Friday, April 4, 2008

डोळ्यांच्या आरोग्यासाठी नेत्रबस्ती


(डॉ. श्री बालाजी तांबे)
आयुर्वेदाच्या तत्त्वांनुसार नेत्रदोष कोणत्या असंतुलनामुळे झाला आहे, हे लक्षात घेऊन उपचारांचे स्वरूप व कालावधी त्या अनुषंगाने बदलला जातो. .......
डोळे म्हणजे शरीरातील एक महत्त्वाचे इंद्रिय. जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेण्यासाठी सर्वच इंद्रिये संपन्न असायला हवीत हे खरे असले तरी त्यातल्या त्यात डोळे अग्रणी ठरावेत. अष्टांगसंग्रहात डोळ्यांचे महत्त्व अशा प्रकारे सांगितले आहे,

चक्षुरक्षायां सर्वकालं मनुष्यैःयत्नः कर्तव्यो जीविते यावदिच्छा ।व्यर्थो लोको।य़ं तुल्यरात्रिनिन्दवानांपुंसामन्धानां विद्यमाने।पि वित्ते ।।
... अष्टांगसंग्रह उत्तरस्थान

जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत मनुष्याने डोळ्यांच्या रक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. अंध व्यक्‍तीजवळ धन-संपत्ती असली तरी त्याच्यासाठी दिवस व रात्र एकच असल्याने सर्वच व्यर्थ होते.

डोळे अतिशय संवेदनशील तसेच नाजूक असतात. बाह्य वातावरण, शरीरातील दोष-धातूंची स्थिती एवढेच नाही तर मानसिक अवस्थेचाही डोळ्यांवर चांगला-वाईट परिणाम होत असतो. दृष्टी म्हणजेच दिसण्याची क्रिया योग्य असण्यासाठी दर्शनग्रहण करणारे चक्षुरेंद्रिय तर चांगले हवेच पण ते ज्या आधारे राहते ते डोळेरूपी अवयवही उत्तम असायला हवेत.

चष्मा लागतो म्हणजेच दृष्टी किंवा नजर कमकुवत होते. यामागे अनेक बिघाड असू शकतात. या बिघाडांची अनेक कारणे असू शकतात. सगळेच बिघाड झटपट दूर होतील असे नाही पण आयुर्वेदशास्त्रात नेत्ररोगाची कारणे, प्रकार व उपचार यांची सविस्तर माहिती दिलेली आढळते.

सुश्रुतसंहितेमध्ये ७६ प्रकारचे नेत्ररोग वर्णन केलेले आहेत, तर वाग्भटाचार्यांच्या मते ९४ प्रकारचे नेत्ररोग आहेत. नेत्रदोषाचे निदान करताना तो वातदोषातील बिघाडामुळे झाला आहे का पित्तदोषातील असंतुलनामुळे झाला आहे का कफदोष अति प्रमाणात वाढल्यामुळे झाला आहे हे मुख्यत्वाने पहावे लागते, तसेच रक्‍तात बिघाड झाल्याने, शरीरधातूंची ताकद कमी झाल्याने दृष्टी खालावते आहे का होही पाहावे लागते. अर्थातच उपचारांचे स्वरूप व उपचारांचा कालावधी त्या अनुषंगाने बदलत जातो.

सर्वसाधारणपणे नेत्ररोगावर खालील प्रकारचे उपचार केले जातात.

नेत्रबस्ती (नेत्रतर्पण) - यामध्ये उडदाच्या पिठाच्या सहायाने डोळ्यांभोवती पाळे तयार केले जाते व त्यात डोळा, पापण्या व पापण्यांचे केस बुडतील एवढ्या प्रमाणात औषधांनी सिद्ध केलेले तेल अथवा तूप भरले की डोळ्यांची उघडझाप करायची असते आणि साधारणपणे १५ ते २५ मिनिटांपर्यंत अशी नेत्रबस्ती घ्यायची असते. रोगाच्या अवस्थेनुसार ही नेत्रबस्ती रोज वा एक दिवसा आड घेता येते. नेत्रबस्तीमुळे डोळ्यांची ताकद तर वाढतेच पण दृष्टीही सुधारू शकते. नेत्रबस्तीत वापरलेल्या औषधी द्रव्यांचा परिणाम दृष्टिनाडीपर्यंत सुद्धा पोचू शकतो.

