Monday, November 7, 2011

वृंदावनातील क्रीडा

डॉ. श्री बालाजी तांबे
भारतीय संस्कृतीचे जणू प्रतीक असणारी "तुळस' ही घराघरात आपले हक्काचे स्थान टिकवून आहे. भारतात सर्वत्र तुळस उगवतेच; फक्‍त हवामान व जमिनीनुसार तिचे स्वरूप थोडेफार बदलते. उष्ण हवामान असणाऱ्या ठिकाणची तुळस गडद रंगाची, काळसर असते, तर थंड प्रदेशातील तुळस हिरवी असते. गडद रंगाची पाने व जांभळी फुले येणाऱ्या तुळशीला कृष्णतुळशी म्हणतात, तर हिरव्या रंगाची पाने व पांढरी फुले येणाऱ्या तुळशीला श्‍वेततुळस वा रामतुळस म्हणतात. तुळशीच्या या प्रकारांशिवाय "वनतुळस' हाही एक प्रकार असतो, जिची पाने व मंजिऱ्या घरात लावल्या जाणाऱ्या तुळशीपेक्षा मोठी व थोडी राठ असतात.

तुळशीचे संपूर्ण झाडच औषधी गुणधर्मांनी युक्‍त असते, विशेषतः तुळशीची पाने, देठ, बी व मूळ औषध म्हणून वापरले जाते.

प्राचीन ग्रंथात तुळस कधी तोडावी यासंबंधी काही गोष्टी दिलेल्या आहेत. पौर्णिमा, अमावस्या, संक्रांती, द्वादशी या तिथींना; मंगळवार, शुक्रवार व रविवार या वारी, ग्रहणकाळात, जननशौच, मृताशौच काळात तुळस तोडू नये. रात्रीच्या वेळी, तसेच दोन्ही संधिकाळात तुळस तोडू नये.

घरात कोणत्याही प्रकारची दुर्गंधी, दुष्टी येऊ नये म्हणून दारात तुळस ठेवण्याची प्रथा आहे. वाळलेली रानतुळस घरात टांगली असता त्याच्यावर मच्छर बसतात असा अनुभव येतो. तसेच पाणी साठलेल्या ठिकाणी तुळस लावली असता मच्छरांचा उपद्रव कमी होतो. तुळस उत्तम जंतुघ्न व कृमिघ्न असते. साथीचे रोग पसरू नयेत यासाठी तुळस उपयुक्‍त असते. मध्ये बसण्यासाठी चौथरा तयार करून त्याच्या भोवती चारी बाजूने तुळशीची झाडे लावावीत किंवा तुळशीच्या कुंड्या ठेवाव्यात. या चौथऱ्यावर रोज काही वेळ बसण्याने अस्थमा, छातीचे विकार, हृदयविकार, फीट वगैरे विकारांवर उत्तम गुण येतो, असा अनुभव आहे.

तुळशीला संगीत कळते. किर्लियन कॅमेऱ्याने ऑराचा फोटो काढला असता त्यातून तुळशीतून उत्सर्जित होणारी प्राणशक्‍ती लक्षात येऊ शकते.

भारतीय परंपरेपुढे व आपल्या ऋषिमुनींपुढे नतमस्तक व्हावे असे वाटते. त्यांनी काय कल्पना केल्या असतील व या सामाजिक रीतीरूढी कशा बसविल्या असतील, याचे आश्‍चर्य वाटते. तुळशीविवाहाची पद्धत समाजाला अनेक चांगल्या गोष्टी देते. हा एक धार्मिक विधी आहे, असे वाटण्याची शक्‍यता आहे; पण यात धार्मिक असे काहीही नाही. आपल्या रोजच्या जीवनात सुखसमृद्धी नांदावी व आपल्या जीवनाचे नाना तऱ्हेचे अर्थ समजावेत या दृष्टीने हा सर्व विधी केलेला आहे. आपण असे पाहतो, की तुळशीची माळ आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मोलाची आहे. गळ्यात असलेली सोन्याची साखळी व तुळशीची माळ या दोन्हीपैकी सोन्याची साखळी कोणीतरी ओढून नेली व तुळशीची माळ राहिली तर तो देवाचे आभार मानतो की "बरे झाले; माझी तुळशीची माळ राहिली आहे, सोन्याची साखळी तर मी पुन्हा विकत घेईन,' अशी या तुळशीच्या माळेची महती आहे.

पांडुरंगाला प्रिय असलेल्या तुळशीचे महत्त्व काय असावे? लग्न ही आपल्या पृथ्वीवरच्या तमाम मनुष्यजातीला आवश्‍यक असणारी गोष्ट आहे. लग्न कुठल्या पद्धतीने केले जाते याला फारसे महत्त्व नाही. रजिस्टर लग्न करा, ऍग्रिमेंट लग्न करा किंवा तसेच एकत्र राहा; पण स्त्री-पुरुषांनी एकत्र राहणे अभिप्रेत असते.

दानातील अत्युच्च दान म्हणजे कन्यादान. अनेक जण आपल्याला मुलगा व्हावा म्हणून प्रयत्नशील असतात; परंतु कन्यादान दिले नाही तर आयुष्य विफल जाईल. कन्यादान देण्यासाठी मुलगी पाहिजे की नाही? मुलगी नसली तर कन्यादान कसे करणार? ज्यांना मुलगी नाही, म्हणजे ज्यांना कन्यादान करणे शक्‍य नाही, त्यांनी तर हे तुळशीचे लग्न अवश्‍य करायला पाहिजे. एखाद्या घरात एकच मुलगा किंवा एकच मुलगी असली तर त्याचे लग्न झाले की अनेक वर्षे घरात काही लग्नकार्यच होत नाही. त्या मुलाला मूल होऊन ते मोठे झाल्यावर जे मुंज, लग्न कार्य होणार तेच त्यांच्या घरातील कार्य. घरात मुंज, लग्न असे काही नसले की घरातील वातावरण बदलत नाही, वातावरण थंड पडत जाते. घरात कुठलेतरी मंगलकार्य झाले तर आपला उत्साह वाढतो. या दृष्टीने घरात एकदा तुळशीचे लग्न करायची पद्धत उत्तम आहे. साधे तुळशीचे लग्न असले तरी घरात चार दिवस उत्साह संचारतो.

आपण आज हाकाटी करतो आहे की स्त्रीला महत्त्व यायला पाहिजे, तिला हक्क असायला पाहिजे; पण पूर्वीच्या ऋषीमुनींनी याचा किती खोलवर विचार केला आहे हे आपल्याला कळते. अनेक गोष्टींचा विचार करून तुळशीच्या लग्नाची आखणी केलेली दिसते.

तुळशीचे दुसरे नाव वृंदा असे होते. जेथे तुळशी असते ते वृंदावन. या वृंदावनातील श्रीकृष्णांच्या सर्व लीला आपल्या सर्वांना माहिती असतात. वृंदा ही जालंधर नावाच्या राक्षसाची पत्नी होती. दुसऱ्याला पिडणे हे या दानवाचे काम होते. सुख देणारा तो देव व पिडणारा तो दानव, ही व्याख्या आहेच. मस्ती आली की दोन गोष्टी असतात. मस्ती आली की चैन वाढत जाते आणि प्रत्येक वस्तूवर आपलाच हक्क आहे असे वाटत राहते. जालंधराने एकदा स्वर्गावर स्वारी केली, स्वर्ग जिंकला, इंद्राला बंदिवान केले, इंद्राणीला उचलून स्वतःकडे आणले, बंदिवासात टाकले व तिला त्रास द्यायला सुरुवात केली. मुळात दुसऱ्याच्या स्त्रीवर नजर ठेवणे किंवा दुसऱ्या स्त्रीला घरात आणणे हे घरातल्या स्त्रीला आवडत नाही. जालंधराने इंद्राणीला घरी आणल्याने अनेक शत्रू तयार झाले. तो इंद्राणीला त्रास देत असे, हे त्याच्या बायकोला म्हणजे वृंदेला मुळीच आवडले नाही. वृंदेने मागच्या दाराने इंद्राणीला मदत करायला सुरवात केली. इंद्राणीला उपाशी ठेवायचे जालंधराने ठरविले तर वृंदा तिला अन्न पोचवत असे. इंद्राला बंदिवासातून कसे सोडवायचे याबद्दलची निरोपानिरोपी करायला मदत करायला सुरवात केली. विष्णूशी संधान बांधून इंद्र-इंद्राणीला सोडवण्याची खटपट वृंदेने सुरू केली.

वृंदेचे हे कार्य अर्थातच जालंधराला आवडले नाही. तो खवळला. "जोपर्यंत तुझी बायको तुझ्या मताप्रमाणे चालेल, जोपर्यंत ती तुझी अनुगामिनी असेल तोपर्यंत तू मरणार नाहीस; पण ज्या दिवशी तुझी बायको तुझ्या विरोधात जाईल, त्या दिवशी तुझी सगळी शक्‍ती नष्ट होईल' असा वर पूर्वी जालंधराला मिळालेला होता. वृंदा आपल्या विरोधात काम करते आहे, विष्णूला निरोप पोचवते, त्याची प्रार्थना करते असे पाहून जालंधराने "तू मला समर्पित असलेच पाहिजे' असा हेका धरला. ती ऐकत नाही असे पाहून त्याने तिची जीभ कापून टाकली. तिला आता बोलता येणार नाही, त्यामुळे आता ती विष्णूची प्रार्थना करू शकणार नाही असे त्याला वाटले. श्रीविष्णूंना हे सर्व जेव्हा कळले तेव्हा त्यांनी उद्धार करण्याच्या दृष्टीने तिची सुटका केली. ती म्हणाली, ""तुम्ही मला या राक्षसाच्या जाचातून तर सोडवाल; पण मला तुमच्या चरणाशी राहता यावे अशी योजना करा.'' विष्णू म्हणाले, ""ठीक आहे, तुझे रूपांतर तुळशीत होईल आणि यापुढे लोक ती तुळस मला वाहतील. या दृष्टीने तुझे-माझे मिलन नेहमीच होत राहील.'' विष्णुरूपी शाळिग्रामावर तुळशी वाहण्याची पद्धत तेव्हापासून सुरू झाली. या कथाभागाचे मर्म लक्षात घेऊन आपल्या ऋषीमुनींनी तुळशीविवाहाची योजना केली.

आपल्या मानेच्या ठिकाणी असणाऱ्या जय, विजय या ग्रंथींचे नाव जालंधर आहे. योगामध्ये जालंधरबंध नावाची क्रिया असते. आपल्या मस्तकातून खाली पडणारा अमृतरस सरळ सूर्यचक्रात पडला तर सूर्य या अमृतरसाला जाळून टाकतो. असे झाल्यास आपल्या शरीराला ताकद मिळत नाही, ग्रंथी नीट काम करत नाही. तेव्हा हा अमृतरस घरंगळू द्यायला हवा. आपल्या मस्तकातील सर्व केंद्रे आपले जीवन चालवतात म्हणून ह्या केंद्रांना (देवतांना) तसेच हा अमृतरस मिळावा यासाठी जालंधरबंध असतो. जालंधरबंधाच्या वेळी श्‍वास थांबवला जातो व हनुवटी दाबून धरली जाते. मेंदूत असणारे केंद्र (देवता) जे शरीराच्या सर्व क्रिया व चेतासंस्था चालवते, त्या शक्तिकेंद्राला विष्णू हे नामकरण केले, तर विष्णुप्रिया तुळशीच्या औषधी गुणांचा आणि श्रीकृष्ण व श्रीविष्णूंचा संबंध समजून येईल.

तुळशीचा व थायरॉइड ग्रंथीचा, तसेच तुळशीचा व आपल्या प्राणशक्‍तीचा संबध आहे. ही गोष्ट आता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध केलेली आहे. तुळशीच्या आजूबाजूला असलेल्या वायूत ओझोनचे प्रमाण अधिक असते व तेथे प्राणशक्‍तीचा संचार अधिक असतो. आपल्याला कुणी प्राणशक्‍ती दिली तर अजून काय हवे? आपण प्राणशक्‍तीवरच जिवंत असतो. प्राणशक्‍ती तुळशीतून उत्सर्जित होत असते म्हणून ज्या ठिकाणी तुळशी लावलेली आहे, त्या ठिकाणी दुष्टशक्‍ती सोडाच; पण तेथे कुठल्याही प्रकारची रोगराई, वाईट विचार वा वाईट शक्‍ती राहू शकत नाही, उलट प्राणशक्‍तीचा प्रभाव अनुभवता येतो.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad