Saturday, April 4, 2009

मजबूत हाडांसाठी सूर्यप्रकाश

व्हिटॅमिन्स आपल्या शरीरातल्या अनेक रासायनिक प्रक्रियांसाठी आवश्‍यक आहेत. त्यांचे दोन प्रकार. त्यांपैकी बी आणि सी ही पाण्यात विरघळणारी, तर ए.डी.इ.के. ही तेलात किंवा चरबीत एकरूप होणारी. ड जीवनसत्त्वाचे विशेष म्हणजे ते त्वचेमध्ये सूर्यप्रकाशातल्या अतिनील (अल्ट्राव्हायोलेट) किरणांमुळे तयार होते. आहारातून मिळते ते फार थोडे म्हणजे सुमारे 10% इतकेच. कॉडलिव्हर ऑइल, कोळंबी, अंड्याचा बलक, प्राण्याचे यकृत इत्यादींमध्ये भरपूर "ड' जीवनसत्त्व असते. दुधात मात्र फारसे नसते. तसेच वनस्पतींमधील "ड' जीवनसत्त्वही रासायनिक दृष्ट्या वेगळे असते. त्वचेखाली बनलेले तसेच आतड्यातून शोषलेले "ड' जीवनसत्त्व नंतर यकृत आणि मूत्रपिंडात जाऊन कार्यकारी बनते. म्हणजेच या अवयवांची पुरेशी कार्यक्षमता त्यासाठी आवश्‍यक आहे. रक्तामध्ये "ड' जीवनसत्त्वाचे प्रमाण 30 नॅनोग्रॅम/ मि.लि. यापेक्षा कमी असू नये.

कार्य
"ड' जीवनसत्त्वामुळे शरीरात कॅल्शिअमचे संतुलन राखले जाते. कॅल्शिअम हे हाडांच्या ताकदीसाठी अत्यावश्‍यक आहेच. याखेरीज मज्जतंतूंमधील संज्ञावहन, स्नायूंचे आकुंचन, हृदयाचे स्पंदन, रक्त साकळणे, अन्नपचन, तसेच संप्रेरकांची कार्यक्षमता यासाठीही कॅल्शिअम अत्यावश्‍यक आहे. "ड' जीवनसत्त्वही शरीरात संप्रेरकासारखे (हॉर्मोन) कार्य करते. शरीरातल्या सर्वच पेशींची वाढ होण्यासाठी आणि त्या कार्यक्षम होण्यासाठी "ड' जीवनसत्त्व आवश्‍यक आहे. त्यामुळेच स्नायूंचीही ताकद राखली जाते. अशक्त स्नायूंमुळे धडपडून हाडे मोडण्याची शक्‍यता जास्त. या कमजोरीमुळे खाली सहजपणे बसता येत नाही. बसले तर उठता येत नाही. चालताना बदकासारखी छोटी फाकलेली पावले पडतात आणि तोल सांभाळता येत नाही. वयस्कर स्त्रियांमधली पाठदुखी अनेकदा अपुऱ्या "ड' जीवनसत्त्वामुळे होते. "ड' जीवनसत्त्व स्वाभाविक प्रतकारशक्तीला बलवान बनवते. त्यामुळे टीबी (क्षय) सारख्या जंतूंचा प्रतरोध होऊ शकतो. संग्रहणीसारख्या प्रतकारशक्तीच्या आजारातही त्याचे महत्त्व आहे. गुडघ्याच्या संधिवातात इ जीवनसत्त्वाने कूर्चेची कमी झीज होते. पुरेशा "ड' जीवनसत्त्वामुळे आमवात (ऱ्हुमॅटॉइड संधिवात) होण्याची शक्‍यता कमी असते. आणि झाला तरी तो कमी तीव्रतेचा असतो. ब्लडप्रेशर, मधुमेह, भ्रमिष्टपणा (स्कीझोफ्रेनिया) आणि उदासीनता (डिप्रेशन) तसेच छाती, आतडे, प्रोस्टेट इत्यादींच्या कॅन्सरमध्येही "ड' जीवन सत्त्वाची कमतरता, हे एक कारण मानले जाऊ लागले आहे.

सूर्यप्रकाश
चेहरा आणि हात अर्धा तास सूर्य प्रकाशात राहिले तरच त्वचेखाली "ड' जीवनसत्त्व बनण्याची प्रक्रया सुरू होते. त्यामुळे पुरेसा वेळ सूर्यप्रकाशात राहणे, हाच "ड' जीवनसत्त्व मिळवण्याचा सर्वांत प्राकृतिक मार्ग आहे. सूर्यप्रकाशाची प्रत ढगाळ वातावरण आणि हवेच्या प्रदूषणामुळे कमी होते. सकाळी लवकरचा तसेच संध्याकाळचा सूर्यप्रकाशही यासाठी उपयोगाचा नाही. त्वचा काळसर असणे, अंगभर कपडे (बुरखा, घुंघट, रुमाल, ओढणी) घालणे, घर किंवा ऑफिसच्या बाहेर न पडणे यामुळे भर दुपारीसुद्धा आपल्यापैकी बहुतेकांना सूर्यप्रकाशाचा स्पर्शही होत नाही.


डॉ. श्रीकांत वाघ
ऱ्हुमॅटॉलॉजिस्ट, पुणे.

No comments:

Post a Comment

ad