मनुष्याच्या शरीरातला अस्थिधातू नीट पोसला गेला नाही, तर हाडे कमकुवत वा भुसभुशीत होतात. अशी हाडे शरीराला एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आधार देऊ शकतात. वास्तविक पाहता हाडे 100 वर्षे व्यवस्थित काम करतील अशीच असतात. तेव्हा आयुष्यात हाडांची काळजी घेतली गेली तर अशा तऱ्हेच्या रोगाचा त्रास होऊ नये.
ऑस्टिओ म्हणजे हाडे व पोरोसिस म्हणजे छिद्रे असलेले. भुसभुशीत हाडे, असे ऑस्टिओपोरोसिस या शब्दाचे भाषांतर करायला हरकत नाही.
कोकणात आमचे एक स्वयंभू गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर अतिशय जुने आहे. आमच्या पूर्वजांपैकी एकाला दृष्टान्त देऊन श्री गणेशांनी त्या ठिकाणी वास्तव्य केले. माहेरची तांबे असलेली झाशीची राणी या गणपतीच्या दर्शनाला गेली असता त्या वेळी तिने तिचा हत्ती कोठे बांधला होता, असे सांगणारी मंडळी गावात आहेत. दर वर्षी माघी चतुर्थीला या गणपतीचा उत्सव असतो. हा गजानन नवसाला पावतो, त्याच्याशी बोलता येते, त्याला आपली संकटे सांगून सोडवून घेता येतात, अशी अनेकांची श्रद्धा असल्याने चतुर्थीचा उत्सव जोरात होतो. काळाच्या ओघात तांबे मंडळी इकडे तिकडे पसरून गेली व आज तांब्यांची फक्त एक-दोन घरे तेथे आहेत. हे मंदिर जुने असले तरी अत्यंत सुंदर आहे. बाहेर सभामंडप असून, आतल्या छोट्या गर्भागारात श्री गजाननाची मूर्ती आहे. बाहेरच्या सभामंडपाला सहजपणे कवेत घेता येणार नाहीत, असे लाकडी खांब होते. हे खांब दिसायला व आकाराला फार सुंदर असले तरी ते सभामंडपातील मोठी जागा व्यापून उभे होते. खांबाच्या अंगावर जेव्हा भोके दिसायला लागली तेव्हा नीट पाहता लक्षात आले, की खांब आतून वाळवी वा किड्यांनी पोखरले गेले आहेत. खांबांची परीक्षा करणे खूप सोपे होते. बाहेरून टिचकीने वाजवले, की आतला पोकळपणा सहज कळून येत असे. मंदिर केव्हा पडेल, याची शाश्वती वाटेनाशी झाल्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार केला. अर्थात मूळ मंदिराची कोकणी पद्धतीची बांधणी होती तशीच ठेवून संपूर्ण मंदिर स्टील वापरून पुन्हा बांधून काढले. जेणेकरून सभामंडपातील जागाही वाढली.
मंदिराचे खांब जसे पोकळ झाले, तसेच मनुष्याच्या शरीरातला अस्थिधातू नीट पोसला गेला नाही, तर हाडे कमकुवत वा भुसभुशीत होतात. अशी हाडे शरीराला एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आधार देऊ शकतात. साधारण धक्का लागला तरी हाड मोडणे, सांधे मजबूत न राहिल्याने सांध्यांच्या ठिकाणी दुखणे, अशा तऱ्हेचे विकार सुरू होतात. एकूणच हाडांमधली ताकद कमी होणे वा त्यात छिद्रे पडणे वा ती भुसभुशीत होणे, या सर्व प्रकाराला "ऑस्टिओपोरोसिस' वा "अस्थिधातूचे दौर्बल्य' असे म्हणायला हरकत नाही.
याची कारणे अनेक असू शकतात. हाडांचे पोषण करणारे सर्वांत महत्त्वाचे अन्न आहे दूध व दुधाचे पदार्थ. जाड होण्याच्या भीतीने अनेकांनी दूधदुभते बंद केले व हा विकार वाढायला सुरवात झाली. इतर पदार्थांत कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे, एवढीच गोष्ट पाहणे पुरेसे नसून, त्यातील कॅल्शियम शरीरात सुलभपणे सात्म्य होईल व शरीरात अतिरिक्त उष्णता उत्पन्न होणार नाही, या गोष्टींकडेही लक्ष देणे आवश्यक असते. अशा पदार्थांची आहारात कमतरता झाल्यामुळे हा विकार वाढणे अधिकच सोपे झाले. शिवाय मनुष्याला एकूणच सूर्यप्रकाश कमी मिळू लागला, पर्यावरण प्रदूषित झाले, गगनचुंबी खोल्यांमध्ये दोन वा तीन खोल्यांमध्ये राहणाऱ्यांना घरात तर सूर्यप्रकाश मिळेनासा झालाच; पण या उंच घरांच्या सावल्या रस्त्यावर पडल्याने रस्त्यावरही सूर्यप्रकाश मिळेनासा झाला.
हे कारणही हाडे भुसभुशीत होण्यासाठी पुरेसे असते. सारखे वातानुकूलित हवेत राहिल्यामुळे श्वसनावर व पचनावर परिणाम होऊन सरतेशेवटी याची परिणती मेदधातूच्या पलीकडे असणारे अस्थी, मज्जा व वीर्यधातू कमकुवत होण्यात होते. शिवाय सतत उभे राहून काम करणे, शरीराच्या ताकदीपलीकडे अति काम करणे, पैशाच्या लोभापायी काळवेळ न पाहता काम करणे, अशा सर्व कारणांनीसुद्धा असा विकार होऊ शकतो. अति मानसिक ताण किंवा अग्नीचे असंतुलन, हॉर्मोनल असंतुलन या कारणांमुळेसुद्धा एकूण शरीराचे संतुलन बिघडून मज्जा, अस्थी, वीर्य यावर परिणाम दिसून येतात. स्त्रियांच्या बाबतीत पाळीतील दोषांमुळे अंगावरून लाल-पांढरे जाण्याचा विकार जडल्यास पुढे हाडे भुसभुशीत होऊ शकतात. तेव्हा ऑस्टिओपोरोसिस हा रोग व्हायला एक ना दोन- अनेक कारणे असतात.
एका बाजूने घर बांधत असताना कॉंक्रिटमध्ये टाकलेल्या सळया गंजून जाऊ नयेत, जास्ती टिकाव्यात यासाठी त्यांच्यावर वेष्टण केले जाते, तर दुसऱ्या बाजूने मनुष्याच्या अस्तित्वासाठी असलेले शरीर ज्या आर.सी.सी.रूपी हाडांवर उभे आहे, त्या हाडांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.
हाडे कमकुवत होत आहेत, हे वेळच्या वेळी लक्षात आले तर ठीक असते अन्यथा मोठे त्रास होऊ शकतात. सध्या हाडे मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ती कमकुवत झाली आहेत का, हे शोधण्यावर अधिक लक्ष दिलेले दिसते. हाडांचा कठीणपणा (घनता - डेन्सिटी) शोधणारी यंत्रे निर्माण झाली आहेत. तपासणी झाल्यानंतर अनेक प्रकारच्या गोळ्या घ्यायला सांगितल्या जातात. या गोळ्या पोटात गेल्यावर स्वीकारल्या जातात किंवा नाही, त्या शरीराला सात्म्य होतात की नाही व त्यांचा शरीरावर दुसरा काही परिणाम होतो आहे का, याकडे दुर्लक्ष केले जाते. वास्तविक पाहता हाडे 100 वर्षे व्यवस्थित काम करतील अशीच असतात. तेव्हा आयुष्यात हाडांची काळजी घेतली गेली तर अशा तऱ्हेच्या रोगाचा त्रास होऊ नये. परंतु पूर्वी म्हटल्यानुसार आहारात दूध-दुभत्याचा अभाव असतो; डिंक, खारीक, शतावरी या पदार्थांची तर नावेच ऐकलेली नसतात.
आयुर्वेदाने सुचविलेली प्रवाळ, मौक्तिक, शौक्तिक वगैरेंपासून बनविलेली कॅल्शियमयुक्त औषधे शरीरात उष्णता न वाढवता हाडांना मजबुती आणतात. ही नैसर्गिक द्रव्ये थोडी महाग असल्यामुळे स्वस्तातला चुना खाण्यात काही अर्थ नाही. हाडे बळकट करण्यासाठी उपलब्ध असलेली स्वस्तातली औषधे एकूणच "भीक नको पण कुत्रा आवर' या वर्गातली असतात. स्वस्त-महाग पाहत असताना काळाचेही गणित सांभाळावे लागते, याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष केलेले दिसते. स्वस्तातला कंपास घेतल्यास दर वर्षी मुलाला नवीन कंपास घेऊन द्यावा लागल्याची उदाहरणे दिसतात. याउलट वडील इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिकताना त्यांनी वापरलेला कंपास त्यांच्या मुलाने तो इंजिनिअरिंग शिकत असताना वापरता येणार असला तर वडिलांना सुरवातीला महाग वाटणारा कंपास शेवटी स्वस्त ठरतो. अशी चांगली वस्तू घरात असल्याचे समाधान मिळते ते वेगळेच.
शरीरातील हाडे खूप महत्त्वाची असतात व या अस्थिधातूचे संरक्षण करणे, हाच ऑस्टिओपोरोसिसवरचा खरा इलाज आहे.
- डॉ. श्री बालाजी तांबे
No comments:
Post a Comment