Tuesday, April 7, 2009

ताक प्या, निरोगी राहा!

"ताकाला जाऊन भांडे का लपवायचे,'' ही म्हण आपल्याकडे प्रचारात आहे. हे भांडे घेऊन दुसऱ्याच्या घरी जायचे म्हणजे घरोघरी स्वयंपाकघरातून ताक तुम्हाला आढळणारच. ताकाला पृथ्वीतलावरचे अमृत म्हटलेले आहे. प्रत्यक्ष इंद्रालाही ताक दुर्लभ आहे, असे संस्कृत साहित्यात संदर्भ आढळतात.
दही घुसळून त्याचे ताक बनवले जाते. या घुसळण्याच्या मंथनक्रियेतून दह्यावर अग्निसंस्कार होतात आणि ताक तयार होते. साईसह दह्यात पाणी घालून घुसळून लोणी काढून, फार दाट नाही, फार पातळ नाही, अशा द्रव्याला मथित म्हणतात.
ताक लघु, आंबट, तुरट, रसात्मक असून भूक वाढविणारे म्हणजे दीपन कार्य करणारे आहे. कफवात दोषांचे शमन करणारे, सर्वांग सूज, उदर, अर्श-मूळव्याध, मूत्रावरोध, तोंडाला चव न लागणे, या तक्रारीत ताक उपयुक्त आहे. ताक पाचक, पांडुरोग म्हणजे ऍनिमिया आणि प्लीहावृद्धी दूर करणारे आहे.
* सुश्रुत मतानुसार ताक उष्ण वीर्याचे, रुक्ष, तहान भागवणारे, मेदोनाशक सांगितले आहे. म्हणजे नियमित ताक प्याल्याने मेद, चरबी, शरीराची जाडी कमी होते.
* ताकाचा महत्त्वाचा गुण म्हणजे अजीर्णामुळे पोटात साठलेला "आमदोष' कमी होतो. अपाचित आहाररसाला "आम'' म्हणतात.
* ताक हे आतड्याच्या व्याधीवर उपयुक्त आहे. ताकामुळे आतडी क्रियाशील बनतात. जुने मलदोष बाहेर फेकले जातात. ताकाच्या मलशोधक गुणामुळे मलाचा निचरा व्यवस्थित होतो. टायफाईड, कॉलरा, जुलाब या विकारांत ताक औषधासारखे काम करते.
* ज्यांना जुनाट असे आतड्याचे विकार आहेत, त्यांना दोन-तीन दिवस आहार वर्ज्य करून फक्त ताकावर ठेवल्यास त्यांची पचनशक्ती सुधारते.
* चरकाचार्यांच्या मते, ताक अरुची, मंदाग्नी आणि अतिसार म्हणजे वरचेवर पातळ शौचाला होत असताना अमृततुल्य आहे.
* सुंठ, मिरे, पिंपळी आणि सैंधन समभाग घेऊन चमचाभर प्रमाणात एक पेलाभर ताकात मिसळून दिल्यास अजीर्ण कमी होते.
* जेवल्यावर पोट फुगले असता, मिरीपूड घालून ताक प्यायला द्यावे.
* चित्रकमूळ चूर्ण अर्धा चमचा, पेलाभर ताकात मिसळून घेतल्यास शौचाला आव, रक्त पडणे, मुरडा मारणे या तक्रारी कमी होतात.
* ताकात ओवा आणि शेंदेलोण घालून प्याल्यास मलावरोधाची सवय दूर होते.
* ताकात गूळ मिसळून प्याल्यास लघवीचे विकार दूर होतात. शरीराचा दाह होत असल्यास ताकात भिजवलेले फडके दाह झालेल्या भागावर ठेवावे, म्हणजे दाह कमी होतो.
* ताकाने रोज चेहरा धुतल्याने तोंडावरचा काळेपणा, मुरुमाचे डाग, चिकटपणा कमी होतो. चेहरा तेजस्वी आणि आकर्षक बनतो.
* ताकाच्या नित्यसेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्वचेचे आरोग्य व सौंदर्य टिकून राहते.
* एक कप दही + चार कप पाणी + अर्धा चमचा शेंदेलोण + चिमूटभर हिंग + चार चमचे भाजलेले जिरे + थोडी कोथिंबीर हे सर्व मिश्रण मिक्‍सरला लावून घ्यावे व रोज दुपारच्या जेवणात घ्यावे.
सारांश काय, तर ताक प्याल तर दीर्घायुरारोग्य मिळवाल.
-डॉ. सुनील बी. पाटील

No comments:

Post a Comment

ad