Saturday, December 5, 2009

निराशा... दूर ठेवा (टिप टिप टिप्स)

- प्रेमा कुलकर्णी.
अनेकांना जीवनात कमालीची निराशा वाटते. संसार, नोकरी-व्यवसायात सततचे अपयश, चिंता घातक असतात. म्हणून निराशा येऊ नये अशा प्रयत्नात राहावे. त्यासाठी...

* नकारात्मक विचारांना थारा देऊ नये. आशावादी विचार करावा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा.

* कोणतीही तीव्र प्रतिक्रिया एकदम देऊ नये. तीव्र किंवा जोराची कृती करू नये.

* आपल्या मनातील दुःख, संघर्ष अशा अनेक प्रकारच्या भावना आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ विचारी, प्रेमळ माणसांशी मनमोकळेपणी बोलून व्यक्त कराव्यात. आपल्या दुःखात कुटुंबातील माणसांना सहभागी करून घ्यावे. त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे.

* विश्‍वासातील जीवलग मित्रांबरोबर आपल्या मनातील संघर्ष, दुःख, निराशा, आर्थिक विवंचना जे असेल त्याविषयी बोलावे. यामुळे मनावरील ओझे, ताण कमी होण्यास मदत होते.

* ज्यांच्या मनात श्रद्धा आहे अशांनी प्रार्थना, नामस्मरण, आध्यात्मिक पठण सुरू ठेवावे.
त्यामुळे मानसिक बल वाढते.

* चांगल्या पुस्तकांचे वाचन करावे. खेळात भाग घ्यावा. विनोदी, आनंदी चित्रपट पाहावा. जवळपासच्या सहलीस जावे.

* मित्रांबरोबर, कुटुंबातील व्यक्तींबरोबर फिरावयास जावे, गप्पा माराव्यात.

* घरातील अगर आजूबाजूच्या लहान मुलांत मिसळावे. त्यांच्याशी खेळावे, बोलावे.
घरात पाळीव प्राणी, कुत्रे, मांजर असेल तर त्यांच्याशीही बोलावे, खेळावे.

* भरपूर पाण्याने स्नान करावे. चांगले कपडे घालावेत. विश्रांती घ्यावी. सहभोजन करावे. प्रयत्नपूर्वक चांगले विचार मनात आणावेत.

* आपल्या आवडत्या छंदात, बागकाम, संगीत इत्यादीत मन गुंतवावे.

* एकटे बसून मनात विचार करत, कुढत बसू नये. आपल्यापेक्षा अधिक दुःखी असणाऱ्यांचा विचार करावा. शेवटी चांगलेच घडेल, असा विश्‍वास बाळगावा.

* आत्मघातकी विचारांना बिलकूल थारा देऊ नय. जीवन अनमोल आहे. आपण कोणाला तरी हवे आहोत. आपणावर कोणी अवलंबून आहे, कोणी वाट पाहत आहे. जेवणासाठी, आपल्यासाठी थांबले आहे, याची जरूर आठवण ठेवावी.

* आत्मविश्‍वास ठेवावा, वाढवावा. "धीर धरी रे, धीरापोटी फळे रसाळ गोमटी.'

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

ad