Sunday, May 24, 2009

सत्तू, लाह्या आणि लोंब्या


वात-पित्तदोषांवर लोंब्या गुणकारी ठरतात

कोणतेही धान्य भाजून त्याचे पीठ केले तर त्याला "सत्तू' असे म्हणतात. त्या त्या धान्याप्रमाणे प्रत्येक सत्तूचे गुणधर्म वेगळे असतात तरी धान्यापेक्षा सत्तू पचायला हलके असते.
शालीसत्तू म्हणजे भाजलेल्या तांदळाचे पीठ. शालीसत्तूचे गुणधर्म याप्रमाणे होत,
सक्‍तवः शालिसंभूता वदि लघवो हिमाः ।
ग्राहिणो रुच्याः पथ्याश्‍च बलशुक्रदा ।।
... निघण्टु रत्नाकर
भाताचे सत्तू अग्निदीपक, पचायला हलके व शीतल असते, चवीला गोड, अतिशय रुचकर, पथ्यकर व ताकद देणारे तसेच शुक्र वाढविणारे असते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करणारे असते.
यवसत्तू म्हणजे भाजलेल्या जवाचे पीठ.
यवजाः सक्‍तवः शीतो लघवो रोचनाः सराः ।
कफपित्तहरा रुक्षा लेखनाश्‍च प्रकीर्तितः ।।
... निघण्टु रत्नाकर

जवाचे सत्तू शीतल व पचायला हलके, रुचकर तसेच सर म्हणजे मलप्रवृत्ती सहज करणारे असते, कफ व पित्तदोषाचे शमन करते, गुणाने रुक्ष असते व अतिरिक्‍त मेदाचे लेखन करते म्हणजेच मेद कमी करते.
साळीच्या लाह्या
साठेसाळी म्हणजे साठ दिवसात तयार होणारे, विशिष्ट प्रदेशात व हवामानात तयार होणारे तांदुळ. हे तांदूळ भाजून फोडले असता लाह्या तयार होतात. साळीच्या लाह्या अतिशय पथ्यकर समजल्या जातात.
लाजाः स्युर्मधुराः शीता लघवो दीपनाश्‍च ते ।
स्वल्पमूत्रमला रुक्षा बल्याः पित्तकफच्छिदः ।।
छर्द्यतीसारदाहास्रमेहमेदस्तृषापहा ।।
... निघण्टु रत्नाकर

साळीच्या लाह्या चवीला गोड, शीतल, पचायला हलक्‍या व अग्नीचे दीपन करतात, ताकद वाढवितात, कफ-पित्तदोषांचे शमन करतात. मल-मूत्र अल्प प्रमाणात तयार करतात, उलटी, जुलाब, दाह, प्रमेह, मेद, तृष्णा, रक्‍तविकार वगैरे विकारांचा नाश करणाऱ्या असतात.
लाह्यांचे पीठ लाह्यांपेक्षाही अधिक गुणकारी असते.
लाजोद्भवाः सक्‍तवस्तु लघवस्तृप्तिदा मताः ।
ग्राहिणः शीतलाः श्‍लेष्मवातघ्नाः पित्तनाशनाः ।।
पथ्याश्‍च च्छर्दिरक्‍तानां नाशना लघवस्तथा ।
... निघण्टु रत्नाकर

लाह्यांचे पीठ अतिशय हलके, त्रिदोषशामक असते, तृप्ती देते, पथ्यकर असते, उलटी, रक्‍तविकार यांचा नाश करणारे असते.
सक्तु म्हणजे कोणतेही धान्य भाजून केलेले पीठ तूपात घोळून पाण्यासह मिसळुन तयार केलेल्या पेयाला मंथ म्हणतात. लाह्यांच्या किंवा तांदळाच्या सक्तुपासून बनवलेला मंथ तात्काळ ताकद देणारा असतो.
परिणामे बलकरो मधुरः शीतलः स्मृतः।
वर्णपुष्टिस्थैर्यकारी दाहतृट्‌श्रमवान्तिहा ।।
प्रमेहक्षयकुष्ठानां नाशकः परिकीर्तितः ।
... निघण्टु रत्नाकर

मंथ वीर्याने शीतल असतो, वर्णासाठी उत्तम असतो, शरीरपुष्टीस मदत करतो, शरीराची स्थिरता वाढवतो. दाह, तृष्णा, श्रम, उलटी, प्रमेह, क्षय, कुष्ठ वगैरे विकारांमधे विशेष हितकारी असतो.
पोहे
साळीचे तांदूळ पाखडून त्यावर गरम पाणी घालून भिजवले, दाबून ठेवले व दुसऱ्या दिवशी खापरात भाजून कुटले की त्यापासून पातळ पोहे तयार होतात. संस्कृतमध्ये पोह्यांना पृथुका म्हणतात,
पृथुका गुरवो वातनाशनाः श्‍लेष्मला अपि ।
सक्षीरा बृंहणा वृष्या बल्याः स्निग्धाः सराश्‍च ते ।।
... निघण्टु रत्नाकर

पोहे पचायला जरा जड पण वातनाशक व कफकारक असतात. दुधात भिजवून सेवन केले असता धातुवर्धक, शुक्रकर, बल देणारे, स्निग्ध व सारक असतात. पोहे मलावष्टंभ करणारे असतात असे अष्टागसंग्रहात सांगितले आहे.
धान्यांच्या लोंब्या
गहू, जव, ज्वारी, बाजरी वगैरे धान्यांच्या लोंब्यांचे गुणही आयुर्वेदात सांगितले आहेत
उम्बी कफप्रदा लघ्वी बल्या पित्तानिलापहा ।
... निघण्टु रत्नाकर

लोंब्या गवताच्या अग्नीवर भाजून खाल्ल्या असता ताकद वाढविणाऱ्या असतात. पित्त तसेच वातदोष कमी करतात व प्राकृत कफाला वाढवितात. गुजरातमधे ज्वारी, बाजरीची कणसे आणि गव्हासारख्या धान्यांच्या लोंब्या या पद्धतीने भाजून, त्यातले दाणे सुटे करून मठ्ठा व चटणीसह खाण्याची पद्धत असते, त्याला "पोंक' म्हणतात.

No comments:

Post a Comment

ad