Saturday, November 12, 2011

आवळा

डॉ. श्री बालाजी तांबे


भारतीय संस्कृतीत वृक्ष-वनस्पतींना अतिशय मानाचे स्थान दिलेले आढळते. वृक्षांचे संवर्धन, पालन-पोषण, इतकेच नाही, तर त्यांचे पूजन करण्याचीही पद्धत आपल्या संस्कृतीत आहे. तुळशीला पाणी घालणे, तुळशीची पूजा हे तर दैनंदिन कर्मातील एक कर्म समजले जाते, तसेच कार्तिक महिन्यात एकादशी ते पौर्णिमेच्या काळात आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. पूजा झाल्यावर आवळ्याचा औषधासाठी वापर करण्यास प्रारंभ करायचा असतो.

वाळवलेल्या आवळ्यांचाही औषधात वापर करता येतो. मात्र च्यवनप्राशसारखे रसायन बनवताना किंवा ज्या ठिकाणी आवळ्याचा रस वापरायला सांगितला आहे अशा ठिकाणी ताजे आवळेच वापरायचे असतात. म्हणूनच नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांमध्ये आयुर्वेदिक फार्मसीत आवळा प्रमुख घटक असणारी औषधे बनवून ठेवावी लागतात. आवळकाठी म्हणजे वाळवून ठेवलेले आवळे. मात्र झाडावरून आपोआप गळून पडलेले कोवळे, रस न धरलेले आवळे वाळवून आवळकाठी तयार केलेली असेल तर तिचा गुण येत नाही. म्हणून वर्षभर लागणारी आवळकाठीसुद्धा या चार महिन्यांत तयार करून ठेवणे चांगले असते.

आवळा हा औषधात मोठ्या प्रमाणावर वापरला जातोच, पण तो स्वयंपाकातही महत्त्वाचा असतो. "अम्लफलेषु श्रेयम्‌' म्हणजे सर्व आंबट फळांमध्ये आवळा श्रेष्ठ सांगितला असल्याने चटणी, लोणचे, सुपारी करण्यासाठी आवळ्यासारखे दुसरे उत्तम फळ नाही. मोरावळा तर सर्वांच्याच परिचयाचा असतो.

औषधात आवळ्याचे फळ, पाने आणि बिया वापरल्या जातात. आवळा पोटात घेतला जातो, तसेच शरीराला बाहेरून लावण्यासाठीसुद्धा वापरला जातो.

अम्लं समधुरं तिक्‍तं कषायं कटुकं सरम्‌ ।
चक्षुष्यं सर्वदोषघ्नं वफष्यमामलकीफलम्‌ ।।...सुश्रुत सूत्रस्थान

आवळा चवीला आंबट, गोड, कडू, तुरट व किंचित तिखट असतो, सारक असतो, डोळ्यांना हितकर असतो, तिन्ही दोषांना संतुलित करतो, शुक्रधातूचे पोषण करतो.

एकटा आवळा तिन्ही दोषांवर काम कसा करतो, हेही सुश्रुताचार्य सांगतात...
हन्ति वातं तदम्लत्वात्‌ पित्तं माधुर्यशैत्यतः ।
कफं रूक्षकषायत्वात्‌ फलेभ्यो।भ्य़धिकं च यत्‌ ।।...सुश्रुत सूत्रस्थान

आंबट असल्याने आवळा वाताचे शमन करतो; गोड व थंड असल्याने पित्ताचे शमन करतो; तुरट व रूक्ष (कोरडा) असल्याने कफाचे शमन करतो. त्रिदोषांचे संतुलन करणारा असला तरी आवळा प्रामुख्याने पित्तशमन करत असतो.

शरीराला बाहेरून लावण्यासाठी आवळ्याचे उपयोग
- आवळकाठी पाण्यात वाटून अंगाला उटण्याप्रमाणे लावून ठेवली व काही वेळाने स्नान केले तर कांती उत्तम राहते, त्वचा सुरकुतत नाही.
- आवळकाठी व पांढरे तीळ रात्रभर पाण्यात भिजत घालावे. सकाळी बारीक करून तयार झालेला कल्क डोळे बंद करून पापण्यांवर लावल्यास डोळ्यांची आग शमते, डोळे थंड राहतात.
- उष्णता वाढल्याने नाकातून रक्‍त पडते, त्यावर तुपात परतलेली आवळकाठी कांजीत वाटून टाळूवर लावल्यास फायदा होतो.
- अंगावर पित्त उठते, त्यावर आवळकाठी रात्रभर गोमूत्रात भिजत घालावी, सकाळी वाटून घ्यावी व नारळाच्या दुधात मिसळून अंगावर चोळावी. याने पित्ताच्या गांधी येणे बंद होते.
- नेत्ररोगांवर आवळ्याच्या झाडाच्या पानांचा रस बाहेरून लावण्याचा किंवा नेत्रबस्तीसाठी वापरण्याचा उपयोग होतो.
- आवळकाठी रात्रभर भिजत घातलेल्या पाण्याने डोळे धुतल्यास नेत्ररोग होण्यास प्रतिबंध होतो.
- केस गळणे, अकाली पिकणे या त्रासांवर आवळ्याच्या चूर्णाने केस धुण्याचा उपयोग होतो.
- कोरडी खरूज, कोरड्या त्वचारोगावर आवळकाठी भिजत घालून बारीक करून लावल्यास कोरडेपणा दूर होतो, त्वचा मऊ होते व खाज थांबते.
- ताप वाढल्याने डोके फार तापले असता आवळकाठी दुधासह बारीक करून लेप करण्याने डोके शांत राहते.
- "वयःस्थापनानां श्रेष्ठम्‌' म्हणजे तारुण्य टिकविण्यास मदत करणाऱ्या द्रव्यांमध्ये आवळा श्रेष्ठ समजला जातो. वाढत्या वयामुळे शरीराची झीज होणे स्वाभाविक असते. पण ही झीज कमीत कमी व्हावी, धातूंची संपन्नता टिकून राहावी यासाठी मदत करणारी द्रव्ये म्हणजे वयःस्थापन द्रव्ये. शतावरी, गोक्षुर, अश्‍वगंधा अशी अनेक द्रव्ये वयःस्थापन करणारी असतात, मात्र यात आवळा सर्वश्रेष्ठ सांगितला आहे.

याच कारणासाठी आवळा अनेक रसायनांमध्ये वापरला जातो. च्यवनप्राशमध्ये आवळा हे मुख्य द्रव्य असते. तसेच ब्राह्मरसायन, केवलामलक रसायन, आमलकी घृत, आमलकावलेह वगैरे अनेक रसायने आवळ्यापासून तयार केलेली असतात.

भूक लागावी, पचन व्यवस्थित व्हावे, तोंडाला रुची यावी, यासाठी आवळ्याच्या पाचक वड्या किंवा गोळ्या करता येतात. आवळे वाफवून घ्यावेत, त्यांचा गर वेगळा करावा. या गरात जिरे, मिरे, पिंपळी, धने, सुंठ, दालचिनी, सैंधव मीठ, काळे मीठ यांची बारीक पूड घालावी व त्याच्या वड्या किंवा गोळ्या करून वाळवून ठेवाव्यात. ही वडी किंवा गोळी चघळून खाण्यास उत्तम असते.

पित्तशमनासाठी उत्तम घरगुती औषध म्हणजे मोरावळा. चांगले मोठे आवळे निवडून वाफवावेत, टोचणीने बीपर्यंत टोचावेत, सुती कापडाने नीट पुसून घ्यावेत व तीन-चार तारी साखरेच्या पाकात बुडवून ठेवावेत. 25-30 दिवस मुरले की मोरावळा खाण्यासाठी वापरता येतो. मोरावळा जेवढा अधिक मुरेल म्हणजे जेवढा जुना असेल तेवढा अधिक गुणकारी असतो.

आवळा, आले व लिंबाचा रस यांचे लोणचेही बनवता येते. हे लोणचे रुचकर व पचनास मदत करणारे असते.

आवळा, आले किसून त्याला सैंधव व जिरेपूड लावून उन्हात वाळवून तयार केलेली सुपारी भोजनानंतर सेवन केल्यास पचनास मदत करते, तसेच पित्तशमनासाठी उत्तम असते.

आवळ्याचा उपयोग खालील तक्रारींमध्ये होतो
- खूप उचकी लागत असेल आणि पाणी, साखर वगैरे खाऊनही थांबत नसेल तर आवळ्याचा रस मधात मिसळून थोडा थोडा घेण्याचा उपयोग होतो.
- उलट्या होत असल्यास आवळ्याचे चूर्ण, चंदनाचे गंध व मध यांचे मिश्रण घेण्याने बरे वाटते.
- तापामध्ये तोंडाला शोष पडतो, त्यावर आवळकाठी व द्राक्षे तुपासह वाटून तयार केलेली गोळी तोंडात धरण्याने बरे वाटते.
- उष्णता वाढल्याने योनीच्या ठिकाणी जळजळ होत असल्यास आवळ्याचा रस साखर मिसळून घेण्याने बरे वाटते.
- स्त्रियांच्या अंगावरून पांढरे जाते, त्यावर आवळ्याच्या आठळीतील बिया पाण्यात वाटून साखर व मधात मिसळून घेण्याचा उपयोग होतो. मात्र या बिया मदकारक असल्याने त्यांचे प्रमाण वैद्यांच्या सल्ल्याने ठरविणे चांगले.
- आवळा हा आम्लपित्तावर खूप प्रभावी असतो. आवळ्याचा रस दोन चमचे, दोन चिमूट जिरेपूड आणि चवीनुसार खडीसाखर मिसळून सकाळ-संध्याकाळ घेतल्यास 15 दिवसांत आम्लपित्ताचा त्रास थांबतो.
- पित्त वाढल्याने चक्कर येत असेल तर त्यावरही आवळ्याचा रस दोन चमचे खडीसाखरेसह घेण्याचा उपयोग होतो.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad