श्वास आणि बुद्धीचा परस्परसंबंध
(वैद्य विनिता बेंडाळे) फुप्फुसाची कार्यक्षमता जितकी चांगली तितकी बुद्धीची तल्लखता अधिक, असे आधुनिक शास्त्राच्या लक्षात आले आहे. पण, असे का होते याचे स्पष्टीकरण आयुर्वेदाने फार पूर्वीच देऊन ठेवलेले आहे. .........काही दिवसांपूर्वीच्या "फॅमिली डॉक्टर'च्या अंकात "आरोग्य वार्ता' या सदरात एक माहितीपर लेख वाचनात आला. श्वसन प्रक्रिया अथवा फुफ्फुसाची कार्यशक्ती जितकी चांगली तितकी बुद्धीची तल्लखता अधिक असते, असे संशोधन नुकतेच अमेरिकेत प्रसिद्ध झाल्याचे या लेखात म्हटले होते. त्याचा कार्यकारणभाव मात्र समजू शकत नसल्याचे या संशोधनामध्ये नमूद केले गेले आहे. हे वाक्य वाचले आणि मनात आले, आपल्या आयुर्वेदशास्त्रातील काही मूलभूत सूत्रांनुसार हा कार्यकारणभाव तर सहज स्पष्ट होतो. प्राण, उदान, व्यान, समान व अपान हे वातदोषाचे पाच प्रकार आहेत. यांपैकी श्वसन प्रक्रियेमध्ये प्राण व उदान हे वायू सक्रिय आहेत. श्वसन म्हणजे नि-श्वास (श्वास आत घेणे) व उच्छ्वास (श्वास बाहेर सोडणे) यांची लयबद्ध सतत प्रक्रिया. नि- श्वास हे प्राणवायूचे, तर उच्छ्वास हे उदान वायूचे कार्य होय. म्हणजेच या दोन्ही क्रिया घडणे ही प्राण व उदानाची जबाबदारी असते. आयुर्वेद शास्त्रानुसार वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांची व त्यांच्या असलेल्या प्रत्येकी पाच प्रकारांची (प्रत्येकी पाच प्रकारचे वात, पित्त व कफ) शरीरातील स्थाने निश्चित केलेली आहेत व त्यानुसार त्यांना आपापली कार्येही विभागून दिली गेली आहेत. एखाद्या सैन्यातील सैनिकांप्रमाणे या सर्वांची जागा व स्थाने निश्चित केलेली दिसतात. त्यानुसार प्राणवायूचे प्रमुख स्थान हे "शिर' (मस्तक) आहे, तर नासिका (नाक), मुख, कंठ, उर (छाती), हृदय व कोष्ठ ही त्याची संचारी स्थाने सांगितली आहेत. म्हणजे या सर्व ठिकाणी प्राणवायूचा संचार आहे व शिरामध्ये अवस्थिती आहे. प्रामुख्याने त्याचा मुक्काम शिरामध्ये असतो; तसेच संचारी स्थानांमध्ये. प्राणवायूची विविध कार्ये १) प्राणावलंबन - शरीरातील प्राणाचे (जीवन) धारण करणे. २) नि-श्वास - श्वास आत घेणे (निश्वासो ताम श्वासस्य अंत- प्रवेशनम्) ३) अन्नप्रवेश - अन्न प्रवेशाबरोबरच अन्नाचे धारण, निस्सरण, म्हणजे पचन प्रक्रियेतील सहभागही चक्रदत्त या चरक संहितेच्या टीकाकाराने स्पष्ट केला आहे. ४) हृदयधारण - हृदयाचे आरोग्य राखण्यामध्ये सहभाग घेणे. ५) चित्त व बुद्धीचे धारण - मनाचे आरोग्य राखणे व बुद्धी तल्लख ठेवणे. ६) इंद्रियधारण - पंचेंद्रियांची कामे व्यवस्थित पार पाडण्यास मदत करणे. ७) ष्ठिवन, क्षवथु, उद्गार - थुंकणे, शिंक येणे, ढेकर येणे. उदान वायूची स्थाने विचारात घेता "उर' (छाती) हे त्याचे अवस्थिती स्थान असून नाक, नाभी व कंठ ही त्याची संचारी स्थाने आहेत. उदान वायूची कार्ये १) वाक्प्रवृत्ती - बोलणे २) प्रयत्न - प्रयत्न करण्याची वृत्ती ३) ऊर्जा - कार्य करण्यासाठी आवश्यक शक्ती ४) बल - शरीरातील सर्व धातूंचे बल ५) वर्ण - कांती ६) स्मृती - स्मरणशक्ती वरील प्रस्तावनेवरून हे लक्षात येते, की उर हे दोघांचेही स्थान असल्याकारणाने व श्वसनप्रक्रिया ही या दोघांवरही अवलंबून असल्याकारणाने फुफ्फुसाशी या दोन्ही वायूंचा संबंध निश्चित होतो. तसेच कार्याचा विचार करायचा झाल्यास नि-श्वास व बुद्धीचे धारण करणे ही प्राणवायूची कार्ये आहेत व उच्छ्वास व स्मृती ही उदान वायूची कार्ये आहेत. फुफ्फुसांची कार्यशक्ती जितकी चांगली असेल तितकी प्राण व उदानाची कार्यशक्ती उत्तम ठरते. त्यामुळे त्यांची सर्वच कामे उत्तम प्रकारे पार पडतात. या इतर कार्यांमध्ये बुद्धीचे धारण करणे व स्मृती या प्रक्रियांचा अंतर्भाव आहे, हे आपण पाहिलेच आहे. अशा प्रकारे अमेरिकेतील संशोधनाचा कार्यकारणभाव आयुर्वेदाच्या या मूलभूत सिद्धान्तामध्ये स्पष्ट होतो. प्राणायामामुळे बुद्धी तल्लख होणे, एकाग्रता वाढणे, पचन सुधारणे, मन शांत होणे, हृदयाचे विकार नियंत्रित ठेवण्यास मदत होणे इ. अनेकविध फायदे अनेकांच्या अनुभूतीस येतात. प्राण व उदानाची कार्ये लक्षात घेतल्यास या सर्वांचा कार्यकारणभावही सहज स्पष्ट होऊ शकेल. अनंत व शाश्वत अशा आयुर्वैदशास्त्राच्या गाभ्यातील अशी अनेक मूलतत्त्वे संशोधन स्वरूपाने प्रसिद्ध झाल्यास ती अधिक स्पष्ट स्वरूपात जगासमोर येण्यास निश्चित मदत होईल. - वैद्य विनिता बेंडाळे आयुर्वेदतज्ज्ञ, पुणे.
No comments:
Post a Comment