Friday, February 5, 2010

टोमॅटोपासून बनवलीय सुरकुत्यांना रोखणारी गोळी

आजच्या आधुनिक जगात तुम्ही किती हुशार आहात याच्याइतकेच तुमचे व्यक्तिमत्त्व कसे आहे यालाही महत्त्व आहे. सर्वानाच देव सगळे काही भरभरून देतो असे नाही, त्यामुळेच अनेक स्त्री-पुरुष सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे क्रीम, लोशन, औषधे, मसाज यांचा वापर करीत असतात. यातील दावे कितपत खरे असतात हे सांगणे तसे अवघड आहे. पण आपला चेहरा छान दिसावा, निदान तो सर्वाना आवडावा यासाठी प्रत्येकजण या मार्गाचा अवलंब करीत असतो. चेहऱ्यावर जर सुरकुत्या असतील तर तुमची वृद्धत्वाची प्रक्रिया सुरू झाल्याचे ते निदर्शक असते. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवण्यासाठी अनेकजण गाढवाच्या दुधापासून ते इंजेक्शनपर्यंत सर्व उपाय करतात. अशा वेगवेगळ्या उपायांनी त्वचेला अपायही होऊ शकतो. म्हणून कुठलेही उपाय हे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच केलेले बरे. अलीकडेच एक गोळी तयार करण्यात आली असून, त्यात चेहऱ्याची त्वचा अधिक सुकोमल व तजेलदार दिसण्यासाठी ती प्रभावी आहे. इनेव्ह फर्मेट हे त्या लाल रंगाच्या गोळीचे नाव आहे. ती रोज घेतल्यास सुरकुत्या येण्याची प्रक्रियाच रोखली जाते, असा संशोधकांचा दावा आहे. या गोळीत टोमॅटोमध्ये आढळणारे लायकोपिन हे द्रव्य असते. त्यामुळे जुन्या त्वचापेशींचे संरक्षण होते. त्याचबरोबर नवीन पेशींची वाढ होते. वेगवेगळ्या वयोगटातील ९० महिलांवर या गोळीचे प्रयोग करण्यात आले. त्यातील काहींना ही गोळी, तर काहींना प्लासेबो (म्हणजे औषध नसलेली गोळी) देण्यात आली. ज्यांनी ही सुरकुत्या प्रतिबंधक गोळी सहा महिने घेतली होती त्या महिलांमध्ये त्वचेची लवचिकता चांगलीच म्हणजे ८.७ टक्के दिसून आली. ज्यांनी प्लासेबो घेतले होते त्यांच्यात काहीही परिणाम दिसला नाही. इनेव्ह फर्मेट ही गोळी एल ओरियल या सौंदर्यप्रसाधन कंपनी व नेसले यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आली आहे. शरीरपोषण विज्ञान व त्वचाविज्ञान यातील तंत्रांचा वापर करून ती तयार केली आहे. ही गोळी म्हणजे केवळ वरवरचा उपाय नाही तर शरीरातून दिले जाणारे ते औषध आहे. त्यामुळे त्याला कॉस्मेसेटय़ुकल्स असे म्हणतात. जीवनसत्त्वाच्या गोळीसारखे पूरक औषध म्हणून ती गोळी लोकप्रिय ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. युरोप व दक्षिण अमेरिकेत ही गोळी अगोदरच वापरात आहे व आता ती इंग्लंडमध्येही विक्रीस येत आहे. या दहा गोळ्यांची किंमत २५ पौंड आहे, त्यामुळे ती अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे. इनेव्हच्या पॅट्रिशिया मॅनिसियर यांच्या मते ही गोळी तयार करताना बरेच संशोधन करण्यात आले आहे व अजूनही त्यात सुधारणा होत आहेत. शरीराला उत्तम पोषण मिळाले तर त्वचा कोमल व तुकतुकीत राहू शकते. या गोळीचे जे तीन घटक आहेत ते अँटिऑक्सिडंट असून, त्यात उतींचा ऱ्हास रोखण्याची क्षमता आहे. लायकोपिन हे टोमॅटोत आढळणारे द्रव्य घेऊन ते मानवी पेशीत शोषले जाईल अशा स्वरूपात आणले आहे. त्याला सी जीवनसत्त्व व आयोसोफ्लॅव्होन्सची जोड आहे. यातील आयोसोफ्लॅव्होन्स हे सोयाबीनमधून घेतले आहे. आर्थिक मंदी असली तरी लोकांची सौंदर्यदृष्टी कायम असून, त्यावर ब्रिटनमध्ये वर्षांला ७०० दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त खर्च होत आहे. ग्लासगो येथील सौंदर्य उपचारतज्ज्ञ केरिन बोंग यांनी सांगितले की, या गोळीचे परिणाम चांगले आहेत यात शंका नाही, पण ज्यांच्यावर प्रयोग करण्यात आला त्यांची संख्या कमी आहे.
Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad