Sunday, January 1, 2012

शूल

डॉ. श्री बालाजी तांबे
वेदनेचे म्हणजे शूलाचे विविध प्रकार कोणते असतात याची माहिती आपण घेतो आहोत. वातदोष व पित्तदोष यांच्यामुळे होणाऱ्या वेदनांचे स्वरूप कसे असते हे आपण पाहिले; आज आपण कफदोष, आमदोष वगैरेंमुळे होणाऱ्या वेदना कशा असतात याची माहिती घेणार आहोत.
कोणतेही असंतुलन वेदनांना, दुःखाला निमंत्रण ठरते. कफदोष, आमदोष यामुळे वेदना म्हणजे शूल कसा होतो, हे येथे आपण पाहणार आहोत.

वेदनेचे म्हणजे शूलाचे विविध प्रकार कोणते असतात याची माहिती आपण घेतो आहोत. वातदोष व पित्तदोष यांच्यामुळे होणाऱ्या वेदनांचे स्वरूप कसे असते हे आपण पाहिले; आज आपण कफदोष, आमदोष वगैरेंमुळे होणाऱ्या वेदना कशा असतात याची माहिती घेणार आहोत.

कफज शूल
हृल्लास-कास-सदनारुचिसंप्रसेकैःआमाशये स्तिमितकोष्ठ शिरोगुरुत्वैः ।
भुक्‍ते सदैव हि रुजं कुरुतेऽतिमात्रं सूर्योदयेऽथ शिशिरे कुसुमागमे च ।।
 • वेदनेच्या बरोबरीने जडपणा जाणवतो, विशेषतः डोक्‍यात व धडात जडपणा जाणवतो.
 • पोट जड होते.
 • मळमळते.
 • खोकला येतो.
 • अंग गळून गेल्यासारखे होते.
 • तोंडाला चव नसते, पाणी सुटते.
 • कफदोषाशी संबंधित वेदना जेवणानंतर लगेच होतात, सूर्योदयाच्या वेळी वाढतात, थंडीत व वसंतात अधिक जाणवतात.
 • कफज शूलाची कारणे
 • मांसाहार, विशेषतः पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांचे मांस सेवन करणे.
 • खवा, पनीर, रबडी वगैरे दुधापासून बनविलेल्या पदार्थांचे अतिसेवन करणे.
 • ऊस, तीळ, पिष्टमय पदार्थ वगैरे कफवर्धक पदार्थांचे अतिसेवन करणे.
 • दिवसा झोपणे.

आमशूल
शरीरात आम साठल्याने ज्या वेदना होतात त्याला आमशूल म्हणतात.
आमशूलाची लक्षणे पुढीलप्रमाणे असतात,
 • पोट फुगते, ताणले जाते.
 • पोटातून गुडगुड आवाज येतो.
 • उम्हासे येतात, उलटी होते.
 • अंग जड होते, जखडल्यासारखे वाटते.
 • पोटात वायू धरतो.
 • लाळ अधिक प्रमाणात सुटते.

त्रिदोषज शूल
तिन्ही दोषांच्या असंतुलनामुळे जो शूल होतो, तो अतिशय कष्टप्रद असतो. विषसंसर्गामुळे किंवा वज्रप्रहारामुळे जशा वेदना व्हाव्यात, त्या प्रकारच्या तीव्र वेदना यात असतात. हा शूल सहसा असाध्य समजला जातो.

 • जो शूल ओटीपोटात, छातीत, बरगड्यांमध्ये व पाठीत असतो तो सहसा कफवातज असतो.
 • जो शूल कूस, छाती, हृदय व नाभीच्या आसपास असतो तो सहसा कफ-पित्तज असतो.
 • जो शूल संपूर्ण शरीरात असतो आणि वेदनेबरोबर दाह किंवा ताप उत्पन्न करतो, तो सहसा पित्तज प्रकारचा असतो.
परिणामशूल
परिणामशूल असा शूलाचा अजून एक प्रकार सांगितले आहे. आहाराचे पचन होत असताना होणाऱ्या शूलाला परिणामशूल म्हटले जाते. ह्याचीही वात-पित्त-कफानुसार वेगवेगळी लक्षणे असतात.

वातज परिणामशूल - यात पोटात वायू धरणे, मल-मूत्राचा अवरोध होणे, बेचैनी प्रतीत होणे, कंप होणे ही लक्षणे असतात. ह्या प्रकारचा शूल सहसा स्निग्ध व उष्ण द्रव्यांच्या प्रयोगाने शांत होतो.

पित्तज परिणामशूल - असह्य तहान लागणे, दाह होणे, घाम सुटणे, तिखट-आंबट-खारट चवीच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे वेदना वाढणे अशी लक्षणे असतात. या प्रकारचा शूल थंड पदार्थांच्या सेवनाने कमी होतो.

कफज परिणामशूल - मळमळणे, उलटी होणे, चक्कर येणे, वेदना फार तीव्र नसल्या तरी दीर्घकाळ टिकणे अशी लक्षणे कफज परिणामशूलात दिसतात. हा शूल कडू, तिखट व गरम पदार्थांनी शांत होतो. ---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad