Sunday, October 30, 2011

आरोग्य दृष्टी

डॉ. श्री बालाजी तांबे
दृष्टी म्हणजे नजर. दृष्टी म्हणजे जिच्या योगे पाहिले जाते ती पण दृष्टी. दृष्टी हा शब्द दूरदृष्टी, चौफेर दृष्टी असाही वापरला जातो. यात दृष्टीचा अर्थ लक्ष असणे, जाणीव असणे असा असतो. उत्तम नियोजनासाठी जशी दूरदृष्टीची आवश्‍यकता असते, उत्तम प्रसंगावधानासाठी चौफेर दृष्टीची आवश्‍यकता असते, तसेच आरोग्यासाठी, संपन्न दीर्घायुष्यासाठी "आरोग्य दृष्टी' असायला हवी.

आरोग्य ही आपली हक्काची संपदा आहे हे सर्वांनाच पटेल. बॅंकेतील पैसे किंवा इतर प्रॉपर्टी वृद्धिंगत व्हावी, अक्षय टिकावी यासाठी आपण प्रयत्नशील असतो. मात्र ज्याच्या आधारावर, ज्याच्या भरवशावर या सगळ्या गोष्टी करायच्या त्या आरोग्याला बहुतेक वेळा अध्याहृत धरले जाते. दिवसेंदिवस नवनवीन रोगांची नावे कानावर पडत आहेत. असे काही आपल्याला होऊ नये असे वाटत असेल, तर त्यासाठी जीवनात पदोपदी आरोग्य दृष्टी ठेवायला हवी.

आरोग्य दृष्टीतला सर्वांत महत्त्वाचा आणि मूलभूत भाग म्हणजे स्वतःची प्रकृती माहिती करून घेणे. कारण मूळचा पिंड जसा असतो, त्याच्या अनुरूप आहार-आचरण ठेवणे हे आरोग्याच्या रक्षणासाठी अत्यावश्‍यक असते. प्रकृती नुसती माहिती करून घेणे पुरेसे नसते, तर तिचा स्वीकार करून त्यानुसार जीवनशैलीमध्ये बदल करण्याची तयारी असावी लागते. व्यवसायाची निवडसुद्धा प्रकृतीचा विचार करून करावी असे आयुर्वेदात सुचवलेले आहे. सैन्यात भरती होण्यासाठी जशी खांद्यांची रुंदी, उंची, श्‍वसनाची क्षमता वगैरे गोष्टी पाहिल्या जातात, तसेच इतर कोणत्याही कामासाठी आपली प्रकृती, मानसिकता साजेशी आहे की नाही हे पाहणे आवश्‍यक असते.

निसर्गाशी समन्वय ठेवा
आरोग्य दृष्टीचा दुसरा पैलू म्हणजे निसर्गचक्राशी आपल्या जीवनशैलीचा समन्वय असला पाहिजे. उदा. सूर्योदय झाला की निसर्गात चैतन्य येते, याउलट सूर्यास्त झाला की निसर्गही विश्रांती घेतो. तसेच शरीरालाही सूर्यास्तानंतर शांतता, विश्रांती हवी असते, तसे न करता रात्री कामात किंवा इतर काही करण्यात दंग राहायचे आणि सकाळी उशिरापर्यंत झोपून राहायचे किंवा रात्री उशिरा शरीरातील सूर्य म्हणजे अग्नी मंदावला असतानाही पोट भरून जेवायचे हे निसर्गाच्या विरुद्ध असते आणि याचा अर्थातच आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

रोजची जागरणे, सतत गाडी-विमानासारख्या अति वेगवान वाहनातून प्रवास, ऋतूमधील बदलांचा विचार न करता किंवा आपण राहतो त्या प्रदेशातील हवामानाचा विचार न करता आपल्या सवयीनुसार किंवा आवडीनुसार आहार-आचरण ठेवणे, शारीरिक व्यायाम, श्रम अजिबात न करणे वगैरे गोष्टी निसर्गाला विसंगत असल्याने आरोग्याच्या दृष्टीने सहसा हितावह नसतात.

निसर्गनियमानुसार वय वाढणेही स्वाभाविक असते, पण त्यातही वात-पित्त-कफाचे न्यूनाधिक्‍य असते. उदा. बालवयात कफाचे, तरुण वयात पित्ताचे आणि उतारवयात वाताचे आधिक्‍य असते. हे वात-पित्त-कफ त्या त्या वयात जितके संतुलित राहतील तेवढी त्यांची कामे व्यवस्थित होतात आणि पर्यायाने आरोग्य चांगले राहते. म्हणूनच लहान वयात अभ्यंग, धूपन, व्यायाम हे कफसंतुलन करणारे उपचार करणे आवश्‍यक असते; मध्यम वयात कामाची धडाडी खूप असली तरी वेळेवर खाणे-पिणे, व्यायामाने शरीरातील लवचिकता कायम ठेवणे आवश्‍यक असते तर उतार वयात वात वाढू नये म्हणून अंगाला तेल लावणे, विश्रांती घेणे आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे असते.

नैसर्गिक तेवढंच स्वीकारा
आरोग्य दृष्टीचा अजून एक महत्त्वाचा पैलू म्हणजे शरीराला जे काही सात्म्य आहे, म्हणजेच शरीर जे सहजपणे स्वीकारू शकते, शरीराला जे सवयीचे व अनुकूल असते, तेच सेवन करणे, पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायानुसार निसर्ग आणि शरीर हे दोघेही परस्परांना तुल्यबळ असतात. ज्या गोष्टी निसर्गातून आल्या आहेत, ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत, त्या शरीरात सहजपणे सामावल्या जातात. या उलट कृत्रिम पद्धतीने, रासायनिक प्रक्रिया करून किंवा निसर्गात नैसर्गिकपणे होत नाही अशा प्रक्रिया करून बनविलेले अन्न, औषध आरोग्याच्या दृष्टीने हितकर असेलच असे नाही. उदा. हायब्रीड, जेनेटिक बदल करून बनवलेले अन्न शरीरात गेल्यावर नैसर्गिक अन्नाप्रमाणे स्वीकारले जात नाही किंवा वनस्पतींवर नैसर्गिक प्रक्रिया करून बनविलेल्या औषधाप्रमाणे रासायनिक प्रक्रिया करून बनविलेले औषध प्रभावी ठरत नाही, उलट त्यांचे दुष्परिणाम झालेले दिसतात. थोडक्‍यात अन्न, औषध, शेतीला दिली जाणारी खते, सौंदर्यप्रसाधने किंवा रोजच्या वापरात असणारी साफ-सफाईची द्रव्ये जितकी नैसर्गिक असतील तितके आरोग्य सुखरूप राहू शकते.

आरोग्य दृष्टीचा यानंतरचा महत्त्वाचा पैलू म्हणजे वापरात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची प्रत चांगली असण्याकडे लक्ष देणे. प्रत ही वीर्यावरून म्हणजे वस्तूच्या गुणवत्तेवर, सक्षमतेवर, संपन्नतेवर ठरत असते. अर्थातच वस्तूची प्रत जितकी चांगली तितके तिचे काम चांगले असते. संपन्न आयुष्यासाठी, निरामय दीर्घायुष्यासाठी केवळ वस्तूच्या संख्येकडे न पाहता, तिच्या संपन्नतेकडे, प्रत उत्तम असणे.याकडे लक्ष द्यावे लागते. गहू, तांदूळ, भाज्या, साखर अशा रोजच्या आहारातील मूलभूत पदार्थ असोत, केशर, वेलचीसारख्या मौल्यवान गोष्टी असतो, अत्तर, काजळ, उटण्यासारखी सौंदर्यप्रसाधने असोत, प्रत्येक वस्तू संपन्नतेच्या निकषावर निवडली तर त्यातून मिळणारे आरोग्यही बावनकशी सोन्यासारखे असेल हे नक्की. या उलट प्रत्येक वेळी तडजोड केली, प्रतीपेक्षा प्रमाणाला प्राधान्य द्यायचे ठरविले तर आयुष्याची प्रतही खालावू शकते.

संपूर्ण आरोग्याच्या आनंदासाठी

आरोग्य हा फक्‍त निरोगी शरीरावर नाही तर मनाच्या सकारात्मकतेवर बुद्धीच्या सर्जनतेवर अवलंबून असते. म्हणूनच आरोग्यदृष्टी ही केवळ शरीरावरच नाही तर मन, बुद्धी, इंद्रिये यांच्या आरोग्यावरही ठेवावी लागते. त्यासाठी अनुशासन, शिस्त यांना प्राधान्य द्यावे लागते. धावपळीच्या जीवनातही मन व बुद्धीच्या संतुलनासाठी स्वास्थ्यसंगीत, ॐक़ार गुंजन, दीर्घश्‍वसन, ध्यान वगैरेंचा समावेश असू द्यावा, बुद्धी-इंद्रियांना प्रेरणा मिळण्यासाठी सृजनतेला वाव द्यावा, त्यांच्या पोषणासाठी ब्रह्मलीन घृतासारखे घृत घ्यावे, पंचेद्रियवर्धन करणाऱ्या नस्यसॅन घृत, श्रुती तेल, सुमुख तेल, अंजन वगैरेंचा वापर करणे वगैरे उपायांचा योजना करावी, म्हणजे संपूर्ण आरोग्याचा आनंद घेता येईल.

स्वच्छता राखा
आरोग्याच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा पैलू म्हणजे स्वतःचे पोट भरताना, स्वतःचे जीवनव्यवहार चालविताना, अगदी आरोग्य सांभाळताना देखील निसर्गाचे नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे. ज्या प्रमाणे गावातील प्रत्येकाने आपले घर स्वच्छ करून कचरा घराबाहेर टाकला तर गाव अस्वच्छ राहिल्याने रोगराईला उलट आमंत्रणच मिळेल, त्या प्रमाणे आपल्या गरजांसाठी, सुखासाठी आपण जर निसर्गाला बिघडवत राहिलो तर एक दिवस निसर्गाचा कोप झाल्याशिवाय आणि त्यातून एकाएकी मोठे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रासायनिक पदार्थांपासून बनविलेल्या गोष्टी कमीत कमी वापरणे, प्लॅस्टिकसारख्या विघटन होण्यास अशक्‍य असलेल्या गोष्टींचा वापर टाळणे, निसर्गाची स्वच्छता राखणे हा आरोग्य दृष्टीचा महत्त्वाचा भाग होय. कचऱ्याची नीट नियमाप्रमाणे विल्हेवाट लावणे, प्रवासाला गेले असता त्या ठिकाणी कचरा राहणार नाही याची काळजी घेणे.

थोडक्‍यात, आरोग्याच्या दृष्टीने सतत सजग पाहण्याची दृष्टी आपल्याकडे हवी. रोग झाल्यावर त्याच्या निराकरणासाठी प्रयत्न करणे भाग असतेच, पण रोग होण्यापूर्वी आरोग्य दृष्ट विकसित झाली असेल तर अबाधित आरोग्य मिळू शकेल.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad