Thursday, February 4, 2010

केसांची काळजी

डॉ. रचिता धुरत,
प्राध्यापक व विभागप्रमुख,
त्वचा व गुप्तरोग चिकित्सा विभाग,
बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, मुंबई.

प्रत्येक स्त्रीला आपले केस काळेभोर, लांबलचक, घनदाट व रेशमी असावेत, असे वाटत असते; परंतु हे सौभाग्य प्रत्येकाला प्राप्त होते असे नाही, पण आपल्याला मिळालेल्या नैसर्गिक केसांची निगा योग्य तऱ्हेने राखून आपण आपले केस आकर्षक बनवू शकता.
हल्ली तरुण मंडळी केसांना आकर्षक करण्यासाठी केसांना वेगवेगळे कलर करतात. काहीजण केस सरळ करून तर काहीजण कुरळे करून घेतात. तसेच वेगवेगळ्या प्रकारची केसांची रचना करून आपल्या केसांचे सौंदर्य खुलवू शकतात.
केस धुण्यासाठी कोमट पाणी वापरावे. गरम पाण्याच्या शॉवरखाली केस धुऊ नये कारण शॉवरमधून येणाऱ्या गरम पाण्याची तीव्रता लक्षात येत नाही. त्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. केस धुताना जोरजोरात घासू नये त्यामुळे केसातील क्युटिकलला इजा पोहोचते व केस राठ होण्याची शक्यता असते.
केस चमकदार करण्यासाठी कंडिशनरचा वापर आठवडय़ातून एकदा तरी करावा. शाम्पू केलेल्या केसांवर लिंबूपाणी घालूनसुद्धा केस चमकदार करता येतात.
केसांची निगा राखताना केसांचे आरोग्य व केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी वापरली जाणारी प्रसाधने यांचा विचार करणे आवश्यक आहे. केसांच्या आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे केसांची स्वच्छता व संतुलित आहार.
केसांची उत्तम स्वच्छता राखण्यासाठी कोणता/ कुठला शाम्पू वापरावा, केस आठवडय़ातून किती वेळा धुवावे, केसांना तेल लावावे किंवा लावू नये, केस कसे सुकवावे अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण करत असतो.
केस सुकवताना जास्त काळजी घ्यावी लागते. केस ओले असताना विंचरू नयेत कारण केस तुटण्याची शक्यता अधिक असते. केस ओले असताना कमकुवत असतात. केस धुतल्यावर टॉवेलने केसांचा घट्ट आंबाडा बांधू नये. केसांचे पाणी टॉवेलने टिपावे व केस दोन भागांत विभागून सुकवावे. केस सुकवताना गरम हेअर ड्रायरचा वापर शक्यतो टाळावा. केस उन्हात सुकवू नये. पंख्याखाली केस सुकवणे अधिक चांगले. केस वाळवताना केस झटकू नये. केस साधारण ओलसर असताना थोडे केसांना तेल किंवा live-on conditioner चोळावे त्यामुळे केस मऊ राहण्यास मदत होते.
केस धुण्यापूर्वी केसांच्या मुळापासून टोकापर्यंत खोबरेल तेल लावल्यामुळे केसांमधील आद्र्रता टिकून राहते. केस मऊ होतात; परंतु फार जास्त प्रमाणात केसांना तेल चोळल्यावर शाम्पूसुद्धा केस साफ करण्यासाठी जास्त प्रमाणात वापरावा लागतो व त्यामुळे केस अधिक कोरडे होऊ शकतात.
तुमचे केस कोरडे असतील तर दररोज केस धुऊ नये. टू इन वन (कंडिशनरमिश्रित) शाम्पू न वापरता वेगळ्या कंडिशनरचा वापर केस धुतल्यानंतर करावा. आपल्या केसांसाठी योग्य असलेल्या एकाच ब्रॅण्डचा शाम्पू व कंडिशनर वापर करावा.
Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

1 comment:

  1. mmm nice article mam actually i would like to tel you iam a 24 old man but i need to this on hair aslo ... thanks a lot for this article keep it up
    my blog

    http://thodamazapan.blogspot.com/

    ReplyDelete

ad