Thursday, February 4, 2016

स्रोतस सिद्धांत -2

- डॉ. श्री. बालाजी तांबे 
स्रोतसे आपापल्या द्रव्याचे वहन व्यवस्थित करत असतात तोपर्यंत आरोग्य नीट राहते. जो आहार किंवा जे आचरण दोषांच्या गुणाशी समान गुणांनी युक्‍त असते म्हणजे दोषांना वाढवणारे असते आणि धातूूच्या गुणांना विरोधी असते म्हणजे धातूंना अशक्‍त करणारा असते. तो आहार आणि ते आचरण स्रोतसांमध्ये बिघाडाला कारण ठरत असते.

आयुर्वेदाचे वैशिष्ट्य समजला जाणारा सिद्धांत म्हणजे स्रोतससिद्धांत. शरीरात जेथे जेथे अवकाश आहे, जेथे जेथे शरीरभावांचे परिवहन होत असते, त्या सर्वांना स्रोतस ही संज्ञा देता येते. असंख्य स्रोतसांपैकी काही स्रोतसे महत्त्वाची समजली जातात. कारण या स्रोतसांच्या मुळांवर म्हणजे स्रोतस जेथून सुरू होतात त्या उत्पत्तीस्थानावर आघात झाला, तर त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तसेच या मुख्य स्रोतसांमध्ये दोष उत्पन्न झाला तर त्याची लक्षणे शरीरावर विशेषत्वाने दिसतात. 

स्रोतसांचे मुख्यत्वे दोन प्रकार केले जातात. 
१. बहिर्मुख स्रोतस - ज्या स्रोतसांचे मुख शरारीवर उघडते ती बहिर्मुख स्रोतसे होत. दोन डोळे, दोन कान, मुख, नाकपुड्या, गुद आणि मूत्रमार्ग ही नऊ स्रोतसे बहिर्मुख असतात. तसेच स्त्रियांमध्ये दोन स्तन आणि योनी अशी तीन स्रोतसे विशेषत्वाने असतात. 
२. अंतर्मुख स्रोतस - ज्या स्रोतसांचे मूळ शरीराच्या आत असते, जी स्रोतसे शरीरावर बाहेर दिसू शकत नाहीत त्यांना अंतर्मुख स्रोतसे म्हणतात. प्राणवह, उदकवह, अन्नवह, सात धातूंची सात स्रोतसे आणि तीन मलांची तीन स्रोतसे अशी एकूण तेरा स्रोतसे अंतर्मुख असतात या सर्व स्रोतसांमध्ये वात, पित्त व कफ हे तिन्ही सातत्याने संचार करत असतात. 
ही अंतर्मुख स्रोतसे शरीराच्या आत असल्याने सहजासहजी पाहता येत नाहीत, त्यामुळे त्यांचे स्वरूप कसे असते हे पुढील सूत्रातून सांगितले आहे, 
स्वधातुसमवर्णानि वृत्तस्थूलान्यणूनि च ।
स्रोतांसि दीर्घाण्याकृता प्रतानसदृशानि च ।। ...चरक विमानस्थान
स्रोतसे आतून पोकळ असतात. नळीच्या आकाराची असतात. काही स्रोतसे स्थूल तर काही सूक्ष्म, बारीक असतात, काही लांब (दीर्घ) असतात, तर काही वेलीच्या शाखा-उपशाखांप्रमाणे पसरलेली असतात. स्रोतसाचा वर्ण ते ज्या द्रव्याला वाहून नेते त्या द्रव्याच्या वर्णासारखा असतो. 
जोपर्यंत स्रोतसे आपापल्या द्रव्याचे वहन व्यवस्थित करत असतात तोपर्यंत आरोग्य नीट राहते. मात्र स्रोतसातील द्रव्याची मात्रा वाढली, त्याच्या वहनाचा वेग वाढला किंवा स्रोतसामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा उत्पन्न झाला, सिरांमध्ये ग्रंथी तयार झाली किंवा चुकून एका स्रोतसाचे द्रव्य दुसऱ्या स्रोतसात गेले, तर त्यामुळे स्रोतसांच्या कार्यात दोष उत्पन्न होतो. 
स्रोतसांमध्ये अशा प्रकारचा बिघाड का होतो हे पुढील सूत्राद्वारा स्पष्ट केले आहे, 
आहारश्‍च विहारश्‍च यः स्यात्‌ दोषगुणैः समः ।
धातुभिर्विगुणश्‍चापि स्रोतसां स प्रदुषकः ।। ...चरक विमानस्थान
जो आहार किंवा जे आचरण दोषांच्या गुणाशी समान गुणांनी युक्‍त असते म्हणजे दोषांना वाढवणारे असते आणि धातूूच्या गुणांना विरोधी असते म्हणजे धातूंना अशक्‍त करणारा असते तो आहार आणि ते आचरण स्रोतसांमध्ये बिघाडाला कारण ठरत असते. या प्रकारे स्रोतस बिघडण्यामागे सामान्य कारण सांगितलेले असले तरी मुख्य तेरा स्रोतसांना बिघडवणारी विशिष्ट कारणे आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेली आहेत. तसेच प्रत्येक स्रोतसाचे मूळ काय, स्रोतसात बिघाड झाला तर शरीरावर काय परिणाम होतो हेही समजावले आहे. याची माहिती आपण पुढच्या वेळी घेणार आहोत.
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad