Thursday, May 1, 2008

विरुद्ध अन्नाचे त्रास कसे टाळाल?

विरुद्ध अन्नाचे त्रास कसे टाळाल?

(डॉ. श्री बालाजी तांबे)
विरुद्ध अन्नामुळे होणारे त्रास टाळायचे असतील, तर प्रकृती, आपण राहतो तो प्रदेश, चालू ऋतू, बदललेली जीवनपद्धती, अन्नपदार्थांचे गुण, वीर्य या सर्वांचा सारासार विचार करून आहाराची योजना करायला हवी.
विरुद्ध अन्न म्हणजे काय हे आपण पाहतो आहोत. गुणांनी एकमेकांच्या विरुद्ध असणारे, ज्या देशात राहतो तेथील हवामानाला अनुकूल नसणारे, अग्नीला सोसवेल की नाही, याचा विचार न करता सेवन केलेले, नेहमीच्या सवयीपेक्षा फारच निराळे, दोषांना प्रकुपित करणारे अन्न वगैरे सर्व अन्न हे विरुद्ध अन्न असते.

संस्कारविरुद्ध - उष्णता देणे, घुसळणे, विशिष्ट भांड्यात ठेवणे, भावना देणे वगैरे क्रियांकरवी वस्तूवर संस्कार होत असतात. योग्य संस्कारांनी वस्तू जशी अधिक गुणसंपन्न होते, तसेच चुकीच्या संस्कारांनी गुणहानी होऊ शकते. उदा. चांदीच्या भांड्यात ठेवलेले तूप अमृताप्रमाणे गुणसंपन्न होते; पण काशाच्या भांड्यात तूप दहा रात्रींपर्यंत ठेवले तर विषसमान होते.

कांस्यभाजने दशरात्रोषितं सर्पिर्विरुद्धम्‌ ।
... अष्टांगसंग्रह सूत्रस्थान

दही गरम करून सेवन केले तर ते अहितकर असते. म्हणून भेंडी वगैरेंची दह्यातली भाजी करायची असेल तर भाजी अगोदर शिजवून तयार झाली, की अगदी वाढायच्या आधी त्यात दही घातले जाते. दह्यातली कोशिंबीर, रायता करताना अगोदर फोडणी देऊन नंतर दही टाकायचे असते.

कोष्ठविरुद्ध - कोष्ठ म्हणजे कोठा. जड कोठा असणाऱ्याला मलावष्टंभ होण्याची, तर हलका कोठा असणाऱ्याला जुलाब होण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे जड कोठा असणाऱ्यांना पुरेशा प्रमाणात अन्नसेवन करण्याची, पोट साफ होण्यास मदत करणाऱ्या अन्नाचे सेवन करण्याची आवश्‍यकता असते तर हलका कोठा असणाऱ्याला पचायला हलके, सोपे अन्न खाण्याची आवश्‍यकता असते. कोठा जड असणाऱ्या व्यक्‍तीने मलावष्टंभ होणारे अन्न खाणे किंवा फार कमी मात्रेत अन्न खाणे आणि हलका कोठा असणाऱ्याने पचायला जड, अत्याधिक किंवा ज्याने जुलाब होतील असे अन्न खाणे कोष्ठविरुद्ध होत.

अवस्थाविरुद्ध - आपल्या शरीर-मनाची जी अवस्था असेल तिला अनुरूप अन्न सेवन करणेच हितावह असते. जे खूप शारीरिक मेहनत करतात, खेळ-व्यायाम-मैथुन यांच्या योगे ज्याचा शक्‍तिव्यय होत असतो, त्यांच्या शरीरात वातदोष वाढत असतो. अशा व्यक्‍तींनी अजून वात वाढविणारे अन्न खाणे हे अवस्थाविरुद्ध असते, तर जे बैठे काम करतात, व्यायाम वगैरे करत नाहीत, आरामपूर्ण जीवन जगतात त्यांची कफदोष वाढण्याची प्रवृत्ती असते. अशा व्यक्‍तींनी पचायला जड, तेलकट, थंड असे कफवर्धक अन्न खाणे हेसुद्धा अवस्थाविरुद्ध समजले जाते.

क्रमविरुद्ध - अन्नसेवनाचा जो क्रम सांगितला आहे, उदा. मूत्रत्याग वा मलत्यागाची संवेदना झाली असता प्रथम त्यांचे प्रवर्तन करून मगच जेवावे, भूक लागल्यावरच जेवावे, जेवणानंतर लगेच अंघोळ करू नये वगैरे अन्नसेवनासंबंधीचे नियम न पाळता सेवन केलेले अन्न क्रमविरुद्ध असते.

परिहारविरुद्ध - काही रोग असे असतात की त्या वेळेला त्यांना अनुरूप व अनुकूल आहाराचीच आवश्‍यकता असते. उदा. कावीळ झाल्यावर पित्ताचे संतुलन होईपर्यंत आणि अग्नी मूळपदावर येईपर्यंत खाण्या-पिण्याचे पथ्य पाळावेच लागते. गोवर- कांजिण्यासारखा विकार झाल्यानंतर शरीरातील अतिरिक्‍त उष्णता निघून जाण्यासाठी शीतल अन्न-औषधांची योजना करावीच लागते अन्यथा रोगाचे मूळ तसेच राहून त्यातून इतर समस्या उद्‌भवू शकतात. अशा प्रकारची काळजी न घेणे हे परिहारविरुद्ध समजले जाते.

उपचारविरुद्ध - पंचकर्मासारखे उपचार घेताना विशिष्ट अन्नपानाची योजना करणे आवश्‍यक असते, उदा. पचायला हलका, त्रिदोषांना संतुलित करणारा, ताजा, द्रवगुणाचे आधिक्‍य असणारा आहार घ्यायचा असतो विशेषतः शरीरशुद्धी म्हणजे विरेचन, वमन झाले की नंतर आठवडाभर कटाक्षाने पथ्य पाळायचे असते, घृतपानाच्या दिवशी गरम पाणीच प्यायचे असते. यांसारखे नियम सांभाळले नाहीत तर ते उपचारविरुद्ध होतात.

पाकविरुद्ध - अन्न फार शिजविले, जाळले, अर्धवट शिजविले किंवा चुकीच्या पद्धतीने अग्नी देऊन शिजविले तर ते पाकविरुद्ध ठरते.

हृदयविरुद्ध- जे अन्न मनापासून आवडत नाही ते जबरदस्तीने खाणे हृदयविरुद्ध असते. एखाद्या मानसिक कारणाने काही खाण्याची इच्छा नसताना बळेच खाणे हेही हृदयविरुद्ध असते.

संपत्‌ विरुद्ध - जे अन्न उत्तम प्रतीचे नाही, आपापल्या स्वाभाविक चव, गंध वगैरे गुणांनी युक्‍त नाही ते खाणे संपत्‌ विरुद्ध होय, उदा. उत्तम आंबा रसाने परिपूर्ण, गोड चवीचा व गोड वासाचा असतो. पण हाच आंबा झाडावरून लवकर काढला आणि अनैसर्गिक पद्धतीने पिकवला तर त्याला खरी चव येत नाही. चव बिघडलेले, अस्वाभाविक चव असलेले अन्न संपत्‌ विरुद्ध समजले जाते.

तेव्हा विरुद्ध अन्नामुळे होणारे त्रास किंवा रोग टाळायचे असतील तर प्रकृती, आपण राहतो तो देश, चालू असलेला ऋतू, बदललेली जीवनपद्धती, अन्नपदार्थांचे गुण, वीर्य या सर्वांचा सारासार विचार करून आहाराची योजना करायला हवी.

No comments:

Post a Comment

ad