Thursday, December 29, 2011

ऊब आहाराची : १


डॉ. श्री बालाजी तांबे
शरीराला ऊब हवी हे खरे; पण शरीरात अतिउष्णता असली तर शरीराचे क्षरण लवकर होईल व म्हातारपणाकडे वाटचाल होईल. उष्णतेपेक्षा ऊब अधिक महत्त्वाची समजली जाते. जीवनासाठी उष्णता व ऊब यांची आवश्‍यकता असते. शरीराची ऊब टिकावी व कार्यासाठी उत्साह राहावा म्हणून आहारावर खूप लक्ष ठेवावे लागते. प्रत्येकाने स्वतःची प्रकृती ओळखून ऋतुमानाप्रमाणे आहार करावा हे जितके खरे, तितकेच थंडीत आहाराची ऊब मिळणेही महत्त्वाचे असते. 

पोटात अन्नाचा कण नसला की नुसती थंडीच वाजते असे नाही, तर हात-पाय लटलटायलाही लागतात, उभे राहताना ग्लानी येऊ शकते आणि काहीही करू नये असे वाटले तर नवल नसते. थंडीच्या दिवसांत उबदार पांघरूण घेऊन झोपणे आणि सकाळी जाग आली तरी "आज व्यायाम झाला नाही तरी चालेल', "आज फार थंडी आहे तेव्हा ऑफिसला दांडी मारू', अशा तऱ्हेचे विचार मनात येऊ लागतात. कारण पांघरुणाची ऊब त्यातून बाहेर आल्यावर मिळू शकत नाही. शेवटी शरीराची ऊब असो वा प्रेम असो, ते आतूनच यावे लागते; त्याचे सोंग घेता येत नाही किंवा त्याचा कल्पनेने अनुभव घेता येत नाही, ते प्रकट व्हावे लागते व त्यासाठी लागते शक्‍ती.

जानेवारी महिन्यात करण्यात येणारी गुळाची पोळी सर्वांच्या परिचयाची असते. त्याचबरोबर थंडीच्या ऋतूत गूळपापडी, तिळपापडी, दाणेपापडी, रेवडी, गजक या गोष्टींची चलती असते. थोडेसे पुढे गेले तर डिंकाचे लाडू, अहळिवाचे लाडू, सुक्‍या मेव्याच्या लाडू, तसेच मिरचीचा ठेचा, लसणाची चटणी याही गोष्टी खाण्यात अधिक प्रमाणात येतात.

मनुष्याचे पूर्ण जीवन आहारावर अवलंबून असते. सर्व शक्‍ती आहारातूनच मिळवावी लागते. आहारातून शक्‍ती काढून घेत असताना किंवा त्या शक्‍तीचा इंद्रियचलनासाठी वा कुठलेही कार्य करण्यासाठी वापर होताना शरीरात उष्णता उत्पन्न होते. पण तरीही मुळातच आहार जर उष्णवीर्य असला, तर तो सहज पचू शकतो; त्यातून ऊबही मिळू शकते. तिळाच्या रेवड्या किंवा गुळाची पोळी उन्हाळ्यात खाल्ली असता हातापायाची, डोळ्यांची जळजळ होणे किंवा मूळव्याधीसारखा त्रास होण्याची शक्‍यता असते.

आहारातील गोष्टींचा विचार केला, तर तांदूळ थंड असतो व गहू उष्ण असतो. तिखट, खारट व आंबट वस्तू साधारणतः उष्ण असतात; गोड वस्तू साधारणतः शीत असतात.

अपवाद म्हणता येणार नाही, पण आंबट-गोड चवीचा गूळ उष्णवीर्याचा असतो; साखर मात्र वीर्याने थंड असते म्हणून तिचे नामकरण आयुर्वेदाने शीता-सीता असे केलेले दिसते.

सेवन केलेल्या आहाराचे अपचन झाले की शरीरात मेदोत्पत्ती होते. हा मेद स्पर्शाला थंड असतो, त्यामुळे तो शरीरात अति प्रमाणात वाढला की शरीराला अधिक उबेची गरज भासू लागते. रक्‍ताभिसरणासाठी उष्णता लागते आणि रक्‍ताभिसरण झाले की उष्णता वाढते. हृदयाच्या धडधडीमुळे शरीराची उष्णता वाढते व थंडीमुळे हृदयाला काम करणे अवघड होते. बाहेरून थकून भागून आलेल्या व्यक्‍तीला "या-बसा' अशा प्रेमाच्या स्वागताने मिळालेली ऊब पुरशी नसल्याने, त्याला गूळ-दाणे देण्याची पद्धत दिसते.

शरीर थंड पडले की प्राण गेला असे लक्षात येते. तसा संशय आल्यास कपाळावर हात लावून धुगधुगी आहे की नाही, म्हणजे उष्णता प्राण आहे की नाही याचा अंदाज घेतला जातो. जिवंत मनुष्य व उष्णता यांचा संबंध नक्कीच असतो. हाता-पायाची घडी घालून एखादा मनुष्य शांत बसून राहिलेला असला तर "काय थंडपणे बसून राहिला आहेस, काय मेल्यासारखा बसला आहेस' असा प्रश्‍न विचारला जातो.

गती व उष्णता यांचाही संबंध आपल्याला दिसतो. उष्णतेसाठी गती आवश्‍यक असते. एकूणच जीवनासाठी उष्णता व ऊब यांची आवश्‍यकता असते. शरीराची ऊब टिकावी व कार्यासाठी उत्साह राहावा म्हणून आहारावर खूप लक्ष ठेवावे लागते. एक गोष्ट खरी, की शरीराला ऊब हवी हे खरे असले तरी शरीरात अतिउष्णता असली तर शरीराचे क्षरण लवकर होईल व म्हातारपणाकडे वाटचाल होईल.

म्हणून उष्णतेपेक्षा ऊब अधिक महत्त्वाची समजली जाते. असे काही पदार्थ आहेत, की ज्यामुळे उष्णता वाढली तर त्रास होऊ शकतो. त्यामुळे मिरची, मिरी, गूळ वगैरे अतिउष्ण वीर्याचे पदार्थ अति प्रमाणात खाऊन चालत नाही, कारण अशा पदार्थांच्या अति प्रमाणात सेवनाने उबेपेक्षा उष्णता वाढू शकते.

मनुष्याची वात, पित्त, कफ अशी तीन प्रकारची प्रकृती असते व त्यांचे असंतुलन झाले की रोगाची निर्मिती होते. तसेच आहारपदार्थांचे वर्गीकरण शीतवीर्य, उष्णवीर्य असे करता येते. मुळात गरम गरम अन्न सेवन करण्याने शरीरात सहजतेने पचते, तर शिळे, थंड पदार्थ शरीरात लवकर सात्म्य होत नाही, लवकर पचत नाहीत. तेव्हा प्रत्येकाने स्वतःची प्रकृती ओळखून ऋतुमानाप्रमाणे आहार करावा हे खरे असले, तरी थंडीत आहाराची ऊब मिळणे महत्त्वाचे असते, हे लक्षात ठेवणे इष्ट असते.
 

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad