Wednesday, February 22, 2012

ऊब प्रेमाची

डॉ. श्री बालाजी तांबे
आईच्या प्रेमाच्या शक्तीचा बाळांना लाभ होतो. वाढत्या वयातही मुलांना आत्मविश्‍वास, समंजसपणा, शहाणपण मिळतं ते आईच्या प्रेमाच्या उबेतूनच. लहान वयातच नाही, तर मोठेपणीही मनाला शांत करण्याची शक्‍ती प्रेमभावनेत असते. मनाचा गोंधळ उडणे, नेमका निर्णय घेणे अवघड जाणे, असुरक्षितता, न्यूनगंड वगैरे त्रासाच्या पाठीमागे प्रेमाची ऊब न मिळणे हे कारण असू शकते. प्रेमभाव हा समोरच्याला आश्‍वस्त करतो.

प्रेमाचा उबदारपणा, प्रेमाचा जिव्हाळा कोणाला हवाहवासा वाटत नाही? आईच्या पोटात बाळ आकार घेते, तेव्हापासूनच त्याने ही प्रेमाची ऊब अनुभवलेली असते. जन्मानंतरही आईच्या स्पर्शाद्वारा, स्तन्यपानाद्वारा ही ऊब मिळत राहणे बाळाच्या विकासासाठी आवश्‍यक असते.

स्तन्यपान हे आई व बाळाचे संबंध दृढ होण्यासाठी अत्यावश्‍यक असतेच, पण स्तन्य निरोगी व पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी आईचा प्रेमभाव, वात्सल्यभाव फार महत्त्वाचा असतो. म्हणूनच बाळंतिणीच्या मनात दुःख, शोक, रोग वगैरे भावनांचा उद्रेक होणार नाही याकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक असते. या संबंधात सुश्रुतसंहितेमध्ये सांगितले आहे,

न च क्षुधित शोकार्त श्रान्त क्रुद्ध प्रदुष्टधातु स्तन्यं पाययेत्‌ ।
...सुश्रुत शारीरस्थान

म्हणजे भूक लागली असता, मनात शोक, काम, क्रोध वगैरे भावना उद्दीपित झाल्या असता, थकवा आला असता स्त्रीने बाळाला स्तन्यपान करवू नये.

याउलट आईचे मन जेवढे प्रसन्न असेल, बाळाविषयीच्या प्रेमाने परिपूर्ण असेल तेवढा बाळाला अधिक फायदा होतो. कारण स्तन्यातील पोषक तत्त्वांबरोबर आईच्या प्रेमाच्या शक्‍तीचाही बाळाला लाभ होत असतो. प्रत्यक्षातही हा अनुभव येतो की योग्य प्रकारे स्तन्यपान मिळालेली मुले अधिक समजूतदार, शांत व शहाणी असतात, तर स्तन्यपानापासून वंचित राहिलेल्या बालकांच्यात चिडचिड, अस्वस्थता, हट्टीपणा वगैरे भावना दिसून येतात.

आश्‍वस्त करतो प्रेमभाव
लहान वयातच नाही, तर मोठेपणीही मनाला शांत करण्याची शक्‍ती प्रेमभावनेत असते. मनाचा गोंधळ उडणे, नेमका निर्णय घेणे अवघड जाणे, असुरक्षितता, न्यूनगंड वगैरे त्रासाच्या पाठीमागे प्रेमाची ऊब न मिळणे, हे कारण असू शकते.

प्रेमभाव हा समोरच्याला आश्‍वस्त करणारा असतो, श्रद्धा, विश्‍वास वाढविणारा असतो. म्हणूनच उपचार करताना वैद्याने रुग्णाला औषधांबरोबरच विश्‍वासाची, प्रेमाची ऊब समोरच्याला देण्यासाठी तयार असावे, असे शास्त्र सांगते. वैद्याची लक्षणे सांगताना "प्रियदर्शन' असा शब्द वापरला आहे. तसेच "रोगिणो यश्‍च पुत्रवत्‌ समुपाचरेत्‌' असेही वर्णन केले आहे. प्रियदर्शन म्हणजे वैद्याचा आविष्कार सौम्य, प्रसन्न आणि समोरच्या रुग्णाला आश्‍वस्त करणारा असावा. वैद्याच्या एकंदर आविर्भावातून रुग्णाला आपण बरे होऊ हा विश्‍वास वाटायला हवा. त्रासिक मुद्रा, कपाळावर आठ्या किंवा स्वतः वैद्याच्याच डोळ्यांत अविश्‍वासाचे भाव असले तर रुग्णाची बरे होण्याची उमेद कमी होईल, यात शंका नाही.

"रोगिणो यत्र पुत्रवत्‌ समुपाचरेत्‌' म्हणजे जो रुग्णाकडे पुत्रवत्‌ भावनेने पाहतो, तो खरा वैद्य होय. म्हणजे एखादी आई आपल्या मुलाला जी प्रेमाची ऊब देईल त्या भावनेने, त्या आत्मीयतेने वैद्याने रुग्णावर उपचार केले पाहिजेत, रुग्णाची काळजी घ्यायला पाहिजे. अर्थात ही आत्मीयता फक्‍त मानसिक समाधानापुरती कामाला येते असे नाही, तर रुग्णाचा विश्‍वास वाढला, श्रद्धा बसली की औषधाचा गुण अनेक पटींनी वृद्धिंगत होण्यास मदत मिळते.

वैद्यामध्ये जसा हा भाव असायला हवा, तसाच परिचारकामध्ये म्हणजे प्रत्यक्ष उपचार करणाऱ्या थेरपिस्टमध्येही प्रेमाची ऊब देण्याची प्रवृत्ती असायला हवी. अभ्यंग करताना किंवा इतर कोणतेही उपचार करताना परिचारकाचा रुग्णाशी प्रत्यक्ष संबंध येत असतो. त्यामुळे त्याच्या मनातील प्रेमाची, जिव्हाळ्याची भावना रुग्णापर्यंत प्रभावीपणे पोचू शकते. वातावरण पण फार थंड नसावे, अन्यथा खोली गरम करून घेण्याची व्यवस्था असावी व परिचारकाने आपले हात चोळून गरम करून घ्यावेत.

सद्‌वृत्त जगावे
आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र असल्याने त्यात "सद्‌वृत्त' म्हणजे रोजचे जीवन जगताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हेही सांगितले आहे.

अनुज्ञाता सुवार्तानां दीनानामनुकम्पकः । आश्‍वासकारी भीतानां क्रुद्धानामनुनायकः।। ...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान


चांगले विचार, चांगल्या गोष्टी स्वीकारण्याचा, त्यांचा प्रसार करण्याचा स्वभाव असावा. अडचणीत असणाऱ्याला मदत करण्याची तयारी हवी, भयभीत झालेल्याला आश्‍वस्त करण्याची प्रवृत्ती हवी आणि रागावलेल्याला शांत करण्याची क्षमता असावी.

या सर्व गोष्टी मनात प्रेमभाव असल्याशिवाय येऊ शकत नाहीत. कुटुंब, मित्रमंडळीच नाही, तर संपूर्ण समाजाप्रती मनात आपुलकी असली, प्रेमाची ऊब देण्याची तयारी असली, तरच या प्रकारचे सद्‌वर्तन घडू शकते.

कफप्रधान प्रकृतीचे वर्णन करतानाही क्षमाशीलता, दृढ मैत्री, पक्की भक्‍ती, गोड-आश्‍वस्त करणारे बोलणे, कृतज्ञता हे सर्व गुण सांगितले आहेत. शुक्रधातू संपन्न असणाऱ्या व्यक्‍तीही स्नेहयुक्‍त असतात, सौम्य स्वभावाच्या असतात.

थोडक्‍यात, प्रेमाची ऊब हवी असेल, प्रेमाची ऊब दुसऱ्याला द्यायची इच्छा असेल तर मन सात्त्विक राहण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, म्हणजे कफ संतुलित राहील, शुक्र कमी होणार नाही; उलट शुक्रपोषक, कफवर्धक अन्न-औषधे-रसायनांचा रोजच्या आहारात समावेश होईल याकडे लक्ष ठेवायला हवे.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad