Wednesday, November 18, 2009

लवकर निजे, लवकर उठे -2

निसर्गचक्राला धरून केलेली प्रत्येक गोष्ट आरोग्यासाठी चांगली असते. वेळेवर झोपणे व वेळेवर उठणे हे निसर्गचक्राला धरून तर आहेच, शिवाय अतिशय सोपे व सर्वस्वी आपल्या हातात आहे. "लवकर निजे, लवकर उठे' असे म्हणताना त्यात पुरेशी झोप घ्यावी, हेही सांगितलेले आहे. आरोग्याच्या दृष्टीने दुपारची झोप किंवा जागरण टाळायला हवे.
- डॉ. श्री बालाजी तांबे


आरोग्यरक्षणासाठी शंभर टक्के आपल्या हातात असलेली आणि अगदी सहजपणे कोणालाही करता येईल अशी एकमेव गोष्ट म्हणजे लवकर झोपणे व लवकर उठणे. झोपणे व उठणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी वाटल्या, तरी त्या परस्परसंबंधित असतात. लवकर उठले की लवकर झोप येते आणि लवकर झोपले की लवकर उठणेही सोपे जाते.

ब्राह्ममुहूर्तावर उठा
दिनचर्येची सुरवात अर्थातच उठण्याने होते. आयुर्वेदात नुसतेच लवकर उठावे एवढे सांगितलेले नाही, तर ब्राह्ममुहूर्तावर उठावे, असे सांगितले आहे.
रात्रेः उपान्त्यो मुहूर्तो ब्राह्मः ।
अहोरात्रीचा शेवटचा मुहूर्त म्हणजे ब्राह्ममुहूर्त. आयुर्वेद, ज्योतिषशास्त्र वगैरे प्राचीन भारतीय शास्त्रात मुहूर्त हे कालगणनेचे एक मान सांगितले आहे. 24 तासांचे जर 15 भाग केले, तर त्यातला एक भाग म्हणजे एक मुहूर्त. म्हणजेच एक तास 36 मिनिटे. रात्रीचा शेवटचा मुहूर्त असताना, म्हणजे साधारणपणे सूर्योदयापूर्वी दीड तास असताना उठणे म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर उठणे. आयुर्वेदात सांगितले आहे,

ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत्‌ स्वस्थो रक्षार्थमायुषः। तत्र सर्वाघशान्त्यर्थं स्मरेच्च मधुसूदनः।। ...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान
आयुष्याचे रक्षण करण्यासाठी निरोगी मनुष्याने ब्राह्ममुहूर्तावर उठावे व सर्व पाप, सर्व संकटे दूर होण्यासाठी मधुसूदनाचे स्मरण करावे.
ब्रह्म शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ब्राह्ममुहूर्त हा ज्ञानोपासना करण्यासाठी सर्वोत्तम काळ समजला जातो. विद्यार्थ्याने अभ्यास करण्यासाठी, एखाद्या कलावंताने कलेची उपासना करण्यासाठी, तसेच साधकाने साधना करण्यासाठी ब्राह्ममुहूर्त उत्तम असतो. मन एकाग्र होणे, बुद्धी-स्मृती-मेधा वगैरे प्रज्ञाभेद सर्वाधिक कार्यक्षमतेने काम करणे साध्य होण्यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उपासना, साधना करणे चांगले असते, असे समजले जाते.
ब्राह्ममुहूर्तावर उठल्यावर अजून एक गोष्ट आपोआप साध्य होते व ती म्हणजे मलविसर्जन व्यवस्थित होते. आयुर्वेदात सांगितले आहे,

जातवेगः समुत्सृजेत्‌। ...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान

आयुष्याची इच्छा करणाऱ्या व्यक्‍तीने ब्राह्ममुहूर्तावर उठून वेग उपस्थित झाल्यास अडवू नये. मलविसर्जन ही क्रिया वाताच्या आधिपत्याखाली येते. निसर्गचक्रासारखेच शरीरातही वात-पित्त-कफदोषाचे एक चक्र असते. यात अहोरात्र- म्हणजे 24 तासांचे सहा विभाग केलेले असतात. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या 12 तासांचे तीन भाग केले तर त्यातला पहिला भाग कफाचा, दुसरा पित्ताचा व तिसरा वाताचा असतो. म्हणजेच दिवसाच्या पहिल्या एक तृतीयांश भागात कफदोषाचे आधिक्‍य असते, मधल्या एक तृतीयांश भागात पित्तदोष विशेषत्वाने कार्यक्षम असतो तर शेवटच्या एक तृतीयांश भागात वातदोष अधिक उत्कट होत असतो. दिवसाचे हे चक्र रात्रीही याच क्रमाने पुन्हा होते.

विसर्जन क्रिया वाताच्या आधिपत्याखाली येत असल्याने ती क्रिया सकाळी कफाचा काळ सुरू होण्यापूर्वी, म्हणजे सूर्योदयापूर्वी होणे उत्तम असते. वाताच्या काळात वाताची क्रिया अधिक चांगल्या प्रकारे होत असल्याने सकाळी लवकर उठल्याने पोट साफ व्हायला खूपच चांगला हातभार लागत असतो. नियमितपणे रोजच्या रोज पोट साफ झाले तर त्यामुळे अनेक रोगांना प्रतिबंध होऊ शकतो व आरोग्य नीट राहू शकते हे सर्वज्ञात आहे.

