Wednesday, October 20, 2010

ऍलर्जी कोणाकोणाची ?


ऍलर्जी होऊ नये असे वाटत असेल तर आहार विहार आणि आचारात नैसर्गिकता हवीच, परंतु नित्यनियमाने शरीरशुद्धी करून प्रतिकारशक्ती वाढेल असे अन्न व रसायन खाण्यात अवश्‍य असावे. केवळ आयुर्वेदिक संकल्पनेद्वारे ऍलर्जी टाळणे किंवा ऍलर्जीवर उपचार होऊ शकतो हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे. 
आ ज सकाळी गौरीच्या अंगावर अचानक खाज सुटायला लागली आणि त्यानंतर त्वचेवर लालसर गांधी सुद्धा दिसून आल्या. बागेत फिरताना सुरवंट वगैरे लागण्याची शक्‍यता असते, पण बागेत तर गौरी गेलेलीच नव्हती. अंथरूणात काही कीडा वगैरे चावला का याचा शोध घेतला, पण तसेही काही घडलेले नव्हते. काल रात्री गेलेल्या हॉटेलातील जेवणात नक्कीच काहीतरी खाण्यात आले असावे, कदाचित चायनीज डीशमधील अजिनोमोटो असावा किंवा सुंदर हिरव्यागार ग्रीन पालक मधील रंग असावा. एकदा जाऊन कशाची ऍलर्जी आहे हे पहावेच लागेल, असे तिने ठरविले. घर साफ करण्याची सोय नाही. कारण धुळीमुळे पण असाच त्रास होतो. पूर्वी तर असे काही होत नसे, मग आत्ताच असे काय झाले, की कुठल्याही कारणाने ऍलर्जीचा त्रास होऊ लागतो? एकूणच सर्व मनुष्यमात्रांची प्रतिकारशक्ती कमी झाल्याचे वर्तमानपत्रात वाचलेले आठविले. पण स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देऊन ताबडतोब इलाज करायला हवा हे तिच्या लक्षात आले.

वसंतरावांच्या मुलाचे लग्न ठरले, म्हणून केळवणाच्या जेवणासाठी रविवारचे आमंत्रण करण्याकरिता मी त्यांना फोन केला. बऱ्याच दिवसांनी भेट होणार म्हणून त्यांना आनंद झाला. त्यामुळे बसून गप्पा वगैरे मारू अशा माझ्या बेताला दुजोरा देत त्यांनी आमंत्रणाचा स्वीकार केला. फोन खाली ठेवून मी घरात जेवणाचा मेनू वगैरे ठरवण्यासंबंधी माहिती दिली. पाच मिनिटातच वसंतरावांचा परत उलटा फोन आला. वसंतराव विचारत होते, ""तुमच्या घरात मांजर वगैरे आहे का? ड्रॉईंग रूममध्ये गालिचा घातलेला आहे का?'"
तेव्हा मी म्हटले, ""गालिचा तर जमिनीवर चिकटवलेला आहे व कुणाची तरी मांजर घरात येऊन-जाऊन असते. पण केळवणाचे जेवण तर चांदीच्या ताटात व टेबलावरच होईल, तेव्हा ही चौकशी कशाला?''

तेव्हा त्यांनी सांगितले, की मध्यंतरी सौभ्याग्यवतींना सारखा शिंकांचा त्रास होत होता. त्यामुळे ऍलर्जी टेस्ट करवली. त्यात मांजरांची, गालिच्याची व इतर बऱ्याचशा पदार्थांची ऍलर्जी असल्याने त्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला गेला आहे. तिला ऍलर्जी असलेल्या गोष्टींची एक मोठी लिस्टच दिली आहे. मी मस्करीने म्हटले, ""काय वसंता, त्या लिस्टमध्ये तुझे तर नाव नाही ना? नवऱ्याची ऍलर्जी असली तर काय करणार? केळवण तर आम्ही हॉटेलातही करू. हॉटेलात मेनू ठरवण्यापूर्वी ऍलर्जीच्या पदार्थांची लिस्ट मला पोस्टाने पाठवून दे.''

सध्या कुणाला कसली ऍलर्जी असेल ते सांगता येत नाही. ऍलजी म्हणजे नेमके काय? आयुर्वेदात ऍलर्जी म्हणजे "असात्म्य दोष' असे सांगितले आहे. दोन वस्तू एकत्र होताना जर चुकीचा संयोग झाला तर त्या वस्तूंचे सात्म्य होत नाही व त्यापासून दोष उत्पन्न होतो. हा उत्पन्न होणारा दोष म्हणजे असात्म्य दोष. प्रत्येक व्यक्‍तीची वात-पित्त कफानुरूप, विशिष्ट धातुबांधणी आणि वंशपरंपरागत अशी एक प्रकृती असते. शिवाय कालमानानुसार व ऋतुमानानुसार काही पदार्थ विशिष्ट प्रकृतीला मानवतात किंवा मानवत नाहीत. अशा वेळी न मानवलेल्या पदार्थांमुळे खाज, पुरळ, फोड, मळमळ, उलट्या, शिंका वगैरे जो त्रास होतो त्याला ऍलर्जी म्हणजे असात्म्य दोष म्हणतात. साधारणतः ऍलर्जीत शरीरातील पित्तदोष किंवा पित्त-वातदोष वाढलेला असतो. त्यामुळे वात व पित्त असे दोन्ही दोष कमी करून प्रकृतीला समत्व मिळेल असे प्रयत्न करावे लागतात. ऍलर्जीवर प्राथमिक उपचार म्हणून सारखे रागावणे, सतत धावपळ, प्रत्येक गोष्टीचे टेन्शन घेणे कटाक्षाने टाळावे लागते. थंड (पण फ्रीजमधील नव्हे) लिंबू पाणी, गुलाब सरबत, कोकम सरबत, सूतशेखरमात्रा याबरोबरच ध्यान-धारणा, संगीत यांचा जीवनात समावेश केल्यास चांगले परिणाम दिसून येतात.

विशिष्ट व्यक्‍तीला ज्या विशिष्ट वस्तू चालत नाहीत, त्या टाळणे हा एक उपाय किंवा रक्‍तशुद्धी व श्‍वसनाची ताकद वाढविणे हा दुसरा उपाय. एकूणच शरीराची प्रतिकारशक्‍ती कमी झाली की ऍलर्जीचा त्रास वाढतो. ही ऍलर्जी खाद्यपदार्थ, शीतपेये, धुलिकण, सिंथेटिक परफ्युम व त्यापासून बनवलेल्या उदबत्त्या, सिंथेटिक कपडे, काही औषधे यांची असू शकते. साधारणतः योग्य उपचारांनंतर बहुतेक ऍलर्जीचा त्रास कमी होऊन एखाद्या-दुसऱ्या पदार्थांची ऍलर्जी राहू शकते. पण पाच - पन्नास खाण्याच्या किंवा वापरण्याच्या वस्तूंची ऍलर्जी असली व भीतीने त्या वस्तूंचा वापर करणे सोडायचे म्हटले, तर कुटुंबातील व आजूबाजूच्या लोकांना तुमचीच ऍलर्जी निर्माण होऊ शकते. आयुर्वेदात खाण्यासाठी, औषधासाठी किंवा वापरण्यासाठी म्हणून ज्या काही वस्तू उपयोगात आणणे आवश्‍यक असे त्या सर्व शुद्ध वातावरणातून आणि निसर्गातून मिळवलेल्या असत.

अन्न हे संपूर्णतः सेंद्रिय पद्धतीने उत्पादन केलेले, वापरायचे कपडे सुती, रेशमी, लोकरी असे नैसर्गिक आणि राहती घरे, त्यातील फर्निचर हे सुद्धा दगड, वीटा, वाळू, लाकूड यापासून बनविलेले असे. अत्तरे फुलाच्या सुगंधापासून, धूप-उदबत्त्या या पण सुगंधी वनस्पती आणि त्यांच्या तेलापासून, साबणासारख्या वस्तू नारळाच्या तेलापासून बनविलेल्या असत. सद्यःपरिस्थितीत आजुबाजूला लक्ष दिले तर सर्वच वस्तू अनैसर्गिक म्हणजे नानातऱ्हेच्या रसायनांपासून तयार केलेल्या दिसतात. अगदी पवित्र वातावरणात देवाजवळ वापरायच्या उदबत्त्या किंवा धूप सुद्धा अशुद्ध रसायनांपासून बनविलेल्या असतात. त्यामुळे आध्यात्मिक फायदा तर नाहीच, परंतु श्‍वसनाचे रोग किंवा ऍलर्जी सारखे त्रास वाढतात. शरीराचा वात कमी करून आरोग्य, शक्ती आणि समृद्धी वाढविणाऱ्या अभ्यंगासाठी सुद्धा तेल हे खनिज तेलापासून बनवायला मागेपुढे पाहिले जात नाही. अर्थात तेलाचा चिकटपणा नको हे कारण पुढे केले जाते. वातावरणाशी समतोल साधणारी आणि वातावरणातील बदलाप्रमाणे बदलत राहून संतुलन साधणारी नैसर्गिक द्रव्ये असतात. ती न वापरता केवळ कृत्रिम प्लॅस्टिकसारख्या द्रव्यांचा वापर केला तर ऍलर्जीला आळा कसा काय घालणार?

ऍलर्जी होऊ नये असे वाटत असेल तर आहार विहार आणि आचारात नैसर्गिकता हवीच, परंतु नित्यनियमाने शरीरशुद्धी करून प्रतिकारशक्ती वाढेल असे अन्न व रसायन खाण्यात अवश्‍य असावे. केवळ आयुर्वेदिक संकल्पनेद्वारे ऍलर्जी टाळणे किंवा ऍलर्जीवर उपचार होऊ शकतो हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे.

- डॉ. श्री बालाजी तांबे 

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad