Monday, October 25, 2010

वास्तुप्रथा ४३ : किचन ओटय़ाची रचना (भाग ३)sanjuspatil@hotmail.com 
ओटय़ांची विभागणी आपल्या सोयीसाठी अशी करता येईल. ज्या ओटय़ावर पिण्याचं पाणी, सिंक यांची योजना असते तो वॉटर प्लॅटफॉर्म. ज्या ओटयावर मिक्सर, ज्युसर, गाइंडर, ओव्हन अशी इलेक्ट्रिकल उपकणं ठेवली जातात ते वर्क स्टेशन किंवा स्टोरेज प्लॅटफॉर्म. आणि ज्या ओटय़ावर शेगडी ठेवली जाते तो मुख्य प्लॅटफॉर्म.
किचनसाठी आग्नेय ही दिशा प्रमुख असली तरी ईशान्य, वायव्य, नैर्ऋत्य, पूर्व आणि उत्तर या दिशाही चालतात हे मागील भागात आपण पाहिलं.  आता किचनची अंतर्गत मांडणी ढोबळमानानं पाहू.

प्रथम आग्नेयेच्या किचनकडे वळू. या किचनमध्ये सी शेप, एल शेप किंवा सिंगल अशा तिनही प्रकारे  जागेच्या उपलब्धतेनुसार ओटय़ाची रचना करता येईल. ओटा सी शेप असेल तर उत्तरभिंतीवरील ओटय़ाचा वापर वॉटर प्लॅटफॉर्म म्हणून करावा. म्हणजे सिंक व पिण्याच्या पाण्याची योजना या ओटय़ावर करावी. दक्षिण भिंतीवरील ओटा  स्टोरेज प्लॅटफॉर्म असेल. त्याचा वापर वर्क स्टेशन  म्हणून करावा. तेथे आग्नेय कोपऱ्याकडे सरकवून मिक्सर, ओव्हन व तत्सम इलेक्ट्रॉनिक उपकरणं ठेवावीत.   पूर्वेकडील ओटा हा मुख्य प्लॅटफॉर्म असेल. त्यावर शेगडी ठेवावी. भाजी चिरणं, कापणं, पीठ मळणं वगैरे स्वयंपाकाची पूर्वतयारी म्हणून केल्या जाणाऱ्या गोष्टी शक्यतो याच ओटय़ावर कराव्यात.  (आकृती १ पाहा)

एल शेप प्लॅटफॉर्म बनवण्याइतकीच जागा असेल तर उत्तर भिंतीलगत व पूर्व भिंतीलगत ओटा बनवावा.   या केसमध्ये पूर्व भिंतीच्या ओटय़ाचा वापर (मुख्य प्लॅटफॉर्म) शेगडीसाठी आणि वर्क स्टेशन म्हणून करावा तर उत्तर भिंतीलगतच्या ओटय़ाचा वापर (वॉटर प्लॅटफॉर्म) वरीलप्रमाणेच सिंक व पाण्यासाठी करावा. (आकृती २ पाहा) सिंगल ओटा करण्याइतकीच जागा असेल तर  एकाच ओटय़ाचा वापर वॉटर प्लॅटफॉर्म, स्टोरेज व मुख्य प्लॅटफॉर्म म्हणून करावा लागेल. . या केसमध्ये सिंक अगदी इशान्येच्या कोपऱ्यात न घेता थोडं अंतर ठेवून घ्यावी. अगदी डाव्या कोपऱ्याचा वापर पिण्याचं पाणी ठेवण्यासाठी किंवा वॉटर प्युरिफायर लावण्यासाठी े करावा.  या केसमध्ये शेगडी व सिंक यातील अंतर कमी होतं. म्हणून या दोघांमध्ये लाकडाची एखादी वस्तु म्हणजे पोळपाट-लाटणं वगैरे आवर्जून ठेवावी.  त्यानंतर शेगडी ठेवावी. उजव्या बाजूच्या कोपऱ्याचा वापर मिक्सर आदी ठेवण्यासाठी करावा. (आकृती ३ पाहा) किचनसाठी लागणारं स्टोरेज दक्षिण किंवा पश्चिमेला करावं. उत्तरेला स्टोरेज करायचंच असेल तर अगदी गरजेपुरतं करावं.  किचनला लागणारे मसाले व अन्य पदार्थाची साठवण आग्नेय व दक्षिणेकडे करावे. क्रोकरी व काचेच्या भांडय़ांची मांडणी उत्तरेत करावी.
किचन आग्नेय, पूर्व, उत्तर, पश्चिम या दिशांत असेल तर वर दिलेल्या रचना सर्वसाधारणपणे वापरता येतील. मात्र किचन वायव्येत किंवा इशान्येत असताना अशी रचना करणं साफ चुकीचं ठरेल कारण वायव्येच्या किचनमध्ये शेगडी रोगपदात तर ईशान्येत असताना शेगडी  पर्जन्य वा अग्नी या पदात ठेवावी लागते.
वायव्य (आकृती ४ ) व इशान्य (आकृती ५) दिशेतील किचनच्या आकृत्या सोबत दिल्या आहेत. वायव्य दिशेत सी शेप प्लॅटफॉर्म असेल तर पश्चिम भिंतीवरील ओटय़ाचा वापर स्टोरेज प्लॅटफॉर्म म्हणून, उत्तर भिंतीवरील ओट्याचा वापर मुख्य प्लॅटफार्म म्हणून  तर पूर्व भिंतीवरील ओटय़ाचा वापर वॉटर प्लॅटफॉर्म म्हणून करावा. शेगडी आकृतीत दाखविल्याप्रमाणे कोपऱ्यात म्हणजे रोगपदात ठेवावी.
किचन ईशान्येत असेल तेव्हा मुख्य ओटा पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे घेता येईल. मात्र शेगडी ईशान्येच्या  अगदी कोपऱ्यात म्हणजे अग्नी या पदात किंवा पूर्व -ईशान्येला कोपऱ्यापासून थोडं अंतर ठेवून म्हणजे पर्जन्य या पदात ठेवता येईल.
किचन आग्नेयेत किंवा नैर्ऋत्येतअसेल तर मुख्य प्लॅटफॉर्म पूर्वेकडे ठेवावं.  किचन वायव्येत असेल तर मुख्य प्लॅटफॉर्म उत्तरेकडे ठेवावं. किचन उत्तरेत किंवा ईशान्येत  असेल तर मुख्य प्लॅटफॉर्म उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे ठेवता येईल.
प्लॅटफॉर्मसाठी ग्रॅनाईटचा वापर करणं शक्यतो टाळावं. ग्रॅनाईट आरोग्याला चांगलं नसल्याचं मॉडर्न सायन्स सांगतं. मार्बल किंवा अन्य नॅचरल स्टोन वापरावेत. रंग त्या त्या दिशेतील कारकत्वाप्रमाणे निवडावा. म्हणजे -
* आग्नेयेचं किचन असेल तर हिरवा मार्बल किंवा यलो जैसलमेर
* पूर्वेच्या किचनसाठी हिरवा मार्बल
* ईशान्येच्या-उत्तरेच्या किचनसाठी पांढरा मार्बल
* वायव्येच्या किचनसाठी करडय़ा रंगाचा कोटा किंवा इटालियन मार्बल
* पश्चिमेच्या किचनसाठी पिवळा जैसलमेर
* नैऋत्य व दक्षिणेच्या किचनसाठी पिवळा जैसलमेर किंवा गुलाबी मार्बल.  क्रमश:

आठवडय़ाची टिप
हा विस्मयकारी उपाय आहे. क्रिस्टल बाऊल ज्या कोपऱ्यात ठेवाल तेथील गुण वृध्दींगत करेल. मात्र तो रिकामा असावा आणि ओपन असावा. म्हणजे त्याच्या आत काही ठेवू नये.  आणि त्याच्यावर वरून  काही नसावं.  तो कपाटात ठेवू नये. तीनचार शेल्फची रॅक असेल तर मधल्या शेल्फवर न ठेवता अगदी वरच्या शेल्फवर ठेवावा. नैऋत्य कोपऱ्यात तो ठेवल्यास नातेसंबंधात मोकळेपणा येतो. आग्नेय कोपऱ्यात ठेवल्यास लक्ष्मी आकर्षित करतो. ईशान्य कोपऱ्यात ठेवल्यास ज्ञानार्जनात फायदा होतो. वायव्य कोपऱ्यात ठेवल्यास मित्रांकडून मदत मिळते, भागीदारीत यश मिळतं. मात्र बाऊल क्रिस्टलचाच असावा. क्रिस्टल सदृश्य काचेचा चालणार नाही.


    ---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

    No comments:

    Post a Comment

    ad