Monday, October 18, 2010

डोकेदुखी

शारीरिक कारणांमुळे डोकेदुखी होऊ नये यासाठी आयुर्वेदाने सुचविलेले उपाय योजावेत. त्यानंतरही डोकेदुखी झालीच, तर ती घालविण्यासाठीसुद्धा योग्य उपाययोजना करणे आवश्‍यक असते. डोकेदुखी कोणत्याही प्रकारची असली, तरी तिचा संबंध मेंदूशी असतो आणि तसेही सध्या मेंदूचे विकार वाढत आहेत.

डो केदुखीसंबंधी लिहीत असताना पूर्वी "सिर सलामत तो पगडी पचास,' या म्हणीचा उल्लेख केला होता. डोक्‍याचे एवढे महत्त्व, की डोके शाबूत असले की सर्व प्रकारची प्रसिद्धी, सर्व प्रकारचे मान, सर्व प्रकारचे समाजातील स्थान असते. एकूणच सर्व जीवन डोक्‍यावर अवलंबून असते. डोंगरावर चढायचे असताना किंवा कुठेतरी लांब जायचे असताना समजा पाय दुखत असतील, तर ठरविलेला कार्यक्रम रद्द करण्याशिवाय गत्यंतर नसते. ज्याचे पाय दुखतात तो डोंगर कसा चढणार? जराशा कामाने ज्याचे हात दुखतात ती व्यक्‍ती मालिश करू शकेल का? तेव्हा एकूण जीवन जगण्यासाठी, कार्य करण्यासाठी, उपजीविकेचे साधन म्हणून काम करण्यासाठी, लोकांशी संबंध ठेवण्यासाठी, अगदी काही नाही तरी आनंद घेण्यासाठी, शांत झोपेसाठीसुद्धा आवश्‍यकता असते डोक्‍याची.

डोकेदुखी सुरू झाली, की एकूणच सर्व जीवनव्यवहारातून अंग काढून घेतले जाते. एका व्यक्‍तीला असलेली डोकेदुखी ही अनेकांची डोकेदुखी होऊ शकते. डोके दुखते या कारणाने कामावर न गेल्यास त्या दिवसाचा पगार बुडणार म्हणजेच उपजीविकेचा प्रश्‍न आला. डोके दुखते म्हणून एखादा मनुष्य डोके घरून बसला, की इतरांना चैन पडत नाही; कारण काहीतरी विचित्र घडते आहे असे वाटते. एखादे मोठे संकट आले की मनुष्य डोके धरून बसतो, तर मग डोके धरून बसायला लागणारी डोकेदुखी हे किती मोठे संकट असेल!

डोकेदुखीची कारणे अनेक असू शकतात. काही मित्रमंडळींमध्ये अमुक एक मनुष्य आला, तर "ही डोकेदुखी आली,' असा उल्लेख केला जातो. जणू काही त्याचे डोकेदुखी असे नावच असावे. घरी आलेले पाहुणे वेळेवर परत न जाता ठिय्या ठेवून राहिले, तरी "ही काय डोकेदुखी आहे,' असे म्हटले जाते. एखाद्या घरी शेजारपाजाऱ्यांना त्रास होईल एवढा गोंगाट व आरडा-ओरडा चालत असला, की असे कुटुंब हीसुद्धा डोकेदुखीच असते. काही कामासाठी घाईघाईने जात असता रस्त्यात गाडीचे चाक पंक्‍चर होणे, हीसुद्धा डोकेदुखीच ठरते.

अशा प्रकारे डोकेदुखीच्या अनेक कारणांबरोबरच अपचनाने होणारी डोकेदुखी, पित्त वाढल्यामुळे होणारी डोकेदुखी, मेरुदंड व मज्जारज्जूत असलेले जल कमी होण्याने येणारी डोकेदुखी, डोळ्यांवर ताण आल्याने येणारी डोकेदुखी, मेंदूत गाठ वगैरे झाल्यास येणारी डोकेदुखी, रक्‍तदाब प्रमाणाबाहेर कमी-अधिक होण्याने मेंदूला होणाऱ्या रक्‍तपुरवठ्यात झालेल्या बदलामुळे होणारी डोकेदुखी, मूत्र साठून राहिल्याने येणारी डोकेदुखी अशी अनेक प्रकारची शारीरिक कारणेही असू शकतात. अर्थात आयुर्वेदाने याचे व्यवस्थित विश्‍लेषण केलेले आहे व त्याचबरोबर त्याच्यावर उत्तम उपायही सांगितलेले आहेत.

स्वतःला डोकेदुखी होऊ नये, अशी काळजी घेत असतानाच आपण दुसऱ्याची डोकेदुखी होऊ नये, हे पाहणेही प्रत्येकालाच गरजेचे असते. असे म्हणतात, की जे आपल्याला नकोसे वाटते ते दुसऱ्याला भोगावे लागणार नाही यावर आपण कटाक्षाने लक्ष ठेवणे. आपण कुणाची डोकेदुखी ठरू नये याकडे प्रत्येकाने लक्ष ठेवणे आवश्‍यक असते.

शारीरिक कारणांमुळे डोकेदुखी येऊ नये यासाठी आयुर्वेदाने सुचविलेले उपाय योजावेत. त्यानंतरही डोकेदुखी झालीच, तर ती घालविण्यासाठीसुद्धा योग्य उपाययोजना करणे आवश्‍यक असते. डोकेदुखी कोणत्याही प्रकारची असली, तरी तिचा संबंध मेंदूशी असतो आणि तसेही सध्या मेंदूचे विकार वाढत आहेत. जन्माला येणारी मुले असोत किंवा वयस्कर मंडळी असोत, मेंदूसंबंधी रोग वाढत आहेत, तेव्हा डोकेदुखीवर ताबडतोब इलाज करणे आवश्‍यक असते. ध्यानधारणा आणि स्वास्थ्यसंगीत यांचा मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी खूप उपयोग होऊ शकतो. म्हणून पुढे येणारी डोकेदुखी टाळण्यासाठी रोज ध्यान व संगीतासाठी थोडा वेळ देणे इष्ट असते. मेंदूला आरोग्य मिळेल अशी पंचगव्य, पंचामृत, ब्राह्मरसायन, ब्रह्मलीन घृत वगैरे रसायने नित्य सेवन करणे चांगले असते. सूतशेखर, कामदुधा, प्रवाळ किंवा मौक्तिक भस्म यांचाही डोकेदुखीसाठी चांगला उपयोग होऊ शकतो. साधारणतः पोट खराब असणे, जागरण आणि पित्त ही डोकेदुखीची नेहमीची कारणे असतात. त्यामुळे त्यावरती इलाज अवश्‍य करावा.

- डॉ. श्री बालाजी तांबे ---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad