Tuesday, April 7, 2009

आयुर्वेदाचे आहारशास्त्र

आहाराचे मार्गदर्शन आणि सर्वंकष सर्वांगीण विचार केवळ आयुर्वेदच देऊ शकतो. शिवाय जीव आणि प्राण यांचाही संस्कार होत असल्याने अन्न कोठे, केव्हा, कसे व कोणी शिजवावे व वाढावे इतकेच नव्हे तर, हे अन्न कोठे, केव्हा व कसे खावे याचेही मार्गदर्शन आयुर्वेद करतो.
आपले आरोग्य व अनारोग्य हे बहुतांशी अन्नपाण्यावरच अवलंबून असते. रसायनशास्त्रात मिश्रण व संयुग असे दोन प्रकार असतात. परंतु, त्यात पूर्वनियोजित गुणधर्माच्या दोन जड वस्तू एकत्रित झाल्यानंतरचा विचार असतो. आपण खातो ते अन्न मिश्रण, संयुग अशा स्वरूपात तर असतेच, पण शरीरात गेल्यानंतर त्याचे वेगळ्याच संयुगात रूपांतर होते. एवढेच नव्हे तर त्यात जैविक अंश मिसळला जाऊन खाल्लेल्या पदार्थांवर जीव, आत्मा, व्यक्तिमत्त्व व महत्त्वाचे म्हणजे प्राण यांचा संस्कार होतो. त्यामुळे पोटात जाण्यापूर्वी असलेले पदार्थांचे गुणधर्म आणि प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या प्रकृतीमानाप्रमाणे पचनानंतर शरीरावर होणारे परिणाम अगदी वेगळे-वेगळे असतात.
येथे दोन अधिक दोन बरोबर चार असे साधे गणित नसते. शरीरात एखाद्या तत्त्वाची (जीवनसत्त्व, मिनरल/क्षार इ.) कमतरता असलेली द्रव्ये बाहेरून पोटात ढकलल्यास त्याचा शरीर स्वीकार करेलच असे नाही. हा अनुभव रोजच्या व्यवहारात सर्वांनाच येतो. अर्थात, बाहेरून दिलेली व्हिटॅमिन्‌स, कॅल्शियम आदि द्रव्ये काही प्रमाणात तात्पुरती गरज भागवितात.
अन्नातील विशिष्ट घटक जर शरीर स्वीकारत नसेल तर आहारातून आलेले ते घटक शरीरात वाढणार नाहीत. गाय हा प्राणी साधे गवत खातो, पण त्यापासून स्निग्धांश असलेले दूध कसे तयार होते, याचे उत्तर साध्या रसायनशास्त्रात सापडणार नाही.
आयुर्वेदात शरीराचे वात-पित्त-कफ असे प्रकृतीचे प्रकार आणि वस्तूचे रस (षड्‍रस), गुण (वीस गुण), वीर्य (उष्ण, शीत), विपाक (तीन) आणि प्रभाव असे प्रकार केलेले असतात. त्यामुळे ढोबळ मानाने कुठल्या प्रकृतीच्या माणसाने कुठली वस्तू खावी हे साधारणपणे समजू शकते. सप्तधातूंचा विचारही समाविष्ट असल्यामुळे खायच्या पदार्थांचा शरीरास कसा उपयोग होऊ शकेल, हे ठरविता येते.
आयुर्वेदाच्या ग्रंथात अनेक ठिकाणी याचे मार्गदर्शनपर श्‍लोक आढळतात. त्यापैकी काही श्‍लोक खालीलप्रमाणे, कामक्रोधलोभमोहेर्ष्या र्हिशोकमानोद्वेग भयोतप्तमनसा वा यदन्नपानमुपयुज्यते तदप्याममेव प्रदूषयति।
... चरक विमानस्थान
काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या, लज्जा, शोक, मान, उद्वेग, भय आदि मनोविकारांनी मन तप्त झाले असता ज्या अन्नपानाची योजना केली जाते त्याने (आहार रस तयार न होता) आम विषाची निर्मिती होते.
आप्तास्थितमसंकीर्णं शुचिकार्यं महानसम्‌ ।
तत्राप्तैर्गुणसंपन्नं सुसंस्कृतम्‌ ।।
शुचौ देशे सुसंगुप्तं समुपस्थापयेद्‌ भिषक्‌ ।
... सुश्रुत सूत्रस्थान
स्वयंपाकघर निर्भय, पवित्र आणि स्वच्छ ठिकाणी असावे व त्यात आप्त (आचरण चांगले असलेल्या) व्यक्तींचा वावर असावा.
शुचिपात्रोपचरणः शुचौ देशे शुचिः स्वयम्‌ ।
भुञ्जानो लभते तुष्टि पुष्टि तेजधिगच्छति ।।
नानिष्टैरमनस्यैर्वा विघातं मनसोर्च्छति ।
तस्मात्‌ अनिष्टे नाश्‍नियात्‌ आयुरारोग्यलिप्सया ।।
... कास्यपसंहिता खिलस्थान
पवित्र पात्रात, पवित्र स्थानी व स्वतः पवित्र होऊन जेवण करणाऱ्यास तुष्टिपुष्टीचा लाभ होतो.
अनिष्ट व मनाला विघात करणारा आहार करू नये. आयुष्य व आरोग्याचे रक्षण करण्यासाठी अनिष्ट भोजन करू नये.
- डॉ. श्री बालाजी तांबे

1 comment:

ad