी भरून काढतात. त्यामुळेच या दोन्ही पेशींचा कॅन्सरही होत नाही. कारण पेशी विभाजनाची प्रक्रिया नसल्यामुळे सदोष कॅन्सरपेशी निर्माण होण्याचे कारणच नाही. "ब्रेन ट्यूमर' म्हणून जे आपण ऐकतो वा चित्रपटात पाहतो, ते मेंदूच्या पेशींना जोडणाऱ्या मधल्या पेशींचे असतात.
ढोबळमानाने मेंदूचे तीन भाग पडतात. आकाराने सर्वांत मोठा असा "सेरेब्रम'. ज्याला डावा व उजवा असे दोन भाग असतात. स्वतःच्या इच्छेने होणारी, बुद्धीचा-तर्काचा वापर केली जाणारी कार्ये त्याच्यामार्फत होतात. स्मरणशक्तीच्या साह्याने साठवलेले माहितीचे भांडार सेरेब्रमच्या विविध भागात असते. दुसरा भाग म्हणजे लहान मेंदू. जो हालचालींमध्ये सफाईदारपणा आणण्यासाठी, शरीराचा तोल सांभाळण्यासाठी आणि प्रत्येक कृतीत व स्थितीत शरीराची ढब सांभाळण्यासाठी उपयुक्त असतो. तिसरा भाग म्हणजे मेंदूचे देठ- ब्रेनस्टेम. या आकाराने लहान असलेल्या भागात हृदयाची गती, श्‍वासाची गती वगैरे अनैच्छिक क्रियांची नियंत्रणकेंद्रके असतात.
मेंदूमधून शरीराकडे येणारे सर्व संदेश ब्रेनस्टेममधूनच मज्जारज्जूमध्ये येतात.
मेंदूच्या या देठाच्या शेजारी "हायपोथलॅमस' नावाचा बोराच्या आकाराचा मेंदूचा "कारभारी' असतो. हायपोथलॅमसला मात्र भरपूर रक्तपुरवठा असतो. याचे कारण म्हणजे शरीराचे विशिष्ट तापमान टिकवणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवणे, तहान-भूक ओळखणे, रक्तातले साखरेचे प्रमाण ओळखणे, या सर्व महत्त्वाच्या सेवांचे "हेडऑफिस' या ठिकाणी आहे. हायपोथलॅमसचा विश्‍वासू सेवक म्हणजे "पिट्युटरी ग्रंथी'. तिच्या हाताखाली थायरॉइड, ऍड्रेनल इत्यादी ग्रंथी सरदार असतात. हायपोथलॅमस-पिट्युटरी आणि इतर ग्रंथींची ही अजब यंत्रणा संप्रेरकाच्या माध्यमातून नानाविध कार्ये करते.
मेंदूमधून शरीराच्या पेशींकडे व सर्व ज्ञानेंद्रियांकडून मेंदूकडे संदेशाची देवाणघेवाण नसांच्या माध्यमातून केली जाते. ताशी २९० कि.मी. वेगाने हे संदेशवहन केले जाऊ शकते. मेंदूच्या आज्ञेशिवाय सूक्ष्मतमही हालचाल केली जात नाही. तसेच शरीराच्या प्रत्येक ज्ञानेंद्रियांच्या प्रत्येक पेशीला प्रतिक्षणी होणारी माहिती मेंदूला कळल्याशिवाय राहत नाही.
डॉ. हिमांशू वझे

No comments:

Post a Comment

ad