पुरेशी झोप घ्या
"लवकर निजे लवकर उठे' असे म्हणताना त्यात पुरेशी झोप घ्यावी हेही सांगितलेले आहे. वय, प्रकृती, काम, हवामान वगैरे अनेक गोष्टींवर झोपेचे प्रमाण अवलंबून असते. उदा.- लहान मुलांना मोठ्यांपेक्षा जास्त झोप मिळणे आवश्‍यक असते. वात, तसेच पित्त प्रकृतीच्या व्यक्‍तींना स्वभावतःच झोप कमी असते, पण वास्तविक त्यांनी पुरेसे व शांतपणे झोपणे आवश्‍यक असते. शारीरिक श्रम, प्रवास करणाऱ्यांना झोप थोडी जास्त लागू शकते. तसेच शरीरशक्‍ती कमी असणाऱ्या ऋतूत झोपेची आवश्‍यकता वाढू शकते. योग्य वेळेला, योग्य प्रमाणात घेतलेली झोप आहाराप्रमाणेच शरीराचे पोषण करत असते, असे आयुर्वेदात सांगितले आहे.

आहारादिवत्‌ निद्रा देहस्थितिकारिणी तथा सुखदुःखे, पुष्टिकार्श्‍ये, बलाबले, वृषताक्‍लीबता ज्ञानाज्ञानं जीवितमरणं च निद्रायत्ते ।। ...चरक सूत्रस्थान
आहाराप्रमाणेच झोपसुद्धा देहस्थितीची कारक असते. योग्य झोपेमुळे सुख, पुष्टी, बल, वृषता, ज्ञान, जीवन या सर्व गोष्टी अवलंबून असतात; तर अयोग्य झोपेमुळे दुःख, कृशता, अशक्‍तता, नपुंसकता, अज्ञान, मरणसुद्धा येऊ शकते. बऱ्याच जणांना दुपारी झोपण्याची सवय असते, पण दिवसा झोपणे कफ-पित्त वाढविणारे असते. शिवाय त्यामुळे स्थूलता, आम्लपित्त, मधुमेह वगैरे अनेक विकारांना आमंत्रण मिळू शकते. शिवाय दिवसा झोपण्याने रात्री वेळेवर झोप येत नाही. म्हणजे "लवकर निजे लवकर उठे' सांभाळणे अवघड होऊन बसते.

जागरणाचे दुष्परिणाम
'लवकर निजे लवकर उठे' या उक्‍तीला नाट लागतो तो जागरणामुळे. जागरण झाले की सकाळी उशिरा उठणे ओघाने आलेच. बऱ्याचदा असे दिसते, की "जागरण करू नका' असे सांगितले की समोरची व्यक्‍ती "पण मी सकाळी उशिरा उठतो, माझी झोप पूर्ण होते,' असे सांगते. पण झोपेच्या बाबतीत पुरेशा तासांइतकेच महत्त्व योग्य वेळी झोप घेण्यालाही असते, हे लक्षात घ्यावे लागते. रात्रीच्या जागरणांनी अंगात रुक्षता वाढते, वात वाढतो, तसेच पित्तही वाढते. उशिरा उठल्याने अंग जड होते, उत्साह वाटत नाही, शौचाला साफ होत नाही.
अवेळी झोपण्याने शरीरावर काय दुष्परिणाम होतात, हे आयुर्वेदात सांगितलेले आहे...
अकालशयनात्‌ मोह-ज्वर स्तैमित्य-पीनस-शिरोरुक्‌-शोफ-हृल्लास-स्रोतोरोध-अग्निमंदता भवन्ति । ...अष्टांगहृदय सूत्रस्थान

अवेळी झोपल्याने, म्हणजेच रात्री उशिरा, जेवणानंतर लगेच, दुपारी दोनप्रहरी झोपणे वगैरे प्रकारे झोपण्याने :

* विचारांचा गोंधळ होतो.
* शरीर थिजलेले वाटते.
* वारंवार सर्दी, डोकेदुखीचा त्रास जाणवतो.
* अंगावर सूज येते.
* मळमळ होते.
* शरीरातील स्रोतसे अवरुद्ध झाल्याने शरीर आंबल्यासारखे वाटते.
* अग्नी मंद होतो.

निसर्गचक्राला धरून केलेली प्रत्येक गोष्ट आरोग्यासाठी चांगली असते हे सर्व जाणतातच. वेळेवर झोपणे व वेळेवर उठणे हे निसर्गचक्राला धरून तर आहेच, शिवाय अतिशय सोपे व सर्वस्वी आपल्या हातात आहे. तेव्हा "लवकर निजे लवकर उठे, त्यासी ऋद्धी-सिद्धी भेटे' या उक्‍तीचा अनुभव घेऊन पाहावा हे उत्तम!


योग्य व पुरेशा झोपेचे फायदे
पुरेशी व योग्य झोप मिळते आहे का, हे समजण्यासाठी आयुर्वेदाने योग्य झोपेचे सांगितलेले फायदे बघायला हवेत.
कालशयनात्‌ पुष्टिवर्णबलोत्साह अग्निदीप्तिअतंद्रा धातुसात्म्यानि भवन्ति।
...सुश्रुत चिकित्सास्थान
* शरीर पुष्ट होते. या ठिकाणी पुष्ट शब्दाचा अर्थ जाड होणे, असा अपेक्षित नाही, तर सर्व धातूंनी शरीर संपन्न असणे म्हणजे पुष्ट असणे.
* पुरेशा व योग्य वेळेला घेतलेल्या झोपेने कांती उजळते, शरीरवर्ण उत्तम राहतो.
* शरीराची ताकद, स्टॅमिना चांगला राहतो.
* उत्साह म्हणजे आपणहून काहीतरी छान करण्याची भावना तयार होते, सर्जनता वाढते.
* अग्नी प्रदीप्त होतो, पचन सुधारते.
* डोळ्यांवर झापड वगैरे येत नाही.
* सर्व धातू समस्थितीत राहतात.

- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405

No comments:

Post a Comment

ad