नस्य - सिद्ध घृत वा तेल नाकामध्ये टाकणे म्हणजे नस्य होय. नाक, कान व डोळे ही तिन्ही इंद्रिये एकमेकांशी संबंधित असतात हे सर्वज्ञातच आहे. आयुर्वेदात तर या तिन्ही इंद्रियांचा शिरामध्ये ज्या एका बिंदूपाशी संयोग होतो त्याला "शृंगाटक मर्म' अशी संज्ञा दिलेली आहे. नस्याद्वारे औषध शृंगाटक मर्मापर्यंत पोचले की त्याचा डोळ्यांवर, दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच दृष्टी सुधारण्यासाठी नस्य हा एक महत्त्वाचा उपचार असतो.

शिरोबस्ती - नेत्रबस्तीमध्ये जसे डोळ्यांभोवती पाळे बांधले जाते, तसेच शिरोबस्तीमध्ये डोक्‍यावर उंच टोपी घातल्याप्रमाणे उडदाच्या पिठाच्या व चामड्याच्या साहाय्याने पाळे बांधले जाते व त्यात सिद्ध घृत वा सिद्ध तेल ३० ते ९० मिनिटांपर्यंत भरून धारण केले जाते. या उपचारांचा डोळ्यांशी प्रत्यक्ष संबंध येत नसला तरी प्रत्यक्षात त्याचा उपयोग दृष्टी सुधारण्यासाठी तसेच नेत्ररोगनिवारणासाठी होताना दिसतो.

पुटपाक - नेत्रबस्तीप्रमाणेच या उपचारामध्ये वनस्पतीचा ताजा रस डोळ्यांवर धारण केला जातो. ज्या द्रव्यांचा रस निघत नाही अशा द्रव्यांचा रस पुटपाक पद्धतीने काढला जातो.

अंजन - डोळ्यात काजळाप्रमाणे औषध घालणे म्हणजे अंजन करणे होय. अंजन ज्या द्रव्यांपासून बनविले जाते त्यानुसार त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्य असते. काही अंजनांमुळे डोळ्यांचे प्रसादन होते म्हणजेच डोळ्यांचा थकवा दूर होतो. संगणक वगैरे प्रखर गोष्टींकडे सातत्याने बघितल्यामुळे येणारा डोळ्यांवरचा ताण नाहीसा होण्यास मदत मिळते. उदा. "सॅन अंजन -क्‍लिअर'. काही अंजनांमुळे डोळ्यातील अतिरिक्‍त कफ वाहून जातो व डोळे स्वच्छ होतात. उदा. रसांजन

नेत्रधावन - त्रिफळा, लोध्र वगैरे द्रव्यांच्या काढ्याने डोळे धुणे म्हणजे नेत्रधावन. यामुळे जंतुसंसर्ग होण्यास प्रतिबंध होतो, डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते, कंड, चिकटपणा वगैरे त्रास दूर होतात.

वर्ती - डोळ्यांना व दृष्टीला हितकर असणारी द्रव्ये घोटून, वाळवून वातीप्रमाणे बारीक वर्ती (लांबुडकी मात्रा) केली जाते व ती मध, त्रिफळा काढा वगैरे द्रवात बुडवून डोळ्यामध्ये फिरवली जाते किंवा उगाळून घातली जाते. यामुळे डोळ्यांची शक्‍ती वाढते, विविध नेत्ररोग बरे होतात, दृष्टी सुधारण्यासाठी मदत मिळते.

चक्षुष्य बस्ती - मध, तेल, शतपुष्पा, एरंडमूळ, ज्येष्ठमध वगैरे द्रव्यांपासून तयार केलेली चक्षुष्य बस्ती बस्तीरूपाने (आयुर्वेदिक एनिमा) घेण्यानेही दृष्टी सुधारायला मदत मिळते.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी, दृष्टी सुधारण्यासाठी हे उपचार उत्तम असतातच, बरोबरीने डोळ्यांना हितकर द्रव्यांचे सेवन करण्याचाही चांगला उपयोग होताना दिसतो. त्रिफळा हे चूर्ण डोळ्यांसाठी उत्तम असते, विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण मध व तुपासह घेणे हितकारक असते. त्रिफळा, दारुहळद वगैरे द्रव्यांपासून बनविलेले त्रिफळा घृत, जीवनीय गणातील औषधांचा विशेष संस्कार केलेले "संतुलन सुनयन घृत' यांचाही नेत्ररोगावर खूप चांगला उपयोग होतो. नवायास लोह, रौप्य भस्म, मौक्‍तिक भस्म वगैरे औषधी योगही डोळ्यांसाठी उत्तम असतात.

नेत्ररोग झाल्यावर किंवा चष्मा लागल्यावर उपचार करण्यापेक्षा डोळे निरोगी राहण्यासाठी अगोदरपासून काळजी घेणे निश्‍चितच चांगले असते. त्यादृष्टीने डोळ्यात आयुर्वेदिक अंजन घालणे, नेत्र्य द्रव्यानी सिद्ध तेल उदा., "संतुलन सुनयन तेल' टाकणे, पादाभ्यंग करणे, तोंडात थोडे पाणी घेऊन व गाल फुगवून बंद डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारणे, जेवणानंतर दोन्ही हाताचे तळवे एकमेकावर घासून डोळ्यांना लावणे यासारखे साधे सोपे पण प्रभावी उपचार करता येतात.

डोळ्यांसाठी विशेष हितकर पदार्थ - मूग, जव, लाल तांदूळ, जुने तूप, कुळीथ सूप, पेज, कण्हेरी, गाजर, मेथी, पालक, पपई, सुरण, परवर, वांगे, काकडी, मुळा, मनुका, गाईचे दूध, तूप, साखर, धणे, सैंधव, मध, वगैरे आहारातील गोष्टी; पुनर्नवा, माका, कोरफड, त्रिफळा, चंदन, कापूर, लोध्र वगैरे औषधी द्वव्ये.

डोळ्यांसाठी अहितकर गोष्टी - क्रोध, शोक, मैथुन, अश्रू-वायू-मूत्र वगैरे वेगांचा अवरोध करणे, रात्री जड भोजन करणे, सातत्याने उन्हात किंवा उष्णतेसन्निध राहणे, फार बोलणे, वमन, अतिजलपान, दही, पालेभाज्या, टरबूज, मोड आणलेली कडधान्ये, मासे, मद्य, पाण्यातील प्राणी, मीठ, अतिशय तिखट, अतिशय आंबट व जड अन्नपान, मोहरीचे तेल, रात्रीचे जागरण वगैरे.

--------------------------------------------------------------------
डोळ्याचा नंबर कमी करण्यासाठी
- रात्री उशिरापर्यंत जागू नये, लवकर झोपावे. रात्री नाकात साजूक तुपाचे थेंब टाकावेत.
- टी.व्ही., संगणकाचा स्क्रीन वा तेजस्वी प्रकाशाकडे सतत पाहू नये,
- योगशास्त्रातील सर्वांगासन, त्राटक, नेत्रक्रिया कराव्यात.
- शुद्ध आयुर्वेदिक काजळ (सौंदर्य प्रसाधनातील नव्हे), अंजन नित्य वापरावे. पुरुषांना काळे काजळ घालणे योग्य वाटत नसले तर "संतुलन काजळ- क्‍लिअर' वापरावे. "संतुलन सुनयन घृता' सारखे योग नियमित वापरावेत.
- दूध, लोणी, गाजर, मेथी, पालक, पपई वगैरे भाजीपाला व फळे आहारात अवश्‍य सेवन करावे.
--------------------------------------------------------------------

- डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment

ad