उपचार "मोशन सिकनेस'वर
(डॉ. मनीषा खरे) "गाडी लागणं' म्हणजेच मोशन सिकनेस. अशा व्यक्तींनी प्रवासात काळजी घेणे जितके महत्त्वाचे तितकेच या त्रासाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करणेही महत्त्वाचे. त्यासाठी होमिओपॅथीमध्ये अनेक साधी-सोपी औषधे सुचविलेली आहेत. .......अकरावीचं नवीन कॉलेज सुरू झालं. मित्र-मैत्रिणींचा छान ग्रुप जमला. सगळ्यांनी मिळून पिकनिकचा बेत ठरवला. पण जरा लांब व तेही बसनं जायचं म्हटल्यावर रसिकाचा मूड गेला. तिला बस लागत असल्यानं सहलीच्या आनंदावर विरजण पडलं. रसिकासारखा त्रास बऱ्याच जणांना होतो. आपल्या गतिमान आयुष्यात शाळा, कॉलेज, नोकरी, व्यवसाय किंवा जरा चेंज म्हणून कुठं जायचं तर प्रवास आलाच आणि तोच जर का त्रासदायक होत असेल तर दैनंदिन जीवनात खूप बंधनं येतात. काही वेळा करिअरमधल्या एखाद्या चांगल्या संधीलाही मुकावं लागत. या त्रासाला इंग्रजीत मोशन सिकनेस (बस, गाडी, बोट, विमान इ. लागणं) असं म्हणतात. वाहन प्रवासात होणाऱ्या सततच्या हालचालींमुळे मळमळ, उलटी, गरगरणं अथवा चक्कर येणं, घाम येणं, अस्वस्थता वाटणं, गळून जाणं अशा प्रकारची लक्षणं जाणवतात. काहींना सतत हलणाऱ्या गोष्टीकडे बघूनही अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. मोशन सिकनेस ही समस्या शरीराचा समतोल राखण्याच्या प्रक्रियेशी अथवा जाणिवेशी निगडित असते. अवकाशातील शरीराच्या स्थितीचं ज्ञान (आपली तसेच आपल्या हालचालीची दिशा, आपण वळतोय की स्थिर आहोत इ.) मेंदूला या जाणिवेमुळेच होतं व तिचं नियमन मज्जासंस्थेच्या वेगवेगळ्या भागांच्या परस्परक्रियांद्वारे केलं जातं. यात अंतरकर्णाची (कानाचा सर्वात आतला भाग) प्रमुख भूमिका असते. अंतकर्ण शरीराच्या हालचालीची दिशा व गती यावर लक्ष ठेवून ती माहिती मेंदूला सांगतो. अवकाशातील आपली हालचाल व दिशा डोळ्यामुळे समजते. त्वचेखालील दाबग्राहक पेशी शरीराचा कोणता भाग खाली अथवा टेकलेला आहे ते सांगतात. तसेच स्नायू व सांध्यातील चेतनाग्राहक पेशी शरीराच्या कोणत्या भागाची हालचाल होत आहे याची माहिती देतात आणि मध्यवर्ती मज्जासंस्था या चारही भागांद्वारे मिळणाऱ्या माहितीचा एकत्रित अर्थ लावते. या माहितीत सुसूत्रता असेल तर आपला समतोल व्यवस्थित राखला जातो. परंतु या उलट विरोधाभास असेल तर काही जणांमध्ये मज्जासंस्थेच्या चेतनाप्रेषक रसायनांच्या पातळीत बदल होतात. याचा परिणाम म्हणूनच मोशन सिकनेसचा त्रास व्हायला लागतो. वाहन प्रवासात बहुतेक वेळा आपली नजर वाहनाच्या आतमध्ये असते. अशा वेळी वाहनाच्या वेगामुळे शरीराला मिळणारी गती अंतरकर्ण व त्वचेतील ग्राहक पेशींमार्फत मेंदूला समजते. पण डोळे या माहितीला दुजोरा देत नाहीत. या विरोधाभासामुळे वाहन लागू शकते. अंतरकर्णाच्या विकारांमध्येपण अशा प्रकारच्या विभिन्न संकेतांमुळेच चक्कर, मळमळीचा त्रास होतो. मोशन सिकनेस जाणवणाऱ्या व्यक्तींनी प्रवासात वाचू नये. वाहनाच्या उलट्या दिशेनं तोंड करून बसू नये. शक्यतो पुढच्या जागेवर बसून नजर गतीच्या दिशेनं लांबवर ठेवावी. प्रवासाच्या आधी व मधे तेलकट, चमचमीत पदार्थ खाऊ नयेत. उग्र वासाशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच ज्यांना त्रास होतो त्यांच्याबरोबर बसू नये. अशी खबरदारी घेतल्यास थोडा फार फायदा नक्कीच होतो; पण मूळ समस्या तशीच राहते. या प्रवृत्तीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी अनेक गुणकारी औषधे होमिओपॅथीमध्ये आहेत, हे माहीत असल्यानं रसिकाच्या मैत्रिणीची आई तिला दवाखान्यात घेऊन आली. तिला होणाऱ्या त्रासाच्या लक्षणांबरोबर तिची शारीरिक व मानसिक प्रकृती विचारात घेऊन औषध सुरू केलं. काही महिन्यांतच रसिकाचा त्रास कमी होत होत पूर्ण बंद झाला. आता काहीही औषध न घेता ती खूप लांबचा बसप्रवासही मजेत करू शकते. उदाहरण म्हणून काही औषधे खाली दिली आहेत; परंतु उपचार होमिओपॅथी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावेत. १) कॉक्यूलस - हे औषध लागू पडणाऱ्या व्यक्तींना प्रवासात मळमळणं, डोकं दुखणं, जड होणं, गरगरणं अशा लक्षणांमुळे आडवं पडण्याशिवाय गत्यंतर नसतं. उठायचा प्रयत्न केला तर त्रास वाढतो. पोटात खड्डा पडल्यासारखं होत; पण खाण्याची इच्छा नसते. अन्नाचा वासही सहन होत नाही. प्रवासाच्या आधी जागरणं झाली किंवा चहा प्यायला तर त्रास संभवतो अशा वेळी गुणकारी. २) पेट्रोलियम - बोटीतून जाताना लाटांवरती; तसेच वाहन प्रवासात बाजूने जाणाऱ्या गाड्यांवरती लक्ष केंद्रित केलं तर मागच्या बाजूस डोकं जड होणं, दुखणं, मळमळणं, घाम फुटणं व त्याला दुर्गंधी येणं, पोटात खड्डा पडून काही वेळा खाल्ल्यानं बरं वाटणं अशा लक्षणांसाठी उपयुक्त. या व्यक्ती चिडखोर स्वभावाच्या असून त्यांच्यात हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणं, तिला रक्त येईल इतक्या खोल भेगा पडणं अशी लक्षणंही आढळतात. ३) थेरेडियॉन - प्रवासात वाहनाचा वेग सहन न झाल्यानं हे औषध लागू पडणाऱ्या व्यक्ती विशेषत- स्त्रिया डोळे मिटून घेतात आणि मग त्रास कमी व्हायच्या ऐवजी वाढतोच. डोकं दुखणं, उलट्या होणं अशा लक्षणांमुळे त्यांना साफ गळून जायला होतं. अशा वेळी आवाज जराही नको वाटतो. हालचालीनं किंवा पुढे वाकल्यानं त्रास बळावतो. याव्यतिरिक्त टबॅकम्, सेपिया, बोरॅक्स, सिलिशिया इ. औषधे प्रकृतिसाधर्म्यानुसार गुणकारी ठरू शकतात. - डॉ. मनीषा खरे होमिओपॅथीतज्ज्ञ, पुणे.
very informative blog
ReplyDelete