आवाज टिकवायचा असेल तर त्यासाठी आरोग्यही चांगले हवे. विशेषतः उदान वायू संतुलित ठेवायला हवा. कफदोष प्राकृत प्रमाणात व प्राकृत स्वरूपात राहील याकडे लक्ष ठेवायला हवे आणि शुक्रधातू संपन्नावस्थेत राहण्यासाठीही प्रयत्न करायला हवा. ........
व्यक्ती निरोगी आहे का हे पडताळण्यासाठी तसेच ती व्यक्ती रोगी असल्यास रोगाचे नेमके स्वरूप समजून घेण्यासाठी आयुर्वेदाने अष्टविध परीक्षा सांगितल्या आहेत. त्यातील एक परीक्षा आहे आवाजाची म्हणजे स्वराची परीक्षा. आरोग्य निर्देशक म्हणून जी सहज समजून येण्यासारखी लक्षणे असतात, त्यात आवाजात बदल झालेला आहे काय याचा अंतर्भाव केलेला असतो. म्हणूनच आरोग्य सांभाळण्यासाठी आवाजाच्या आरोग्याकडे लक्ष ठेवावे लागते. आयुर्वेदात आवाजाला "स्वर' म्हटलेले आहे. मुळात स्वर उत्पन्न होतो तो उदान वायूमुळे आणि आपल्याला तो घशातून आल्यासारखा वाटत असला तरी स्वराचे उगमस्थान असते नाभी. उदानवायूचे स्थान आहे नाभीपासून ते कंठापर्यंत.
उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च ।
वाक्प्रवृत्ति प्रयत्नोर्जा बलवर्णादि कर्म च ।।
... चरक चिकित्सास्थान
उदान वायूचे स्थान नाभी, छाती व कंठ असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होत असतात. याशिवाय प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात. या ठिकाणी एक गोष्ट सहज लक्षात येईल की बल आणि वाक्प्रवृत्ती या दोन्ही गोष्टी उदानवायूशी संबंधित असल्याने बल कमी झाले की आवाजही क्षीण होतो. याचा पडताळा अनेक वेळा येतो.
स्वराचा संबंध दोषांमधल्या उदान वायूशी जसा असतो तसाच तो प्रकृतींपैकी कफप्रकृतीशी व धातूंपैकी शुक्रधातूशी असतो. कफप्रकृतीचे वर्णन करताना अष्टांगहृदयात सांगितलेले आहे,
जलदाम्भोधिमृदङ्सिंहघोषः ।
... अष्टांगहृदय
कफप्रकृतीच्या व्यक्तीचा आवाज मेघ, समुद्र, मृदंग, सिंह यांच्या आवाजाप्रमाणे धीरगंभीर असतो. याउलट वातप्रकृती असणाऱ्या व्यक्तीचा आवाज चिरका, फुटका, ऐकू नयेसे वाटेल असा असतो. शुक्रसार पुरुषाचे वर्णन "प्रसन्नस्निग्ध वर्णस्वरा' असे केलेले आहे. म्हणजे संपन्न शुक्रधातू असणाऱ्या व्यक्तीचा आवाज अतिशय प्रसन्न, स्निग्ध व ऐकत राहावा असा असतो.
या सर्व संदर्भावरून एक गोष्ट लक्षात येते की आवाजाचे आरोग्य टिकवायचे असेल तर त्यासाठी उदान वायू संतुलित ठेवायला हवा, कफदोष प्राकृत प्रमाणात व प्राकृत स्वरूपात राहील याकडे लक्ष ठेवायला हवे तसेच शुक्रधातू संपन्नावस्थेत राहण्यासाठी प्रयत्न करायला हवा. म्हणजेच आवाज नीट राहण्यासाठी प्रत्येकाने अगोदरपासून काळजी घ्यायला हवी.
यादृष्टीने खालील आयुर्वेदिक उपायांचा उपयोग होऊ शकतो.
रात्री झोपण्यापूर्वी नाकात साजूक तुपाचे किंवा "नस्य सॅन घृता'सारख्या सिद्ध घृताचे दोन-तीन थेंब टाकणे.
इरिमेदादि तेल किंवा "सुमुख तेल'मिश्रित कोमट पाणी तोंड भरेल एवढ्या प्रमाणात गालात आठ-दहा मिनिटांसाठी किंवा नाकाडोळ्यातून पाणी येईपर्यंत धरून ठेवणे. याप्रकारे आठवड्यातून ए-दोन वेळा केल्याने आवाज तर चांगला राहतोच पण दात आणि हिरड्यांचेही आरोग्य नीट राहते.
रोज सकाळी दात घासण्यापूर्वी आयुर्वेदोक्त दंतधावन क्रियेत सुचवलेल्या तुरट, तिखट, कडू चवीच्या द्रव्यांचा किंवा तयार "संतुलन योगदंती' चूर्णाचा वापर करणे. यामुळे घशातील अतिरिक्त कफ सुटा होऊन बाहेर पडून गेला की आवाज चांगला राहतो.
जेवणानंतर लवंग, ओवा, बडीशेप, सुंठ वगैरे पाचक व कफनाशक द्रव्यांपासून बनविलेले मुखशुद्धिकर चूर्ण सेवन करण्याने घसा व स्वरयंत्रातील अतिरिक्त कफ कमी झाला की आवाज नीट राहू शकतो.
ज्येष्ठमधाचा तुकडा चघळणे, काळ्या मनुका चावून खाणे, खडीसाखरेचा खडा तोंडात धरणे, साळीच्या लाह्या खाणे या गोष्टी घशासाठी चांगल्या असतातच, बरोबरीने शुक्रधातूची ताकद वाढविण्यासही हातभार लावणाऱ्या असतात.
रोज सकाळ-संध्याकाळ एक-दोन चिमूट हळद आणि थोडे पाणी घालून उकळवून गाळून घेतलेल्या दुधात शतावरी कल्प, "अनंत कल्प'सारखी शुक्रवर्धक व स्वर्य (स्वराला हितकर) योग टाकून घेणेही आवाजासाठी उत्तम होय.
शक्य तेव्हा गरम पाणी पिणे, विशेषतः पावसाळ्यात व हिवाळ्यात घशाला बरे वाटेल एवढ्या तापमानाचे गरम पाणी पिणे आवाजासाठी हितकर होय.
जेवणाच्या सुरुवातीला गरम वरण-भात-तूप खाणे हे सुद्धा घसा आणि स्वरयंत्राला आवश्यक ती मृदुता व स्निग्धता देण्यास उपयुक्त असते.
एकाएकी आवाज बदलणे व बदलल्यानंतर बरेच दिवस पूर्ववत न होणे हे एखाद्या व्याधीचेही लक्षण असू शकते. उदा. थायरॉईड ग्रंथीमधील बिघाड, क्षयरोग, कर्करोग, घशामध्ये अर्बुद तयार होणे वगैरे. यामुळे आवाज बदलल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्यायलाच हवा. साध्या भाषेत ज्याला आवाज बसणे म्हणतात, त्यातही आवाज बदलतो, पण तो रोग म्हणून गणला जात नाही तर ते एक लक्षण असते, त्याची सामान्य कारणे याप्रमाणे सांगता येतात,
सर्दीमुळे स्वरयंत्र, घसा वगैरे अवयवांना सूज येणे.
फार वेळ, फार उंच आवाजात बोलण्याने किंवा गाण्याने आवाजावर अतिरिक्त ताण येणे.
फार आंबट, फार थंड, आईस्क्रीम, कडक, तेलकट किंवा तत्सम घशाला त्रासदायक ठरेल असे पदार्थ खाणे.
आम्लपित्ताच्या त्रासामुळे घशात आंबट येणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे या कारणां मुळे आवाज बदलू शकतो.
अशा परिस्थितीत सर्वप्रथम ज्या कारणामुळे आवाज बसला असेल ते कारण थांबवणे भाग असते. त्याखेरीज खालील उपाय योजता येतात.
सीतोपलादी चूर्ण आवाजासाठी हितकर असते, मात्र ते शुद्ध घटकद्रव्यांपासून बनविलेले असायला हवे. सितोपलादी चूर्ण पाण्याबरोबर किंवा मध-तुपात मिसळून घेणे आवाजासाठी हितकर असते.
ज्येष्ठमधाच्या काढ्यात थोडेसे तूप मिसळून घेण्यानेही आवाज सुधारण्यास मदत होते.
हळद, सैंधव मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्याने बसलेला आवाज सुधारतो.
घसा जड होऊन बोलायला त्रास होत असल्यास दालचिनी चघळण्याचा, कंकोळ, लवंग तोंडात घरण्याचा उपयोग होतो.
आवाज बसला असून घसा दुखत असल्यास तूप व गूळ घालून भात खावा व वर कोमट पाणी प्यावे.
आवाज बसला असताना किंवा बोलण्यास त्रास होत असताना आंबट फळे, दही, आंबट ताक पिणे टाळावे; जांभूळ, कच्चे कवठ, सीताफळ, फणस, कलिंगड वगैरे फळे खाऊ नयेत; तळलेले पदार्थ पूर्ण टाळावेत.
अतिश्रम टाळावेत; थंड पाण्याने स्नान करणे टाळावे, दिवसा झोपू नये.
आयुर्वेदात "स्वरभेद' नावाचा एक रोग सांगितला आहे. याचेही मुख्य लक्षण आवाज बदलणे हेच असते. प्रकुपित झालेले वातादी दोष स्वरवाही स्रोतसांमध्ये जाऊन स्वर बिघडवतात तेव्हा स्वरभेद होतो, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. वातज, पित्तज, कफज, त्रिदोषज, क्षयज, मेदज असा सहा प्रकारचा स्वरभेद असू शकतो. यातील वातज, पित्तज, कफज हे प्रकार साध्य असतात तर त्रिदोषज, क्षयज व मेदज हे प्रकार असाध्य असतात.
--------------------------------------------------------------------
असा निर्माण होतो आवाज
घ शामध्ये अन्ननलिका आणि श्वासनलिका जिथे वेगळ्या केल्या जातात तेथेच स्वरयंत्र असते. अन्ननलिका आणि श्वासनलिका एका झाकणासारख्या झडपेने वेगळ्या केल्या जातात. त्याला "एपिग्लॉटिस' असे म्हणतात. स्वरयंत्र या एपिग्लॉटिसच्या खाली आणि "ट्रॅकिआ' म्हणजे फुफ्फुसांकडून येणाऱ्या श्वासनलिकेच्या भागाच्या वर असते. स्वरयंत्रात दोन पातळ आडव्या पट्ट्या असतात, ज्यांच्या कंपनांमुळे आवाज निर्माण होतो. या पट्ट्या पाठीच्या कण्याच्या बाजूला ऍरेटिनॉइड कार्टिलेजला तर पुढील कंठाच्या बाजूस थॉयराइड कार्टिलेजला जोडलेल्या असतात. दोन्ही बाजूंनी त्या स्वरयंत्राच्या आतल्या भिंतींना स्नायूंद्वारे जोडलेल्या असतात. आणि त्यांचा मधला भाग मोकळा असतो. प्रामुख्याने श्लेष्मल पेशींनी बनलेल्या या पट्ट्यांमध्ये काही स्नायूतंतूही असतात. या पट्ट्यांची कंपने "व्हेगस' चंतातंतूंद्वारे नियंत्रित केली जातात. त्यांना होणारा रक्ताचा पुरवठा अगदीच कमी असल्याने त्या मोतिया पांढऱ्या रंगाच्या दिसतात. हवेच्या योग्य दाबाने या पट्ट्यांची वेगवेगळी कंपने निर्माण केली जातात, त्यामुळे वेगवेगळे स्वर निर्माण होतात. हवेच्या दाबामुळे दूर ढकलल्या गेलेल्या या पट्ट्या त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीमुळे पुन्हा एकत्र येतात आणि हवेच्या दाबाने पुन्हा दूर ढकलल्या जातात. हे चक्र सतत सुरू राहते आणि आवाज निर्माण होतो. प्रत्येकाच्या आवाजाची प्रत ही त्याच्या स्वरयंत्रातील या दोन पट्ट्यांची लांबी, जाडी, आकार, त्यावरील ताण यावर अवलंबून असते.
--------------------------------------------------------------------
आवाज कुणाचा?
आपल्या घशात असलेल्या स्वरयंत्रामधल्या स्नायूंच्या दोन पट्ट्यांच्या कंपनांमुळे आवाज निर्माण होतो. घशातून निर्माण झालेला ध्वनी जीभ, जबडा, टाळू, ओठ यांच्या प्रभावामुळे बदलत जातो आणि आपल्या तोंडून "आवाज' बाहेर पडतो. बोलाण्यासाठी, गाण्यासाठी, हसण्यासाठी, रडण्यासाठी, ओरडण्यासाठी या आवाजाचा वापर केला जातो. या आवाजातील चढ-उतारांवरून क्रोध, आश्चर्य, आनंद यासारख्या भावना व्यक्त केल्या जाऊ शकतात. तर त्याचा प्रभावी वापर करून गायक संगीत निर्माण करतात. पूर्ण वाढ झालेल्या पुरुषांच्या आवाजाची कंप्रता सर्वसाधारणपणे १२५ हर्टझ् एवढी असते. स्त्रियांच्या आवाजाची कंप्रता २१० हर्टझ् तर मुलांच्या आवाजाची कंप्रता ३०० हर्टझ् असते.
--------------------------------------------------------------------
आवाज जपण्यासाठी
चरकसंहितेत दहा कण्ठ्य द्रव्ये सांगितलेली आहेत. कण्ठ्य म्हणजे कंठाला, घशाला हितकर. अनंतमूळ, उसाचे मूळ, ज्येष्ठमध, पिंपळी, मनुका, विदारीकंद, कायफळ, हंसपादी, बृहती, कंटकारी ही द्रव्ये स्वराला हितकर असतात. प्रकृृतीनुरूप व दोषाच्या असंतुलनानुसार या द्रव्यांचा काढा, चूर्ण करून किंवा या द्रव्यांनी सिद्ध तेल वा तूप बनवून वापरणे आवाजासाठी हितकर असते. कण्ठ्य द्रव्यांपासून "संतुलन स्वरित'सारख्या गोळ्या तयार करून ठेवता येतात व या गोळ्या गवई, प्रवचनकार, वक्ते यांनी नित्य सेवन केल्यास आवाज उत्तम ठेवण्यास मदत मिळते.
--------------------------------------------------------------------
- डॉ. श्री बालाजी तांबे
No comments:
Post a Comment