Tuesday, November 13, 2012

दिवाळीतील फराळ


दिवाळीतील फराळ
डॉ. श्री बालाजी तांबे
पावसाळ्यानंतर हळूहळू प्रदीप्त होऊ लागलेल्या अग्नीला यथायोग्य इंधन मिळावे या दृष्टीने दिवाळीत फराळ करण्याची पद्धत आहे. पचनशक्‍ती उत्तम असलेल्या कालावधीत आयुर्वेदिक रसायनसेवनाचा सर्वोत्कृष्ट उपयोग होत असल्याने दिवाळीत रसायन खाण्याचा शुभारंभ करणेही श्रेयस्कर होय.

भारतीय संस्कृतीमध्ये वर्षभर अनेक प्रकारचे उत्सव येतात, पण सर्वांत मोठा उत्सव- ज्याची लहान-मोठे सर्व जण अगदी आतुरतेने वाट पाहतात, तो म्हणजे दीपावली. पणत्या, आकाशकंदील, नवे कपडे, रांगोळी, किल्ला, फटाके, पाहुण्यांच्या स्वागताची तयारी, आप्तजनांना द्यायच्या भेटी, अशा अनेक प्रकारे दीपावली साजरी केली जाते आणि त्यातही अग्रेसर असतात फराळाचे पदार्थ. हे फराळाचे पदार्थ रुचकर तर असतातच, पण आरोग्याच्या दृष्टीनेही उपयुक्‍त असतात.

ऋतूंचा विचार केला असता पावसाळ्यानंतर दीपावली येते. पावसाळ्यात कमी प्रमाणात मिळणारा सूर्यप्रकाश पुन्हा क्रमाक्रमाने वाढायला वागतो. याचे प्रतिबिंब शरीरातही उठते आणि शरीरातील अग्नीही क्रमाक्रमाने प्रदीप्त होऊ लागतो. याचा आरोग्यप्राप्तीसाठी उपयोग होण्याच्या दृष्टीनेच दिवाळीत विशेष फराळ घेण्याची पद्धत असते.

स यदा नेन्धनं युक्‍तं लभते देहजं तदा । 
रसं हिनस्त्यतो वायुः शीतः शीते प्रकुप्यति ।। 
तस्मात्‌ तुषारमसमये स्निग्धाम्ललवणात्‌ रसान्‌ ।। ...चरक सूत्रस्थान 

प्रदीप्त झालेल्या अग्नीला यथायोग्य इंधन म्हणजे अन्न मिळाले नाही तर तो अग्नी रसधातूला जाळून टाकतो व त्यातूनच वायूचा प्रकोप होतो. असे होऊ नये म्हणून या ऋतूत स्निग्ध, आंबट, खारट पदार्थ खावेत. प्रदीप्त जाठराग्नीमुळे सुधारलेल्या पचनशक्‍तीचा फायदा घेऊन या ऋतूत शरीरपोषक, धातुपोषक पदार्थ करण्याची प्रथा आहे. यात चकली, शेवेसारखे तळलेले, खारट, तिखट पदार्थही असतात. तसेच अनारसा, करंजी, लाडूसारखे शुक्रपोषक रसायन पदार्थही असतात.

रसायन सेवनही करा 
यालाच जोड म्हणून या दिवसांत आयुर्वेदिक रसायनांचे सेवन केले तर ते आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम असते. तसे पाहता रसायन पूर्ण वर्षभर खाणे उत्तमच असते; पण पचनशक्‍ती उत्तम असलेल्या कालावधीत रसायन सेवनाचा सर्वोत्कृष्ट उपयोग होत असल्याने दिवाळीत रसायन खाण्याचा शुभारंभ करणे श्रेयस्कर होय. च्यवनप्राश, धात्री रसायन, "सॅन रोझ', "मॅरोसॅन' "संतुलन चैतन्य कल्प', शतावरी कल्प वगैरेसारखी रसायने दिवाळीत व दिवाळीनंतरही अवश्‍य सेवन करावीत अशी होत.

चकली, कडबोळी, लाडू, अनारसा, करंजी वगैरे पदार्थांचा आयुर्वेदाच्या ग्रंथातही उल्लेख सापडतो. हे पदार्थ तयार करण्याची खरी पद्धत, त्या काळी वापरले जाणारे घटक पदार्थ, त्यांचे गुणधर्म अशी सर्व माहिती यात दिलेली आहे. दिवाळीच्या निमित्ताने आपणही यांची आयुर्वेदिक माहिती घेऊ या.

चकली (वेष्टनी) 
माषाणां धूमसी हिुलवणार्द्रकसंयुता । 
जलेन निबिडं मर्द्य कार्याः पृथुलवर्तयः ।। 
कृत्वा तासां वर्तुलानि जले संस्वेदयेत्‌ ततः । 
गृह्णीयात्‌ वेष्टनी नाम्ना शुक्रला बलकारिणी ।।...निघण्टु रत्नाकर 

उडदाचे पीठ, हिंग, मीठ, बारीक केलेले आले हे सर्व पदार्थ पाण्यात एकत्र घट्ट मळून नंतर त्याच्या वाती करून वर्तुळे करावीत आणि वाफेवर शिजवावीत.
चकलीचे गुणधर्म - शुक्रकर, बलकर, पचायला जड, कफवर्धक, पाककाली मधुर असतात, पित्त वाढवितात, प्रवास करणाऱ्यांसाठी हितकर व वातशामक.

अनारसे (शालिपूप) 
प्रक्षाल्य तण्डुलान्‌ द्विस्त्रिः शोषयित्वा च पेषयेत्‌ । 
तत्पिष्टं च घृतेनाशु किंचित्‌ चाल्यगुडोदकैः ।। 
मर्दयित्वा च वटकान्‌ कृत्वा ते पोस्तबीजकैः । 
एकतो घोलयित्वा च तान्घृतेन पचेत्ततः ।। 

दोन ते तीन वेळा तांदूळ चांगले धुऊन वाळवावेत. त्यांचे पीठ करून त्यात थोडेसे तूप, गूळ व पाणी घालून मळावे व त्याचे वडे करून एका बाजूने खसखस लावून तुपात तळावे.

शालिपूपास्तु ते सिद्धाः शीता वृष्या रुचिप्रदाः । 
स्निग्धातिसारशमना नाम्ना।ऩारससंज्ञिता ।। ...निघण्टु रत्नाकर 

अनारसे धातुवर्धन करतात, रुची वाढवितात, गुणांनी स्निग्ध असतात, वीर्याने थंड असतात व अतिसारामध्ये हितकर असतात.

कडबोळी (कचकल्ली) 
पाचिता च घृते सैव कचवल्लीति विश्रुता । 
गुरुर्वृष्या पुष्टिकरी बलदा तृप्तिकारिका ।। 
पित्ततेजःकफानां च कारिणी वातनाशिनी ।। 
...निघण्टु रत्नाकर 

हीच तुपामध्ये तळली असता त्याला कचकल्ली (कडबोळी) असे म्हणतात.

कडबोळी पचायला जड, ताकद वाढविणारी, वजन वाढविणारी, तृप्ती देणारी, शुक्रवर्धक अशी असते. अग्नी वाढवते, पित्त-कफदोष वाढविणारी व वातशामक असते.

करंजी (संयाव) 
गोधूमानां सूक्ष्मपिष्टं घृतभृष्टं सितायुतम्‌ । 
चूर्णे तस्मिन्‌ क्षिपेदेलां लवं मरिचानि च ।। 
नारिकेलं सकर्पूरं चारीबीजानि मिश्रयेत्‌ । 
दुग्धेन धूमसीं मर्द्य तस्याः पर्पटिकासु च ।। 
तत्पुरणं तु निक्षिप्य कुर्यान्मुद्राः दृढां सुधीः । 
सर्पीषि प्रचुरे तां तु पचेत्‌ निपुणयुक्‍तितः ।। 
पश्‍चाच्च शर्करापाके निक्षिप्य च समुद्धरेत्‌ ।। 
...निघण्टु रत्नाकर 

गव्हाचा रवा तुपात भाजून त्यात साखर, वेलची, लवंग, मिरी, नारळ, चारोळ्या, थोडा कापूर मिसळून सारण तयार करावे.

दुसरा गव्हाचा बारीक रवा दुधात भिजवावा व चांगला मळावा. त्याच्या छोट्या पापड्या लाटाव्या. आत रव्याचे सारण भरावे. अर्ध्यात वाकवून दोन्ही कडांना मुरड घालावी. तुपात तळून साखरेच्या पाकात बुडवून काढाव्यात. याला संयाव वा करंजी म्हणतात.

धातुवृद्धिकरो वृष्यो हृद्यश्‍च मधुरो गुरुः । 
सारको भग्नसन्धानकारकः पित्तवातहृत्‌ ।। ...निघण्टु रत्नाकर 

हे संयाव (करंज्या) धातुवर्धक, शुक्रधातुवर्धक, हृदयाला हितकर असतात, चवीला गोड, पचायला जड, मलप्रवृत्ती साफ करणारे व मोडलेले हाड सांधण्यास मदत करतात, पित्त व वातदोष कमी करतात.

चिरोटे 
गोधूमधूमसी चाल्य घृतेनाक्‍ता जलेन च । 
यित्वा तु तस्याश्‍च ग्राह्यं पूगप्रमाणकम्‌ ।। 
गोलकं वैल्लयित्वा तु तस्य कुर्याच्च पोलिकाम्‌ । 
द्वितीया च तृतीया च कृत्वा स्थाप्यास्तथोपरि ।। 
एकां गृहीत्वा तस्यां तु घृतं दत्वा द्वितीयकाम्‌ । 
तस्याश्‍चोपरि संस्थाय एवं स्थाप्या तृतीयका ।। 
द्वयंगुलान्‌ खण्डकान्‌ कृत्वा वेल्लयित्वा घृतेपचेत्‌ । 
ते घृते पाचिता नाम्ना चिरोटे इति विश्रुताः ।। 
ते तु शर्करया चाद्या ।...निघण्टु रत्नाकर 

गव्हाचा रव्याला थोडेसे तूप चोळावे, नंतर पाणी घालून मळून कुटून कुटून मऊ करावा. त्याची सुपारीएवढी गोळी करून कागदासारखी पातळ पोळी लाटावी. अशा तीन पोळ्या कराव्या.

एका पोळीवर तूप लावून वरून दुसरी पोळी ठेवावी, त्यावर तूप लावून तिसरी पोळी ठेवावी. हे सर्व तीन पदरी वा चार पदरी दुमडून पट्टी तयार करावी. या पट्टीचे पुन्हा तुकडे पाडावेत. ते पुन्हा पातळ लाटून पुन्हा दुमडावेत व चौकोनी आकाराचे करून तुपात तळून साखरेबरोबर खावेत.

वृष्या बल्यास्तु शुक्रला । 
गुरवः पित्तवातघ्ना श्‍चोक्‍ता पाकविशारदैः ।। ...निघण्टु रत्नाकर 

चिरोटे शुक्रधातूस वाढवितात, ताकद वाढवितात, पचायला जड असतात व पित्त-वाताला शमवतात. 

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

1 comment:

  1. सुंदर माहिती
    ठेवणीत ठेवावा असा हा लेख आहे.

    ReplyDelete

ad