Friday, January 22, 2010

तरुणांची स्वास्थ्याबद्दल जागरुकता

- डॉ. आरती दिनकर
होमिओपॅथी तज्ज्ञ, समुपदेशक, पणजी-गोवा

उदास, खिन्न राहून स्वतःवरच दया, कीव करायची व मानसिक संतुलन बिघडवून घ्यायचं, असे अनेक तरुण बघण्यात येतात. विशेषतः तरुणांमध्ये निरुत्साह जाणवतो. आजच्या तरुणांना स्वामी विवेकानंदांसारखी निष्ठा, जागृती व जोम यांची आवश्‍यकता आहे.

आजच्या तरुणाला गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची. वेळेवर योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, तर तरुण वयात अनेक विकृतींमध्ये तरुण गुरफटला जातो. मन विकृत असेल किंवा स्वतःमध्ये मोठा काहीतरी दोष आहे, असा विचार मनात आणला, तर आपण आयुष्यात आनंद उपभोगू शकणार नाही. उदास, खिन्न राहून स्वतःवरच दया, कीव करायची व मानसिक संतुलन बिघडवून घ्यायचं, असे अनेक तरुण बघण्यात येतात. विशेषतः तरुणांमध्ये निरुत्साह जाणवतो. आजच्या तरुणांना स्वामी विवेकानंदांसारखी निष्ठा, जागृती व जोम यांची आवश्‍यकता आहे.

निनाद- कॉलेजमध्ये जाणारा मुलगा. अशक्त, निरुत्साही. क्‍लिनिकमध्ये आला तेव्हा संकोचाने बोलतच नव्हता. "मी...मला ' असं त्याचं चाललेलं. "हं, बोल ना, काय होतंय?' "नाही.... कसं सांगू, याचा विचार करतोय.' "तू सांगितल्याशिवाय मला तुझा प्रॉब्लेम कसा कळणार? तू असं कर, बाहेर थांब. मनाची तयारी कर. मनात पक्कं ठरव काय बोलायचं ते. तोपर्यंत मी दुसरा पेशंट घेते,' असं मी त्याला म्हटलं. तेव्हा तो दबकतच म्हणाला, "नाही, सांगतो ना. मला झोपेत वीर्यपात होतो. बहुतेक वेळा रोजचं. अभ्यासात लक्ष लागत नाही. अतिशय थकवा जाणवतो.' एका दमात तो बोलला. "तुला स्वप्नं पडतात?' मी. "हो.' तो. "कसली?' निनाद गप्पच. "सांग ना तुला स्वप्न कशाविषयी पडतात?' निनाद खाली जमिनीकडे बघून सांगू लागला. "मला, कॉलेजमधील एक मुलगी आवडते. मी तिला आवडतो की नाही, ते माहीत नाही. आम्ही भेटतो, बोलतो. घरी आलो, की वारंवार तिचा विचार मनात येतो.'

निनादचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला. मी म्हटलं "निनाद, तुला असं वाटत नाही का, की तुझं लक्ष अभ्यासावर केंद्रित व्हायला हवं. तुझं शिक्षण अजून पूर्ण व्हायचं आहे. मग व्यवसाय किंवा नोकरी, त्यात स्थिरस्थावर होणं, मग संसार. हे जीवनातले टप्पे आहेत. मन चांगल्या उद्योगात गुंतव. अभ्यास तर करच. त्याचबरोबर चांगली पुस्तकं वाच. थोर महात्म्यांची चरित्र वाच. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, लोकमान्य टिळक वगैरे; तसंच मूड बदलेल असं विनोदी साहित्य वाच. असं वाचन तुझ्या मनावर चांगला परिणाम करील. मी तुला त्यावर होमिओपॅथिक औषधं देते; पण रात्री लवकर झोप, सकाळी लवकर ऊठ. व्यायाम, सूर्यनमस्कार घाल. मुख्य म्हणजे तुझ्या मनोवृत्तीला समर्थन मिळेल, असं प्रेरणात्मक वाचन कर. वेळ मिळत नाही, अशी फुटकळ कारणं सांगू नकोस. टीव्हीसमोर बसून वेळ जातोच ना. असा कितीतरी वेळ दिवसभरात वाया जातच असतो.'

तरुण वयात असं होणं हे नैसर्गिक आहे; पण वारंवार वीर्यपात होत असेल तर मात्र अशक्तपणा, निरुत्साह जाणवतो. बरेचदा अनेक तरुणांना इच्छेविरुद्ध वीर्यपात होतो, तर काहींना स्वप्नं पडून, तर काहींना झोपेत स्वप्नाशिवायही वीर्यपात होतो; तसंच जंत, शौचास साफ न होणं, अजीर्ण, ताप, हस्तमैथुनासारख्या सवयी त्याला कारणीभूत आहेत.

निनादनं विचारलं, "होमिओ औषधांचे साइड इफेक्‍ट होणार नाहीत ना? किंवा वीर्य कमी होणार नाही ना?' मी म्हटलं, "अजिबात नाही. जे नैसर्गिक आहे, त्याविरुद्ध होमिओ औषधं कार्य करीत नाहीत. त्यामुळे वीर्य कमी होणार नाहीत व या औषधांचे साइड इफेक्‍ट्‌सही नाहीत, हे सर्वश्रुत आहे. तू काळजी करू नकोस. सगळं नीट होईल. तरुण वयात असं घडणं साहजिक आहे; पण फार प्रमाणात असं होऊन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून तर होमिओपॅथी औषधं देते, ती घे.'

ओम व्यवसायानं आर्किटेक्‍ट आहे. नुकताच स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय. अजून लग्न व्हायचंय; पण आताच केस पांढरे व्हायला लागलेत. अपचनाच्या तक्रारी, गॅस, पोट फुगतं, भयंकर भूक लागते. भुकेच्या वेळी काही खाल्लं नाही, तर पोटात जळायला लागतं. भगभगतं, तहान खूप लागते. थोडे श्रम केले तरी थकवा येतो. कोणत्याही ऋतूत तळपायाला, तळहाताला, केसात घाम येतो. व्यवसाय नुकताच सुरू केल्यामुळे टेन्शन असतं. आई-वडील म्हणत होते नोकरी कर; पण स्वतःचा व्यवसाय करायचा असा माझा हट्ट; पण आता खूप टेन्शन येतं. रात्री कधी झोप येते, कधी नाही. ओमनं विचारलं, खूप केस पिकलेत, त्याचं प्रमाण कमी होईल ना? केस काळे होतील ना. मी हसत म्हटलं, तू मनावर घेतलंस तर... म्हणजे होमिओ औषधांबरोबर तुझ्या खाण्याच्या सवयी बदलायला हव्यात. वेळच्या वेळी खायला हवं. जागरणं नकोत. तुझे केस पांढरे होण्याचं मुख्य कारण कळलं. औषधं सुरू केल्यावर ओमची पचनशक्ती सुधारली. घाम येणं कमी झालं. आता थकवा येत नाही. कामात उत्साह आहे. होमिओ औषधांबरोबर त्याच्या खाण्याच्या सवयी, आहारविहार योग्य ठेवला, त्यामुळे त्याला लवकर गुण आला.

पूर्वी म्हाताऱ्या लोकांना पांढऱ्या केसांचा अभिमान असायचा. त्यानुसार अनुभवाचं मोजमाप केलं जायचं. म्हातारी माणसंही "माझे केस अनुभवांनी पांढरे झालेत' हे अभिमानानं सांगायची. म्हातारपणी केस पांढरे होणे नैसर्गिक आहे; पण आजकाल मात्र काही तरुण-तरुणींचे केस पांढरे होताना दिसतात. आता या तरुणांना तरुण वयातच केस पांढरे झाल्यामुळे अनुभव सांगायची सोय उरली नाही. आरोग्याबाबतची जागरूकता वाढली, तरी त्याबाबतचे नियम जाणिवेतून उणिवेकडे गेलेले आढळतात. केसांना तेल लावा, मालिश करा असे उपाय सांगितले, तर ते वेळेचे कारण देतात; पण वेळ मात्र कुणासाठी थांबत नाही. काळ पुढे जातो. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतात. ज्याला वेळेवर वेळेचं गणित साधायचं कळतं, तो आरोग्य जपतो. आधुनिकपणाच्या नावाखाली तेलाशिवाय केस कोरडे ठेवले, तर ते राठ होऊन गळू लागतात. केस पांढरे होऊ लागतात; तसेच अन्नात लोह, प्रथिनांची कमतरता केस गळणं, केस पांढरे होण्यास कारणीभूत ठरू शकते.

काही पेशंट्‌स विचारतात, डॉक्‍टर मी खात्रीनं बरा होईन ना? तेव्हा मला पेशंटना सांगावंसं वाटते. अरे, आपल्या आयुष्यात इतक्‍या घटना घडतात. पुढे पाच मिनिटांनी काय होईल, माहीत नसतं. त्याची कोण गॅरंटी देतं? मी पेशंटना सांगते, गॅरंटी द्यायला हे कुठल्या वस्तूचं दुकान नाही. हे "प्रोफेशन' आहे. इथे गॅरंटी, वॉरंटी नाही. विश्‍वासानं औषधं वेळच्या वेळी घ्या. डॉक्‍टर सांगतात त्याप्रमाणे आहार-विहार करा. तुमच्या निरोगी जीवनाची गॅरंटी तुमच्याच हातात आहे. मग तुम्हाला बरं होण्यास कितीसा वेळ लागणार?

वीर्यपतन किंवा स्वप्नावस्था यावर काही होमिओपॅथिक औषधं देत आहे; पण ती डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार घेणं योग्य.

1) चायना - अत्यंत वीर्यनाश होऊन अशक्तपणा येतो.
2) नक्‍सव्हॉमिका- पचनाच्या तक्रारी असतात. अनेक वेळा स्वप्नावस्था होऊन कंबर दुखते. थोड्याशा वाचनानं डोकं दुखतं.
3) सेलिनियम - एकाच दिवशी एकाहून अधिक वेळा स्वप्नावस्था होते. शौचास साफ होत नाही. शौचाच्या वेळी कुंथल्यावर वीर्यपात होतो.
4) फॉस्फरस- कामुक स्वप्नं न पडता स्वप्नावस्था होते. इंद्रियाचं वारंवार उत्थापन होतं व वेदना होतात.

याशिवाय सल्फर बर्याटाकार्ब, थुजा, बेलीस पेरीन्नीस, जल्सेमियम, ऍसिडफॉस, पिकरिक ऍसिड ही औषधंही लक्षण साधर्म्यानुसार देता येतील; पण लक्षात ठेवा डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाशिवाय औषधं घेऊ नयेत.
Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad