शरीरशुद्धी
सौंदर्याला सर्वांत घातक काय? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर येईल "शरीरात साठणारी विषद्रव्ये'. आहाराद्वारे, पाण्याद्वारे, हवेद्वारे आपल्या शरीरात अनेक विषद्रव्ये प्रवेशित होत असतात. मल-मूत्र-घामामार्फत बरीचशी विषद्रव्ये शरीराबाहेर जात असली तरी हे काम रोजच्या रोज अगदी १०० टक्के होतेच असे नाही. परिणामत- हळू हळू शरीरात विषद्रव्ये साठत जातात. त्यातूनच मग रंग काळवंडणे, वजन वाढणे, निस्तेज होणे, उत्साह कमी होणे यासारखे त्रास जाणवू लागतात. अशा परिस्थितीत नुसत्या औषधांनी त्रास कमी करण्यापेक्षा मूळ कारण असणारी विषद्रव्ये शरीराबाहेर काढून टाकणे सर्वोत्तम असते. विशेषत- पंचकर्मातील विरेचन आणि बस्ती या दोन कर्मांद्वारे शरीरातील पित्त व वात दोषांचे संतुलन साधले गेले आणि विषद्रव्ये दूर झाली की सौंदर्यावरचे सावटही दूर होऊ शकते. त्रास होत नसला तरी वयाच्या पस्तिशी-चाळिशी दरम्यान एकदा शरीरशुद्धी करणे सौंदर्य तसेच आरोग्यासाठीही हितकर असते. अशा प्रकारची शरीरशुद्धी शास्त्रोक्त पद्धतीने व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणे उत्तम असतेच. बरोबरीने घरच्या घरी पंधरा दिवसातून एकदा तीन-चार जुलाब होतील एवढ्या प्रमाणात प्रकृतीनुरूप जुलाबाचे औषध घेणेही उपयुक्त असते. यासाठी एरंडेल तेल, त्रिफळा, गंधर्वहरीतकी आदी औषधे घेता येतात.
पंचकर्म म्हणजे शरीरातील प्रत्येक पेशी शुद्ध होणे. आजकाल बहुतांशी वेळेला नुसता मसाज, स्वेदन, शिरोधारा वगैरे वरवरचे उपचार करण्याला "पंचकर्म' संबोधले जाते. परंतु, पंचकर्म म्हणजे शरीर आतूनही स्वच्छ करणे. जसे "संतुलन पंचकर्मा'मध्ये अंतर्स्नेहन, बह्रिस्नेहन, स्वेदन, विरेचन, बस्ती, नस्य वगैरे उपचारांचा समावेश असतो. यामुळे शरीरातील पेशी न् पेशी शुद्ध होते, पुनर्जीवित होते, सतेज होते. याने सौंदर्य व आरोग्य दोन्हीचाही लाभ होतो. सर्वप्रथम अशी शरीरशुद्धी करून घेतली आणि नंतर आयुर्वेदिक पद्धतीने फेशियल, रक्तशुद्धिकर द्रव्यांची बस्ती वगैरे उपचार घेतले तर त्वचा नितळ, सतेज होणे सहज शक्य असते. नुसत्या मसाज, शिरोधारा यांनी असे परिणाम मिळत नाहीत.
पोट साफ ठेवणे तर सौंदर्यासाठी खूपच आवश्यक असते. खाल्लेल्या अन्नाचे सप्तधातूत व पर्यायाने शक्तीत रूपांतरण होण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक असते, जेणेकरून शरीराला सौष्ठवही येते.
शल्यचिकित्सेने शरीरात ताबडतोब बदल करून घेता येत असला तरी तसे न करता शरीराला तेल लावणे, जेणेकरून शरीरावर जमलेला मेद कमी होऊ शकतो, नितंब, वक्षस्थळ वगैरे ठिकाणी तेल लावून त्यांचे सौष्ठव टिकविता येते, असे आयुर्वेदाने सांगितले आहे. या व अशा तत्सम आयुर्वेदिक उपचारांनी नुसतेच सौंदर्य वाढते असे नाही तर शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन राहून सर्वांगीण मदत मिळते.
आहार व आचरण
योग्य आहार आरोग्यासोबत सौंदर्यासाठीही आवश्यक असतो. सौंदर्यासाठी वात-पित्तदोष नियंत्रित रहायला हवेत आणि शरीरपोषक कफदोषाचे पोषण व्हायला हवे. त्यासाठी आहारात दूध, साजूक तूप, यासारखी शरीरपोषक स्निग्ध द्वव्ये; मनुका, अंजीर, डाळिंबासारखी रस- रक्तधातुपोषक फळे; खारीक, डिंकाचे लाडू, खसखस आदी अस्थिधातुपोषक पदार्थ यांचा समावेश असावा. केशर, हळद, मध, साळीच्या लाह्या, खडीसाखर रक्तशुद्धिकर व शरीरपोषक असल्याने सौंदर्यासाठी उत्तम. असे सौंदर्याला हितकर पदार्थ आहारात असायला हवेत तसेच त्वचेला, केसांना बिघडवू शकणारे, बांधा बेडौल करू शकणारे पदार्थ टाळायलाही हवेत. उदा. तिळाचे, मोहरीचे तेल खाणे टाळावे. चिंच, मिरची, टोमॅटो, आंबट दही, अननस यांचा अतिरेक टाळावा. दूध व फळे एकत्र करू घेऊ नयेत. मैद्याचे पदार्थ खाणे टाळावे. रासायनिक खते, फवारे यांवर जोपासलेल्या भाज्या-फळे टाळाव्यात. दीर्घकाळ टिकण्यासाठी रासायनिक प्रक्रिया केलेले, प्रिझर्वेव्हिज् घातलेले अन्न टाळावे. प्रक्रिया करून डब्यात भरून ठेवलेले फळांचे रस, शीतपेये, फ्रीजमधील अतिथंड पाणी पिणे टाळावे.
वेळेवर पुरेशी झोप घेणे, नियमित वेळेला जेवणे, केस-डोळे-त्वचा यांना तीव्र ऊन फार वेळ लागू न देणे, दुपारी न झोपणे, मल-मूत्रादि नैसर्गिक वेग बळेच धरून न ठेवणे आरोग्यासोबत सौंदर्यासाठीही हितकर असते.
व्यायाम व योग
सौंदर्यासाठी तेज हवे आणि तेजासाठी प्राणशक्तीचे संचरण व्हायला हवे. मन जेवढे शांत व प्रसन्न तेवढे सौंदर्याला पूरक. रागाने नैराश्याने किंवा शोकाने मन ग्रासले की तेज आणि पर्यायाने सौंदर्य कमी होते. प्रसन्न मन आणि प्राण संचरण हे दोन्ही साध्य होण्यासाठी नियमित योग-व्यायाम महत्त्वाचा होय. नियमित चालणे, जॉगिंग, पोहणे आदी व्यायाम सर्वांनाच अनुकूल असतात. बरोबरीने सूर्यनमस्कार, शीतली क्रिया, अनुलोम-विलोम, प्राणायाम, समर्पण-स्थैर्य आदी संतुलन क्रियाही परिणामकारी ठरतात.
थोडक्यात सौंदर्य व आरोग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, जीवन सर्वार्थाने जगण्यासाठी, जीवनाचा आनंद घेण्यासाठी त्या अत्यावश्यक असतात. पंचक्रियांच्या साहाय्याने सौंदर्य टिकविण्याचा व वाढविण्याचा प्रयत्न केला तर याचा अनुभव निश्चितच घेता येईल.
- डॉ. श्री बालाजी तांबे.
No comments:
Post a Comment