मंत्र बुद्धिवर्धनाचे
(डॉ. श्री बालाजी तांबे) आपण करीत असलेले प्रत्येक छोटे-मोठे कार्य, आपल्याला घ्यावा लागणारा प्रत्येक छोटा- मोठा निर्णय "योग्य' असायला हवा असला, तर त्यासाठी बुद्धी व त्यापाठोपाठ धृती सक्षम, सुयोग्य असायला हव्यात. बुद्धीची असमर्थता हे तमोगुणाचे दर्शक आहे, असेही आयुर्वेदशास्त्रात सांगितलेले आहे. तसेच, ज्याप्रमाणे प्यायचे पाणी स्वच्छ ठेवायचे असेल, तर आपण स्वच्छ भांड्यातच ठेवू, तसे मन शुद्ध राहायला हवे असेल, बुद्धी प्रसन्न असायला हवी असेल, तर शरीर शुद्ध ठेवणे अपरिहार्य आहे. ......."देवा, मला शक्ती, बुद्धी, युक्ती दे' असे मागणे लहानपणी मागितल्याचे बहुतेकांना आठवत असेल. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जिवामध्ये चेतनेपाठोपाठ काही तत्त्वे येत असतात, त्यातलेच एक बुद्धी. कुशाग्र बुद्धी, मंद बुद्धी, साधारण बुद्धी असे शब्द आपण व्यवहारात वापरतो. बुद्धीचे असे सर्व प्रकार तिच्या शुद्धतेमुळे, बुद्धीवर झालेल्या संस्कारांमुळे पडत जातात. म्हणूनच बुद्धितत्त्व हे जरी चेतनतत्त्वाच्या जोडीने आपोआप येत असले तरी त्यावर संस्कार करणे शक्य असते व त्यातूनच ते संपन्न व उत्तम बनू शकते. बुद्धी म्हणजे "हुशारी' हे जरी खरे असले तरी फक्त परीक्षेत उत्तम गुण मिळविण्यापुरती बुद्धीची आवश्यकता असते असे नव्हे. बुद्धी संपन्न करण्याचे उपाय पाहण्यापूर्वी, बुद्धी म्हणजे नेमके काय व तिचे खरे योगदान काय असते हे पाहू या. आयुर्वेदशास्त्रात बुद्धीची व्याख्या केली आहे, निश्चयात्मिका धी- बुद्धि- । ... सुश्रुत शारीरस्थान जी निश्चित, पक्का निर्णय करू शकते ती बुद्धी होय. समं बुद्धिर्हि पश्यति । ... चरक शारीरस्थान जे जसे आहे तसेच पाहणारी एकटी बुद्धीच असते. बुद्धिमत्ता हे सात्त्विकतेचेही प्रतीक असते. सात्त्विक व्यक्तीमध्ये बुद्धी "सम' म्हणजे आपले काम चोखपणे पार पाडणारी असते, तर तामसिक व्यक्तीमध्ये बुद्धी "मूढ' झालेली असते, दुष्ट झालेली असते. एखाद्या गोष्टीचे ज्ञान होण्यासाठी, त्यानुसार कर्म करण्यासाठी इंद्रिये, मन, बुद्धी अशी साखळी कार्यान्वित होणे भाग असते. ज्ञान कसे होते हे आयुर्वेदात याप्रमाणे सांगितलेले आहे. इन्द्रियेणेन्द्रियार्थो हि समनस्केन गृह्यते । ... चरक शारीरस्थान सर्वप्रथम ज्ञानेंद्रिये म्हणजे डोळे, कान, जीभ, नाक व त्वचा या अवयवात राहणारी इंद्रिये आपापल्या विषयाचे मनाच्या सोबतीने ग्रहण करते. कल्पते मनास तूर्ध्वं गुणतो दोषतो।थवा । ... चरक शारीरस्थान यानंतर मन त्यातील गुण व दोष यांचा विचार करते, अमुक गोष्ट केल्याने काय होईल, न केल्याने काय होईल याचा अंदाज मन घेते. जायते विषये तत्र या बुद्ध्रिनिश्चयात्मका । ... चरक शारीरस्थान चांगले काय, वाईट काय हे मनाने तोलले तरी त्यातून एका निर्णयाला येण्यासाठी बुद्धीची आवश्यकता असते. मनाला एकटे सोडले तर ते द्विधेत सापडते. म्हणून, द्विधा मन-स्थितीतून बाहेर निघणे बुद्धीमुळेच शक्य होत असते. व्यवस्यति तया वक्तुं कर्तुं वा बुद्धिपूर्वकम् । बुद्धीने घेतलेल्या निर्णयानुसार ती व्यक्ती कार्य करण्यास प्रवृत्त होते. बुद्धीने घेतलेला निर्णय योग्य असला तरी तो तसाच्या तसा अंमलात आणण्यासाठी मनाचे सहकार्य लागतेच. यासाठी बुद्धीचीच पाठराखीण म्हणता येईल अशा "धृती'ची योजना केलेली असते. बुद्धीने घेतलेला निर्णय मनाने स्वीकारावा व कर्मेंद्रियांना योग्य कर्म करण्याची आज्ञा द्यावी यासाठी धृती मनाला नियंत्रित करत असते. या साऱ्याचा अर्थ असा की, आपण करत असलेले प्रत्येक छोटे मोठे कार्य, आपल्याला घ्यावा लागणारा प्रत्येक छोटा-मोठा निर्णय "योग्य' असायला हवा असला तर त्यासाठी बुद्धी व त्यापाठोपाठ धृती सक्षम, सुयोग्य असायला हव्यात. बुद्धी, धृती, स्मृती हे प्रज्ञाभेद सांगितले असले तरी त्यात पहिली बुद्धी येते कारण ती सर्वात महत्त्वाची असते. बुद्ध्या विषमविज्ञानं विषमं च प्रवर्तनम् । प्रज्ञापराधं जानीयान्मनसो गोचरं हि तत् ।। ... चरक शारीरस्थान जे जसे आहे तसेच समजण्याची बुद्धीची क्षमता नाहीशी झाली (विषमज्ञान) आणि त्यामुळे ती अनुचित कर्माचा निर्णय करू लागली (विषमप्रवर्तन) तर त्यामुळे प्रज्ञापराध घडतो आणि त्यातून दु-ख, सर्व शारीरिक मानसिक रोगांची उत्पत्ती होते. बुद्धीची असमर्थता हे तमोगुणाचे दर्शक आहे असेही आयुर्वेदशास्त्रात सांगितलेले आहे. थोडक्यात, फक्त अभ्यास करणाऱ्यांनाच बुद्धिसंपन्नतेची आवश्यकता असते असे नाही, तर आरोग्यपूर्ण व संपन्न जीवन जगण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला बुद्धी संपन्न राहावी, समर्थ राहावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. "मन-शुद्धौ बुद्धिप्रसाद-' म्हणजे बुद्धिप्रसादनासाठी मन शुद्ध असणे आवश्यक आहे, असे सुश्रुतसंहितेत म्हटले आहे म्हणून बुद्धिवर्धनाची इच्छा असणाऱ्यांनी मनात रज, तम वाढू नयेत याकडे लक्ष ठेवायला हवे. त्यासाठी सात्त्विक व साधा आहार, सद्वर्तन, प्रकृतीनुरूप आचार वगैरे गोष्टींकडे लक्ष ठेवता येते. मन-बुद्धी ही तत्त्वे पांचभौतिक शरीरापेक्षा वेगळी असली तरी जोवर जीव आहे, चेतना आहे तोपर्यंत ती शरीरातच असतात. ज्याप्रमाणे प्यायचे पाणी स्वच्छ ठेवायचे असेल तर आपण स्वच्छ भांड्यातच ठेवू तसे मन शुद्ध राहायला हवे असेल, बुद्धी प्रसन्न असायला हवी असेल तर शरीर शुद्ध ठेवणे अपरिहार्य आहे. आयुर्वेदात विरेचन प्रक्रिया समजावल्यानंतर जी उत्तम विरेचनाची लक्षणे सांगितली त्यात शरीर हलके होणे, भूक लागणे वगैरे शारीरिक लक्षणांचा उल्लेख केलाच व बरोबरीने बुद्धी, इंद्रिये व मन शुद्ध होते असेही सांगितले. प्रत्यक्षातही याचा असंख्य वेळेला अनुभव येताना दिसतो. बुद्धी संस्कारांनी संपन्न करता येते. आयुर्वेदाने नवजात बालकांसाठी "सुवर्णप्राशन' संस्कार सांगितला आहे तो यासाठीच. षड् भि र्मासै- श्रुतधर- सुवर्णप्राशनाद् भवेद् । ... कश्यप सूत्रस्थान जन्मल्यापासून सहा महिन्यांचे होईपर्यंत बाळाला रोज सुवर्णप्राशन म्हणजे मधासह शुद्ध सोने उगाळून चाटवले तर बालक "श्रुतधर' म्हणजे एकदा ऐकलेले लक्षात ठेवू शकेल असे बुद्धिसंपन्न होते. तूप, बदाम, शतावरी, ब्राह्मी, सुवर्ण, केशर, बदाम, खडीसाखर ही द्रव्ये बुुद्धिवर्धक असतात. त्यामुळे मोठ्या वयातही या द्रव्यांचे नियमित सेवन करता आले तर ते बुद्धिवर्धनासाठी, बुद्धिसंपन्नतेसाठी उत्तम असते. त्यादृष्टीने सुवर्णसिद्धजल, केशर-सुवर्णवर्खयुक्त "संतुलन बालामृत', शतावरी-केशर- सुवर्णवर्खयुक्त "संतुलन अमृतशतकरा', पंचामृत, ब्रह्मलीन घृत, "संतुलन डिव्हाईन सिरप' "संतुलन सूर्यप्राश', आत्मप्राश वगैरे योगांचा रोजच्या आहारात समावेश करता येतो. आयुर्वेदाने बुद्धिवर्धनासाठी उत्तमोत्तम रसायनयोगही सांगितले आहेत, उदा. मधुकेनतवक्षीर्या पिपल्ल्या सिन्धुजन्मना । पृथग्लोहै- सुवर्णेन वचया मधुसर्पिषा ।। सितया वासमायुक्ता समायुक्ता रसायनम् । त्रिफला सर्वरोगघ्नी मेधायु- स्मृतिबुद्धिदा ।। ... अष्टांगसंग्रह उत्तरस्थान ज्येष्ठमध, वंशलोचन, पिंपळी, सैंधव, सुवर्ण, लोह, रौप्य, वेखंड, मध, तूप, खडीसाखर व त्रिफळा यांचे मिश्रण सेवन केल्यास सर्व रोगांचा नाश होतो व मेधा, आयुष्य, स्मृती, बुद्धी यांचा लाभ होतो. ब्राह्मी वचा सैन्धवशङ्खपुष्पी मत्स्याक्षकब्रह्मसुवर्चलैन्द्रै- । वैदेहिना च त्रियवा- पृथक्स्युर्यवौ सुवर्णस्य तिलोविषस्य । सपिर्षश्च पलमेकत एतद् योजयेत् परिणते च घृताढ्यम् ।। भोजनं समधुवत्सरमेवं शीलयन्नाधिकधीस्मृतिमेधा- ।। ब्राह्मी, वेखंड, सैंधव, शंखपुष्पी, मत्स्याक्षी, ब्रह्मसुवर्चला, ऐन्द्रि, पिंपळी, प्रत्येकी तीन यव प्रमाण,सुवणर् दोन यव प्रमाण, वत्सनाभ एक तिल प्रमाण, घृत चार तोळे प्रमाणात मिसळून रोज सकाळी खावे, त्यानंतर भूक लागली असता भरपूर तुपयुक्त भोजन मधासह घ्यावे. याप्रमाणे वर्षभर केल्यास बुद्धी, स्मृती व मेधा वाढतात. बुद्धीवर संस्कार होण्यासाठी आयुर्वेदाने इतरही उपाय सुचविले आहेत, सतताध्ययनं वाद- परतन्त्रावलोकनं तद्विद्याचार्यसेवा इति बुद्धि मेधाकरो गण- । ... सुश्रुत चिकित्सास्थान - सातत्याने अध्ययन करणे, मनापासून शास्त्र अभ्यासणे. - सहाध्यायी व्यक्तीबरोबर शास्त्राबद्दल संवाद साधणे. - आपल्या शास्त्राशी संबंधित इतर शास्त्रांची माहिती करून घेणे. - ज्या शास्त्राचे अध्ययन करायचे असले त्या आचार्यांच्या सहवासात राहून त्यांची सेवा करणे. यातून आणखीही एक गोष्ट लक्षात येते की बुद्धी संन्न ठेवाची असली तर तिचा वापर करत राहणे आव्यक आह. धूळ खात पडलेली तलवार जशी गंजून निकामी होऊ शकते तसेच बुद्धीच्या बाबतीत घडता कामा नये. बुद्धीने शेवटपर्यत सम राहायला हवे असेल, योग्य निर्णय घेऊन जीवन सुखी व्हायला हवे असेल तर बुद्धीवर या प्रकारचे संस्कार करत राहायला हवेत. - डॉ. श्री बालाजी तांबे
No comments:
Post a Comment