Tuesday, November 13, 2012

दीपावलीचा आरोग्य मेन्यू

दीपावलीचा आरोग्य मेन्यू
डॉ. श्री बालाजी तांबे
दीपावलीचा सण व्यवस्थित साजरा व्हावा व कुठलीही भीती न बाळगता जेवणखाण व्यवस्थित व्हावे यासाठी वस्तू खरेदी करत असताना त्यात भेसळ नाही, याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. वस्तूत जास्त कस असला तर त्यासाठी चार पैसे अधिक लागतात, हेही लक्षात ठेवावे. पाककौशल्य दाखविण्याची संधी उत्सवांमुळे मिळते असे समजले तर दीपावलीच्या सणाचा आनंद सर्वांनाच घेता येईल. या दीपावलीच्या शुभमुहूर्तावर भेसळीचा व भ्रष्टाचाराचा नरकासुर मरावा व पुन्हा प्राचीन भारतीय परंपरेतील दूध-तूप वगैरे अमृतमय अन्न सेवन करून अग्नितेजाची व कर्मप्रतिष्ठेची श्रद्धा वाढावी व दीपावली व येणारे नूतन वर्ष आरोग्य, मैत्री, समृद्धी, धनसंपदा व उत्कर्ष यांनी परिपूर्ण जावो, हीच प्रार्थना. 

"या वर्षीच्या दीपावलीच्या दिवसात आम्ही पुण्याला आत्याकडे जाणार आहोत, कारण आत्याच्या हातचे चिरोटे व कडबोळी जगात दुसऱ्या कुणालाही जमण्यासारखी नाही. आत्याचं आग्रहाचं आमंत्रण आलं आहे व रिझर्वेशनही झालेलं आहे. आत्याचा छान मोठा वाडा आहे. दिवाळीची मजा येईल,'' असे संवाद ऐकण्याचे दिवस मागे पडलेले दिसतात.

हास्य-थट्टा-मस्करी, संगीत याचबरोबर मसाज, अभ्यंग स्नान, लक्ष्मीपूजन वगैरे करून सगळ्यांबरोबर दिवाळी साजरी केली तर पुढे वर्षभर शक्‍ती पुरते. दीपावलीचा फराळ म्हणजे साध्या बटाटेपोह्यांबरोबर एखादी चकली, एवढा कधीच नसतो. फराळाच्या वेगवेगळ्या पदार्थांनी मोठे ताट भरलेले असते. इडली, डोसा, पोहे अशा एखाद्या गरम गरम पदार्थाबरोबर मध्ये ठेवलेल्या फराळाची ताटामधील चकली, कडबोळी, लोणी, लाडू असे आपल्याला हवे ते घेऊन खाणे ही फराळाची गंमत. पूर्वी अशा प्रकारे भरपूर खाऊन दिवाळी साजरी होत असे, तसेच भाऊबीजेला बहिणीकडे जेवायला गेले तर तिच्या सासरच्या घरात केल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी काही विशेष पदार्थ चाखले जात असत. ""सकाळी अंगाला तेल लावून घ्यायचे आहे, तेव्हा आदल्या दिवशीच ये. नंतर फराळ वगैरे झाला की दुपारी जेवून ओवाळणी करून जा,'' असे बहिणीकडून भाऊरायाला आग्रहाचे आमंत्रण असे.

हे सर्व दिवस आता मागे पडलेले दिसतात. सध्या तर लोकांनी खाण्याची धास्ती घेतलेली दिसते. ""दिवाळी येते आहे, फराळ वगैरे सांभाळून करा. खूप मेहनत करून उतरवलेले दोन किलो वजन पुन्हा दिवाळीत वाढणार नाही याकडे लक्ष ठेव,'' असे सल्ले हल्ली ऐकू येतात. दिवाळीच्या फराळाची अडचण अशी, की त्यातील सर्व पदार्थ एक तर गोड असतात किंवा तळलेले असतात. हे सर्व पदार्थ आरोग्याला कसे काय झेपणार, अशी शंका अनेकांना असते. हलके हलके गेल्या 50 वर्षांत मनुष्याची पचनशक्‍ती कमी झाल्याचे दिसते. दिवाळीच्या फराळाचे ताट समोर भरून ठेवले की "तोंडं पहा दिवाळीचा फराळ खाणाऱ्यांची' असेच म्हणायची वेळ येऊ लागली.

खा आणि पचवा 
गेली काही वर्षे दिवाळीच्या सुमारास भेसळीचा राक्षस व व्हायरस सगळीकडे पसरलेला दिसतो. डाळ, गूळ, तिखट, तेल, दूध वगैरे पदार्थांमध्ये भेसळ येऊ लागली तर मावा, तूप, दूध वगैरे पदार्थ तर बनावटी स्वरूपात मिळू लागले आणि दिवाळीची पणती तेवण्याऐवजी मंद होत गेली. असे म्हणतात, की उपसा झाला नाही तर विहीर आटते. तसेच पचनशक्‍ती खाण्या-पिण्याच्या सवयीवर टिकून राहते. तेव्हा प्रत्येकाने प्रकृतिपरीक्षण करवून घेऊन मानवणारे पदार्थ योग्य मात्रेत अवश्‍य खावेत. पचन झाले तरच शक्‍ती मिळते. नुसत्या प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅलरी यांचा विचार करून केलेल्या आहारामुळे हलके हलके शक्‍ती कमी होते. चेहरा निस्तेज होऊ लागतो. नटनट्या किंवा सांपत्तिक सुविधा असणाऱ्यांचे एक बरे असते, की त्यांना हव्या त्या वेळी मेक-अपमुळे चेहऱ्यावर तेज आणता येते व चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या डॉक्‍टरांकडे जाऊन काढून टाकता येतात. सर्वसामान्यांनी काय करावे? शरीराचा कायाकल्प करण्यासाठी पंचकर्मासारखा विधी करता येतो, पण ताकदीसाठी त्याने काय करावे? खाण्याने कोलेस्टेरॉल वाढते, आर्टरीज भरतात, वजन वाढते, रक्‍तदाब , मधुमेह असे रोग होण्याची शक्‍यता वाढते, असे एकदा डोक्‍यात बसले की मग समोर आलेला कुठलाही पदार्थ आपला शत्रू आहे, तो खाल्ल्याने आपले नुकसान होणार आहे, असेच मनात येते. त्यामुळे तो पदार्थ खाल्ला जात नाही किंवा खाल्ला तरी पचत नाही. मुख्य म्हणजे दूध, तूप व साखर खाल्ली जात नाही.

खरे पाहता भारतीय संस्कृतीत सणावारांची योजना आयुर्वेदाच्या सल्ल्यानुसारच केलेली आहे. कधी काय खावे, कोणी किती खावे, ऋतूनुसार कोठल्या देवतेचे पूजन करावे, कुठल्या देवतेला कुठला नैवेद्य दाखवावा, या सर्व बाबींचा विचार करून सणांचे मेन्यू कार्ड ठरविलेले असते.

दीपावलीच्या फराळातील जिन्नस योग्य प्रकारे केले व योग्य प्रमाणात व योग्य वेळी सेवन केले तर अत्यंत आरोग्यदायी असतात. आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेल्या गोष्टी सेवन केल्या, मग तो साधा वरण-भात असो, तर आरोग्याला खूप मोठा आधार मिळतो.

अन्नयोग साधावा 
आयुर्वेदानुसार अन्नयोग हे मोठे शास्त्र आहे. पदार्थ तयार करताना त्यासाठी वापरलेल्या वस्तूंची शुद्धता, त्यात असलेले वीर्य, पदार्थ बनविताना वापरलेली कृती, संस्कार याबरोबरच पदार्थ बनविताना प्रेमाने दिलेल्या वेळेलाही महत्त्व असते.

नुसते अन्नाच्या बाबतीत नव्हे, तर आयुर्वेदिक औषधांच्या बाबतीतही हाच अनुभव येतो. औषधाचा पाठ अवघड असला व त्यासाठी लागणाऱ्या काही वनस्पती खूप महाग व दुर्मिळ असल्या तर सहज उपलब्ध असलेल्या कुठल्यातरी चार वनस्पती गोळा करून पूर्ण संस्कार न करता, पूर्ण वेळ न देता (शॉर्टकटने) उत्पादने बनवल्यास किंवा नुसत्या चूर्णांच्या वा अर्कांच्या गोळ्या पाडल्यास त्यांना आयुर्वेदिक उत्पादने म्हणता येणार नाही. आयुर्वेदिक औषधे ऋषिमुनींनी घालून दिलेल्या पाठानुसारच बनविलेली असणे आवश्‍यक असते. आयुर्वेदात भौतिक, रासायनिक संकल्पनांबरोबरच संस्कारकाल व वातावरणातील शक्‍तीचा परिणाम महत्त्वाचा समजला जातो. म्हणून साधा भातासारखा पदार्थ करताना काळजी घ्यावी लागते. भात करण्यासाठी तांदूळ आधी भाजून घ्यावे, त्यात किती पट पाणी टाकावे, अशा सूचनांबरोबरच कुठल्या प्रकारचा तांदूळ कुणी खावा, याही गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्या असतात. म्हणूनच व्यवस्थित केलेला पायस दशरथाच्या राण्यांना मिळाल्यावर श्रीरामप्रभूंसारखे अवतारी शूर पुत्र जन्माला येऊ शकले.

दीपावलीचा सण व्यवस्थित साजरा व्हावा व कुठलीही भीती न बाळगता जेवणखाण व्यवस्थित व्हावे यासाठी वस्तू खरेदी करत असताना त्यात भेसळ नाही याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. वस्तूत जास्त कस असला तर त्यासाठी चार पैसे अधिक लागतात, हेही लक्षात ठेवावे. पाककौशल्य दाखविण्याची संधी उत्सवांमुळे मिळते असे समजले तर दीपावलीच्या सणाचा आनंद सर्वांनाच घेता येईल. या दीपावलीच्या शुभमुहूर्तावर भेसळीचा व भ्रष्टाचाराचा नरकासुर मरावा व पुन्हा प्राचीन भारतीय परंपरेतील दूध-तूप वगैरे अमृतमय अन्न सेवन करून अग्नितेजाची व कर्मप्रतिष्ठेची श्रद्धा वाढावी व दीपावली व येणारे नूतन वर्ष आरोग्य, मैत्री, समृद्धी, धनसंपदा व उत्कर्ष यांनी परिपूर्ण जावो, हीच प्रार्थना.

www.balajitambe.com

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad