Friday, January 6, 2012

सर्व उबेचा प्रणेता - सूर्य

डॉ. श्री बालाजी तांबे
सूर्य केवळ प्रकाश देत नाही, तर ऊबही देतो. म्हणून जीवन जगण्यासाठी शक्‍ती व प्रेरणा मिळते. तसे पाहताना व्यायामाची ऊब मिळते, तीसुद्धा नाभीच्या ठिकाणी असलेल्या मणिपूर चक्रातील सूर्याच्या उत्तेजनेमुळेच. आहारातून मिळणारी ऊब हीसुद्धा जाठराग्नीमुळे मिळते. तसे पाहता आहार सूर्यामुळे मिळतो, तेव्हा सूर्य हाच सर्व उबेचा प्रणेता आहे असे म्हटले तर त्यात काही वावगे ठरणार नाही. सर्व आरोग्याचा, दीर्घायुष्याचा व शतायुष्याचा कारक सूर्यच आहे. अग्नी सूर्याचा प्रतिनिधी आहे, असे समजूनच जगात ठिकठिकाणी अग्निपूजा होत असते.

"संध्याकाळचा बाहेर जातो आहेस. रात्री परत येताना थंड वारा डोक्‍याला व कानाला लागेल, तेव्हा मफलर व स्वेटर घेऊन जा,' अशा तऱ्हेचा सल्ला ऐकू येऊ लागला की थंडीचे दिवस आले आहेत असे कळते. ऋतू थंडीचा असला, तरी दिवसा थंडीचे फार कौतुक होत नाही. कारण आकाशातील सूर्य फारसा प्रखर नसला तरी तो सगळ्यांना तापवत ठेवतो, म्हणजेच ऊब देतो. हिल स्टेशनला, डोंगरावर वगैरे गेले तर तेथे एकूणच वारे जास्त असल्यामुळे सूर्य असला तरी दिवसाही थंड वाटते. तेथे झाडी वगैरे वाढलेली असली तर त्यामुळेही वातावरण थंड राहते.

आपल्याला असे वाटते, की सूर्य फक्‍त प्रकाश देतो, त्याच्यामुळे आपल्याला दिवसा दिवे वापरावे लागत नाहीत व खर्च वाचतो. परंतु सूर्य केवळ प्रकाश देत नाही, तर ऊबही देतो. म्हणून जीवन जगण्यासाठी शक्‍ती व प्रेरणा मिळते. तसे पाहताना व्यायामाची ऊब मिळते तीसुद्धा नाभीच्या ठिकाणी असलेल्या मणिपूर चक्रातील सूर्याच्या उत्तेजनेमुळेच. आहारातून मिळणारी ऊब हीसुद्धा जाठराग्नीमुळे मिळते. तसे पाहता आहार सूर्यामुळे मिळतो, तेव्हा सूर्य हाच सर्व उबेचा प्रणेता आहे, असे म्हटले तर त्यात काही वावगे ठरणार नाही.

सकाळी सूर्योदयापूर्वी उठून व्यायाम, स्नान वगैरे आटोपून उगवत्या सूर्याची ऊब शरीराला मिळवून दिली की आरोग्य उत्तम राहते, असा सर्वांचा अनुभव असतो. अग्नी सूर्याचा प्रतिनिधी आहे असे समजूनच जगात ठिकठिकाणी अग्निपूजा होत असते. सूर्याचे आभार मानावे तेवढे थोडेच असते.
सूर्य उगवला आहे वा मावळला आहे किंवा आता दिवस आहे वा रात्र आहे, हे दृष्टिहीन माणसालाही वातावरणातील तापमानात होणाऱ्या बदलामुळे कळू शकते.

सूर्याच्या उबेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी योजना करता येते सूर्यनमस्कारांची. या सूर्यनमस्कारांमुळे नाभीच्या ठिकाणी असलेल्या मणिपूर चक्रातील सूर्याला जागृत करणे म्हणजेच त्याचा प्रकाश आतून सगळीकडे खेळवणे, हे काम शक्‍य होते. सूर्य जसा सर्वांना प्रकाश देतो तसे जगात प्रत्येक व्यक्‍तीने चमकावे, सूर्याप्रमाणे आपणही जगाला काही द्यावे, अशी प्रेरणा घ्यावी. सूर्योपासनेने वाढलेल्या श्रद्धेचाही खूप मोठा फायदा होतो. हे सर्व लक्षात घेतले तर सूर्यापासून ऊब मिळविण्याचे फायदे पटू शकतील. काही ऋतूंमध्ये दिवसभरात सूर्य अगदी कमी वेळ आकाशात असतो. अशा काळात व थंड प्रदेशात येणारी अडचण लक्षात घेतली तर सूर्य व सूर्यापासून मिळणारी ऊब या गोष्टींचे महत्त्व आपल्याला पटेल व सूर्यावरची श्रद्धा वाढू शकेल.

सर्वांत महत्त्वाची सूर्योपासना म्हणजे सूर्योदयाच्या वेळी कमीत कमी बारा सूर्यनमस्कार घालणे. "क्रियायोगा'च्या पुस्तकात या क्रियेला इंग्रजीत cosmic prayer (कॉस्मिक प्रेअर) असे नाव दिलेले आहे. त्यावरूनही ही वैश्‍विक कल्याणाची क्रिया आहे हे लक्षात येईल. सूर्यनमस्कारात अनेक प्रकारच्या शारीरिक अवस्था अभिप्रेत असतात. मुख्य म्हणजे डोके उचलून पाठीला ताण दिल्यानंतर सूर्यचक्राचा विकास होण्यासाठी खास मदत मिळते आणि शरीरातील अग्नी म्हणजे सर्व हॉर्मोनल संस्था संतुलित राहून आरोग्याला मदत मिळते व शरीरात ऊब राहते. सर्व आरोग्याचा, दीर्घायुष्याचा व शतायुष्याचा कारक सूर्यच आहे, हे आपल्या सर्वांना अनुभवाने माहीत असते. शरीरातील हाडे मजबूत होण्यासाठी, म्हणजेच दीर्घायुष्यासाठी व भरपूर ताकद मिळविण्यासाठी सूर्यप्रकाश महत्त्वाचा असतो.

वनस्पतींना सूर्याचे प्रेम अधिक असते. कारण त्यांनासुद्धा उबेचीच आवश्‍यकता असते. प्रयोगात असे दिसून आलेले आहे, की शेतातील रोपांना संगीत ऐकवले असता किंवा त्यांची प्रेमाने देखभाल केली असता कणसे अधिक भरतात, तसेच अधिक चांगल्या प्रतीचे धान्य तयार होते. पण तरीही वनस्पतींना सूर्यप्रकाशाची गरज असतेच. बाटलीत झाड लावून ती बाटली घरात ठेवली तर झाड खिडकीच्या दिशेने वाढते, हा प्रयोग शाळेत असताना सर्व मुलांनी केलेला असतो. म्हणजे वनस्पतींनाही ओढ असते सूर्यप्रकाशाची व सूर्याच्या उबेची.

एकूण, सूर्य सर्व प्राणिमात्रांना ऊब देतो, माया देतो; पण ती पित्याच्या प्रेमाची ऊब असते. तेव्हा एका विशिष्ट वेळी वडील रागावलेले असताना मुलाला वडिलांकडून लाडाची अपेक्षा करता येत नाही, तसे दुपारी सूर्याचा प्रकाश वाढल्यानंतर किंवा काही विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट ऋतूत सूर्याची ऊब घेता येत नाही. परंतु थंडीत सूर्याची ऊब सर्वांना आवश्‍यक असते. सूर्याच्या उबेचे महत्त्व सर्वांना पटण्यासारखे आहे.

www.balajitambe.com

No comments:

Post a Comment

ad