Sunday, October 11, 2009

ऑस्टिओपोरोसिस


'अस्सल लाकूड
भक्कम गाठ
ताठर कणा
टणक पाठ'
असे कवी वसंत बापट यांनी वारा खात, गारा खात उन्हात ताठ वावरणाऱ्या एका कार्यकर्त्याचे वर्णन केले आहे. ज्याची हाडे भक्कम आहेत, अशा कुणासाठीही हे वर्णन चालू शकेल. पण या लाकडाचा आतून भुगा होऊ लागला की झाडही वाकू लागतं. हाडांमध्ये जाळी होऊ नये, ती ठिसूळ होऊ नयेत याची काळजी प्रत्येकानेच घ्यायला हवी.
ऑस्टिओ म्हणजे हाड व पोरोसिस म्हणजे सच्छिद्रता, ठिसुळता. तेव्हा हाडे ठिसूळ होणे म्हणजे ऑस्टिओपोरोसिस. वास्तविक हाडांचा सापळा हा शरीराचा भक्कम साचा असतो. या साच्याच्या आधारानेच शरीर बांधलेले असते. ताठपणे उभे राहायचे असेल, तर मुळातला हा साचा भक्कम असावा लागतो. ऑस्टिओपोरोसिसमध्ये मात्र साच्यातला कणखरपणा कमी होत असतो.
हाडांच्या संरचनेबद्दल आयुर्वेदात सांगितले आहे-
देहे शरीरधारकः कठिनतमः सारो धातुः।।...सुश्रुत सूत्रस्थान
शरीर धारण करणारा सर्वांत कठीण, सारस्वरूप असणारा धातू म्हणजे अस्थिधातू होय.
अस्थ्नोः जनिः स्वोष्मणः कृतः
पृथिव्यग्न्यनिलादीनां संघातः खरत्वं प्रकरोति।
ततोऽस्य नृणामस्थि जायते।
अस्थ्नां मध्ये समीरिणः सौषिर्यं करोति।
...चरक चिकित्सास्थान
पृथ्वी, अग्नी आणि वायू यांचे एकत्र पचन होत असताना कठीणत्व तयार होते, त्यातून अस्थी तयार होतात. वायू अस्थींमध्ये पोकळी वा सच्छिद्रता निर्माण करतो.
तत्स्वरूपम्‌ कठिनं स्थिरं, मज्जपूर्णं सुषिरम्‌।
...अष्टांग हृदय, काश्‍यपसंहिता
हाडे कठीण असतात, स्थिर असतात, सच्छिद्र व मज्जेने भरलेली असतात. पृथ्वी महाभूताचा संबंध असल्याने हाडे कठीण व स्थिर असतात आणि वायू महाभूताचा संबंध असल्याने हाडांमध्ये सच्छिद्रता असते. मज्जाधातू राहावा म्हणून हाडांमध्ये उचित पोकळी असते.
मात्र, अस्थिधातूमधील पृथ्वी, अग्नी व वायू यांचे संतुलन बिघडले, की अस्थींमधली स्थिरता कमी होते व सच्छिद्रता वाढायला लागते आणि त्यातूनच ऑस्टिओपोरोसिसची सुरवात होते.
रजोनिवृत्तीनंतरही शरीरात वातदोष वाढत असल्याने ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्‍यता वाढते. वयानुसार वाढणाऱ्या वाताला नियंत्रित केले नाही, तर त्यामुळेही अस्थी धातूतील सच्छिद्रता वाढू शकते. याशिवाय बाळंतपणानंतर वातदोषाला संतुलित करण्यासाठीचे उपचार न करणे, हाडांना पोषक आहारपदार्थांचे सेवन न करणे, स्त्रियांच्या बाबतीत अंगावरून पांढरे जाणे, शरीरावश्‍यक धातू खर्च होणे, पुरुषांमध्ये शुक्रधातू अति प्रमाणात खर्च होणे यांसारख्या अनेक कारणांनी हाडांमध्ये वात वाढून ऑस्टिओपोरोसिसची संप्राप्ती सुरू होऊ शकते.
ऑस्टिओपोरोसिसमध्ये हाडांची स्थिरता, घनता कमी होत असल्याने हाड मोडण्याची शक्‍यता वाढते. याशिवाय अस्थिक्षयाची म्हणून आयुर्वेदात सांगितलेली लक्षणेही दिसू लागतात.
लक्षणे -
केशलोमनखश्‍मश्रु द्विजप्रपतनं श्रमः।
ज्ञेयमस्थिक्षये लिङगं सन्धिशैथिल्यमेव च।।
...चरक सूत्रस्थान
- केस, रोम, मिशा वगैरे झडणे
- नखे न वाढणे वा तुटणे
- दात तुटणे
- सांध्यांमध्ये शैथिल्य उत्पन्न होणे
- थोड्याही श्रमाने थकवा येणे
याखेरीज ऑस्टिओपोरोसिसमध्ये सामान्यतः दिसणारी लक्षणे याप्रमाणे होत-
- हात-पाय दुखणे
- सांधे दुखणे
- तोंड कोरडे पडणे
- ताठ उभे राहता न येणे
- कंबर-पाठ दुखणे
- अशक्‍तता जाणवणे
प्रतिबंधात्मक उपाय -
आयुर्वेदिक जीवनशैलीमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत, की त्यांचा रोजच्या जीवनात समावेश केला, तर ऑस्टिओपोरोसिसला प्रतिबंध करता येईल.
अभ्यंग- अंगाला नियमित तेल लावणे व ते आतपर्यंत जिरवणे हे सर्व धातूंसाठी पोषक सांगितले आहे. शास्त्रोक्‍त पद्धतीने तेल सिद्ध केलेले असेल, तर ते खरोखर आतपर्यंत जिरून अगदी हाडांपर्यंतही पोचू शकते व तेथे वातदोषाला संतुलित करून ऑस्टिओपोरोसिस होण्यास प्रतिबंध करू शकते. वाढलेला वात कमी करण्यासाठी म्हणजे ऑस्टिओपोरोसिसमुळे झिजणाऱ्या हाडांना पुन्हा बळकट करण्यासाठीही अभ्यंग करण्याचा उपयोग होताना दिसतो.
व्यायाम - प्रकृतिनुरूप योग्य व्यायाम करण्याने सर्व शरीरधातू स्थिर होतात, सशक्‍त बनतात, असे सांगितले जाते. म्हणूनच नियमित व्यायामाने वात संतुलित ठेवता आला, की त्यामुळे ऑस्टिओपोरोसिसला प्रतिबंध होऊ शकतो. व्यायामाच्या बाबतीत लक्षात घ्यायला हवे, की अतिव्यायाम, शरीरशक्‍तीचा विचार न करता केलेल्या व्यायामामुळे वात वाढून अपाय होऊ शकतो. तेव्हा शरीर दृढ होईल, असा व्यायाम करणेच चांगले.
झोप - योग्य वेळेला योग्य प्रमाणात झोपणे हे सुद्धा धातुपोषक असते; तसेच शरीरदृढता, शरीरशक्‍ती टिकविण्यासाठी महत्त्वाची असते. रात्र-रात्र जागरण करणे, आवश्‍यकतेपेक्षा कमी झोपणे यामुळे वात वाढून उलट ऑस्टिओपोरोसिसला हातभार लागू शकतो.
संतुलित आहार - आहारात सातही धातूंचे पोषण होईल अशी तत्त्वे असावीत, असे आयुर्वेद सांगतो; तसेच घेतलेला आहार पचून अंगी लागेल व सातही धातू सशक्‍त राहतील यासाठी मुळात पचनसंस्था व्यवस्थित असणे आवश्‍यक असते. हे दोन्ही हेतू साध्य होण्यासाठी संतुलित आहार खूप महत्त्वाचा ठरतो. ऑस्टिओपोरोसिस टाळण्याच्या दृष्टीने आहारात दूध, खारीक, तुपात तळलेल्या डिंकाची लाही, शतावरी कल्प वगैरे पदार्थ असणे अपेक्षित होय.
औषधे घेताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, की औषधे शरीरात सात्म्य व्हायला पाहिजेत, म्हणजे पचन झाले पाहिजे. शिवाय रासायनिक औषधे उष्ण पडणार नाहीत व इतर कोठली रिऍक्‍शन येणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल. मौक्‍तिक, प्रवाळ या नैसर्गिक वस्तू उष्ण नसतात.
थोडक्‍यात, योग्य उपचार केले, आहारात योग्य ती काळजी घेतली, तर ऑस्टिओपोरोसिसची भीती बाळगायची गरज नाही.
ऑस्टिओपोरोसिसवर काही सामान्य उपाय सांगता येतील -
- अंगाला नियमितपणे तेल लावणे. हे तेल वातशामक औषधांनी सिद्ध केलेले आहे व आत हाडांपर्यंत जिरण्याच्या क्षमतेचे आहे याची खात्री असायला हवी.
- आहारात वातशमनाच्या दृष्टीने घरचे ताजे लोणी, साजूक तूप, मधुर चवीच्या पदार्थांचा समावेश करणे.
- सेवन केलेला आहार हाडांपर्यंत पोचू शकेल यासाठी पचन व्यवस्थित ठेवणे.
- आहारद्रव्यांपैकी दूध, खारीक, डिंकाचे लाडू वगैरेंचा, तर औषधद्रव्यांपैकी अश्‍वगंधा, प्रवाळभस्म, शंखभस्म, शतावरी, बला वगैरेंचे सेवन करणे.
- कपभर दुधात चमचाभर खारकेची पूड टाकून मंद आचेवर थोडेसे उकळून पिणे.
- प्रवाळपंचामृत, मुक्‍ता वटी, कॅल्सिसॅन, पित्तशांती वगैरे नैसर्गिक कॅल्शियमयुक्‍त योगांचे सेवन करणे.
- पुनर्जीवनाच्या दृष्टीने शास्त्रोक्‍त पद्धतीने विरेचन घेणे व नंतर अस्थिपोषक द्रव्यांनी; तसेच तिक्‍तरसयुक्‍त द्रव्यांनी सिद्ध तेल व दुधाची बस्ती घेणे.
- गंध तेल, च्यवनप्राश, "मॅरोसॅन', "सॅनरोझ'सारख्या रसायनांचे सेवन करणे.
ऑस्टिओपोरोसिसवर उपचार करताना ...
- वातदोष संतुलित करणे.
- हाडांना पोषक तत्त्वांचा पुरवठा करून अधिकाधिक झीज होण्यास प्रतिबंध करणे.
- एकंदर शरीराचे पुनर्जीवन करून झालेली झीज भरून काढणे.

- डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment

ad