Friday, March 20, 2009

स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम्‌

जीवन कसे जगावे या विषयी सांगोपांग मार्गदर्शन करणारे भारतीय शास्त्र म्हणजे "आयुर्वेद''. आयुर्वेदाची पाळेमुळे आपल्या संस्कृतीमध्येच खोलवर रुजलेली असली तरी "शास्त्र'' म्हणून जनसामान्यांना याची माहिती नाही असे चित्र होते. "स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम्‌'' म्हणजे आरोग्य जपणे हा मूळ हेतू असलेले आयुर्वेदशास्त्र घरोघरी पोचविण्याच्या दृष्टीने "आयुर्वेद उवाच'' हे सदर सुरू केले.
आयुर्वेद शिकण्यासाठी एखादा विद्यार्थी महाविद्यालयात जेव्हा प्रवेश करतो, तेव्हा त्याला जो विषय शिकवला जातो, तो विषय "आयुर्वेद उवाच'' सदरात माहिती देण्यास सुरुवात केली. पण वैद्यक शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भषा व पद्धत वेगळी असते कारण त्यांनी पूर्वतयारी केलेली असते. सुशिक्षित परंतु वैद्यकीय शाखेचा अभ्यास नसलेले अगदी सामान्य मनुष्य, गृहिणी असा वाचक वर्ग डोळ्यासमोर ठेवून "आयुर्वेद उवाच'' या सदरात विषय समजावण्याचा प्रयत्न केला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पण त्याचा उपयोग होऊ शकला.
"फॅमिली डॉक्‍टर'' पुरवणी सुरू झाली ती धनत्रयोदशीच्या दिवशी. हाच दिवस धन्वंतरी पूजनाचाही असतो. म्हणूनच पहिल्या अंकाच्या आयुर्वेद उवाच या सदरात धन्वंतरी या आयुर्वेदाच्या देवतेचे स्तवन केले. स्तवनाचा नुसता शब्दशः अर्थ न पाहता त्यात अभिप्रेत असलेला आरोग्यविषयक अर्थही समजून घेतला. धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता, तर देवदेवतांचे वैद्य म्हणजे अश्‍विनीकुमार. तेव्हा दुसऱ्या अंकात अश्‍विनीकुमार या जुळ्या वैद्यांची माहिती घेतली. धन्वंतरी व अश्‍विनीकुमार या पूजनीय अभिव्यक्‍तींची माहिती घेऊन पुढे आयुर्वेदाच्या अभ्यासाला सुरुवात केली.
आयुर्वेदाला प्राचीन परंपरा आहे. चतुर्वेदांपैकी अथर्ववेदाचा उपवेद असणारा आयुर्वेद सर्वप्रथम फक्‍त स्वर्गात होता. प्राचीन काळच्या मुनी-ऋषींनी तो समाजकल्याणाच्या दृष्टीने स्वर्गातून पृथ्वीवर आणला. याविषयीचे जे काही संदर्भ प्राचीन ग्रंथात सापडतात त्यांची माहिती पाहिली. आयुर्वेदाचे प्राचीन ग्रंथ, त्यांचे विषय, त्यांचे लेखक यांच्याविषयी जाणून घेतले.
आयुर्वेद हे अतिशय विस्तृत असे शास्त्र आहे. आरोग्यरक्षणापासून ते रोगनिवारणापर्यंत, गर्भसंस्कारापासून ते पुनर्जन्मापर्यंत असंख्य गोष्टींविषयीची माहिती त्यात दिलेली आहे. या सर्व विषयांचे वर्गीकरण करण्याच्या दृष्टीने अष्टांगे मांडली आणि कायचिकित्सा, कौमारभृत्यतन्त्र, ग्रहचिकित्सा, ऊर्ध्वांङगचिकित्सा, शल्यतंत्र, अगदतंत्र, वाजीकरण, रसायनचिकित्सा ही आठ अंगे असणारा आयुर्वेद अस्तित्वात आला. आरोग्य शास्त्रातील सर्व विषयांचा अंतर्भाव या अष्टांगात कसा होतो हे आपण "अष्टांग आयुर्वेद' या शीर्षकाखाली पाहिले.
आयुर्वेदाविषयीची मूलभूत माहिती घेतल्यानंतरचा महत्त्वाचा विषय म्हणजे "स्वस्थवृत्त'. संपन्न जीवनासाठी आरोग्य आवश्‍यक असतेच पण आरोग्यरक्षण हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे हे स्वस्थवृत्ताद्वारे आयुर्वेदाने सांगितले. स्वस्थवृत्ताचे महत्त्व पाहिल्यानंतर आयुर्वेद उवाच या सदरात "दिनचर्ये'ची माहिती सुरू केली. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आरोग्यरक्षणाच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्‍तीने काय काळजी घ्यायला हवी याची समग्र माहिती यात दिली गेली, सकाळी किती वाजता उठायचे, दात-हिरड्यांसाठी हितकर द्रव्ये कोणती, स्नानाचे फायदे काय, डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, नियमित व्यायामाचे फायदे काय असतात, जेवण किती वाजता करायचे, रोज अंगाला तेल लावण्याने काय उपयोग होतो अशा अनेक विषयांची माहिती आपण स्वस्थवृत्तातील दिनचर्या या विभागात घेतली. साध्या साध्या उपायांनी आरोग्य कसे राखता येऊ शकते हे यातून कळू शकते.
आयुर्वेद हे जीवन जगण्याचे शास्त्र आहे, त्यामुळे ते फक्‍त शारीरिक आरोग्यापुरते मर्यादित नाही तर त्यात मनाचे संतुलन, समाजात राहताना काय तारतम्य बाळगायला हवे या विषयांचेही मार्गदर्शन केलेले आहे. हा सर्व भाग "सद्‌वृत्त'' या शीर्षकाखाली मांडला.
आपण राहतो त्या देशाचा, आपण ज्या वातावरणात राहतो त्या हवामानाचा आपल्या आरोग्यावर मोठा प्रभाव असतो. हवामानामुळे शरीर-मनामध्ये कसे आणि काय बदल होत असतात हे समजून घेऊन यातल्या शरीरास उपकारक बदलांचा अधिकाधिक फायदा करून घेण्याच्या दृष्टीने व हानिकारक बदलांमुळे कमीत कमी नुकसान होईल या दृष्टीने काय काळजी घ्यावी लागेल याविषयी माहिती "ऋतुचर्या'' या विभागात दिली. भारतीय कालगणनेनुसार जे सहा मुख्य ऋतू सांगितले त्यांची लक्षणे वगैरे माहिती यामुळे होऊ शकली.
कोणतीही वस्तू स्थिर राहणे अपेक्षित असेल तर तिला कमीतकमी तीन खांबांचा आधार असावा लागतो. आरोग्यासाठीही असे तीन खांब आयुर्वेदाने सांगितले, आहार, निद्रा व ब्रह्मचर्य अर्थात शुक्रधातुरक्षण. सहजभाव असणाऱ्या या तीन विषयांचे संतुलन साधल्यास काय फायदे होतात, अतियोगाने वा पूर्णपणे उपेक्षित ठेवल्याने काय नुकसान होते आणि हे संतुलन कसे साधायचे याविषयीची माहिती "त्रयोपस्तंभ'' या शीर्षकाखाली घेतली.
(क्रमशः)
- डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment

ad